अनेक देशांमध्ये द्वेष भावनेतून घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत आहे. अमेरिकेतील अल् पासो शहरात दुकानावर केलेला गोळीबार असो की स्वच्छ भारत अभियान राबवण्याबद्दल अमेरिकेत बिल गेट्स फाऊंडेशनकडून भारत सन्मानित होत असताना मध्य प्रदेशात उघडय़ावर शौचाला बसलेल्या दोन दलित अल्पवयीन भावंडांची सवर्णानी केलेली हत्या असो; अशा प्रकारच्या हिंसेची ही अलीकडची उदाहरणे. एफबीआय या अमेरिकी तपास यंत्रणेच्या ताज्या अहवालातील आकडेवारीनुसार तेथील द्वेषमूलक गुन्ह्य़ांच्या (हेट क्राइम) वाढीचे प्रमाण भयावह आहे. गेल्या १६ वर्षांतील ही वाढ सर्वाधिक, म्हणजे २१ टक्क्यांहून जास्त आहे.

द्वेषमूलक गुन्ह्य़ांच्या वाढीचे वृत्त प्रसिद्ध करताना ‘अल्जझिरा’ वाहिनीच्या संकेतस्थळाने त्याला अमेरिकेतील काही अभ्यासकांची अवतरणे जोडली आहेत. ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या द्वेषमूलक धोरणांवर बोट ठेवणारी आहेत. हिस्पॅनिक किंवा लॅटिनो (मेक्सिको, स्पेन वंशाचे अमेरिकी नागरिक) नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या आकडेवारीवर भाष्य करताना ‘कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी’च्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ हेट अ‍ॅण्ड एक्स्ट्रिमिझम’चे संचालक ब्रायन लेव्हीन म्हणतात, ‘‘सामाजिक-राजकीय क्षेत्रात द्वेष भावनेची देवाणघेवाणच सुरू असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. एका गटाने द्वेषमूलक कृत्य केले, की दुसऱ्या गटाने त्याची परतफेड म्हणून तसेच कृत्य करायचे, असे हे दुष्टचक्र आहे.’’ दहशतवादाच्या अनुषंगाने २०१६ मध्ये मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती, आता स्थलांतराच्या प्रश्नावरून लॅटिनोंना लक्ष्य करण्यात येत आहे, अशी टिप्पणीही लेव्हीन यांनी केली आहे.

हिस्पॅनिक किंवा लॅटिनो नागरिकांवर २०१७ मध्ये ५५२ हल्ले झाले होते, तर २०१८ मध्ये ६७१ नागरिकांना लक्ष्य केले गेले. वॉशिंग्टन येथील लॅटिनो नागरी हक्कसंघटना ‘युनिडोस-यूएस’च्या प्रमुख जेनेट मरग्युआ यांनी हिस्पॅनिकांबद्दल द्वेष वाढण्यास काही प्रमाणात ट्रम्पही जबाबदार असल्याचे मत मांडले. ‘‘ट्रम्प वारंवार लॅटिनोंचा उल्लेख अत्यंत द्वेषमूलक शब्दांत आणि धर्माध पद्धतीने करतात. अल् पासो गोळीबारातील शोकांतिका पाहिल्यावर द्वेषयुक्त शब्दांची परिणती हिंसेतही होऊ  शकते याची प्रचीती आली,’’ अशी टिप्पणीही जेनेट यांनी ‘अल्जझिरा’ला प्रतिक्रिया देताना केली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीट्सबर्ग येथे ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर गोळीबार करून ११ निरपराधांचा बळी घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ज्यूंविरोधातील द्वेषमूलक गुन्ह्य़ांमध्ये ११ टक्के घट झाल्याची माहिती प्रसिद्ध करताना ‘द टाइम्स ऑफ इस्राएल’ने पुन्हा ज्यूंनाच सर्वाधिक लक्ष्य करण्यात आल्याचे भाष्य केले आहे. तसेच ज्यूद्वेषातून घडणाऱ्या गुन्ह्य़ांचे प्रमाण ११ टक्क्यांनी घटले असले, तरी अशा गुन्ह्य़ांमध्ये २४ ज्यूंचा बळी घेण्यात आला आणि १९९१ पासूनची ही संख्या सर्वाधिक आहे, हा विरोधाभासही अधोरेखित केला आहे. धर्मद्वेषातून घडलेल्या १४१९ गुन्ह्य़ांपैकी ८३५ गुन्ह्य़ांमध्ये हल्लेखोरांच्या द्वेषाला ज्यू नागरिकच बळी पडले. हे प्रमाण ५८ टक्के असल्याबद्दल या वृत्तात खंत व्यक्त करण्यात आली आहे.

शिकागोतील ‘लॉण्डेल न्यूज’ या द्विभाषिक हिस्पॅनिक वर्तमानपत्राने शिकागोतील अशा गुन्ह्य़ांमध्ये ५१ टक्के वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सध्याच्या द्वेषपूर्ण सामाजिक वातावरणावर विचारमंथन करण्यासाठी नेत्यांनी एकत्र येण्याच्या ‘अँटी डिफेमेशन लीग’ (एडीएल) या आंतरराष्ट्रीय ज्यू संघटनेच्या आवाहनालाही ठळक प्रसिद्धी दिली आहे. तृतीय पंथियांवरील (एलजीबीटीक्यू) हल्ल्यांमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आणि लिंगभेदभावातून घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये ४१ टक्के वाढ झाल्याची दखलही या वृत्तात प्रामुख्याने घेण्यात आली आहे.

‘एफबीआय’चा अहवाल प्रसिद्ध होताच स्पेनमधील ‘ऑलिव्ह प्रेस’ने प्रसिद्ध केलेली बातमी धक्कादायक आहे. स्पेनध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक ५७ हल्ले ख्रिस्ती धर्मीयांवर करण्यात आल्याचे आणि हे प्रमाण मुस्लिमांवरील हल्ल्यांपेक्षा दुप्पट असल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यासाठी ‘ऑफिस फॉर डेमोक्रॅटिक इन्स्टिटय़ूशन्स अ‍ॅण्ड ह्य़ूमन राइट्स’ या संस्थेच्या अहवालाचा दाखला देण्यात आला आहे. याबाबतची आकडेवारी ‘ऑब्झव्‍‌र्हेटरी फॉर रिलिजियस फ्रीडम’ या संस्थेचे अध्यक्ष मार्सिया गार्सिया यांनी जाहीर केली. ते म्हणतात, ‘‘स्पेनमध्येही ख्रिस्ती समाजाबाबत भेदभाव केला जातो, त्यांच्यावरही हल्ले केले जातात. इतकेच नव्हे, तर चर्चही उद्ध्वस्त केली जातात.’’

अमेरिकेत ज्यू, मुस्लीम यांच्यापाठोपाठ भारतीय वंशाचा शीख समुदायही धार्मिक द्वेषाला बळी पडत आहे. ‘गो बॅक टू यूवर कण्ट्री’ अशा द्वेषमूलक घोषणा तेथील कट्टरपंथीय देतात आणि त्याला ट्रम्प यांची विद्वेषी धोरणेच कारणीभूत असल्याचे अधोरेखित करणारा एक लेखही ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केला होता. वास्तविक तथाकथित राष्ट्रवादी आणि लोकानुनयी नेत्यांकडे सत्ता एकवटल्यापासून अशा प्रकारच्या धार्मिक आणि वांशिक गुन्ह्य़ांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई