सुधीर फाकटकर

‘भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक’ म्हणून जगभरात ओळख निर्माण झालेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे अलीकडेच निधन झाले. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख..

‘‘मला गांधीजींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे, म्हणून मी भारतात परत जाणार आहे,’’ संशोधक तरुणाचे हे उत्तर ऐकून समोर बसलेले प्राध्यापक चमकलेच. हा उमदा तरुण भारतातून पीएच.डी.च्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात आलेला होता. साधारण शिरस्ता असा होता की, भारतातून उच्च शिक्षणासाठी कुणी तरुण अमेरिकेत आला की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच स्थायिक होणार. पण हा तरुण तिथे घेतलेल्या उच्च शिक्षणाच्या आधारे आपल्या मायभूमीत एका अभिनव विज्ञानशाखेची रुजुवात करणार होता. अमेरिकेत येतानाच त्याने हा ठाम निश्चय केलेला होता. हा उमदा संशोधक तरुण म्हणजे डॉ. गोविंद स्वरूप! मायदेशी परतल्यानंतर भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक होण्याबरोबरच त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानातील शिक्षणसंस्थांच्या उभारणीसाठीही बहुमूल्य योगदान दिले.

डॉ. गोविंद स्वरूप यांचा जन्म २३ मार्च १९२९ रोजी आताच्या उत्तराखंडमध्ये झाला. आठवे अपत्य म्हणून नाव ‘गोविंद’ ठेवले. शेकडो एकर जमिनीची पिढीजात मालकी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पूर्वजांची एक हवेलीच होती. घरी शिक्षणाचाही वारसा होता. प्राथमिक शिक्षण मूळ गावीच झाले. वडिलांनी पावसाळ्यात शेतावर जाण्यासाठी एक हत्तीच विकत घेतलेला होता. हत्तीला काम नसले की, लहानपणी शाळेत जाण्यासाठी चक्कहत्ती असायचा! शालेय जीवनात असताना १९४२ च्या आंदोलनाची आठवण त्यांच्या मनावर कोरलेली राहिली.

डॉ. स्वरूप यांची लहानपणी वाचनाची आवड आईमुळे जोपासली गेली. ते इयत्ता नववीपर्यंत इंग्रजी विषय शिकलेले नव्हते. पण नववीनंतर इंग्रजीत लवकर प्रगती केली. इंग्रजी विषयातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांना इंग्रजी पुस्तक भेट मिळाले. पण गंमत झाली, इंग्रजी लेखकाचे पुस्तक आणि मागील वर्षीच्या, १९४२ च्या आंदोलनाची आठवण म्हणून शाळकरी मित्रांनी विचारले, ‘तुम अंग्रेजी किताब पढोगे?’ यावर ‘अंग्रेजी किताब नही पढनी हैं!’ असा मित्रांकडून गजर झाला आणि ते इंग्रजी पुस्तक जाळले गेले!

विशेष गुणवत्ता प्राप्त करत मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अलाहाबादमधल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच दरम्यान इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनासाठी नोबेल पारितोषक विजेते डॉ. सी. व्ही. रामन अलाहाबादला आले होते. मग स्वरूप आणि विद्यार्थिमित्रांनी त्यांना होस्टेलवर जेवणासाठी आमंत्रित करण्याचे ठरवले. आमंत्रण देण्याची जबाबदारी स्वरूप यांनी पार पाडली. होस्टेलवर डॉ. रामन यांनी विद्यार्थ्यांसमवेत तीन तास व्यतीत केले. निरोप घेताना डॉ. रामन यांनी आइन्स्टाइनचे प्रसिद्ध वाक्य ऐकवले, ‘तुम्हालाही नोबेल पारितोषिक मिळू शकते, मात्र त्यासाठी फक्त एक टक्का प्रेरणेची गरज असते आणि ९९ टक्के परिश्रमाची!’

अलाहाबादमधील विद्यापीठातच त्यांनी बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला. बी.एस्सी.ला असताना डॉ. के. एस. कृष्णन (डॉ. रामन यांचे साहाय्यक) यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. बी.एस्सी.नंतर स्वरूप यांना बेंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेत पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता, पण तो मिळाला नाही. मग पुन्हा अलाहाबादला परतून त्यांनी तिथल्याच विद्यापीठात प्रवेश घेतला. अलाहाबादच्या वास्तव्यात स्वरूप यांना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.

