रेश्मा शिवडेकर

काही प्रवास आयुष्य घडवतात. पण भारतात करोनामुळे झालेली टाळेबंदी (खरे तर कामबंदी) काहींना अशा मार्गावर घेऊन गेली, की तिथून त्यांना परतणेच शक्य झाले नाही. काम करायला, घाम गाळायला त्यांची ना नव्हती. त्यासाठी स्वत:चं घरदार, जीवलग सोडून दूर परराज्यात जाण्याचीही त्यांची तयारी होती. पण त्यांचे जगण्याचे साधनच एका झटक्यात, त्यांच्या नकळत, अनपेक्षितपणे टाळेबंदीच्या नावाखाली स्थितप्रज्ञ करून टाकण्यात आले. उद्याच्या रोजीरोटीची जिथे भ्रांत, तिथे दीड-दोन महिने परराज्यात कुणाच्या जीवावर काढायचे, आपण काय खायचे, पोराबाळांना काय घालायचे आणि गावाकडे काय पाठवायचे.. या विवंचनेत काही अस्वस्थ मने वांद्रे, सुरत, हैदराबाद, दिल्ली अशी कुठे कुठे पेटलीही. पण रिकाम्या पोटातल्या आगीने, खचलेल्या मनामुळे त्या आगीचा वणवा काही झाला नाही. मग सुरू झाली मैलोन् मैल परतीची हतबल, हताश पायपीट. टाळेबंदीत सुरू झालेले काहींचे हे प्रवास अजूनही सुरू आहेत. काहींचे मात्र अर्ध्या वाटेवरच संपले, तुटले. पण त्यांचे संपलेले प्रवास आपल्या देशाच्या आजवरच्या प्रगतीची, विकासाची लक्तरे वेशीवर टांगणारे ठरताहेत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी देशभर टाळेबंदी जाहीर केल्यानंतर दिल्लीत एका हॉटेलात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रणवीर सिंग यांचे अवसानच गळाले. कमाईचे साधनच अनिश्चित काळासाठी बंद राहाणार असल्याने ३९ वर्षांच्या रणवीर यांनी थेट मध्य प्रदेशातील आपले गाव गाठायचे ठरवले. वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला.. चालत गावाकडे परतण्याचा. गावाकडे असलेल्या पत्नी आणि तीन मुलांचे चेहरे समोर आणतच बहुधा त्यांनी या खडतर मार्गावर सुमारे ३०० किमी पायपीट केली. पण पुढचा आणखी ३०० किमीचा पल्ला त्यांना गाठता आला नाही. वाटेत छातीत दुखू लागल्याने त्यांना चालता येईना आणि त्यातच त्यांचा करुण अंत झाला. तो दिवस गुरुवार, २६ मार्चचा. तेव्हापासून आजतागायत टाळेबंदीने देशभरात जवळपास १२५हून अधिक भारतीयांचे प्रवास अर्ध्यावरच संपवले. काहींचे रणवीर यांच्याप्रमाणे प्रवासाचा ताण सहन न झाल्याने, तर काहींचे रस्त्यातच ट्रक, रेल्वे यांच्याखाली चिरडले गेल्याने, तर काहींनी हताश होऊन आपल्याच हाताने.. म्हणायला ते अपघात, वणवा, मानसिक आजार, भुकेचे बळी. प्रत्यक्षात ते कोणत्याही पूर्वतयारी, पूर्वसूचनेविना घेतलेल्या टाळेबंदीचेच बळी ठरतात.

ते तीन दिवस..

कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात १९ मार्चला लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांसाठी लागलेल्या रांगा. पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे २२ मार्चला देशभर ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. १९ ते २१ मार्च या तीन दिवसांत देशभर परप्रांतीय मजुरांनी मिळेल त्या रेल्वे किंवा मिळेल त्या वाहनाने गावाकडे प्रवास सुरू केला होता. परप्रांतांतील मजुरांचे रोजगार, डोक्यावरचे छत गेल्याने टाळेबंदीत काय हाल होणार आहेत, याची जाणीव होण्यासाठी हे तीन दिवस पुरेसे होते.

