दिगंबर शिंदे

एकेकटय़ा पातळीवर शेती करणे तसे आव्हानात्मक राहते. त्यातच द्राक्षासारखे पीक हे अत्यंत अनिश्चित आणि नाजूक असल्याने त्याचे पीक एकटय़ाच्या बळावर घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी तासगावातील द्राक्ष उत्पादकांनी एकत्र येत कंपनी स्थापन केली आहे.

शेतकरी तीन प्रकारचे असतात. एक सातबारावरचा, दुसरा बांधावरचा आणि तिसरा प्रत्यक्ष मातीशी नातं सांगणारा. मातीशी ज्याची नाळ जुळलेली असते त्याला शेती करताना येणाऱ्या अडचणी अनंत असतात, त्याची सोडवणूकही तो आपल्या आपल्या पध्दतीने करीत असतो. मात्र त्याला समस्या सुटली नाही तर तो शेजारी असलेल्या शेतकऱ्याचा सल्ला घेऊन आपली शेती अधिक लाभदायी कशी करता येईल हे पाहत असतो.

तासगाव आणि द्राक्ष बाग हे समीकरण आता नवे राहिले नाही. येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी नव-नवे प्रयोग करीत द्राक्ष शेतीला आज भरभराटीचे दिवस आणले असले तरीही शेती निसर्ग आणि बाजारपेठेशी निगडित असल्याने रोज नव-नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. हीच गरज ओळखून डोंगरसोनीच्या अभिजित झांबरे या युवकाने द्राक्ष भूमी उत्पादक कंपनीची स्थापना करून उत्पादन ते बाजारपेठ असा पल्ला गाठण्याचा संकल्प सोडला आहे.

शेतीप्रश्नांवर फक्त लिहून आणि बोलून भागत नाही तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृतीचीही जोड द्यावी लागते. बळीराजा उन्हा-तान्हात शेतात राबत असतो, कष्ट करून शेती पिकवत असतो. पण ही शेती करत असताना या शेतकरी राजाला नसनैसर्गिकगक संकटासोबतच अनेक अडीअडचणीं, समस्यांना तोंड द्यावे लागत असते. अशा वेळी या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. त्यातून द्राक्षभूमी  शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन आणि त्यातून एकत्रित प्रश्नांची सोडवणूक हे धोरण घेऊन काम सुरू केलं. आज या कंपनीच्या माध्यमातून ३०५ सभासद शेतकरी जोडले गेले आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांसाठी मोफत द्राक्ष लागवडीबाबतचा सल्ला, प्रयोगशाळेच्या माध्यमातून माती-पाणी, द्राक्षकाडी परीक्षण, द्राक्षभूमी अ‍ॅग्रो एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माफक दरात खते- औषधे, बी-बियाणांचा पुरवठा, शेतकऱ्यांची बोगस द्राक्षकाडीच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कंपनीच्या वतीने खात्रीशीर द्राक्षकाडीचा पुरवठा केला जात आहे. तसेच येत्या काही काळात कंपनीच्या माध्यमातून द्राक्ष व बेदाणा निर्यातीसोबतच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या द्राक्षमालाला योग्य भाव कसा मिळवून देता येईल, द्राक्षखरेदी नंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे त्यांना बांधावरच कसे देता येतील या दृष्टीने काम सुरू राहणार आहे.

सध्या शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोटय़ाचा होत चालला आहे. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट या सारख्या संकटांनी शेती व्यवसायातील धोका वाढत आहे, तर दुसरीकडे वाढती महागाई, खते-औषधे, शेती साहित्य व मजुरीचे वाढलेले दर यामुळे एकंदरीतच शेतीवरील उत्पादन खर्च वाढत आहे. परंतु त्यामानाने शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत येऊन आपल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असल्याचे चित्र आहे.

