दयानंद लिपारे

यंदा पाऊसमान चांगले झाल्याने ऊस आणि साखरेचे विक्रमी उत्पादन होणार अशी चिन्हे दिसत असतानाच उसावर तांबेराचे संकट कोसळले आहे. या रोगाने उसाचे नुकसान होत साखरेचा उतारा आणि उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

गेली दोन वर्ष राज्यात वरुणराजाची कृपा झाली आहे. राज्यभर सर्वदूर पावसाची साथ लाभल्याने पिके जोमात असल्याचे चित्र आहे. अशी सुखावणारी स्थिती बळीराजाच्या नशिबी कमीच. चांगली लक्षणे दिसत असताना मध्येच काही अडचणीही अचानक निर्माण होऊ लागतात. यातीलच ताजे उदाहरण म्हणजे उसाला लागलेल्या तांबेरा रोगाची लागण. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना या दोघांचेही आर्थिक नुकसान करणारा तांबेरा वेळीच नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे आहे.

यंदा पाऊसमान उत्तम आहे. उसाच्या अमाप पिकामुळे साखरेचे विक्रमी उत्पादन होणार अशी चिन्हेही आहेत. त्यादृष्टीने साखर कारखान्याची यंत्रणा कधीचीच सज्ज झाली आहे. काही राज्यात उसाचे गाळप सुरु झाले आहे. मात्र त्यामध्ये गेल्या आठवडय़ात राज्यात अतिवृष्टीचा अडथळा आला. तर त्यानंतर हंगाम सुरू होत असतानाच तांबेरा रोग झपाटय़ाने पसरत चालला असल्याचे ऊस उत्पादकांचे म्हणणे आहे. याची चिंता साखर उद्योगाला लागली आहे. तांबेऱ्यामुळे ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. साखर वजन घटणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे आणि साखर उतारा घटल्यामुळे साखर उत्पादन कमी होण्याचा फटका साखर कारखानदारीला बसणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना या दोघांनाही आर्थिक झळ देणारा तांबेरा नियंत्रणात आणण्यासाठी झपाटय़ाने उपाययोजना करण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे.

राज्यातील नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. उसाची लागवड केल्यानंतर त्याची तोडणी होईपर्यंत शेतकऱ्यांना जातीने लक्ष पुरवावे लागते. मात्र अन्य पिकांच्या तुलनेत परिश्रम कमी आहेत. शिवाय, ऊस पिकाच्या आधुनिक जाती चांगल्या पद्धतीने वाढत असतात. त्यांच्यामुळे वजन आणि साखर उतारा यामध्ये ही वाढ होत असल्याचे आकडेवारी सांगते. ‘एफआरपी’ कायद्यामुळे आधारभूत दराची खात्री मिळाली असल्याने अन्य शेतमालाच्या तुलनेत इथे दराबाबतची चिंता कमी असते. परिणामी शेतकरी ऊस पीक घेण्याकडे अधिक लक्ष पुरवतो. मुख्य म्हणजे उसाच्या बरोबरीने अलीकडे विविध प्रकारची आंतरपिकेही घेतली जात आहेत. त्याचाही शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन घेण्यासाठी लाभ होत असतो. यामुळे एकूणच ऊस उत्पादन घेणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे ठरले आहे. पण सर्वार्थाने खात्रीचे ठरणारे हे पीक असले तरी त्यालाही काही रोगांचा सामना करावा लागतो. त्यापासून शेतकऱ्याला सावध राहावे लागते. अन्यथा उंच उंच पिकलेला हिरवागार ऊस रोगाला बळी पडून दीड वर्षे घेतलेली मेहनत वाया जाण्याच्या धोका असतो. विविध रोगामुळे ऊस शेतकऱ्यांना कोटय़वधी रुपयांचा आर्थिक फटका आतापर्यंत असा अनेकदा बसला आहे. त्यामुळे उसाला कुठलाही रोग होऊ नये यासाठी शेतकऱ्याला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. उपलब्ध माहितीनुसार जगात उसावर तब्बल २४० प्रकारचे रोग आढळून आल्याची नोंद आहे. भारतात त्यापैकी ५८ रोग दिसून येतात. मात्र एकाच वर्गात मोडणाऱ्या जीवाणू-विषाणूंमुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे सारखीच दिसत असल्याने त्यातील लहानसे फरक लवकर कळून येत नाही. ऊस उत्पादक शेतकरी रावसाहेब पुजारी सांगतात, की भारतातील विविध ऊस संशोधन केंद्रे अधिक उत्पादन क्षमता व जास्त साखर उतारा देणाऱ्या प्रजाती विकसित करण्याबरोबर अधिक रोगप्रतिकारशक्ती असलेल्या ऊस जाती विकसित करण्यावर भर देत आहेत. तरीही तांबेरासारखा रोग डोके वर काढतो तेव्हा शेतकऱ्यांना सजग राहून वेळीच उपाययोजना करणे भाग असते. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच हा रोग झपाटय़ाने पसरत चालला असल्याने साखर उद्योग चिंताग्रस्त झाला आहे. तांबेऱ्यामुळे ऊस पिकाचे नुकसान होते, साखर वजनही घटते. साखर उतारा घटल्यामुळे उत्पादन कमी होण्याचा फटका साखर कारखानदारीला बसतो.  एकप्रकारे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने या दोघांनाही आर्थिक झळ देणारा हा रोग आहे. त्यामुळे त्याला वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