पाय आहे चाललेले, कालही अन् आजही..

पहिली टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच दिल्ली, मुंबई, चेन्नई, सुरत, हैदराबाद अशा प्रमुख शहरांमधून मजुरांची गावाकडे परतण्यासाठीची धडपड सुरू झाली होती. अनेकांचा रोजगार गेलेला. हातातला पैसा संपल्याने उपासमार सुरू झालेली. घराचे भाडे देणे शक्य नसल्याने डोक्यावरचे छप्परही पारखे होण्याच्या मार्गावर. त्यात गावाकडे परतण्याचे दोर अकस्मात कापलेले. वांद्रे पूर्वेला झालेला श्रमिकांचा उद्रेक हा या अस्वस्थतेचा कडेलोट होता. हे उद्रेक देशाच्या सुरत, चेन्नई, हैदराबाद अशा इतरही भागांत झाले.

टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यांच्या मागणीवरून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्याकरिता रेल्वेने श्रमिक गाडय़ा सोडण्याची घोषणा केली. परंतु त्यात अनंत अडचणी होत्या. मागणीच्या तुलनेत फारच कमी गाडय़ा पहिल्या सात-आठ दिवसांत सोडण्यात आल्याने मजुरांमधील अस्वस्थता पुन्हा वाढली. अनेकांनी पुन्हा एकदा पायीच गावचा रस्ता धरला. काहींनी कुटुंबकबिल्यासह रिक्षाच गावाकडे पिटाळल्या, तर काहींनी सायकलींचा आधार घेतला.

मुंबई-ठाण्यात सर्वाधिक परप्रांतीय असताना दिवसाला केवळ एक किंवा दोनच गाडय़ा सोडल्या जात होत्या. या ठिकाणी करोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसारखी राज्ये मजुरांना आपल्या राज्यात प्रवेश देण्यास नकार देत होती. त्यामुळे गाडय़ांच्या वेळा ठरूनही त्या आयत्या वेळी रद्द कराव्या लागल्या. शेवटी ट्रक, टेम्पो यांमधून गुराढोरांप्रमाणे कोंबून माणसे गावाकडे परतू लागली. क्षमतेपेक्षा अधिक माणसे कोंबल्याने झालेल्या अपघातांच्या घटनांची संख्या मोठी आहे.

अशा जीवघेण्या प्रवासात दिलासा म्हणजे महाराष्ट्रात रस्त्यावर चालत निघालेल्यांना एसटीने त्या त्या राज्यांच्या वेशीवर नेऊन सोडले. काही स्वयंसेवी संस्थांनी श्रमिकांना रस्त्यांत अन्नपाणीही पुरवले. पण अजूनही मजुरांची पायपीट थांबलेली नाही. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश यांच्या सीमांवर मजूर पुढे आपल्या गावात वा इतर राज्यांत जाण्याकरिता धडका देत आहेत. त्यांना गावाकडे व त्यांच्या राज्यांच्या वेशीवर सोडण्याकरिता पुरेशी वाहतूक साधनेच उपलब्ध नसल्याने हजारो मजूर राज्यांच्या वेशींवर अडकून पडले आहेत.

त्यांना कोण कसे थांबवणार?

परप्रांतीयांची महामार्गावरून गावाकडे सुरू असलेली पायपीट, टेम्पो-ट्रक-रिक्षातून सुरू असलेला अवैध प्रवास आणि त्यातून होणारे दररोजचे अपघात याची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयही असमर्थ आहे. न्यायालयाचे म्हणणे हे की, मजूर रुळावर झोपत असतील तर त्यांना कोण कसे थांबवणार..? गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीयांना आसरा, अन्नधान्य पुरवठा, मोफत प्रवास उपलब्ध करून द्यावा यासाठी केलेली ही जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. लोक चालत निघाले आहेत. त्यांना कोण कसे थांबवणार, अशा शब्दांत जेव्हा देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्थाच हतबलता व्यक्त करते, तेव्हा केंद्र-राज्यांनाही ते राबवतील ते धोरण, ते घेतील ते निर्णय अबाधित ठेवण्याची मुभाच मिळते!

