21 November 2019

News Flash

व्यर्थ न हो बलिदान!

काश्मीरमधील चकमकींच्या बातम्या गेल्या काही दिवसांत पुन्हा येत आहेत

(संग्रहित छायाचित्र)

आनंद करंदीकर

‘त्यांचे किती, आपले किती’ हा हिशेब मांडल्यास, काश्मिरात हुतात्मा जवानांची संख्या वाढल्याचे दिसते. जवानांचे प्राण सहजासहजी जाऊ नयेत, हे पाहण्याची जबाबदारी केवळ लष्कराची नसून राजकीय धोरणकर्त्यांचीही आहे..

काश्मीरमधील चकमकींच्या बातम्या गेल्या काही दिवसांत पुन्हा येत आहेत. अनंतनाग जिल्ह्य़ात १२ जून रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात, ‘केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात तीन जवानांसह चार जखमी झाले. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.’  (लोकसत्ता गुरुवार, १३ जून २०१९). त्या अगोदर पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी याच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० हून अधिक भारतीय जवान शहीद झाले आणि पाच अतिरेकी हल्लेखोर ठार झाले. याच काळात भारतीय सनिकांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या काही बातम्या आल्या. पण गेल्या सहा महिन्यात मला असे वाटत आले की दहशतवाद्यांकडून फारच सैनिक मारले जात आहेत. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. कोणी जागतिक शांततावादी असे म्हणतील, की त्यांचे किती मेले आणि आपले किती मेले असे बघणे हेच क्रूर आणि अमानवी आहे. विंदा करंदीकर त्यांच्या ‘आणखी एक रणगीत’ या कवितेत म्हणतात : ‘आमची प्रेते आम्ही आणली, त्यांची प्रेते त्यांनी नेली, चार आणि चार मिळून त्याला वाटली आठ झाली.. चार आणि चार आठ हेच लागले त्याला पिसें!’ या शांततावादी दृष्टिकोनात तथ्य जरूर आहे; पण मी अजूनही आमचे जवान आणि ते दहशतवादी यांच्यात फरक करतो. मला आमच्या जवानांचे प्राण हे दहशतवाद्यांच्या प्राणांपेक्षा कितीतरी अधिक मोलाचे वाटतात. ‘पॅटन’ या इंग्रजी चित्रपटातील जनरल पॅटन यांनी सनिकांना उद्देशून केलेल्या भाषणातील एक वाक्य अजून मला वारंवार आठवते. ते म्हणतात : ‘स्वतच्या देशासाठी बलिदान करून कोणी युद्ध जिंकत नाही; त्या शत्रू सनिकाला त्याच्या देशासाठी बलिदान करायला भाग पाडले, तरच युद्ध जिंकता येते.’

तेव्हा, आपल्या प्रत्येक जवानाच्या बलिदानाच्या बदल्यात किती दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले, हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. कोणी असेही म्हणतील की, ही गणिते सनिकी अधिकाऱ्यांनी करावी, त्यात सामान्य नागरिकांनी लक्ष घालून प्रश्न विचारू नयेत; त्यामुळे सनिकांचे मनोधर्य कमी होईल. मला तसे वाटत नाही. आपले सैनिक का मारले जात आहेत? गेल्या पाच वर्षांत शहीद होणाऱ्या प्रत्येक जवानामागे किती दहशतवादी मारले गेले? हे प्रश्न सामान्य नागरिकांनीसुद्धा विचारले पाहिजेत आणि आपल्या सनिकांचे प्राण कमी किमतीत देशरक्षणात अर्पण केले जाणार नाहीत याबद्दल सजगता दाखवली पाहिजे. नागरिक आपल्या बलिदानाबद्दल जागरूक आहेत, आपले बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रश्न विचारत आहेत, यातून सनिकांचे मनोधर्य कमी होणार नाही तर वाढेलच, असे मला वाटते.

