राजन बावडेकर

अ‍ॅक्च्युरिअल सायन्स – म्हणजेच विमा गणितशास्त्रात पारंगत असलेल्या देशातील पहिल्या पिढीतील काही मोजक्या मंडळींमध्ये जगदीश साळुंखे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांच्या या तज्ज्ञतेमुळेच देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीचे अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदापर्यंत ते पोहोचू शकले. अलीकडेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख..

भारतीय आयुर्विमा महामंडळ या देशातील अग्रगण्य अशा आर्थिक क्षेत्रातील संस्थेचे माजी अध्यक्ष आणि ख्यातनाम अ‍ॅक्च्युअरी जगदीश सदाशिव साळुंखे यांचं अलीकडच्या काळाप्रमाणे वय म्हणावं तसं जास्त नव्हतं. परंतु मधल्या आजारपणामुळे त्यांची ‘एक्झिट’ अकस्मात म्हणावी अशी झाली. त्यांची नोंद शंभर टक्के गिरगावकर अशीच घ्यावी लागेल असाच त्यांच्या आयुष्याचा आलेख होता. जन्म जुलै १९३८, तर तत्कालीन अकरावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये. दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आजही शिकली-सवरली मंडळी ज्याकडे दुर्लक्ष करतात त्या अ‍ॅक्च्युरियल सायन्स (विमागणित शास्त्र) विषयातील फेलोशिपचा अभ्यास त्यांनी केला. तोसुद्धा लंडनमधल्या संस्थेत. (कारण त्या वेळी ती सुविधा आपल्या देशात नव्हती, आता इन्श्युरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे फेलोशिपच्या परीक्षा घेतल्या जातात. या संस्थेच्या जडणघडणीत इतर अनेक मान्यवरांसह साळुंखे यांचाही वाटा आहे.) भारतात आजही अशा फेलोंची संख्या जेमतेम १५०च्या घरात आहे आणि तेही असंख्य खासगी ‘परदेशी’ कंपन्या कार्यान्वित असताना!

अ‍ॅक्च्युअरिजची संख्या इतकी कमी का असावी? त्या अभ्यासक्रमाला जाण्याचा कल कमी का राहिला? शक्यता अशी की भारतीय उपखंडातील मनोवृत्तीमुळे विमा व्यवसाय म्हणजेच ‘अपशकुनी’ उस्तवारी म्हणूनही तो अभ्यासक्रम दुर्लक्षित, उपेक्षित राहिला असावा. परंतु या शक्यतेपेक्षाही दुसरे एक कारण अधिक प्रबळ वाटतं. पदवी घेण्यास, डॉक्टर अथवा इंजिनीयर होण्यास फार तर चार ते सहा वर्षांचा कालावधी लागतो. पण विमा गणितातील फेलो होण्यासाठी किती वर्षे लागतील याचा नेम नाही. अ‍ॅक्च्युरिअल सायन्समध्ये फेलो होण्यासाठी काही मार्गदर्शनपर ‘टिप्स’ घेण्यासाठी आलेल्या कर्मचारी युवायुवतींना साक्षात साळुंखे यांनी सांगितल्याचं स्मरतंय – ‘‘कमीत कमी दहा वर्षे सर्व इच्छा, आकांक्षा ‘जप्त’ करून ठेवा आणि मान वर न करता सातत्यपूर्वक अभ्यास केल्यास निभावून जाल, नपेक्षा नाद सोडून द्या!’’

यामुळेही या कष्टप्रद अभ्यासक्रमाची तीव्रता लक्षात येते व देशभरातील अ‍ॅक्च्युअरिजची संख्या का संकोचते हे ध्यानी येते.

