गोरक्षक मंत्री!

 

कामाला लागा असा आदेश आल्यामुळं अनेक मंत्रालयांत कॅबिनेट आणि राज्यमंत्री सचिवांकडून खात्याच्या कारभाराची माहिती घेण्यात मग्न आहेत.  कृषी , अन्न व नागरी पुरवठा, पशुविकास ही सगळीच खाती कृषी भवनात आहेत. अन्न व नागरीपुरवठा खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद पुन्हा रामविलास पासवान यांनाच दिलेलं आहे. या खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही हे खातं नवं नाही. गेल्या मंत्रिमंडळात हे खातं त्यांच्याकडंच होतं, पण ते सोडून दानवेंना राज्यात परतावं लागलं होतं. पूर्वीची लेटरहेड शिल्लक आहेत तीच आता वापरायला काढतो, असं गमतीनं दानवे सांगत होते. दानवेंना दिल्लीत परत यायचं होतं. त्यांच्या मनासारखं झाल्यामुळं दानवे सध्या खुशीत आहेत. राधामोहन नावाचे एक गृहस्थ पूर्वी कृषिमंत्री होते. शेती क्षेत्रात आता शहांचे विश्वासू नरेंद्र सिंह तोमर लक्ष घालणार आहेत. पशुपालन-मत्स्य व्यवसायाचा विकास गोरक्षकांचे खंदे समर्थक गिरिराज सिंह कसा करतील हे पाहण्यासारखं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मंत्री असताना त्यांच्या वाटय़ाला हेच खातं आलं होतं. त्यामुळं हे खातं पशुपालनाचं असलं तरी गोरक्षणाचं काम करत नव्हे याची मंत्रिमहोदयांना कल्पना असावी! पासवान आणि नितीशकुमार यांच्या ईद साजरी करण्यावरून ‘गोरक्षक मंत्र्यां’नी नाहक वाद निर्माण केलेला होता. ते भाजपमधल्या मुस्लीम मंत्र्याच्या ईदच्या मेजवानीला जाण्याची शक्यता कमीच होती. ते गेलेही नाहीत. मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसेन दरवर्षी ईदनिमित्त भाजपच्या शाकाहारी मंडळींनाही मेजवानीला बोलावत असतात. या वर्षीही या दोघांनी आपल्या राजकीय मित्रमंडळींना बोलावलेलं होतं. अनेक मंत्र्यांनी मेजवानीचा आनंद लुटला, पण चविष्ट चर्चा मात्र गिरिराज सिंह यांचीच होती.

पार्किंग करा, पोटही भरा

करोलबाग असो वा सरोजिनी नगर, दिल्लीच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी वाहतूक कोंडी असतेच. वाहतूक कोंडी हे काही दिल्लीचंच वैशिष्टय़ नव्हे. भारतातील कुठल्याही शहरात-गावात ही कोंडी असतेच; पण दिल्लीत कार, दुचाकी वगैरे वाहनं रस्त्याच्या कुठल्याही भागात उभी असू शकतात. ती रस्त्याच्या कडेला उभी असतीलच असं नाही. खरं तर ठिकठिकाणी अत्याधुनिक कार पार्किंगची सुविधा असायला हवी; पण ती न करताच दिल्लीचे काही भाग वाहतूकमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पादचाऱ्यांसाठी ही कमालीचा आनंद देणारी बाब असली तरी तो किती काळ टिकेल हे सांगणं कठीण. ल्युटन्स दिल्लीतही वाहतुकीमुळं फुप्फुसांचा कोंडमारा होतोच. पटियाला हाऊससमोर पक्षकारांच्या, वकिलांच्या इतक्या गाडय़ा उभ्या असतात, की तिकडं नजर टाकली तरी आपला श्वास बंद होतोय असं वाटतं. नितीन गडकरींच्या परिवहन भवनात मात्र अत्याधुनिक कार पार्किंग सुविधा केलेली आहे. इथं शंभर गाडय़ा एका वेळेला पार्क करता येतात. राष्ट्रीय महामार्ग विभागानं पुढाकार घेऊन कारवाल्यांची सोय करून दिलेली आहे. ही सुविधा लोकसभा निवडणुकीपूर्वीच उपलब्ध झालेली होती; पण उद्घाटन गेल्या आठवडय़ात झालं. कृषिभवन आणि शास्त्रीभवनातही असं कार पार्किंग करायला हवं. या दोन्ही भवनांत अनेक मंत्रालयं आहेत आणि लोकांची ये-जा खूप असते. त्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कोंबून कार उभ्या केलेल्या असतात. परिवहन भवनातील कार पार्किंग सात मजल्यांचं आहे. आठव्या मजल्यावर खाण्याचीही उत्तम सुविधा आहे. हे मंत्रालय गडकरींचं असल्यानं इथं मराठी पदार्थाची रेलचेल आहे. पावभाजी, बटाटावडा, सोलकढीचा आस्वाद घेऊन, स्वत:ची पोटपूजा करून मग सत्तेच्या दरबारात फेरफटका मारणं सोयीचं झालंय!

