शुद्धोदन आहेर

डॉ. आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ कसा पाहिला होता आणि त्याचा त्या वेळच्या तसेच आजच्या परिस्थितीशी संबंध काय याची चर्चा बुद्ध पौर्णिमेसारख्या ‘सणां’निमित्त होतेच असे नाही.. ती सुरू करणारे टिपण..

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?

भारताची जागतिक ओळख ‘गौतम बुद्धांची पवित्र भूमी’ अशी आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट भारतीय कोण? या प्रश्नाचे नि:संदेह उत्तर तथागत सम्यक संबुद्ध असेच आहे. गेल्या अडीच हजार वर्षांत किती जणांना या तथागतांचे आकर्षण वाटले असेल कोणास ठाऊक! इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील महाभिक्खू अश्वघोष रचित ‘वज्रसूची’  या जातिसंस्थाविरोधी काव्याचे मायमराठीत पद्य रूपांतर तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई पाठक यांनी केले तर गद्य रूपांतर १९ व्या शतकात तुकाराम तात्या पडवळ यांनी केले ज्याचे प्रकाशन महात्मा फुले यांनी केले. बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांनी बौद्ध साहित्याच्या अभ्यासास प्रोत्साहन दिले. सुप्रसिद्ध विनोदी लेखक कालवश चिं. वि. जोशी हे सयाजीरावांच्या काळात पाली भाषेचे अध्ययन अध्यापन करीत असत. धर्मानंद कोसंबींची आध्यात्मिक तहान सुगत चरणापाशी येऊन तृप्त झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र लिहिले व लहानग्या भीमाला भेट म्हणून दिले. या बिंदूपासून सुरू झालेल्या भीमरावांच्या प्रबुद्ध प्रवासाची परिपूर्ती १९५६ च्या दसऱ्याला जगप्रसिद्ध धर्मातरात झाली. इसवी सनपूर्व ५६३ ते ४८३ असे ८० वर्षांचे आयुर्मान लाभलेले तथागत संबुद्ध यांनी चित्त निर्मळ करण्याच्या स्वानुभवाधारित मार्गाने दु:खमुक्त होता येते, अशी शिकवण दिली. हल्ली चच्रेत असलेल्या कालवश गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरांत असेच काहीसे शिकविले जाते. त्याच श्रमण परंपरेतील वर्धमान महावीर व विरोधी ब्राह्मण परंपरेतील स्थलकालविभिन्नत्व लाभलेले अनेक नायक यांनीदेखील आध्यात्मिक मुक्तीच सांगितली होती. तथापि, ‘गौतम बुद्धांचे महानायकत्व असे की, त्यांनी वैतनिक कर्मकारांच्या पंचधम्माद्वारे भारताची सामंतप्रथाक क्रांती घडवून देशाचे उत्पादन १० पटीने वाढविले’असे कालवश प्राच्यविद्यापंडित शरद पाटील सांगतात. त्यानंतर येथे समाजरचना बदलली नाही. समाजरचना बदलणारी खरी औद्योगिक क्रांती झालेल्या युरोपात आधुनिक मूल्यव्यवस्था जोमाने बहरली. भारतातील सध्याचे औद्योगिकीकरण हे युरोप-अमेरिकेतील आयात तंत्रज्ञानातून कृत्रिमरीत्या तयार केलेले आहे. निव्वळ बाजारपेठेचा विचार करणाऱ्या या कृत्रिम औद्योगिकीकरणाने भारतातील जुनी समाजरचना नष्ट केलेली नाही. या जुन्या समाजरचनेची मनुवादी मूल्यव्यवस्था व येथील कृत्रिम औद्योगिकीकरणाने बाहेरून परिधान केलेली आधुनिक मूल्यव्यवस्था यांतील द्वैत कसे मिटवावे? हा आधुनिक भारतातील खरा कळीचा प्रश्न आहे. ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ हे या कळीच्या प्रश्नावर डॉ. आंबेडकर यांनी शोधलेले उत्तर आहे. म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या बौद्धवादाला सर्वच भारतीयांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे.

