रामदास भटकळ

आपल्या अभिनयाने आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारांनी मराठी जनमानसावर अमीट ठसा उमटवलेले डॉ. श्रीराम लागू यांचा १७ डिसेंबर रोजी पहिला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने..

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

डॉक्टर श्रीराम लागू हे नाव घेतले की त्यांच्या एखाद्या भूमिकेत दाढीमिश्यांसह ते उभे राहतात. सत्तरीपुढील प्रेक्षकाला आठवण येईल ‘पीडीए’निर्मित ‘वेडय़ाचं घर उन्हात’मधील दादासाहेब वा फार तर ‘खून पाहावा करून’मधील लेखक यांची. विजय तेंडुलकरांच्या चाहत्यांना ‘मादी’ किंवा ‘मी जिंकलो, मी हरलो’, फार तर त्यानंतरचे ‘गिधाडे’ किंवा ‘कन्यादान’ नाटकातील निरनिराळे लागू दिसू लागतील. ‘रंगायन’मधील त्यांची आणि विजया खोटे यांची जुगलबंदी तर विसरणे शक्यच नाही. ते व्यावसायिक नट झाले आणि बहरू लागले. एके काळी त्यांची चार नाटके जोरात चालू होती. त्यापैकी शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ आणि कानेटकरांचे ‘हिमालयाची सावली’ ही तर मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट भूषणे.

काही अनुभव असे असतात की, प्रत्यक्ष न पाहताही ते आपल्या विचारात पक्के ठासून बसतात. कलेच्या क्षेत्रात बालगंधर्व आणि राष्ट्रीय पातळीवर गांधी यांचे तसेच नाही का! फरक असा की, आज तंत्रज्ञानामुळे लागूंच्या निदान काही नाटकांतील अभिनयाची साक्ष कॅसेटच्या रूपाने उपलब्ध आहे.

लागूंनी शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील गणपतराव जिवंत करताना नवा मानिबदू निर्माण केला. त्यांच्या इतर दोन नाटकांतही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांतील ‘मुख्यमंत्री’ नाटकातील रोहिणी हट्टंगडींबरोबरची जुगलबंदी लाजवाब होती. कानेटकरांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाच्या माग्रे ते व्यावसायिक नट झाले, तरी त्यांच्या ‘कस्तुरीमृग’ नाटकातील चार भूमिका हे त्यांच्यातील नटाला खरे आव्हान होते.

सुरुवातीच्या काही नाटकांचे प्रयोग जरी ‘पीडीए’, ‘रंगायन’, ‘धी गोवा िहदू असोसिएशन’ अशा हौशी संस्थांनी केले असले, तरी ते मोठय़ा प्रेक्षागृहांत तुडुंब गर्दीत होत असत. परंतु व्यावसायिक नाटय़कर्मी झाल्यावरही हेच डॉक्टर लागू नियमितपणे आणि उत्साहाने प्रायोगिक नाटकांत कामे करत. सत्यदेव दुबेंबरोबर त्यांनी मोहन राकेश यांचे ‘आधे अधुरे’, गिरीश कार्नाड यांचे ‘ययाती’ ही नाटके केलीच होती, तसेच खानोलकरांचे ‘प्रतिमा’, ज्यां आनुई यांच्या नाटकाचा अनुवाद ‘अँटिगनी’ अशी अनेक नाटके प्रायोगिक रंगमंचावर केली. डॉक्टर लागूंच्या नाटय़प्रवासात या प्रायोगिक नाटकांना विशेष महत्त्व आहे. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ने फक्त गो. पु. देशपांडेंसारखा सशक्त नाटककार दिला असे नाही, तर राजकीय नाटकाचा आदर्श निर्माण केला. किंबहुना ‘थिएटर युनिट’, ‘आविष्कार’प्रमाणे डॉक्टर लागू यांनाही प्रायोगिक नाटके रुजविण्याचे श्रेय जाते. त्याचप्रमाणे अजित दळवी, प्रेमानंद गज्वी, शिरीष आठवले अशा नवीन नाटककारांच्या नाटकांना न्याय देण्याचेही. व्यावसायिक रंगकर्मी झाल्यानंतर काही वर्षांतच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पद्मश्री हा किताब त्यांच्याकडे चालून न येते तरच आश्चर्य वाटले असते. त्यांचा स्वतंत्र पठडीतला अभिनय मराठी प्रेक्षकांनी स्वीकारल्यावर त्यांच्या नाटकांचे दिवसातून दोन किंवा क्वचित तीन प्रयोग होत असताना, हा नट प्रायोगिक नाटकांसाठी दर महिन्यात काही दिवस राखून ठेवायचा.

आपल्याला आवडणारी नाटके आणि इतर कार्यक्रम बिनधोक करता यावेत म्हणून त्यांनी ‘रूपवेध’ या संस्थेची स्थपना केली. महेश एलकुंचवार यांची ‘गाबरे’, ‘आत्मकथा’ ही नाटके या संस्थेने केली, तसेच इतर कार्यक्रमही. नाटकांप्रमाणे डॉक्टरांना कवितेचेही वेड होते. मर्ढेकर, इंदिरा यांच्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रमही त्यांनी हौसेने केले. कुसुमाग्रजांच्या कवितांचे त्यांनी केलेले वाचन ‘प्रवासी पक्षी’ उपलब्ध आहे. रंगभूमीवर हे सारे डॉक्टरांना करता आले याला एक कारण गमतीचे आहे.