कवकजन्य रोग

महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या उसाच्या गंभीर रोगांमध्ये तांबेरा याचाही प्रामुख्याने समावेश केला जातो. यावर्षी हाच तांबेरा शेतकऱ्यांना त्रस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्यातील प्रमुख शेतीपीक असलेल्या ऊस शेतीवर शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. त्यांच्या लक्षणाकडे वेळीच नजर असली पाहिजे. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे ठिपके पडतात. हळूहळू ठिपक्यांचा आकार वाढत जातो. उसाच्या पानांचा भुगा होत राहतो. पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिवळी होतात. पानेच खराब झाल्याने ऊस रोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होऊ लागते. उसाची वाढ खुंटून उत्पादन घटते. त्याचा जबर आर्थिक फटका सोसावा लागतो.

रोग नियंत्रणाचे उपाय

तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर ढगाळ वातावरण, जास्त आद्रता, थंड  हवा असताना अधिक प्रमाणात दिसून येतो. सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. तांबेरा रोगाचा प्राथमिक प्रसार हवा, पाणी, पाऊस व कीटक याद्वारे जास्त होतो. तांबेरा कसा आटोक्यात आणावयाचा या प्रश्नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. यासाठी उपाययोजना अशी करावी – रोगप्रतिकार ऊस जातीची लागण करावी. शिफारस नसलेल्या ऊस जातीची लागण करण्यापासून दूर राहावे. पिकाचे वय लहान असताना पाण्याचा ताण किंवा अति पाण्याचा वापर करू नये. यामुळे दलदल निर्माण होते; हे असे होणे घातक ठरू शकते. रात्रीच्यावेळी तुषार सिंचनाचा वापर करू नये. पिकास माती परीक्षणानुसार खत मात्रा द्यावी. तांबेरा रोग आढळल्यास प्रोमिनेंब, मॅन्कोझेब या बुरशी नाशकांच्या फवारण्या आलटून पालटून कराव्यात. बुरशीनाशके दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी.

अलीकडे  ऊस पिकावर आढळणाऱ्या रोगाच्या संख्येत व प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण एकाच भागात एकाच पिकाखाली वाढलेले क्षेत्र. एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, उत्तम ऊस बियाणांची कमतरता तसेच शिफारशी नसलेल्या ऊस जाती, समस्यायुक्त जमिनी, सेंद्रिय रासायनिक, जैविक व संतुलित खतांचा अनियंत्रित वापर, अपुरी आंतरमशागत, किडींचा वाढता प्रसार, पाण्याचा ताण किंवा अति पाण्याचा वापर ही ऊस रोग प्रसाराची प्रमुख कारणे आहेत. या सर्व बाबींबरोबर शेतकऱ्यांत असणारे अज्ञान, हवामानातील बदल अशा विविध कारणांमुळे रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऊस पिकास बुरशी, विषाणू, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे रोग वाढीस चालना मिळते. रोगांमुळे उसाच्या व साखरेच्या उत्पादनात घट होते. उसावर येणाऱ्या अनेक रोगांपैकी तांबेरा रोगामुळे जास्त नुकसान होते. तांबेरा हा रोग ‘पकसिनिया मोलेनोसिफाल’ या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो. तांबेरा रोगामुळे ऊस पिकांचे २० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. सततच्या पावसामुळे शेतात दलदल निर्माण होते. तपमान कमी झाल्याने तांबेरा मोठय़ा प्रमाणात वाढतो. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हा रोग मोठय़ा प्रमाणात आढळून येतो. या भागात ऊस पिकाच्या सर्व जातीवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. राज्याच्या अन्य भागातही तांबेरा डोके वर काढत असल्याचे वृत्त आहे. स्फुरद व पालाश अन्नद्रव्य कमी असणाऱ्या ऊस पिकात रोगाची तीव्रता जास्त आढळून येते.

– श्रीशैल हेगाण्णा, कृषी अधिकारी, दत्त सहकारी साखर कारखाना

dayanand.lipare@expressindia.com