01 March 2021

News Flash

रोपवाटिकांना बहर!

उस रोपांचा मागणी पुरवठा यामध्ये सर्वाधिक पातळीवर राहिलेला दिसत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

बदलत्या काळात, नव्या तंत्रज्ञनाच्या युगात कृषी क्षेत्रात रोपवाटिकांचे महत्त्व अनन्यसाधारण बनले आहे. करोना काळात कृषी क्षेत्राचे महत्त्व वाढू लागल्यावर तर या व्यवसायाला मोठी गती प्राप्त झाली आहे. हवामान आणि बाजारपेठेचा अचूक अंदाज घेत पिकाचा निर्णय घेताना या तयार रोपांना मोठी मागणी येत आहे. गेल्यावर्षीपासून या रोपवाटिकांना जणू बहरच आला आहे.

कृषी क्षेत्रात रोपवाटिकांचे महत्त्व अनन्यसाधारण बनले आहे. करोनाच्या संकटावर मात करून हा व्यवसाय पुन्हा स्थिरावला आहे, नव्हे, तर त्यास बरकतीचे दिवस आले. यातही पश्चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ऊस रोपवाटिका व्यवसाय तर सध्या सर्वात जोमात असलेला व्यवसाय ठरला आहे. शेती क्षेत्राला एक नवी दिशा देणारी घटना म्हणावी लागेल.

अलीकडच्या ज्या रोपवाटिकांचे क्षेत्र विस्तारात आहे, जेथे कलमे किंवा रोपांची निर्मिती केली जाते त्या जागेस रोपवाटिका असे म्हणतात. इंग्रजीत त्यास ‘नर्सरी‘ म्हणतात. रोपवाटिकेत तयार केलेल्या कलमांची, रोपांची काळजी घेतली जाते असा अर्थ अभिप्रेत आहे. रोपांची वेगवेगळ्या प्रकारे अभिवृद्धी करणे, तयार केलेल्या रोपांची काही काळापर्यंत योग्य प्रकारे जोपासना करणे आणि अशा योग्य रोपांचा किंवा कलमांचा पुरवठा करणे अशा तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या रोपवाटिकेमध्ये सांभाळल्या जातात. असा व्यवसाय पश्चिम महाराष्ट्रात स्थिरावला आहे. त्याचा वेलू प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे.

करोनाच्या संकटाने साऱ्या जगाची अर्थव्यवस्था थंडावलेली असताना कृषी क्षेत्रात मात्र मोठी हालचाल होत होती. याचाच परिणाम रोपवाटिकांतील तयार रोपांच्या मागणीत झालेला दिसत आहे. यातही अनेकजण चांगल्या पाऊसमानामुळे ऊसशेतीकडे वळल्याने त्याच्या रोपांना यंदा कधी नव्हे एवढी प्रचंड मागणी वाढलेली दिसून येत आहे. एकटय़ा पश्चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमधून मराठवाडा, विदर्भ आणि थेट गुजरातमध्ये कोटय़वधी ऊस रोपांची निर्यात झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे करोनाच्या काळातसुद्धा ऊसरोपवाटिका व्यवसाय जोमात राहिलेला आहे.

करोना काळामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट घडली, ती म्हणजे शेतीत राबणारे हात कायम कार्यरत राहिले. शेतात तयार झालेला भाजीपाला, फळे यांची तोडणी आणि विक्री वेळेवर होणे महत्त्वाचे असते. शासनाने काही सेवा या अत्यावश्यक केल्या. याचा फायदा रोपवाटिका, नर्सरी यांना मोठय़ा प्रमाणात झाला.  भाजीपाला, फळ बागा संवर्धन, टिशू कल्चर रोपवाटिका व्यावसायिकांना असे परवाने देऊन त्याची रोपे शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेत पोहोचण्यातील अडथळे दूर केले गेले. उस रोपांचा मागणी पुरवठा यामध्ये सर्वाधिक पातळीवर राहिलेला दिसत आहे.

यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने साखर कारखानदार वेळीच सतर्क झाले. त्यांनी आपल्या परिसरात नवीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. याचाच भाग म्हणून उसाच्या रोपांना मोठी मागणी येऊ लागली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रोपवाटिका चालकांनी यासाठी कारखानदारांशी संपर्क करून लाखो ऊस रोपांचा पुरवठा केला. सोलापूर, लातूर , उस्मानाबाद , बीड, जळगाव या भागात मोठय़ा प्रमाणात ऊस रोपांचा पुरवठा केला जाऊ लागला. आश्चर्याचा भाग असा, की यातील सर्वाधिक पुरवठा गुजरातमध्ये झाला. यामध्ये कोल्हापूर , सांगली भागातील अनेक व्यावसायिक आघाडीवर होते.

