News Flash

अडचणीतील कुक्कुटपालन!

देशात एकूण दहा राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

अडचणीतील कुक्कुटपालन!

गेल्या वर्षी आलेले करोनाचे संकट कायम असताना पुन्हा ‘बर्ड फ्लू’चे संकट आल्याने कुक्कुटपालन व्यवसाय पुरता अडचणीत आला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून तरुणांनी हा व्यवसाय सुरू केला. मात्र बाजारातील चढउताराचा सामना करीत असताना नसíगक संकटांचाही या व्यवसायाला सामना करावा लागत आहे. या साऱ्यातून मार्ग काढत या व्यवसायाला शाश्वत करायचे असेल, तर यातील मानवनिर्मित अडथळे दूर करण्याबरोबरच शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी जगभरात करोना नावाचे महासंकट आले आणि मानव जातीपुढे अनेक अडचणी, अडथळे उभे केले. आरोग्याबरोबरच दैनंदिन व्यवहारही या करोनाने बंद पाडले. अनेक व्यवसाय-उद्योग ठप्प झाले. यामध्ये सर्वाधिक फटका हा जगभरातील कुक्कुटपालन व्यवसायास बसला आहे. या व्यवसायाची दुर्दशा ही एवढय़ावरच न थांबता तिच्यात नुकत्याच आलेल्या ‘बर्ड फ्लू’नेही भर घातली आणि या उद्योगाला अनेक वर्षे मागे नेले,

मार्च २०२० पासून देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर झाली आणि देशातील अनेक उद्योगधंद्याचे  कंबरडे मोडले, यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसायाचा समावेश होता. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात आजमितीला एकूण ५० ते ६० लाख व्यावसायिक कुक्कुटपालन व्यवसाय करतात. याद्वारे महिन्याला चार कोटी मांसल कोंबडय़ाद्वारे साधारण नऊ कोटी किलो मासिक कुक्कुटमांस (चिकन) उत्पादन केले जाते. देशी कोंबडय़ांचे पालन करणारे दीड लाख  व्यावसायिक आहेत. ते देखील महिन्याला ८० लाख देशी पक्षी उत्पादन करतात. राज्यातील एकूण अंडय़ावरील पक्ष्याची संख्या ही अंदाजे १.८७५ कोटी आहे. अंडय़ाचे दैनंदिन उत्पादन हे १.५ कोटी आहे.  या साऱ्यातून या व्यवसायात होणारी उलाढाल ही अब्जावधीमध्ये आहे. असा हा कुक्कुटपालन व्यवसाय आजमितीला मात्र पुरता संकटात सापडलेला आहे.

सन २००६ साली असेच संकट राज्यामध्ये नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथे आले असताना पशुसंवर्धन विभागाने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. त्यावर मात देखील केली. या लढाईला पुढे  ‘नवापूर पॅटर्न’ असेच नाव पडले होते. या लढाईचे राज्यासह देशात आणि जागतिक पातळीवर ‘एफएओ’ सारख्या संस्थांनी देखील विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि खासगी व्यवसायिक यांना तसा हा रोग नवीन नाही. याबाबत पूर्ण माहिती, त्याचे नियंत्रण, काळजी, जबाबदारी, खबरदारी याबाबत पूर्ण माहिती अवगत असल्याने ते आपापल्या परीने काळजी घेत आहेत. आजकाल विविध माध्यमांतून आपल्या सर्वासमोर वेगवेगळी माहिती येत असते. त्याचे योग्य विश्लेषण सुद्धा केलेले असते. आपण त्यातील शास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवायला हवा आणि त्याप्रमाणे वागायला हवे. त्यातील नकारात्मक बाबीवर आपण विचार करतो आणि खूप मोठे नुकसान स्वतचे आणि या व्यवसायाचे करत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पशुसंवर्धन विभागासह सर्व माध्यमातून कुक्कुटपालन तज्ज्ञ वारंवार सांगतात, की पूर्णपणे तीस मिनिटे ७० डिग्री सेल्सिअस ला शिजवलेले चिकन हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याप्रमाणे आपल्याला खायला काहीच हरकत नाही. व्यक्तीच्या वजनानुसार ६० किलोच्या व्यक्तीला ६० ग्रॅम प्रोटीन खाल्ले पाहिजे. आज  १०० ग्रम चिकन मध्ये २६ ग्रम प्रथिने आहेत. तसेच एका अंडय़ामध्ये १२ ग्रॅम प्रथिने आहेत. चिकन १६० रुपये प्रति किलो घेतल्यास प्रति ग्रॅम प्रथिनांसाठी ६१ पैसे आणि अंडी पाच रुपयाला घेतल्यास ८३ पैसे असा खर्च येतो. इतक्या स्वस्त प्रमाणात प्रथिने उपलब्ध होतात. आजही कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण अजूनही त्या सावटाखाली आहोत, त्यामुळे अशा प्रकारे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा प्रथिनांचा स्रोत गमावणे हे फार धोक्याचे ठरेल. त्यामुळे बिनधास्तपणे चिकन आणि अंडी आपल्या खाद्य संस्कृतीप्रमाणे खायला हरकत नाही. जगात कुक्कुट मांस उत्पादनात आपल्या देशाचा पाचवा क्रमांक आहे. आपण सन २०१९ मध्ये ५२०० दशलक्ष मेट्रिक टन चिकनचे उत्पादन घेतले आहे. पण एकूणच अंडी आणि कुक्कुट मांस खरेदीकडे, खाण्याकडे दुर्लक्ष केले अथवा भीती बाळगली तर आपले सर्व बाजूने खूप मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सन २००६ मध्ये साधारण अकरा लाख पक्षी नष्ट केले. या नुकसानीपोटी ८० कोटी रुपये नष्ट केलेल्या पक्ष्यांना अनुदान म्हणून दिले होते. आज मितीला दररोज साधारण ७० कोटी रुपयांचे नुकसान हे कुक्कुटपालन व्यवसायाचे होत आहे. त्यामुळे आपण सर्वानीच याचा विचार करायला हवा.

