विनया जंगले

भारत हा जगातील जैवविविधता असलेल्या १७ देशांमध्ये मोडतो. हवामानाच्या वैविध्यामुळे इथे हिमबिबटय़ा, जंगली गाढव यांच्यापासून ते सिंह, वाघ, एकशिंगी गेंडा, हत्ती आदी प्राण्यांची तसेच पक्ष्यांचीही विविधता आढळते. विविध हवामानांत वाढणाऱ्या प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपल्यासमोरील एक मोठे आव्हान ठरले आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Prayas Energy Groups work is primarily in the context of energy and power sector policies and consumer interest
वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’
loksatta. pune, Anniversary, Special article, mental health, society by psychiatrist and actor Dr. mohan agashe
वर्धापनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी

वन्यजीवांचे संशोधन आणि त्यांचे संवर्धन हे नेहमी एकमेकांना पूरक ठरले आहे. एका प्रकारच्या संशोधनात प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून त्या प्राण्यांचे संवर्धन अधिक प्रभावी पद्धतीने केले जाते. तर दुसऱ्या प्रकारच्या संशोधनाद्वारे मानव व वन्यजीव संघर्षांवर उपाययोजना सुचवल्या जातात. मानव व वन्यजीव संघर्ष सुरू राहिला तर लोकांना वन्यजीवांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. या नकारात्मकतेमुळे संवर्धन प्रकल्पाला खीळ बसू शकते. भारतातील काही शास्त्रज्ञांनी प्राण्यांबाबतचे पारंपरिक ज्ञान असलेल्या स्थानिक जमातींना सोबत घेऊन वन्यजीव संवर्धन अधिक प्रभावीरीत्या होऊ शकते हे दाखवून दिले आहे. काही शास्त्रज्ञांनी नष्टप्राय होऊ घातलेल्या प्रजाती बंदिस्त प्रजननाद्वारे पुनर्जीवित केल्या आहेत. अशा विविध मार्गानी  गेल्या काही दशकांत भारताने वन्यजीव संशोधनात मोठी मजल मारली आहे .