भारतातील जुन्या समाजरचनेची मूल्यव्यवस्था समजून घेण्यासाठी आपल्या महाकाव्यांतील उदाहरणे बघू या. या महाकाव्यांतील वर्णस्त्रीदास्य समर्थक मूल्यव्यवस्थेने ताटिका, शूर्पणखा, शंबूक, सीता, एकलव्य, गांधारी, कर्ण, घटोत्कच, द्रौपदी आदी व्यक्तिमत्त्वांचा बळी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांनी बुद्ध व त्यांच्या धम्माचा लावलेला अन्वयार्थ बघावा लागेल. गौतम बुद्धांनी त्या काळानुसार आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग शोधला व त्याचा प्रसार करण्यासाठी भिक्खू संघ स्थापन केला. ‘जसे महासागरात सर्व नद्यांचे विसर्जन होते तसेच माझ्या भिक्खू संघात सर्व वर्णाचे विसर्जन होते’, अशा प्रत्ययकारी भाषेत तथागत संबुद्धांनी आपल्या भिक्खू संघाचा गौरव केला आहे. म्हणून पूर्वाश्रमीच्या वर्णातून ‘डीकास्ट’ होऊन आलेल्या व आध्यात्मिक मुक्तीस्तव वर्णातीत भूमिकेने राहणाऱ्या सदस्यांचा भिक्खू संघ हा डॉ. आंबेडकर यांना जातीविरहित समाजाचा आदर्श नमुना वाटत होता. उपालीसारखे पूर्वाश्रमीचे नाभिक समाजाचे भिक्खू तर ‘विनयधर’ म्हणजे भिक्खू संघाच्या घटनेवरील सर्वश्रेष्ठ अभ्यासक म्हणून गणले जाण्याइतपत प्रज्ञावंत होते. तथागत बुद्धांनी भिक्खुणी संघ स्थापन करून स्त्रियांनाही आध्यात्मिक मुक्तीचे महाद्वार खुले केले. परिणामी वर्णविरोधी व तुलनात्मक लिंगसमानता मानणाऱ्या बौद्ध मूल्यव्यवस्थेने उपाली, आनंद, सोपाक, सारिपुत्त, महेंद्र, महाप्रजापती, विशाखा, आम्रपाली, संघमित्रा आदी व्यक्तिमत्वे विकसित केल्याचे दिसून येते.

डॉ. आंबेडकर यांनी बौद्धवादाचा लावलेला अन्वयार्थ समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महाग्रंथाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या महाग्रंथातील अनेक पृष्ठे समाधी, ध्यान, चित्तशुद्धी आदी शब्दांनी नटलेली आहेत. मात्र तिसऱ्या खंडातील भाग दोनमधील पृष्ठ २२५ वरील मजकुरानुसार; समाधी वा विपश्यना यांना तथागत संबुद्ध यांच्या शिकवणुकीचे सार समजणाऱ्यांना तसेच बौद्धवाद हा मूठभर ज्ञानी अभ्यासकांसाठी आहे, असे म्हणणाऱ्यांना काही विशिष्ट गोष्टींची आवड आहे, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर करतात. बौद्धवाद सामान्य जनतेसाठी आहे, असे समजणारे तसेच बौद्धवादाला रुक्ष तत्त्वज्ञान, गूढवाद मानणारे आणि बौद्धवादाच्या नावाने लौकिक जगातील वास्तवापासून दूर जाणाऱ्या स्वार्थी कल्पनाविश्वांत रमणारे व भावनांचे दमन करण्यावर भर देणारे, यांपैकी बहुसंख्य जण हे प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने बौद्धवादाशी प्रासंगिकरीत्या परिचित झाले आहेत. त्यापैकी काही जण बौद्धवादाचे अभ्यासक नाहीत व काहींचा तर धर्माचा उदय विकास शोधणाऱ्या मानववंश शास्त्राचासुद्धा अभ्यास नाही, असे डॉ. आंबेडकर यांचे निरीक्षण आहे.

तथागत बुद्धांनी काही वेगळा सामाजिक संदेश दिला आहे का, असा डॉ. आंबेडकर यांचा प्रश्न आहे. तथागतांनी न्याय, वात्सल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवली आहे का? असे प्रश्न विचारून सम्यक संबुद्ध हे कार्ल मार्क्‍सला उत्तर देऊ शकतात का, असा प्रश्नही त्यांनी शेवटी विचारला आहे. या प्रश्नांना नंतरच्या प्रकरणांत होकारार्थी उत्तरेदेखील दिली आहेत. पृष्ठ २८१ ते ३०९ मध्ये त्यांनी ‘सद्धम्म म्हणजे काय’ यांबाबत चर्चा केली आहे. चित्ताचे शुद्धीकरण करणे, हे सद्धम्माचे कार्य आहे, असे पहिल्याच प्रकरणाचे शीर्षक आहे. इथे डॉ. आंबेडकर यांनी मूळ बौद्धवादातील अध्यात्म मान्य केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मनाला प्रशिक्षण देणे व जे योग्य आहे त्याच्या बाजूने एकटे असूनही उभे राहणे, हेदेखील सद्धम्माचे कार्य आहे. पुढे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, प्रज्ञा-शील-करुणा-मत्री यांची जोपासना व शेवटी सामाजिक भेदभाव संपवणे, हा सद्धम्म असल्याचे ते आवर्जून सांगतात. इथे त्यांना प्रामुख्याने भारतातील सतानी जातिसंस्थेचा शेवट अभिप्रेत आहे, हे उघड आहे.