कोणी आहे का?

२४, अकबर रोड हे काँग्रेसचं मुख्यालय. राष्ट्रीय पक्षाचं कार्यालय; पण तिथं गेल्यावर, कोणी आहे का, असं विचारावं लागतं. राहुल गांधी यांनी या पक्षाचं नेमकं काय करायचं ठरवलंय हे अजून कळलेलं नाही. कोणी म्हणतं राहुलच अध्यक्ष राहतील. त्यांच्या मदतीला दोन कार्याध्यक्ष नेमले जातील. ते पक्षाचं काम पाहतील. मग राहुल काय करणार? कार्याध्यक्ष तरी कोणाला करणार? चर्चेतील नावं सुशीलकुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे. ही नावं कोणाला महत्त्वाची वाटली हे माहिती नाही. दोघेही साठी पार केलेले. लोकसभा निवडणुकीत परंपरागत सोलापूर आणि गुलबर्गा मतदारसंघात पराभूत झालेले. दोघेही जुन्या वळणाचे. नवी पिढी त्यांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाही. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट या तरुण नेत्यांबद्दलही बोललं जातंय, पण काँग्रेस पक्ष कोण चालवणार हे गुलदस्त्यातच आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस झाले. मोदींचं नवं मंत्रिमंडळ कामालाही लागलं. मोदींचा विदेश दौराही ठरला, पण राहुल गांधी यांना वायनाडला जायला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर दोन आठवडय़ांनंतर राहुल गांधी आपल्या दक्षिणेतल्या नव्या मतदारसंघात पोहोचले. आता काँग्रेसकडं बोलण्याजोगं काही नसल्यानं पक्ष प्रवक्त्यांनाही फारसं काम नाही. आठवडाभरात राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची एकही पत्रकार परिषद झालेली नाही. लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं म्हणून पक्ष नव्हे तर व्यक्तिगत स्तरावर अभिषेक मनू सिंघवी न्यायालयात जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे त्यांच्या खासदार मुलाला घेऊन दिल्लीत आले, पण पक्षाध्यक्षांनी भेट दिली नाही. मग, पिता-पुत्र थेट पंतप्रधानांना भेटायला गेले. असा सावळा गोंधळ काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र राहुल गांधींवरच आशा ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीत पोरानं खूप काम केलं बरं. धर्म आणि राष्ट्र निवडणुकीत आणून मतं फिरवली तर त्याला कोण काय करणार?.. काँग्रेसच्या मराठी कार्यकर्त्यांचं हे मत.

हेडमास्तरांची पटपडताळणी

पंतप्रधान मोदींनी गेल्या वेळी मंत्र्यांना पहिल्या शंभर दिवसांत काय करणार याचा आराखडा द्यायला सांगितला होता. या वेळीही मोदींनी मंत्र्यांना वही घेऊन बोलावलेलं आहे. प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला आपापल्या खात्याच्या धोरणांची अंमलबजावणी कशी करणार हे सांगावं लागतंय. हेडमास्तर मोदी वर्गात छडी घेऊन आल्यामुळं विद्यार्थ्यांचा नाइलाज झालेला आहे. वर्गात गप्पा मारणं बंद. वही-पुस्तक उघडून मान खाली घालून अभ्यास करण्यात विद्यार्थी मग्न झालेले आहेत. मधल्या सुट्टीत थोडं बाहेर जाऊन येतो म्हटलं तरी हेडमास्तर रागवतात.  गेल्या वर्गात जे विद्यार्थी होते त्यांना अनुभव आहेच. उनाडक्या करायला वेळच नाही. मतदारसंघात गेलं तरी तातडीनं परत यावं लागतं. हेडमास्तर विदेशात जाणार आहेत तेव्हा थोडी मोकळीक मिळेल असं म्हणतात, पण तात्पुरता हेडमास्तर आणखी कडक. कधी-कोणत्या वेळेला बैठक बोलावली जाईल हेही सांगता येत नाही. बैठक म्हणजे परीक्षाच. परीक्षेत नापास झालं की वर्ष बरबाद. त्यामुळं कॅबिनेट मंत्री होऊनही रुबाब दाखवता येईना असं झालंय. राज्यमंत्रिपद हे लिंबूटिंबूच ठरवलं गेलंय. हेडमास्तरांसाठी हे मंत्री म्हणजे बालवाडीचा वर्ग. गेल्या पाच वर्षांत कुठल्या राज्यमंत्र्याकडं काम होतं हे तपासून पाहायला हवं. बालवाडीही पूर्ण भरलेली असते. ‘ओडिशातील मोदी’ सारंगी हे राज्यमंत्री. सारंगी ओडिशात सायकलवरून फिरतात असं म्हणतात, पण त्यांचा हेलिकॉप्टरमधून उतरल्याचा फोटो प्रसिद्ध झालाय. कदाचित सारंगी  मतदारसंघात जाऊन परत आले असावेत. त्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला असावा! सध्या दिल्लीत हेडमास्तरांची अशी पटपडताळणी सुरू आहे.