टाळेबंदी – १.०

२५ मार्च : मुंबईतील कांदिवलीच्या समता नगरमध्ये पुण्यात कामाला असलेला २१ वर्षांचा दुर्गेश ठाकूर टाळेबंदीमुळे घरी आला होता. टाळेबंदीत बाहेर पडू नको म्हणून भावाने समज दिली. तरीही दुर्गेश ऐकेना. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुर्गेशला मोठय़ा भावाने मारहाण केली. घाव वर्मी लागल्याने तो जागीच गेला.

२५ मार्च : पश्चिम बंगालमध्ये हावडा येथील ३२ वर्षांचे लालस्वामी दूध आणायला म्हणून बाहेर पडले, पण टाळेबंदी मोडली म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार आहे. कारण काही वेळातच त्यांचा अंत झाला. पोलिसांनी ही बाब नाकारली आहे.

२७ मार्च : सुरतमधील गंगाराम येलंगे हे ६२ वर्षांचे गृहस्थ वाहन नसल्याने उपचारानंतर मुलासोबत रुग्णालयातून पायीच घरी निघाले होते, परंतु रस्त्यातच त्यांना मृत्यूने कवटाळले.

२७ मार्च : बिहारमधील भोजपूरमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा भुकेने मृत्यू झाल्याचा पित्याचा आरोप. सरकारी यंत्रणांनी अर्थात ही बाब नाकारली आहे.

२७ मार्च : हैदराबाद येथे कर्नाटकाहून येणारे आठ जण. यात १८ महिने व नऊ

टाळेबंदी – २.०

१८ एप्रिल : ६० वर्षांची महिला झारखंडच्या ढुमका गावात ‘जनधन’मधून मिळालेले ५०० रुपये काढण्यासाठी बँकेबाहेर रांगेत दोन तास उभे राहून शेवटी कोसळली. तिला रुग्णालयात मृत म्हणून घोषित करण्यात आले.

२० एप्रिल : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे टाळेबंदी मोडल्याने बन्सी कुशवाह या ५० वर्षांच्या शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू.

टाळेबंदी – ३.०

७ मे : छत्तीसगढला गावाकडे सायकलवरून दोन मुलांसह निघालेल्या पती-पत्नीचा गाडीने उडवल्याने मृत्यू. दोन मुले सुदैवाने वाचली.

८ मे : औरंगाबादला मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या आणि रात्री रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ मजुरांचा मध्यरात्री मालगाडी अंगावरून गेल्याने मृत्यू.

९ मे : हैदराबादहून आग्य्राकडे निघालेला ट्रक मध्य प्रदेशात उलटून सहा स्थलांतरितांचा मृत्यू. १२ जण जखमी.

९ मे : दिल्लीत दक्षिणपुरी येथे विनय सोनेवाल याने गरोदर पत्नी टाळेबंदीत बाहेर गेली म्हणून गळा दाबून तिचा जीव घेतला.

११ मे : बिहारकडे पायी निघालेल्या दोन परप्रांतीय मजुरांना अंबाला येथील जगाधारी महामार्गावर एका वाहनाने ठोकर दिल्याने एकाचा जागीच मृत्यू.

११ मे : मध्यरात्री तीन वाजता जत तालुक्यात पोलिसांसोबत नाकाबंदीला असलेल्या शिक्षकाला ट्रकने चिरडले.