वन्यजीव संशोधनाविषयी भारतात उल्हास कारंथ यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. कर्नाटकातील  नागरहोळ राष्ट्रीय उद्यानात त्यांनी भारतीय वाघांवर संशोधन केले. तोवर वाघांची मोजणी ही जंगलात आढळणाऱ्या पंजांच्या ठशांवरूनच केली जाई. परंतु उल्हास कारंथ यांनी वाघमोजणीसाठी भारतात ‘कॅमेरा ट्रॅप’चा प्रभावी वापर केला. वाघ आणि त्यांचे तेथील भक्ष्य यांची संख्या व या दोघांच्या   परस्परावलंबनाची आकडेवारी  कारंथ यांनी प्रथमच  मांडली. या संशोधनातून भारतातील वाघांच्या शास्त्रीय संवर्धनाचा पाया घातला गेला. त्याचप्रमाणे  देशातील मानव व बिबटय़ा यांच्यातील संघर्षांवर ठोस उपाययोजना विद्या अथ्रेय यांच्या मूलभूत  संशोधनातून सुचवल्या गेल्या. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वीपर्यंत मानव-बिबटय़ा संघर्ष सोडवायचा म्हणजे बिबटय़ाला संघर्षांच्या जागेवरून पकडायचे  व दूर कुठेतरी सोडायचे हेच व्यवस्थापनात अभिप्रेत होते. परंतु गेल्या १५ वर्षांत हे चित्र बदललेले दिसते. डॉ. विद्या अथ्रेय व डॉ. अनिरुद्ध बेलसरे यांच्या संशोधनातून बिबटय़ांच्या वागण्याबाबत काही ठोस माहिती उपलब्ध झाली. त्यांच्या अकोले ते जुन्नर  येथील संशोधन प्रकल्पात मानव-वन्यजीव संघर्षांत पकडलेल्या व दूरवर सोडलेल्या काही बिबटय़ांना रेडियो कॉलर किंवा मायक्रोचिप लावून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. त्यातून त्यांना असे आढळले की बिबटय़ांमध्ये स्वत:च्या घरी परतण्याची तीव्र अंत:प्रेरणा असते. त्यामुळे दूरवर सोडलेले बिबटे पुन्हा आपल्या मूळ प्रदेशात परत येतात. त्यामुळे या संघर्षांत उलट अधिकच वाढ होते. नुकतेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्या अथ्रेय यांनी पुन्हा सावित्री व महाराज या दोन बिबटय़ांना रेडियो कॉलर लावली आहे. त्यातून बिबटय़ांच्या जंगलातील हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे. या संशोधनातूनच पुढे कदाचित मुंबईतील मानव-बिबटय़ा संघर्षांवर कायमस्वरूपी तोडगा मिळेल. ऐंशीच्या दशकात अंदमान-निकोबार बेटे वेगळ्या प्रकारच्या पर्यटनासाठी ‘विकसित’ करण्याचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणात सुरू होते. परंतु त्याच दशकात सतीश भास्कर हे अंदमान-निकोबार येथील एकाकी बेटांवर कित्येक महिने राहिले. समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांचा शोध त्यांनी घेतला. भास्कर यांना समुद्री कासवांसंबंधीच्या परिषदेत ‘भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील कासवांची स्थिती’ या विषयावर पेपर वाचण्यासाठी वॉशिंग्टनला बोलावण्यात आले. ज्याप्रमाणे सतीश भास्कर यांच्या या संशोधनामुळे भारतातील समुद्री कासवांच्या संवर्धनाला दिशा मिळाली, त्याचप्रमाणे मद्रास क्रोकोडाइल बँकेच्या रॉम्युलस व्हिटेकर यांनी मगर व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संवर्धनात भरीव काम केले. देशात सापांना पकडण्यावर बंदी आल्यावर दक्षिण भारतातील इरूला या पारंपरिकरीत्या सापांचे ज्ञान असलेल्या  जमातीवर  बेकारीची वेळ ओढवली. त्यावेळी सर्पविषावर प्रतिरोधक बनवण्यासाठी सापांची आवश्यकता होती. रॉम्युलस यांनी इरूलांच्या सापांबाबतच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला. त्यांनी त्या कौशल्यांचा उपयोग करून सर्पविषाचा पुरवठा करणारे केंद्र निर्माण केले. कदाचित वेगळ्या मार्गाला लागू शकणारे इरूला त्यामुळे सन्मानजनक जीवन जगू लागले. सापांबरोबरच मद्रास क्रोकोडाइल बँकेने सुसर संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  २००६ मध्ये संपूर्ण भारतात केवळ १८२ सुसरी उरल्या होत्या. त्यातच  २००८ मध्ये चंबळ  नदीतील प्रदूषणामुळे सुमारे १०० सुसरी मृत पावल्या. त्यामुळे जगातून भारताच्या सुसर संवर्धनाच्या प्रयत्नांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. २०१० मध्ये  तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी मद्रास क्रोकोडाइल बँकेला भेट दिल्यानंतर तीन  राज्यांचा समावेश असलेली ‘चंबळ व्यवस्थापन समिती’ स्थापन केली. त्याद्वारे सुसरींची संख्या कमी होण्याच्या कारणांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. चंबळ नदीतील वाळूउपशावर संपूर्ण बंदी घालण्यात आली. नदीतील प्रदूषण कमी करण्यात आले. नदीत पर्यटकांसाठी बोट सफारी सुरू करून सुसरींचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. परिणामी आज सुसरींची संख्या १५०० च्या वर गेली आहे. भारतातील एक यशस्वी वन्यजीव  संवर्धन प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते.