त्यामुळे याविषयी मी थोडा जास्तीचा शोध घेतला. यावर्षीच्या- म्हणजे २०१९च्या पहिल्या चार महिन्यांत ६१ जवान हुतात्मा झाले,  अशी माहिती ‘श्रीमती सुलेखा, संचालक, केंद्रीय गृह मंत्रालय’ यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. ‘त्याच काळात ८६ दहशतवादी ठार करण्यात आले’ अशी माहिती ले. जनरल रणवीर सिंग यांनी उधमपूर येथे भाषण करताना दिली आहे. १ मे ते १५ जून या काळात किती जवान शहीद झाले आणि किती दहशतवादी ठार करण्यात आले, याची मी माहिती गोळा केली. ही सर्व माहिती एकत्र केल्यास असे लक्षात येते, की १ जानेवारी ते १५ जून २०१९ या काळात ६५ जवान हुतात्मा झाले आणि ९० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गेल्या दहा वर्षांत या संख्येमध्ये कसा फरक घडत आला आहे, याची माहिती संकलित करून खालील तक्त्यात दिली आहे.

वरील तक्त्यातील आकडेवारीवरून खालील गोष्टी स्पष्ट होतात :

२००९ ते २०१३ या कालखंडात शहीद झालेल्या जवानांच्या संख्येत नंतरच्या पाच वर्षांत- म्हणजे २०१४ ते २०१८ या काळात ३२ टक्क्यांनी वाढ झाली. २५५ ही शहीद होणाऱ्या जवानांची संख्या ३३९ इतकी वाढली.

या दोन कालखंडांची तुलना केली, तर ठार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येत फार वाढ झाली नाही. ८१५ ही संख्या वाढून ८३८ इतकी झाली.

धारातीर्थी पडणाऱ्या प्रत्येक जवानामागे २००९ ते २०१३ या कालखंडात ३.२ दहशतवादी ठार होत होते. नंतरच्या पाच वर्षांत धारातीर्थी पडणाऱ्या जवानामागे ठार होणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या २.५ इतकी कमी झाली. म्हणजे यामध्ये २२ टक्क्याने घट झाली. गेल्या सहा महिन्यांत तर दर शहीद होणाऱ्या जवानामागे ठार होणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या १.४ इतकी कमी झाली आहे. हुतात्मा जवानांची संख्या वाढते आहे, त्या प्रमाणात ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढताना दिसत नाही.

गेल्या पाच वर्षांत- म्हणजे २०१४ ते २०१८ या कालखंडात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०१४ साली दहशतवाद्यांनी २२२ हल्ले केले, ते २०१८ साली ६१४ पर्यंत जाऊन पोहोचले.

एकंदरीत परिस्थिती वाईट होत चालली आहे. दहशतवाद्यांच्या प्राणांच्या बदल्यात जवानांचे प्राण स्वस्त होत आहेत. हे काय होत आहे? पुलवामाच्या वेळी ‘रस्त्यावर दहशतवाद्यांचा हल्ला होईल, तेव्हा आपल्या सुरक्षा दलांना विमानाने पाठवा’ असा प्रस्ताव होता अन् तो खर्च फार होतो म्हणून नामंजूर करण्यात आला, अशाही बातम्या होत्या. परवा १२ जूनला झालेल्या समोरासमोरील गोळीबारात चार जवान हुतात्मा झाले आणि एकच दहशतवादी ठार झाला. आपल्या जवानांकडील बंदुका कमी प्रतीच्या आहेत काय? दहशतवाद्यांकडे अधिक चांगली हत्यारे आहेत काय? आपल्या टेहळणी यंत्रणा आणि हेरयंत्रणा कमजोर आहेत काय? आपण हे प्रश्न विचारलेच पाहिजेत. होय, या प्रश्नांची उत्तरे लष्करी अधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी शोधायची आहेत.

पण हा प्रश्न खरोखरच अधिक चांगली टेहळणी, अधिक चांगली हेरगिरी, अधिक चांगली हत्यारे आणि अधिक चांगले चकमकींचे नियोजन असाच आहे का? तर नाही.

