03 June 2020

News Flash

‘सरहद्द गांधीं’चा प्रांत पुन्हा अशांत का?

आरिफ वझीरच्या अंत्ययात्रेला करोना महामारी असतानादेखील प्रचंड संख्येने लोक गोळा झाले होते

संग्रहित छायाचित्र

जतिन देसाई

‘‘सरहद्द गांधीं’चा प्रदेश’ म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा अशांत झाला आहे. तिथल्या शांततावादी तरुणांनी सुरू केलेल्या चळवळीतील एका कार्यकर्त्यांची या महिन्याच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी हत्या केली, हे त्याचे ताजे निमित्त. पण ही अशांतता तेवढय़ापुरतीच नाही. तिच्यामागचे विविध कंगोरे उलगडून दाखवणारे हे टिपण..

पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा प्रांत अशांत आहे. आरिफ वझीर (३९) या ‘पश्तुन तहफुझ मूव्हमेंट (पीटीएम)’च्या तरुण कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येनंतर (२ मे) पश्तुन समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

खैबर पख्तूनख्वा या प्रदेशाचे जुने नाव नॉर्थ-वेस्ट फ्रण्टियर प्रॉव्हिन्स! खान अब्दुल गफार खान अर्थात ‘सरहद्द गांधी’ या प्रांताचे. त्यांचा अहिंसेवर विश्वास होता आणि त्यांनी १९३० मध्ये ‘खुदाई खिदमतगार’ ही चळवळ सुरू केली होती. त्यानंतर या प्रांताने अनेक घडामोडी पाहिल्या.

अमेरिकेने २००१च्या शेवटी ९/११च्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला, तेव्हा हा भाग अफगाणिस्तानला लागून असल्याने अनेक दहशतवादी सीमा ओलांडून पाकिस्तानात आले अन् खैबर पख्तुनख्वा तसेच उत्तर व दक्षिण वझिरिस्तान येथे राहू लागले. हे बहुसंख्य दहशतवादीदेखील पख्तूनच होते. तालिबान, हक्कानी नेटवर्क यांसारख्या दहशतवादी संघटनांना तर पाकिस्तानच्या लष्कर आणि गुप्तचर संस्थेने उघड मदत केलेली.

आता या भागात पुन्हा एकदा अहिंसक आंदोलन सुरू झाले आहे. आरिफ वझीरच्या अंत्ययात्रेला करोना महामारी असतानादेखील प्रचंड संख्येने लोक गोळा झाले होते. हत्येच्या चार दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून जामिनावर सुटून बाहेर आला होता. १७ एप्रिलला त्याला पकडण्यात आले होते. त्याच्यावर अफगाणिस्तानात ‘पाकिस्तानविरोधी’ भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. युद्धामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील पश्तुन समाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल तो आवाज उठवत होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळी करणारी डय़ुरॅण्ड सीमारेषा आहे. मात्र अफगाणिस्तानने कधीही ती सीमारेषा स्वीकारलेली नाही. या सरहद्दीच्या दोन्ही बाजूंना पश्तुन समाज प्रामुख्याने राहात आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच वर्षांपासून तणावाचे संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे सुरक्षा कर्मचारी एकमेकांवर अधूनमधून गोळ्या झाडत असतात. डय़ुरॅण्ड सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या पश्तुन लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहानुभूती आहे. साहजिकच आहे की, अफगाण सरकार आणि लोकांमध्ये ‘पीटीएम’विषयी सहानुभूती आहे. दोन्ही देशांच्या तणावात यामुळे आणखी वाढ होते. स्थानिक पश्तुन लोक सहज सीमा ओलांडून एकमेकांच्या देशांत जातात. त्यांचे संबंध हे खूप जुने आहेत, हे विसरता कामा नये. ‘पख्तुनावली’ (पश्तुन जीवनपद्धती) परंपरेमुळे एकमेकांना ते मदत करतात. पाहुण्यांसाठी जीव देण्यास ते तयार असतात. ही पश्तुन संस्कृती आहे.