दुर्मीळ प्राण्यांचे जंगलात संवर्धन करणे कधी कधी अशक्य होते. अशावेळी एखाद्या संरक्षित ठिकाणी त्यांची संख्या पद्धतशीरपणे वाढविण्यात येते. रवीशंकरन यांनी अंदमान येथील इंटरवू बेटावर करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांचा अभ्यास केला. हा पक्षी लाळेने घरटी बनवतो. त्या घरटय़ांपासून चविष्ट असे सूप तयार होते. त्यामुळे या घरटय़ांचा मोठय़ा प्रमाणात चोरटा व्यापार होत होता. या पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली होती. परंतु रवीशंकरन यांनी या पक्ष्यांच्या वागणुकीचा अभ्यास केला. त्यातून त्यांच्या लक्षात आले की, हे पक्षी जिथे जन्माला येतात, तिथेच पुन्हा अंडी घालायला येतात. रवीशंकरन यांनी पाकोळ्यांमधील एक जात असलेल्या पांढऱ्या पोटाच्या पाकोळ्यांची संख्या एका संरक्षित ठिकाणी चांगलीच वाढवली. करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांची अंडी पांढऱ्या पोटाच्या पक्ष्यांच्या घरटय़ात उबवण्यासाठी ठेवली. तिथे जन्माला आलेल्या करडय़ा बुडाच्या पाकोळ्या अंडी घालण्यासाठी पुन्हा त्या संरक्षित ठिकाणीच येऊ लागल्या. यातून अंदमानात करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांची संख्या चांगलीच वाढली.

ईशान्य भारतात जंगली डुकरांची जगातील सगळ्यात छोटी प्रजाती पिग्मी हॉग अतिदुर्मीळ  झाली होती. आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके पिग्मी हॉग उरले होते. अनेक जणांनी पिग्मी हॉगच्या संवर्धनाचे प्रयत्न केले; परंतु ते अयशस्वी ठरले होते. गौतम नारायण यांनी पिग्मी हॉगचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पिग्मी हॉगला वावरण्यासाठी व प्रजननासाठी उंच गवत अत्यंत आवश्यक असते. गेल्या काही वर्षांत उंच गवत वणवे व इतर काही कारणांनी नष्ट झाले होते. त्यामुळे पिग्मी हॉगची संख्या आपोआप रोडावत गेली. गौतम नारायण यांनी गुवाहाटीपासून जवळच असलेल्या बशिष्ट या ठिकाणी पिग्मी हॉग संवर्धन केंद्र स्थापन  केले. तेथे त्यांचे यशस्वी प्रजनन करून आजपर्यंत कितीतरी पिग्मी हॉगना जंगलात नैसर्गिक वातावरणात सोडले आहे. एक नष्टप्राय होऊ घातलेली वन्यजीवांची ही प्रजाती गौतम नारायण यांनी  बंदिस्त प्रजननाद्वारे (कॅप्टिव्ह ब्रीडिंग)  वाढवली आहे .

बाराशिंगा (हार्ड ग्राउंड स्वॅम्प डीअर) या मध्य प्रदेशच्या राज्य-प्राण्याची अशीच कथा. १९७० मध्ये केवळ ६६ बाराशिंगा कान्हा राष्ट्रीय उद्यानात उरले होते. त्यांच्या दुर्मीळ होण्याच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात आले की, बाराशिंगा गवताच्या विशिष्ट जातीच  खातो. त्या जाती कमी झाल्यामुळे बाराशिंगांची संख्या कमी झाली. त्या विशिष्ट जातीच्या गवताची मुद्दाम लागवड करण्यात आली. त्यासाठी मुद्दाम पाण्याची तळी निर्माण केली गेली. आज बाराशिंगांची कान्हामधील संख्या चांगलीच वाढली आहे.

डॉ. अनिरुद्ध बेलसरे आणि डॉ. अबी वनक २००५ पासून वन्यप्राण्यांमधील विविध रोगांवर संशोधन करीत आहेत. या संशोधनात ते  वन्यप्राण्यांमधील रोग व पर्यावरणाशी असलेला त्यांचा संबंध याचा अभ्यास करत आहेत. भारतात तरी हा अशा प्रकारचा अभ्यास प्रथमच होत आहे.

या संशोधनांतून काही प्रजाती वाचविण्यात आपणास यश आले असले तरी बरेचसे प्राणी व पक्षी अजूनही संकटग्रस्त आहेत. वन्यजीवांचे योग्य संवर्धन करायचे असेल तर देशातील वन्यजीव संशोधकांना आणि त्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. वन्यजीव संशोधनाच्या वाटेवरच प्रभावी अशा वन्यजीव व्यवस्थापनाची गुरुकिल्ली धोरणकर्त्यांना सापडणार आहे, हे नक्की.

लेखिका संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माजी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत.

vetvinaya@gmail.com