एम.एस्सी.नंतर डॉ. स्वरूप यांना दिल्लीच्या राष्ट्रीय भौतिकी  प्रयोगशाळेत (एनपीएल) प्रकल्प मदतनीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. डॉ. कृष्णन विद्यापीठ सोडून एनपीएलमध्ये आलेले होते. १९५० च्या कालावधीदरम्यान पाश्चात्त्य देशांमध्ये रेडिओ खगोलशास्त्र उदयास येऊन स्थिरावत होते. ही खगोलविज्ञानातील अदृश्य वर्णपटाच्या किंवा रेडिओ लहरींच्या माध्यमातून खगोलीय घटकांचे निरीक्षण करणारी अभिनव विज्ञान शाखा आहे. रेडिओ खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी डॉ. कृष्णन यांनी स्वरूप यांना ऑस्ट्रेलियात पाठवले. स्वरूप यांच्याबरोबर कोडाईकनाल वेधशाळेचे राघवेयंगार पार्थसारथी हे आणखी एक सहाध्यायी होते. तिथे डॉ. जे. एल. पॉसे या अनुभवी रेडिओ खगोलशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली स्वरूप आणि पार्थसारथी यांनी रेडिओ खगोलशास्त्राशी संबंधित तंत्रविज्ञानाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियातील दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून डॉ. स्वरूप १९५५ मध्ये भारतात परतले आणि पुन्हा एनपीएलमध्ये रुजू झाले आणि ऑस्ट्रेलियातील पॉट्स हिलच्या तबकडय़ा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. पण त्या तबकडय़ा भारतात येणे लांबत गेले.

पुढच्याच वर्षी डॉ. स्वरूप यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी एनपीएलला अलविदा म्हटले आणि ते सपत्नीक अमेरिकेला रेडिओ खगोलशास्त्रातील पुढील अभ्यासासाठी रवाना झाले. हार्वर्ड विद्यापीठातील फोर्ट डेव्हिसमधील रेडिओ खगोल केंद्रात डॉ. स्वरूप यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. इथे डॉ. अ‍ॅलन मॅक्सवेल या न्यूझीलंडच्या रेडिओ खगोलशास्त्रज्ञाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. फोर्ट डेव्हिसमधील अनुभवानंतर डॉ. स्वरूप यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात रेडिओ खगोलशास्त्राशी संबंधित तंत्रविज्ञानात पीएच.डी.चे उच्च शिक्षण पूर्ण केले.

स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएच.डी.ची तयारी करत असतानाच तिथले प्राध्यापक उत्सुकतेने डॉ. स्वरूप यांना रेडिओ खगोलशास्त्राचे शिक्षण घेऊन पुढे काय करणार याची विचारणा करायचे. या प्रश्नावर स्वरूपांचे उत्तर असायचे- ‘या शिक्षणाच्या जोरावर मला गांधीजींच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे, आणि त्यासाठी मी भारतात परत जाणार आहे.’ या दरम्यान अमेरिकेतील रेडिओ खगोलशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी मेनन, कुंदू आणि टी. कृष्णन हे भारतीय युवा संशोधक कार्यरत होते. स्वरूप यांचा त्यांच्याशी संपर्क होताच. या मंडळींमध्ये भारतात रेडिओ खगोलशास्त्र उभारणीसंदर्भात चर्चा घडत होत्या. स्टॅनफोर्ड विद्यापीठात असतानाच डॉ. स्वरूपांच्या नेतृत्वाखाली भारतात रेडिओ खगोलशास्त्राची उभारणी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला गेला. या प्रस्तावाच्या प्रती एनपीएल, भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेकडे (टीआयएफआर) पाठवण्यात आल्या.