पाकिस्तानातील अनेकांनी आरिफच्या हत्येबाबत मौन पत्करणे पसंत केले. पाकिस्तानातील माध्यमांनीदेखील त्याची फारशी नोंद घेतली नाही, ही शोकांतिका आहे. गेल्या दोन वर्षांत आरिफला सहा वेळा पकडण्यात आले आणि जवळपास १३ महिने त्याने तुरुंगात काढले होते. आरिफच्या आधी त्याच्या कुटुंबातील १७ जण दहशतवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडले आहेत. असे हे आरिफचे कुटुंब.

आपल्यावर अन्याय होत असल्याची आणि आपल्या मानवाधिकारांचे मोठय़ा प्रमाणावर उल्लंघन होत असल्याची भावना पश्तुन समाजात आहे. २०१८च्या जानेवारीत पख्तून तहफुझ (संरक्षण) मूव्हमेंट अर्थात पीटीएमची स्थापना मन्झूर पश्तीन आणि त्याच्या तरुण सहकाऱ्यांनी केलेली. त्यापूर्वी त्यातल्या काहींनी २०१४ साली महसुद तहफुझ मूव्हमेंटची स्थापना केली होती. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या : (१) आदिवासी भागात जमिनीत लावलेले सुरुंग काढण्यात यावेत. (२) लष्कराला आवश्यक नसलेले चेक-पॉइंट काढून टाकण्यात यावेत. (३) चुकीच्या पद्धतीने कोणासही अटक करता कामा नये.

कराचीत नकीबुल्ला महसुद नावाच्या एका पश्तुन विद्यार्थ्यांला राव अन्वर या पोलीस अधिकाऱ्याने कराची येथे एका बोगस चकमकीत १३ जानेवारी २०१८ रोजी ठार मारले. या बोगस चकमकीच्या विरोधात पश्तुन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान या शहरापासून इस्लामाबादपर्यंत त्यांनी मोर्चा काढला. इस्लामाबाद येथे दोन आठवडे धरणे धरले. तेव्हा त्यांनी संघटनेच्या नावात थोडा बदल केला. ‘महसुद’च्या जागी ‘पश्तुन’ शब्द लावला गेला. महसुद ही पश्तुन समाजातील एक जमात आहे. मात्र नव्या नामकरणाने ही संघटना अधिक व्यापक करण्यात आली आणि त्याद्वारे पश्तुन समाजातील सगळ्या जाती-जमातींना एकत्र आणण्यात आले.

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीटीएमचे दोन खासदार अली वझीर आणि मोहसीन दावर निवडून आले. आरिफ प्रांताच्या असेम्ब्ली (विधानसभा) निवडणुकीत उभा होता. पण इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए- इन्साफ (पीटीआय)’च्या उमेदवारांनी त्याचा पराभव केला. पीटीएमचे खासदार सतत मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात संसदेत बोलत असतात. अचानक गायब होणाऱ्या तरुणांबद्दल ते सरकारकडून सतत उत्तरे मागत असतात.

‘चांगले दहशतवादी’ आणि ‘वाईट दहशतवादी’ असा फरक करणे चुकीचे असल्याची पीटीएमची भूमिका आहे. ‘चांगले दहशतवादी’ म्हणजे सरकार, लष्कर आणि गुप्तचर संस्थेच्या बाजूने बोलणारे. शांतता समितीत त्यांना मानाचे स्थान मिळते. लोकांमध्ये त्यांच्याविषयी भीती आहे. सरकार व लष्करावर टीका करणाऱ्यांना गप्प बसवण्याचे काम ते करतात. मात्र पीटीएमने शांतता समित्याच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. लष्कराकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे पीटीएम वारंवार सांगते; तर पीटीएमला ‘दुश्मनां’कडून आर्थिक मदत होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरिस्तान हा जिल्हा हक्कानी नेटवर्क या अफगाणी दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला आहे. सिराजुद्दिन हक्कानी हा या संघटनेचा सुप्रिमो. अल कायदाने केलेल्या ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, तेव्हा तालिबानचा सर्वेसर्वा मुल्ला ओमर, सिराजुद्दीन व त्याचा पिता जलालुद्दीन आदी सीमा ओलांडून पाकिस्तानात दाखल झाले. सिराजुद्दीन हा तालिबानचा दुसरा क्रमांकाचा नेता आहे. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानी लष्कर, आयएसआयची मदत मिळते. हक्कानी नेटवर्कचा उपयोग ते अफगाणिस्तानात करतात.