देशात एकूण दहा राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाला आहे. सन २००८ मध्ये पश्चिम बंगाल आणि २०१४ मध्ये केरळमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. देशात एकूण २००६ पासून २०१५ पर्यंत एकूण २५ वेळा या रोगाचा प्रादुर्भाव कुठेना कुठे १५ राज्यांमध्ये झालेला आहे. पण आज अखेर राज्यासह देशात कुठेही मानवाला हा रोग झाला नाही, ही बाब सर्वानी लक्षात घ्यावी.

या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागासह वनविभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभागासह गृ्रह विभाग प्रयत्नशील आहेत. आपली जबाबदारी समर्थपणे उचलतात आणि समन्वयाने काम करत असतात. व्यावसायिक कुक्कुटपालन करणारी मंडळी या रोगाबाबत सजग असल्याने ते जैव सुरक्षेसह सर्व काळजी घेतात. तथापि खेडय़ापाडय़ातील परसातील कुक्कुटपालन करणाऱ्या मंडळींनी, माता-भगिनीनी  विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या पक्ष्यांशी स्थलांतरित पक्षी व इतर पक्षी जसे की बदके, कबूतर, साळुंकी, मोर, भारद्वाज, चिमण्या, कावळे यांचा संपर्क येऊ देऊ नये. पक्ष्यांसाठी ठेवलेली पाण्याची-खाद्याची भांडी स्वच्छ ठेवावीत. खुराडी स्वच्छ ठेवावीत. आपणही आपली स्वच्छता ठेवून कमीत कमी पक्ष्यांची हाताळणी करावी. त्याचबरोबर विशेषत कुक्कुट मांस (चिकन) विक्रेते, अंडी विक्रेत्यांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. नाही म्हटले तरी त्यांच्या व्यवसायावर याचा थेट परिणाम होतो, त्यामुळे या मंडळींनी देखील स्वत आपल्या दुकानांची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित साफसफाई, ‘सॅनिटायझर’चा वापर, मास्क, हॅन्डग्लोज चा वापर करायला हवा. पक्षी ठेवण्यासाठी असणारे पिंजरे नियमित स्वच्छ करावेत. पडलेली पिसे, पक्ष्यांची विष्ठा व इतर कातडी वगरे प्लॅस्टिकच्या बॅगेत बंद करून त्याची व्यवस्थित योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पक्षी खरेदी करताना देखील आजारी पक्ष्यांची खरेदी व विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी. दुकानाची सर्व हत्यारे उपकरणे ही स्वच्छ राहतील याची देखील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने सर्व यंत्रणांनी काळजी घेतली, सर्व जनतेने देखील मनापासून साथ दिली, अफवांवर विश्वास नाही ठेवला, तर आपण निश्चितपणे हे ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट परतवून लावू यात शंका नाही. तसेच सरकारने देखील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा भरण्यासह नैसर्गिक आपत्ती समजून कुक्कुटपालन व्यवसायिकांना मदत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्यांची उपासमार होणार नाही, याची काळजी घेणे इतकेच अपेक्षित आहे.

अफवांपेक्षा शास्त्रीय माहिती हवी

कुक्कुटपालन व्यवसायात रोज विक्री आणि खरेदीचे व्यवहार चालत असतात. या व्यवसायात एकदा अफवा पसरली, की ज्या ग्राहकांच्या क्रयशक्तीवर व्यवसाय चालत असतो, तो व्यवसायच डबघाईला येतो. अफवेच्या दरम्यान, ग्राहक अन्य पर्यायाकडे वळला तर पुन्हा इकडे वळविण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. म्हणजे चालत्या गाडीला खीळ बसल्यातील हा प्रकार आहे. यामुळे अफवांपेक्षा शास्त्रीय माहिती प्रसारित करून धोका टाळणे हाच या वरील पर्याय आहे.

– डॉ. व्यंकटराव घोरपडे, निवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन.

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:14 am

Web Title: article on difficult poultry farming abn 97
Next Stories
1 आल्याची शेती!
2 विश्वाचे वृत्तरंग : अमेरिकेची ‘अणू’चाल..
3 प्रभावी जलव्यवस्थापनासाठी…
Just Now!
X