दरम्यान या चार युवा संशोधकांना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ, तसेच जगभरातील मान्यवर खगोलशास्त्रज्ञांचेही पाठबळ मिळत गेले. तर दुसरीकडे टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संचालक प्रमुखपदी असलेल्या डॉ. होमी भाभांनी डॉ. स्वरूपांना तात्काळ प्रतिसाद दिला आणि भारतात परतून टीआयएफआरमध्ये रुजू होण्याचे आमंत्रण दिले. डॉ. स्वरूप टीआयएफआरमध्ये १९६३ मध्ये रुजू झाले, तर त्याआधीच डॉ. भाभांनी तिथे रेडिओ खगोलविज्ञानाचा विभाग सुरू केलेला होता. टीआयएफआरमध्ये आल्यानंतर डॉ. स्वरूपांना विजय कपाही, इसलूर, एन. व्ही. जी. शर्मा, एम. एन. जोशी असे नवीन सहकारी मिळाले. तसेच मेनन, कुंदू आणि टी. कृष्णन यांनीही भारतात येऊन डॉ. स्वरूपांना मौलिक साथ दिली. १९६३ मध्येच ऑस्ट्रेलियातून आणण्यात आलेल्या तबकडय़ांची मुंबईपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणजवळ उभारणी करण्यात आली. हा भारतातील प्रायोगिक रेडिओ दुर्बीण प्रकल्प म्हणता येईल. कल्याण रेडिओ टेलीस्कोपमुळे भारतात रेडिओ खगोलशास्त्राच्या प्राथमिक पातळीवरील संशोधनास सुरुवात झाली.

या काळात खगोलविज्ञानात विश्वनिर्मितीसंदर्भात स्थिर विश्व सिद्धांत आणि महाविस्फोट सिद्धांत यांत जोरदार वाद सुरू होता. विश्वनिर्मिती सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी १० ते २० अब्ज वर्षांपूर्वीचे विश्व पाहण्यासाठी रेडिओ लहरींच्या माध्यमातील रेडिओ दुर्बिणीचे महत्त्व अधोरेखित झाले होते. याच अनुषंगाने ३२५ मेगाहर्ट्झ रेडिओ फ्रीक्वेन्सी बॅन्डमध्ये खगोलीय घटकांचा वेध घेण्यासाठी ५३० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद परावर्तक असलेल्या रेडिओ दुर्बिणीचा आराखडा विकसित करण्यात आला. या रेडिओ दुर्बिणीसाठी ११ अंशाचा दक्षिणोत्तर उतार असलेली टेकडीसदृश जागा गरजेची होती. अशी जागा तमिळनाडूत उटीजवळ मिळाली आणि तिथे भारताची पहिली स्वतंत्र रेडिओ दुर्बीण आकाराला आली. उटी रेडिओ दुर्बिणीच्या निमित्ताने डॉ. स्वरूपांच्या नेतृत्वाखाली भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा ठसा जगभरात उमटला. उटी रेडिओ दुर्बिणीतून झालेली हजारो रेडिओ स्रोतांची खगोलीय निरीक्षणे आणि संशोधन हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

उटी रेडिओ दुर्बिणीच्या निमित्ताने भारतीय वैज्ञानिक जगताला आत्मविश्वास मिळाला. या आत्मविश्वासाच्या जोरावर डॉ. स्वरूपांनी सत्तरच्या दशकात ‘महाकाय विषुववृत्तीय रेडिओ दुर्बणिी’चा आराखडा विकसित केला. ही दुर्बीण विषुववृत्तीय प्रदेशात विकसनशील देशांमधील वैज्ञानिक-अभियंत्यांकडून उभारली जाणार होती. पण याकामी काही देशांचे सहकार्य मिळाले नाही. पुढे १९८० च्या दरम्यान भारताची सातवी पंचवार्षिक राष्ट्रीय योजना सुरू होती. तसेच देशाच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीची अनुकूलता लाभली आणि महाकाय विषुववृत्तीय रेडिओ दुर्बणिीऐवजी ‘मीटर तरंगलांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बीण’ प्रकल्पाचा आराखडा विकसित झाला. ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलीस्कोप-जीएमआरटी’ म्हणून ओळख मिळालेल्या या रेडिओ दुर्बणिीसाठी पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातील खोडद गावाजवळील जागेची निवड झाली.