रोपांच्या वाढत्या मागणीमुळे या काळात नव्या रोपवाटिका सुरू झाल्या. तसेच या व्यवसायावर आधारित अनेक उद्योगही पुढे आले. त्यांना लागणारे मजूर, वाहने, कोकोपीट, उसाचा डोळा काढणी यंत्र यांचा पुरवठा करणारे अनेक व्यवसाय पुढे आले. हजारोंच्या संख्येने नव्याने रोजगार या व्यवसायाने दिले आहेत. ऊस रोपांची विक्री करणारे नवे दलाल हेही मोठय़ा संख्येने पुढे आले आहेत. ते मध्यस्थाची भूमिका घेऊन दलालीवर रोपांची विक्री करतात. उसाला मिळणारा हमखास दर आणि कमी खर्च यामुळे उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. उलट, सोयाबीन, भुईमूग हे क्षेत्र कमी होते आहे. केळी, भाजीपाला क्षेत्रही घटत चालले आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, हमीभावाची नसणारी खात्री यामुळे शेतकरी या पिकापासून दुरावत चालला आहे. यातून भाजीपाला पीक क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

महाराष्ट्र , कर्नाटक या राज्यात अजूनही सहकाराचे जाळे मोठय़ा प्रमाणात आहे. साखर कारखानदारी चांगल्या स्थितीत आहे. शेतकऱ्यांमध्ये बेणे मळा करून किंवा चांगले बियाणे मिळवून ऊस लागणीचा प्रवाह कमी झाला आहे. हल्ली या रोपांची लागण मोठय़ा प्रमाणात केली जाते. याचा परिणाम मोठय़ा संख्येने ऊस रोपवाटिका तयार झाल्या आहेत. ऊस रोप लागण करण्याचे अनेक फायदे आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. तसेच, काही साखर कारखान्यांनी ऊस लागणीसाठी शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. काही रोपवाटिकांना त्यांनी त्याची कंत्राटे दिलेली आहे.  सध्या रोपवाटिका व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, धाडस, मोठी गुंतवणूक आणि व्यवसायाची वाढती जोखीम त्यामुळे नवे प्रयोग केले जात आहेत. अनेक भागात रोपवाटिकांचे पट्टे तयार झालेले आहेत. विशिष्ट भागांमध्ये भाजीपाल्याच्या रोपवाटिका दिसतात. काही भागांमध्ये फक्त उसाच्या रोपवाटिका मोठय़ा संख्येने दिसतात. काही ठिकाणी फळबागांसाठी लागणाऱ्या झाडांच्या रोपवाटिका, नर्सरी कार्यरत आहेत. या रोपवाटिकांमुळे त्या त्या परिसराचा विकास होण्यास मोठी चालना मिळाली आहे.  किंबहुना त्या परिसराला रोपवाटिकांमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. या रोपवाटिका आज शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची नवी ओळख आणि आशा बनून राहिली आहे.

प्रोत्साहनाची गरज

कृषिपूरक अनेक व्यवसायांना या धंद्याने बरकतीचे दिवस आणले आहेत. अनेक खासगी कंपन्यांना आपल्या कार्य विस्तारासाठी या रोपवाटिका महत्त्वाच्या वाटतात. त्यांचाही चांगला कृषी विस्तार या माध्यमातून होताना दिसतो. किंबहुना या माध्यमातून त्या आपले नवे वाण हिरिरीने बाजारात आणत आहेत. आज अनेक उद्योजक छोटय़ा—मोठय़ा गावातील रोपवाटिका, नर्सरीधारकांच्या दिमतीला आपले कौशल्य घेऊन उभे आहेत.  मात्र,  शासन अजूनही विद्यापीठाच्या संशोधनावर आणि कृषी विभागाच्या विस्तारावर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक चांगले निर्णय, नवीन संशोधन, चांगले वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. खऱ्या अर्थाने या छोटय़ा व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

– रावसाहेब पुजारी, कृषी अभ्यासक

dayanand.lipare@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:13 am

Web Title: article on importance of nursery increasing abn 97
Next Stories
1 लाखोंचे उत्पन्न देणारी बोरशेती
2 ‘रंग’लेले राजकारण…
3 स्वामी विवेकानंदांचा हिंदूंनी स्वीकारच केला आहे!
Just Now!
X