दहशतवाद्यांमध्ये आता पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांचे प्रमाण कमी आणि स्थानिक नागरिकांचे प्रमाण जास्त होत चालले आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेली जी आकडेवारी ४ फेब्रुवारी २०१९ च्या ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये छापून आली आहे, ती अशी : ‘गेली नऊ वर्षे काश्मिरी भारतीय नागरिक दहशतवाद्यांमध्ये भरती होण्याची दर वर्षांची संख्या- २०१० : ५४; २०११ : २३; २०१२ : २१; २०१३ : १६; २०१४ : ५३; २०१५ : ६६; २०१६ : ८८; २०१७ : १२६; २०१८ : १९१.’ म्हणजे काश्मिरी भारतीय नागरिक दहशतवाद्यांमध्ये भरती होण्याची संख्या २०१३ साली १६ इतकी होती ती २०१८ साली १९१ इतकी वाढली. सहा वर्षांत ही संख्या बारा पटीने (१२७३ टक्के) वाढली!

‘न्यूज इंडिया’मधील बातमीप्रमाणे, सन २००० नंतर प्रथमच २०१८ साली- ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये काश्मिरी भारतीय नागरिक दहशतवाद्यांची संख्या (१५०) ही ठार झालेल्या पाकिस्तानी घुसखोर दहशतवाद्यांपेक्षा (९०) जास्त होती. दहशतवादी वाढत्या संख्येने आणि वाढत्या प्रमाणात स्थानिक भारतीय नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांना गनिमी हल्ले करणे जास्त शक्य होते, हे भारतीय जवान जास्त प्रमाणात धारातीर्थी पडण्यामागचे कारण आहे काय? उपलब्ध आकडेवारी तसे नक्कीच सूचित करते.

तेव्हा, आता गाभ्याचा प्रश्न पाकिस्तानी घुसखोरांना भारतात घुसू न देण्याचा आणि घुसलेच तर त्यांना कंठस्नान घालण्याचा राहिलेला नाही; तो प्रश्न आपली सशस्त्र दले सोडवू शकतील. पण आता गाभ्याचा प्रश्न आहे तो स्थानिक भारतीय नागरिकांना दहशतवादी बनण्यापासून थांबवण्याचा. त्यासाठी काश्मीरमधील भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल विनायक पाटणकर यांनी काही ठोस सूचना (यूटय़ूब : https://www.youtube.com/ watch?v=BOcfdzgZWCI) केल्या आहेत :

(१) काश्मीरमधील अनेक धरणे गाळाने खूप भरली आहेत. या धरणांतील गाळ काढावा. त्यामुळे रोजगार निर्माण होईल, पूर कमी होतील, विजेचे उत्पादन वाढेल.

(२) काश्मीरमधील अनेक तरुण भारतभर शिकण्यासाठी जातात. त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय काश्मीरमध्ये व्हावी म्हणून काश्मीरच्या खोऱ्यात आयआयटी, आयआयएम, आयसर यांसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था सुरू कराव्या.

(३) काश्मीरमध्ये अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्या घ्याव्या आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना पुरेसे अधिकार द्यावे. त्यातून नवे नेतृत्व विकसित होईल.

(४) काश्मिरी नागरिकांना वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची (उदा., पूरग्रस्तांना आश्वासित केलेली मदत) कसोशीने पूर्तता करावी.

अजूनही खूप काही करता येण्यासारखे नक्कीच आहे; पण हे सर्व मुख्यत: राजकीय स्वरूपाचे आहे. त्यासाठी योग्य उत्तरे शोधून जवानांचे प्राण सहजासहजी जाणार नाहीत यासाठी आवश्यक कारवाई होत आहे हे बघण्याचे काम पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे आहे. गेल्या पाच वर्षांत हे काम नीट झाले आहे असे आकडेवारीवरून दिसत नाही.

आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ होत नाही, हे पाहण्याची जबाबदारी इथून पुढे आपले नेते नीट बजावतील अशी आशा आहे. त्यासाठीच त्यांना जनतेने भरघोस मताने, विश्वासाने निवडून दिले आहे याबद्दल त्यांना संशय नसावा. त्यांनी ही जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर जनता त्यांना क्षमा करू शकणार नाही!

anandkarandikar49@gmail.com

First Published on June 19, 2019 12:05 am

Web Title: article on increase in the number of martyrs
Just Now!
X