राष्ट्रीयीकरणानंतरच आयुर्विमा महामंडळात साळुंखे यांची कारकीर्द सुरू झाली ती स्वाभाविकपणे अ‍ॅक्च्युरिअल विभागात. प्रदेश प्रवास अप्रूप असतानाच्या काळात, क्वाललंपूरसारख्या मलेशियाच्या राजधानीत, एलआयसीच्या विदेशी ऑफिसातही त्यांनी प्रमुख म्हणून काम पाहिले. दक्षिण क्षेत्राच्या विपणन म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंटचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वी वाटचाल केली. त्यानंतर केंद्रीय कार्यालयात कार्यकारी संचालक (कार्मिक) हा पदभार सांभाळून नंतर मॅनेजिंग डायरेक्टर व शेवटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ३१ जुलै १९९६ रोजी महामंडळाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. मराठी साहित्य विश्वात कवी कुळातील असणे याला एके काळी ‘प्रतिभाशाली’ महत्त्व होते, अ‍ॅक्च्युअरी असणं, ‘अ‍ॅक्च्युअरिल ब्रेन’ असणे याला विमा क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व होते कारण विमेदारांसाठी अनेक आकर्षक योजना आखण्याची कामगिरी अ‍ॅक्च्युअरिजचीच असायची. असंख्य शक्यतांचे शास्त्रच ते. त्यामुळे किचकट आकडेमोड, आयुष्यमान, लांब पल्ल्याच्या गुंतवणुकी, ठेवी आणि परतावे, गणिताच्या असंख्य कसरती या सर्वाचे कसब लागायचं. साळुंखे यांची यावर विलक्षण पकड होती आणि पक्की जाणीव होती. ते अनेकदा अ‍ॅक्च्युअरी असण्याचा सार्थ उल्लेख करायचे. कारणही तसेच होते. कार्यकारी संचालक (कार्मिक) म्हणून कर्मचारी अधिकारी, संघटनांची वेतनवाढ, सेवाशर्तीसंबंधी वाटाघाटी कराव्या लागायच्या आणि महामंडळाच्या वतीने अवघी अवधाने बाळगून, सर्वाचे व्यापक हित ध्यानी ठेवून प्रश्न मार्गी लागायचे. तेसुद्धा काटेकोर हिशेब करूनच. परंतु त्यांच्या अ‍ॅक्च्युअरील प्रतिभेला बहर आला तो म्हणजे आयुर्विमा महामंडळात पेन्शन व गट समूह योजना विभाग १९७०-७१ सुरू झाला तेव्हा! या नव्या विभागात त्यांना पायाभूत काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचं त्यांनी सोनं केलं. त्या वेळी आयुर्विम्याकडे पाठ फिरविणारे बरेच असायचे किंवा कर वाचविण्याचे एक साधन या लघुदृष्टीने पाहिले जायचे. या सर्व अपसमजाला तसेच आयुर्विमा व्यवसायाला एक सकारात्मक वेगळे परिमाण मिळाले ते पेन्शन व गट समूह योजनेअंतर्गत असलेल्या अनेक योजनांमुळे! समाधानी, समृद्ध, काळजीमुक्त जगण्यासाठी अशा तऱ्हेच्या विविध विमा योजना आवश्यक असतात याची जाणीव जनतेला झाली. आजही पेन्शन व गट समूह योजनेसाठी आयुर्विमा महामंडळाचा पर्यायच बहुसंख्य विमेदार निवडतात. साळुंखे यांचा या सर्व आखणीमध्ये सिंहाचा वाटा होता.

नव्वदच्या दशकात सुरुवातीस आलेल्या आर. एन. मल्होत्रा अहवालामुळे आयुर्विमा महामंडळाला एकूणच कार्यालयीन कामकाजात आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे ठरले. संगणकीकरणाचा धडाकेबाज कार्यक्रम, कार्यकारी संचालक (कार्मिक) म्हणून महामंडळाची संपूर्ण कात टाकायची प्रक्रिया साळुंखे यांनी समर्थपणे हाताळली आणि त्यामुळेच आजही स्पर्धेमध्ये खासगी कंपन्यांचा वाटा नगण्य राहिला आहे. त्याचे श्रेय साळुंखे व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांबरोबरच तत्कालीन काळाच्या आधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेल्या सर्वश्री ना. कृ. सिनकर, मु. गो. दिवाण, के. पी. नरसिंहन, एन. एन. जम्बुसरय्या प्रभृतींना जाते. सकारात्मक भूमिका घेऊन पावले उचलणाऱ्या ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉइज फेडरेशनसारख्या संघटनांची भूमिकाही यात महत्त्वाची होती.

महामंडळात प्रदीर्घ काळ सेवा करताना अनेक विभागात आपला ठसा उमटविणारे ज. स. साळुंखे कला, सांस्कृतिक क्षेत्रात मागे कसे राहतील? हेन्रिक झिमर आस्थेने वाचणाऱ्या साळुंखे यांनी महाराष्ट्र मंडळ, योगक्षेम या संस्थेच्या अध्यक्षपदी असताना एरवीचा अ‍ॅक्च्युअरियल शिस्तीचा बडगा बाजूस ठेवून अतिशय सर्जनशील कार्याचा वस्तुपाठ घालून दिला. असो.

गिरगावातील चिकित्सक समूह शाळेच्या मराठी माध्यमातून शिक्षण, १९५०-६० काळातील मुंबई आणि इतर प्रांत व ‘ग्लोबल’ शब्दाच्या जन्माच्या शक्यतेची कुणकुणही कुणास उमजत नसतानाच्या काळातील कोकणवासी गिरगावकर विमा गणितज्ञ जगदीश सदाशिव साळुंखे अत्यंत सहजरीत्या ‘ग्लोबल’ झाले.. तुका झाला आकाशाएवढा, असे. असा सर्जनशील, बुद्धिमान आपल्यातून कायमचा निघून जाणे आणि आयुर्विमा महामंडळाच्या दफ्तरी त्या जाण्याची नोंदही नसणे हेही एक ‘ग्लोबलायझेशन’जन्य असंवेदनशील वृत्तीने दृढ व्हावं त्याचंच लक्षण असावं.

rajanvb27@gmail.com