नव्वदच्या दशकात उभारणीची सुरुवात झालेला हा प्रकल्प पुढच्या दशकात पूर्णत्वाला गेला आणि २००१ मध्ये खगोलजगताला अर्पण करण्यात आला. ‘जीएमआरटी’ डॉ. स्वरूपांच्या नेतृत्वाचा मानिबदू ठरला. जीएमआरटीच्या निमित्ताने जगभरात रेडिओ दुर्बणिींच्या संकेतवहनासाठी प्रथमच ‘ऑप्टिकल फायबर’ तंत्रज्ञान वापरले गेले. जीएमआरटीचे परावर्तक तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली विकसित झाल्यानंतर त्यांचे पेटंट्स मिळाले. पूर्णपणे भारतीय बुद्धिमत्तेतून आकाराला आलेली जीएमआरटी हा जगभरासाठी कौतुकाचा विषय आहे. जीएमआरटीच्या रूपाने जगभरातील खगोल अभ्यासकांसाठी निर्माण झालेली सुविधा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतासाठी मानदंड ठरला आहे. या कालखंडात भारतात फारशा अद्ययावत सुविधा नसताना डॉ. स्वरूपांच्या कल्पक नेतृत्वाखाली उभी राहिलेली जीएमआरटी हा ‘आत्मनिर्भर’ भारताच्या उदाहरणासाठी एक वस्तुपाठच आहे. १९६० च्या दशकात व्यक्त केलेला दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी सत्यात उतरवला. या अनुषंगाने भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनकत्व डॉ. गोविंद स्वरूप यांच्याकडे जाते.

भारतात परतल्यानंतर वैज्ञानिक-अभियंत्यांचा शोध घेऊन, त्यांना खगोलभौतिकी आणि तत्सम विषयांमध्ये प्रशिक्षित करण्याचे कार्य डॉ. स्वरूपांनी केले. डॉ. स्वरूप अगदी साध्यातल्या साध्या पदावरील व्यक्तीशी सहज आणि आत्मीयतेने संवाद साधत. त्या व्यक्तीलाही डॉ. स्वरूपांशी बोलताना कुठलाही संकोच वाटत नसे. उटी रेडिओ दुर्बीण-जीएमआरटीचा कुठलाही विभाग, प्रयोगशाळा किंवा कार्यशाळेत त्यांचे एकटय़ाने येणे अनपेक्षित असायचे. आल्यानंतर तिथल्या व्यक्ती करत असलेल्या कामाबद्दल जाणून घेणे हा त्या व्यक्तीसाठी एक शैक्षणिक वर्गच असायचा. साध्या गोष्टीतील विज्ञान समजावून सांगणे, त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाची मीमांसा करणे आणि जगभरात विज्ञान-तंत्रज्ञानात काय घडत आहे, आपण कुठे आहोत याचे विवेचन डॉ. स्वरूपांकडून ऐकणे हा आनंदसोहळा असायचा. इतक्या साधेपणाने संवाद साधणाऱ्या डॉ. स्वरूपांनी ४२ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. रेडिओ खगोलशास्त्रातील संशोधनावर त्यांचे शेकडो शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

या सगळ्यातून दिसायचे ते डॉ. स्वरूपांचे हाडाचा शास्त्रज्ञ असलेले व्यक्तिमत्त्व. शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. स्वरूपांचे रेडिओ खगोलशास्त्राशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स विषयात प्रावीण्य होतेच, त्याचबरोबर यांत्रिक अभियांत्रिकी, बांधकाम अभियांत्रिकी तसेच संगणक विषयातही त्यांनी मिळवलेले ज्ञान थक्क करणारे होते. एवढे असूनही अहंकाराचा जरासाही वारा त्यांना शिवला नव्हता. डॉ. स्वरूप कायम जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्त्व होते. आज ते शरीराने आपल्यात नसले, तरी डॉ. गोविंद स्वरूप नावाचा ‘विज्ञानतारा’ कायमच झळकत राहणार आहे.

(लेखक जीएमआरटीमध्ये तंत्रज्ञ म्हणून गेली तीन दशके कार्यरत असून विज्ञानविषयक लेखनही करतात.)