दक्षिण व उत्तर वझिरिस्तानसह एकूण सात केंद्रशासित आदिवासी विभाग होते. तिथे पाकिस्तानचे अनेक कायदे लागू होत नसत. पश्तुन समाजाच्या ‘पख्तुनावली’ परंपरेनुसार येथे व्यवहार चालत. २०१८ साली हा भाग खैबर पख्तूनख्वा प्रांतात विलीन करण्यात आला. या प्रांताचे महत्त्वाचे शहर म्हणजे पेशावर. विकासापासून हा भाग खूप दूर आहे. संधी मिळाली की लोक येथून बाहेर पडतात. जगात सर्वात जास्त पश्तुनांची लोकसंख्या कुठल्या एका शहरात असेल तर ते म्हणजे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराचीत.

मन्झूर पश्तीन हा पीटीएमचा सर्वमान्य नेता. त्याची राहणी अत्यंत साधी आहे. तो दक्षिण वझिरीस्तानचा आहे. या वर्षांच्या सुरुवातीला त्याला पेशावरमध्ये अटक करण्यात आली होती. डेरा इस्माइल खान येथे १८ जानेवारीला त्याने ‘पाकिस्तानविरोधी’ भाषण केले, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. आरोपपत्रात म्हटलेले की, त्याने- ‘पाकिस्तानची १९७३ची राज्यघटना मूलभूत मानवाधिकारांचे उल्लंघन करते,’ असे म्हटले होते. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. लोकांनी शांत राहावे, कायदा कोणीही हातात घेऊ नये, अशी विनंती पश्तीन आणि पीटीएमच्या अन्य नेत्यांनी त्याच्या अटकेच्या वेळी केलेली. पश्तीन खैबर पख्तुनख्वा येथे अतिशय लोकप्रिय आहे. नेहमी लाल टोपी घालणाऱ्या पश्तीनला ऐकण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक गोळा होतात.

मोहसीन दावर आणि अली वझीर या खासदारांना गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी उत्तर वझिरीस्तानच्या खारकमर येथे झालेल्या घटनेबद्दल अटक करण्यात आलेली. घडले असे की, पीटीएमच्या कार्यकर्त्यांनी धरणे आयोजित केले होते. लष्कराकडून महिलांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या विरोधात हे धरणे होते. तेव्हा लष्कराने केलेल्या गोळीबारात पीटीएमचे १३ कार्यकर्ते मारले गेले. एक जवानही त्यात मारला गेल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. मोहसीन आणि अली यांना पकडण्यात आले. शेवटी सप्टेंबर महिन्यात पेशावर उच्च न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामिनाद्वारे सोडले.

समाजात असलेल्या असंतोषाचे पीटीएम प्रतिनिधित्व करते. या भागात लोकांनी आणि पीटीएमच्या नेतृत्वाने हिंसाचार पाहिला आहे. हिंसेने प्रश्न सुटत नसतात, याची पीटीएम नेतृत्वाला जाणीव असल्याचे त्यांच्या एकूण वागण्यावरून दिसते. विधायक राजकारण करण्याचा प्रयत्न पीटीएमचा असल्याचे दिसत आहे.

खैबर पख्तूनख्वा येथील परिस्थिती अधिक चिघळण्याआधी पाकिस्तान सरकारने पीटीएमच्या नेतृत्वाशी बोलणी केली पाहिजे. पीटीएमच्या मागण्या चुकीच्या आहेत, असे कोणी म्हणू शकणार नाही. मानवाधिकारांचे उल्लंघन होता कामा नये, ही त्यांची महत्त्वाची मागणी. सैद्धांतिकरीत्या त्याला कोणाचाही विरोध असता कामा नये.

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून भारत-पाकिस्तान यांच्यातील शांततापूर्ण आणि लोकशाहीनिष्ठ संबंधांसाठी प्रयत्नशील असलेल्या नागरी गटात सक्रिय आहेत.

jatindesai123@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 12:00 am

Web Title: article on khyber pakhtunkhwa province of pakistan is once again in turmoil abn 97
Next Stories
1 कोविडोस्कोप : गैरसमजातील गोडवा!
2 ‘पॅकेज’चा फेरविचार हवा! 
3 कोविडोस्कोप : गैरसमज समजून घेताना..
Just Now!
X