हेमा देवरे

पाश्चात्त्य-पौर्वात्य हा भेद करोनाकाळही अधोरेखित करतो आहे. एकीकडे, अमेरिका आणि युरोपातले श्रीमंत, बलाढय़ देश करोना महामारीने ग्रासून गेले आहेत. जगातल्या कुठल्याही समस्येवरचा तोडगा या पाश्चात्त्य जगाकडे असणारच, या विश्वासाला प्रथमच तडा जाऊ लागला आहे, तर दुसरीकडे, पौर्वात्य देशांमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण आणि मृत्यूंची संख्या बऱ्याच अंशी कमी आहे. असे काय उपाय केले आहेत पूर्वेकडच्या देशांनी?

करोना विषाणूने घातलेले भीषण तांडव कमी होण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीत. अमेरिका आणि युरोपातले श्रीमंत, बलाढय़ देश या महामारीने ग्रासून गेले आहेत. जगातल्या कुठल्याही समस्येवरचा तोडगा पाश्चात्त्य जगाकडे असणारच, या त्यांच्यावरच्या विश्वासाला प्रथमच तडा जाऊ लागला आहे. पौर्वात्य देशांमध्ये करोनाग्रस्तांचे प्रमाण आणि कोविड-१९ बाधितांच्या मृत्यूंची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी आहे. त्यामुळे या देशांनी अशा काय उपाययोजना केल्या, हे बघणे इष्ट ठरेल..

वास्तविक तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, व्हिएतनाम, कोरिया, जपान हे भौगोलिकदृष्टय़ा चीनला जवळचे देश. त्यामुळे कोविड-१९ चा धोका त्यांनाच जास्त होता. ज्या दिवसांत करोना विषाणू झपाटय़ाने पसरत होता, त्या दिवसांत लाखो चिनी पर्यटक चिनी नववर्ष साजरे करायला चीनमधल्या विविध ठिकाणांहून या देशांत येत होते, तर या देशांमधले चिनी वंशाचे हजारो लोक चीनला जात होते.

याच पौर्वात्य देशांना चीनकडून सार्स आणि स्वाइन फ्लूचा प्रसाद मिळाला असल्याकारणाने चीनकडून नवा विषाणू येताना बघून हे देश आधीच दक्ष झाले होते. केवळ ८१ मैल दूर असलेल्या तैवान या देशाला ३१ डिसेंबरपासूनच चीनमधल्या विचित्र प्रकारच्या न्यूमोनियाची कल्पना झाली होती. जानेवारीच्या मध्याला तैवानने एक तज्ज्ञांचा गट चीनला पाठवला. चीनने मर्यादित प्रवेश देऊनही तैवानला या विषाणूच्या गंभीरतेची कल्पना आली आणि २६ जानेवारीपासून वुहानहून येणारी सर्व विमानसेवा तैवानने थांबवली. सरकारने मुखपट्टय़ा, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे केले. न वापरणाऱ्यांना दंड केला. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे शारीरिक तपमान बघूनच त्याला पुढे जाऊ दिले. दर तासा-तासाला दूरचित्रवाणीवर कोविड-१९ विषयी माहिती पुरवली. मार्चपासून तैवानहून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व विमानसेवा स्थगित करण्यात आल्या. आजपर्यंत तैवानमध्ये कोविड-१९ मृत्यूंची संख्या केवळ सहा आहे.

करोना विषाणूची समस्या उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल दक्षिण कोरियाची जगभर प्रशंसा होत आहे. द. कोरियाने ताबडतोब कोविड-१९ च्या चाचण्या तर केल्याच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षण पोशाख (पीपीई) कमी पडू दिला नाही. इटली, स्पेन, अमेरिका इथे ते कमी पडल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले. द. कोरियाच्या आरोग्यसेवेने हॉटलाइन सुरू करून फोनवर तपासण्या सुरू केल्या. लागण झाल्याचे फोनवर कळल्यावर रुग्णाला कोविड-१९च्या चाचणी केंद्रावर पाठविण्यात येऊ लागले. ड्राइव्ह इन चाचणी केंद्रेही उघडण्यात आली. करोना विषाणूच्या रुग्णाच्या उपचाराचा खर्च द. कोरियाचे सरकार करते. त्यामुळे जनतेला सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. थेगु शहरात कोविड-१९ ची लागण वाढली तेव्हा राष्ट्राध्यक्ष स्वत: तिथे गेले आणि डॉक्टर्स व परिचारिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. या काळात द. कोरियाने सर्व दृष्टीने जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

थायलंड ही चिनी पर्यटकांची आवडती जागा. चीनबाहेरचा पहिला कोविड-१९ रुग्ण १३ जानेवारीला थायलंडमध्ये आढळला होता. मात्र कोविड-१९ रुग्णांची संख्या भराभर वाढू लागल्यावर थायलंडने २२ मार्चला आणीबाणी जाहीर केली. सीमा बंद केल्या. परदेशी नागरिकांना थायलंडमध्ये यायला बंदी घालण्यात आली. थायलंडच्या ‘सोंग्क्रान’ या नव्या वर्षांच्या सणाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. पर्यटन हा प्रमुख उद्योग असलेल्या या देशावर कोविड-१९चा फार मोठा आघात झाला आहे. नागरिकांना त्याची झळ बसू नये यासाठी थायलंडने ४.५८ अब्ज डॉलर्सची इतक्या रकमेची सवलतीची कर्जे आणि प्रत्येक नागरिकाला ठरावीक रोख रक्कम जाहीर केली आहे. थायलंडमध्ये कोविड-१९ चे ५४ मृत्यू झाले आहेत.