व्ही. शांताराम यांनी आपल्या ‘िपजरा’ या चित्रपटासाठी नायक म्हणून निवड केली लागूंची. या सिनेमाला अभूतपूर्व यश मिळाले. या यशाने ते सिनेनट म्हणूनही नावाजले गेले. रंगभूमीवरील अभिनय आणि सिनेमातील अभिनय जसा वेगळा, तसेच मराठी आणि िहदी सिनेसृष्टीतील यशाचे निकष वेगळे. िहदीत त्यांना ‘घरोंदा’सारख्या महत्त्वाच्या भूमिका कमी मिळाल्या, पण व्यावहारिक यश इतके की त्यांच्यासाठी मुद्दाम भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या आणि अनेक ‘सुपरहीरो’ त्यांचा हेवा करू लागले. या बेभरवशाच्या व्यवसायात त्यांना स्थर्य मिळाले स्वत:च्या बुद्धिमत्तेने आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे. मराठी आणि िहदी सिनेमांसाठी मिळालेल्या  पुरस्कारी बाहुल्यांनी त्यांचे कपाट भरून गेले. मुख्य म्हणजे केवळ पन्नासेक प्रेक्षकांसमोर मनासारखी नाटके करण्याची चन ते करू शकले.

प्रायोगिक आणि व्यावसायिक असा फरक हळूहळू पुसला जात होता. श्याम मनोहर यांचे ‘प्रेमाची गोष्ट’ (सहकलाकार- निळू फुले), मकरंद साठे यांचे ‘सूर्य पाहिलेला माणूस’ आणि काही प्रमाणात शिरीष आठवले यांचे ‘मित्र’ या नाटकांनी डॉक्टरांनी रंगभूमीचा निरोप घेतला. या शेवटच्या दोन नाटकांच्या चित्रफिती निघाल्या आहेत. त्यांच्या या चारपाच चित्रफितींतून पुढील पिढय़ांना खूप काही शिकता येईल.

हे झाले या नटसम्राटाविषयी. त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक महत्त्वाचे पलू आहेत.

ते एक जाणते वाचक होते. त्यांना एकूण लेखकवर्गाविषयी प्रचंड आदर होता. आपला संकोच दूर सारून त्यांनी आपल्या भूमिकांबद्दल लिहिले. ‘गणूचा सदरा’ ही एक विलक्षण एकांकिका लिहिली. दोन नाटकांचे अनुवाद केले. अनेक प्रदीर्घ मुलाखती दिल्या आणि काही नमित्तिक लेखनही केले. बहुतेक सारे स्फुट लेखन ‘रूपवेध’ या ग्रंथात उपलब्ध आहे. तरी त्यांचे महत्त्वाचे लेखन म्हणजे ‘लमाण’ हे आत्मचरित्र. चिंतामणराव कोल्हटकर, मामा वरेरकर यांच्याप्रमाणे लागूंचेही नाटय़जीवनाविषयीचे आत्मकथन महत्त्वाचे आहे.

त्यांच्यावर गांधीविचारांचा प्रभाव होता. म्हणजे सर्वच त्यांना मान्य होते किंवा जमत होते असे नाही. पण निर्भयता त्यांनी स्वत:त बाणवली होती आणि गांधींना प्रिय सेवावृत्तीसुद्धा. नाटय़प्रयोगासाठी बिदागी घेताना पडद्यामागील कर्मचाऱ्यांची ते विशेष काळजी घेत. या देशात विशेषत: सामाजिक कार्याची गरज आहे. आपण सारे करू शकत नसलो तरी निदान तसे काम करणाऱ्यांसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारला. त्यासाठी समविचारी कलाकारांना घेऊन देशविदेशांत प्रयोग करून निरपेक्ष कार्यकर्त्यांना काही मदत पाठवण्याची  बऱ्यापैकी सोय केली. अंधश्रद्धा हे अस्पृश्यतेप्रमाणे सामाजिक पाप आहे हे पटल्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांना पूर्ण पािठबा दिला.

एका बाबतीत लागूंची भूमिका अधिक टोकाची होती. ‘ईश्वराला रिटायर करा’ म्हणताना ते अनेक निरीश्वरवाद्यांपेक्षा वेगळे सांगत नव्हते. तरी आपले म्हणणे नीट समजून घेतले जाणार नाही याची कल्पना असूनही तसे ठामपणे सांगायला निर्भयतेची परमावधी लागते. सेन्सॉरशी ‘गिधाडे’च्या संदर्भात झगडतानाही हीच निर्भयता नजरेस आली.

लागूंच्या धर्मविषयक कल्पनांवरून मराठी मनाचे एक वैशिष्टय़ लक्षात आले. लक्ष्मीबाई ठिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’च्या श्रेष्ठत्वाबद्दल दुमत नाही. ती आहे टिळक दाम्पत्याने ख्रिस्ती होण्याची कथा. बालगंधर्व मुसलमान झाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर लागू यांनी ईश्वराला जाहीरपणे नाकारले. तरीही मराठी मनात या सर्वाचे आपापल्या क्षेत्रातील अग्रस्थान अबाधित आहे.

(लेखक गांधीवादाचे ज्येष्ठ अभ्यासक असून ते संस्थापक-संचालक असलेल्या पॉप्युलर प्रकाशनाकडून डॉ. श्रीराम लागू लिखित ‘लमाण’ आणि ‘रूपवेध’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.)

ramdasbhatkal@gmail.com