पुढे खंड ४ मधील पृष्ठ ३१८ वर धर्माचा व धम्माचा हेतू काय आहे, अशा शीर्षकाच्या प्रकरणात धर्माचा हेतू जगाची उत्पत्ती शोधणे असा असून ‘धम्माचा हेतू जगाची पुनर्रचना करणे आहे,’ असे ते सांगतात. इथे डॉ. आंबेडकर यांनी मूळ बौद्धवादाचा विस्तार केला आहे. म्हणून धर्म व धम्म यांत फरक आहे. निव्वळ स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष देणाऱ्या भिक्खूंना डॉ. आंबेडकर यांनी प्रस्तावनेतच स्वार्थी म्हटले आहे. म्हणजेच खऱ्या भिक्खूंनी जगाची पुनर्रचना करण्यासाठी सामाजिक सेवा करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. थोडक्यात, चित्तशुद्धी करीत सद्धम्माच्या आधारे जगाची पुनर्रचना करून जुनी समाजरचना व तिची मूल्यव्यवस्था नष्ट करायला हवी, असा डॉ. आंबेडकर यांचा संदेश आहे. या तात्त्विक भूमिकेला अभौतिक अनित्यतावाद म्हणता येईल. यामुळे जुन्या समाजरचनेची मनुवादी मूल्यव्यवस्था व येथील कृत्रिम औद्योगिकीकरणाने बाहेरून परिधान केलेली आधुनिक मूल्यव्यवस्था यांतील द्वैत मिटून आधुनिक मूल्यांनी बहरलेला भारतीय समाज विकासाच्या पुढील टप्प्यावर जाईल, अशी निर्मळ भविष्यवेधी दृष्टी डॉ. आंबेडकर देतात!

मागील सहा दशकांचा विचार करता, डॉ. आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीने संविधानातील मूल्यव्यवस्थेला समांतर अशी सामाजिक शक्ती म्हणून अतिशय विपरीत परिस्थितीत आपली ऐतिहासिक भूमिका निभावल्याचे आढळून येते. आज देशातील सर्वाधिक लोकप्रिय महानायक म्हणून डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले जाते. वस्तुत:, भारतीय समाज नव्या वळणावर उभा असून जातिसंस्थेचे ओझे त्याला असह्य़ होत आहे. म्हणून डॉ. आंबेडकर यांचे विचारव्यवहार आज जास्तच प्रासंगिक झाले आहेत. सार्वत्रिक शिक्षणाचा ‘सद्धम्म’ पाळला असता तर आज करोना महामारीला आपण अधिक शास्त्रशुद्धपणे तोंड देऊ शकलो असतो. आपल्या कृषीआधारित अर्थव्यवस्थेचे चाक अधिकच खोल गाळात रुतल्याची जाणीवसुद्धा सर्वानाच होऊ लागली आहे. यानिमित्ताने आपल्या आरोग्यव्यवस्थेचीही बहुआयामी चर्चा होत आहे, हेदेखील सुचिन्ह आहे. टाळेबंद धार्मिक स्थळांची असहायता सामान्य जनतेला विचारप्रवृत्त होण्यास भाग पाडीत आहे. भारतातच नव्हे तर उभ्या जगात मानवप्राण्याच्या उपजत चौकस बुद्धीला जोरदार चालना मिळाली आहे.

अशा कठीण काळात डॉ. आंबेडकर भारतीय समाजाला हात देण्यासाठी उभे आहेत. परंतु ते एकटे नाहीत. त्यांच्यासोबत पेरियार, शाहू राजे, महात्मा फुले-सावित्रीमाता, शिवाजीराजे व आपली संतपरंपरा आहे. त्यांच्यासोबत सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन व नागसेन, असंग, वसुबंधू, नागार्जुन, दिग्नाग, धर्मकीर्ती अशा विद्वान भिक्खूंची ज्ञानपरंपरा आहे. त्यांच्यासोबत तथागत सम्यक संबुद्ध आहेत. या वैभवशाली समतावादी परंपरेसह आपले पाश्चात्त्य ज्ञानशाखांचे प्रकांडपांडित्य पणाला लावून डॉ. आंबेडकर उद्याचा आदर्श भारत घडवायला उभे आहेत. ज्यांचे ज्यांचे या पवित्र भारतभूमीवर प्रेम आहे त्या सर्वानी डॉ. आंबेडकर यांना साथ देण्याची गरज आहे. अन्यथा, उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल!

ahersd26@gmail.com