त्यातच इतक्या आव्हानांचा मुकाबला करून देखील विकलेल्या मालाचे, पिकाचे पैसे हाती मिळतीलच याची खात्री नसते. हक्काची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व्यापारी-दलालांकडून फसवणूक होण्याची भीती सतत आपल्या शेतकऱ्यांच्या मनात असते. अशा वेळी एक-एकटा शेतकरी या सगळ्या आव्हानांना तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे संघटितपणे शेती समोरील समस्या व आव्हानांचा मुकाबला करणे ही काळाची गरज झाली आहे. याच उद्देशाने द्राक्षभूमी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती उत्पादनासाठी परस्पर सहकार्य करणे, उत्पादित मालाच्या विक्रीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे व सहकार, सामजंस्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, शेतमालाच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, शेतकऱ्यांचा शेतीमाल जास्तकाळ टिकावा यासाठी शीतगृह व प्री कुलिंग यंत्रणा उभारणे, शेती आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणे ही उदिष्टे नजरेसमोर ठेवून कंपनी कार्यरत आहे. सभासद शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहिती देण्याबरोबरच रोग येण्यापूर्वी नेमकी काय उपाय योजना करायची, कोणती औषधे परिणामकारक असतील, ती किफायतशीर खात्रीलायक उपलब्ध करून  देणे, द्राक्ष निर्यातीसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे, चर्चासत्रातून माहितीची देवाण-घेवाण करणे आणि सहलींचे आयोजन करून अधिकाधिक अद्ययावत ज्ञान शेतक ऱ्यांना  उपलब्ध करून देणे ही सुध्दा उदिष्टे आहेत.

त्याचबरोबर काही शेतकरी या सर्व संकटावर मात करीत उत्तमरीत्या शेती पिकवत असतात, आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात, अशा वेळी या शेतकऱ्यांच्या शिवारात पीक पाहणी करून त्यांच्या कष्टाचं कौतुक करणं, त्यांना  आणखी प्रोत्साहित करणं तितकंच गरजेचं असतं. इतर शेतकऱ्यांना देखील त्या शेतकऱ्याकडून चांगली शेती करण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. त्याच बरोबर एखादा नवीन शेतकरी अनुभव नसल्यामुळे उत्तम शेती करण्यात कमी पडतोय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला देखील योग्य मार्गदर्शन मिळणं देखील आवश्यक असतं .अशा वेळी प्रत्येक शेतकऱ्यामध्ये विचारांची, ज्ञान-माहितीची देवाण-घेवाण होणे हे अत्यंत गरजेचं असतं ही बाब लक्षात घेऊन द्राक्षभूमी शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने  ‘शिवार संवाद’ या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.

या अभियानात द्राक्षशेती क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अभ्यासू व अनुभवी शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी सहभागी होतात. दर शनिवारी सकाळी दहा ते चार या वेळेत वेगवेगळ्यात गावात हे अभियान आयोजित केले जाते, या अभियानांतर्गत प्रत्यक्ष पीक पाहणी सोबतच शेतकऱ्यांशी थेट चर्चा, संवाद व शेतीसंदर्भात तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाते.

द्राक्षमालाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना द्राक्षबागेची नोंद कृषी विभागाकडे करणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच कारणांमुळे शेतकऱ्यांकडून ही नोंदणी होत नसल्याने पुढे द्राक्ष निर्यातीसाठी त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही नोंदणी वेळेवर पूर्ण व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या वेळेची व पशाची बचत व्हावी, त्यांच्या शेतीकामांचा खोळंबा होऊ नये या हेतूने द्राक्षभूमी शेतकरी उत्पादक कंपनी व तासगाव तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष निर्यातदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या नोंदणी अभियाना अंतर्गत एकाच दिवशी सावळज परिसरातील २३८ शेतकऱ्यांचे जवळपास  २८८ एकर इतके विक्रमी द्राक्ष क्षेत्राची नोंद झाली. यावर्षी कंपनीने, मिहद्रा अ‍ॅग्रो सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. यासाठी कंपनीच्या माध्यमातून शेतकरी सभासदांनी १२० एकर इतक्या क्षेत्राची नोंदणी केली आहे.

digambar.shinde@expressindia.com