१२ मे : ३२ वर्षीय महिलेचा सहा वर्षांच्या मुलीसह मृत्यू. या कुटुंबाच्या ठाण्यातून जौनपूरकडे (उत्तर प्रदेश) निघालेल्या रिक्षाला कंटेनरने धडक दिली.

१२ मे : पोटदुखी आणि तापाने फणफणणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलाचा रस्त्यातच मृत्यू. रुग्णवाहिका नसल्याने आई-बाबा आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्याकरिता १० किमीची पायपीट करत या मुलाला घेऊन निघाले होते.

१२ मे : टाळेबंदीत एकटेपणाला कंटाळून नवी मुंबईत सूरज सुर्वे या तरुणाची घरीच आत्महत्या.

१२ मे : ३१ वर्षांचे रिक्षाचालक शिवकुमार गुप्ता यांची तब्बल दीड महिना व्यवसाय ठप्प झाल्याने कर्जाचा हप्ता कसा द्यायचा, कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा, या चिंतेने आत्महत्या.

१३ मे : मुंबईहून उत्तर प्रदेशकडे स्थलांतरित मजुरांना घेऊन निघालेला ट्रक मध्य प्रदेशातील गुणा येथे उलटून नऊ मजूर ठार. ५० जखमी.

१३ मे : पंजाबमधून बिहारकडे पायी निघालेल्या सहा जणांचा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे मृत्यू. रात्री रस्त्याकडेला झोपलेल्या या मजुरांना बसने चिरडले होते.

१३ मे : हरियाणात प्लायवूडच्या कारखान्यात काम करणारे ४० वर्षांचे गंगाधर बिस्वाल. मूळचे ओरिसाचे. गावाकडे निघाले, पण त्याआधीच हार मानली. गुरुग्राममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

१३ मे : हैदराबादहून ओरिसाकडे चालत निघालेल्या २१ वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे वाटेतच मृत्यू.

१४ मे : ४५ वर्षांचे हरीश शंकरलाल पैसे नसल्याने भाईंदर ते वसईपर्यंत ३० किमी धावत निघाले. राजस्थानला आपल्या गावाकडे निघालेली गाडी पकडायला, पण वसई स्थानक दृष्टीपथात येत नाही तोच कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

१४ मे : बिहारमध्ये पायी गावाला निघालेल्या एका स्थलांतरित मजुराचा अपघातात मृत्यू.

१४ मे : दुचाकीवरून हैदराबादकडे आपल्या गावी जाण्यासाठी पती-पत्नी १० महिन्यांच्या मुलीसह प्रवास करत होते. अपघात होऊन मुलीचा जागीच मृत्यू झाला.

१५ मे : हैदराबादहून उत्तर प्रदेशात ५० मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रकला तेलंगणा-महाराष्ट्र सीमारेषेजवळ मध्यरात्री नागपूर महामार्गावर अपघात. एक मृत. २० जण जखमी.

१५ मे : राजस्थान आणि दिल्लीहून परप्रांतीय मजुरांना घेऊन निघालेल्या दोन ट्रकांचा मध्यरात्री उत्तर प्रदेश येथे झालेल्या अपघातात २४ जणांचा मृत्यू. यात ३५ जण जखमी आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना आहे.

१५ मे : कांदिवली येथून श्रीवर्धनकडे पायीच निघालेले मोतीराम जाधव यांचा पेण येथे भोवळ येऊन मृत्यू. त्याआधी नालासोपाऱ्याहून सलोनी बांद्रे पती आणि दोन लहान मुलांसह श्रीवर्धनमधील मारळ गावाकडे निघाल्या होत्या. रणरणते ऊन सहन न झाल्याने त्यांचा माणगावाजवळच चक्कर येऊन मृत्यू झाला. ठाण्याहून खेडच्या उंबरी गावाकडे निघालेले सदाशिव कदम यांचा मृतदेह तर वाटेत प्राण्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला.

reshma.shivadekar@expressindia.com