सिंगापूर, हाँगकाँगचे नागरिक २००२ सालचा सार्सचा अनुभव गाठीशी असल्याने आपणहून जागरूक झाले. मुखपट्टय़ांचा सर्रास वापर करून सुरक्षित शारीरिक अंतर ठेवू लागले. जानेवारीच्या शेवटी चीनहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाचे विलगीकरण करण्यात आले. सिंगापूरचे नागरिक सोडल्यास इतर प्रवाशांना सिंगापूरला यायला केव्हाच बंदी घालण्यात आली. त्यामुळे टाळेबंदी न करताही सिंगापूरचे जनजीवन सुरळीत राहिले होते, ते आत्तापर्यंत. मात्र अलीकडेच कामगारांच्या वसतिगृहात कोविड-१९ ची बाधा झाली आणि रुग्ण वाढू लागले. त्यामुळे सिंगापूरमध्येही एप्रिलच्या सुरुवातीला महिनाभरासाठी टाळेबंदी करण्यात आली. सिंगापूरमध्ये कोविड-१९ च्या मृतांचा आकडा १७ आहे, तर हाँगकाँगमध्ये तो केवळ ४ आहे.

दक्षिणपूर्व आशियामध्ये सर्वात जास्त करोनाबाधितांची संख्या इंडोनेशियात आढळली आहे. जलद चाचण्यांचे अल्प प्रमाण, संरक्षक पोशाखांची कमतरता आणि आरोग्यसुविधांची टंचाई या सर्व कारणांमुळे इंडोनेशियातले कोविड-१९ चे रुग्ण वाढले. मलेशियाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. मलेशियात बेकायदेशीर निर्वासितांची संख्या खूप मोठी आहे. क्वालालाम्पूरजवळच्या मशिदीत रोहिंग्या निर्वासित मोठय़ा संख्येने जमल्यामुळे करोनाचा उद्रेक वाढला, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

फिलिपाइन्स आणि कम्बोडिया या दोन्ही देशांची ८० टक्के अर्थव्यवस्था चीनवर अवलंबून असल्याने चीनला नाराज करायला हे दोन्ही देश कचरत आहेत. उलट वुहानमधल्या करोनाकांडात कम्बोडियाचे पंतप्रधान हून सेन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांना भेटायला चीनला गेले होते.

जपानमध्ये आत्तापर्यंत टाळेबंदीची आवश्यकता भासली नव्हती. मात्र काही दिवसांपासून कोविड-१९ चे प्रमाण वाढले आहे. करोनाची लागण वाढू नये म्हणून जपानने १ एप्रिलपासूनच आणीबाणी जाहीर केली आहे. जपानच्या सुमारे १२ कोटी नागरिकांना नुकसानभरपाईदाखल प्रत्येकी ९३० डॉलर्स जपान सरकार देणार आहे.

जर पौर्वात्य देश करोना विषाणूला धैर्याने टक्कर देताना दिसत आहेत, तर पाश्चात्त्य देश कुठे कमी पडले? चीनमधून होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठय़ाशिवाय पाश्चात्त्य जगाचे पान हलू शकत नाही ही आज वस्तुस्थिती आहे. कोविड-१९ च्या सुरुवातीच्या दिवसांत हजारो चिनी कामगार थेट वुहानहून इटलीला आले होते आणि त्याच सुमारास चार लाख चिनी प्रवासी अमेरिकेतल्या अनेक शहरांत आले हे थेट कारण होतेच. त्याचबरोबर या देशांना आपली भक्कम अर्थव्यवस्था आणि सशक्त आरोग्यसेवा यावरचा अवाजवी विश्वास आणि टाळेबंदीला केलेला प्रचंड विलंब यापायी करोना विषाणूशी लढायला पाश्चात्त्य देश असमर्थ ठरलेले दिसतात. अमेरिकेने टाळेबंदी जितकी लांबवली तितके अधिक कोविड रुग्ण अमेरिकेत होत गेले. आज मृतांचा आकडा सर्वात जास्त अमेरिकेत आहे.

पाश्चात्त्य देशांप्रमाणे आंतरराष्ट्रीय संघटनाही निष्प्रभ होताना दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेवर चीनधार्जिणे म्हणून टीका होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव चीनविरुद्ध एकही पाऊल उचलू शकले नाहीत. युरोपीय समुदाय संकटग्रस्त काळात आपल्या सभासद देशांना मदत करू शकला नाही. त्यामुळे युरोपीय समुदायाच्या भवितव्यापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारताची लोकशाही करोनाचे भीषण आव्हान संयमाने आणि संकल्पाने पाळताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून टाळेबंदीचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. उत्सवप्रिय भारत देश सुरक्षित सार्वजनिक वावर ठेवण्याचा शिकस्तीने प्रयत्न करत आहे. कोविड-१९ हा निर्णायक टप्पा असून तो जागतिकीकरणाला मानवतावादी बनवू शकेल, अशी भारताची भूमिका आहे.

hemadevare@icloud.com