किशोरी आमोणकर यांच्या सांगीतिक चिंतनाची सखोलता स्पष्ट करणारे हे दोन लेख त्यांच्याच शब्दांत..

तसे पाहायला गेले तर संगीताच्या विषयात मी ‘गर्भश्रीमंत’च आहे, असे मी म्हणेन. माईच्या गर्भात असताना माई अल्लादिया खाँसाहेबांकडे जे जे शिकत होती, त्याचे संस्कार होत होतच मी वाढत होते. त्यामुळे माझे संगीताचे शिक्षण मी गर्भात असतानाच सुरू झाले. गर्भस्थ अवस्था ही अहंकारशून्य अवस्था असते. अहंकारशून्य अवस्थेमध्ये ‘ज्ञान’ हे जसे आहे तसे प्राप्त होत असते. या अहंकारशून्य ज्ञानाच्या भरभक्कम पायावरच जन्मल्यानंतरच्या माझ्या शिक्षणात कृतिस्वरूप अशी वाढ होत होती. बालमनावर जेव्हा संस्कार घडतात, तेव्हा ते नि:शंकपणे घडत असतात. त्या ज्ञानाबद्दल प्रश्न विचारण्याचा किंवा शंका घेण्याचा विचारही बालकाच्या मनात येत नाही. सुरुवाती-सुरुवातीला माईने माझ्या कंठावर स्वरांचे संस्कार केले. हे संस्कार करीत असताना अस्थायी-अंतरे, वेगवेगळ्या तालांचे ज्ञान, घराण्यांची वैशिष्टय़े यांचा मागमूसही तिथे नव्हता. त्यामुळे निखळ स्वरांचे म्हणून एक क्षेत्र असते आणि कंठाला त्या स्वरांनी संस्कारित करायचे असते, एवढे माझ्या नकळत मी शिकले. जसजशी मी मोठी होत गेले, तसतसे माझे संगीताचे शिक्षणही विस्तारत गेले. आधी सप्तकातले स्वर शिकले, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते वेगवेगळ्या अलंकारांतून शिकले. नंतर कंठ जसजसा सांगीतिकरीत्या संस्काराबद्ध होत गेला, तसतसे हळूहळू सोपे सोपे राग, सोपे अस्थायी-अंतरे शिकले. म्हणजेच ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो, त्याच्या कायदेशीर शिक्षणाचा लाभ मला घडत गेला. त्यानंतर ओडव, षाडव, संपूर्ण आणि संकीर्ण रागांच्या शिक्षणातून हे क्षेत्र विस्तारत गेले. त्यातूनच माईच्या गायकीचे संस्कारही माझ्यावर होत होते. माईच्या गायकीतून जयपूर घराण्याची शिस्त, कायदे, स्वराचे शुद्ध कंठयुक्त स्वरूप म्हणजे ‘आकारयुक्त’ गाणे, तालासुरांचे एकमेकांशी असणारे संगनमत, बंदिशीची वैशिष्टय़पूर्ण शिस्तबद्ध मांडणी यांचेही ज्ञान मला होत होते. स्वरभाषा ही गतीशी संबंध ठेवणारी असल्याने विलंबित लयीपासून ते अतिद्रुत अशा लयीच्या अनुसंधानाशी असणाऱ्या प्रगल्भतेचेही संस्कार माझ्यावर घडले. एखाद्या भाषेवर आपले प्रभुत्व असेल, तर त्या भाषेद्वारे सहजगत्या आपल्याला संवाद साधता येतो. असा सहजसंवाद कुठल्याही रागामधून मी साधू शकत होते. म्हणजेच व्यापक अशा स्वराकाशामध्ये सहजगत्या संचार करण्याचेही सामथ्र्य मला प्राप्त झाले. हे सामथ्र्य या गुरूंमुळेच माझ्या कंठाला लाभले. कुठल्याही क्षेत्रामध्ये नावीन्य अनुभवण्याचे सामथ्र्य आपल्याला गुरूच देत असतो. अशा पद्धतीने जयपूर घराण्याची शिस्तबद्ध तालीम घेत असताना घराण्याच्या पलीकडची व्यापकता पाहण्याचे सामथ्र्य या साधनेतूनच मला प्राप्त झाले. हे ज्ञान जसजसे वाढत गेले, तसतसे वेगवेगळ्या घराण्यांतील वेगवेगळी सांगीतिक वैशिष्टय़े, त्यांची संकुचित अवस्था नाहीशी होऊन त्या विषयाचे म्हणजेच स्वरभाषेचे व्यापक असे दर्शन मला होत होते. मानवाच्या अनेक जाती असल्या तरी मानवी धर्म किंवा मानवता ही जशी महत्त्वाची असते; तसेच घराणी कितीही असली, तरी स्वरभाषा ही महत्त्वाची आहे. ती वैश्विक आहे, ती घराण्यांमध्ये बंदिस्त असू शकत नाही. अशा ज्ञानाच्या भूमिकेतून या स्वरभाषेचा अभ्यास करताना माझ्या मनात काही शंका उपस्थित झाल्या. ही स्वरभाषा कशासाठी जन्माला आली? या भाषेच्या सम्यक ज्ञानातून मला कुठे जायचे आहे? ही स्वरभाषा अधिकाधिक व्यापक कशी करता येईल? दुसऱ्या कुठल्याही परक्या माध्यमाची मदत न घेता होऊ शकणारा स्वरसंवाद हा देह, मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा या सर्वाशी कसा संवाद करतो? आत्मा हा सर्वत्र एकच असल्याने आत्म्याशी संवाद साधणारा कोणताही संवाद हा सर्वाशीच संवाद साधू शकतो. म्हणूनच स्वरभाषेतून आत्मिक असा स्वरसंवाद साधण्यासाठी मी अविरत चिंतन केले. या साधनेतून एक गोष्ट माझ्या प्रत्ययाला आली. ती अशी की, स्वर हे शब्द तालावर यत्किंचितही अवलंबून नाहीत! अशा पद्धतीने चिरंतन अशा स्वरभाषेची मानवी दृष्टिकोनातून होणारी कलात्मक स्वरसृष्टी हा लौकिकातून अलौकिकाकडे जाणारा कलात्मक मार्ग माझ्या दृष्टिपथात येऊ लागला आणि या तत्त्वाने साधना करता करता कुठल्याही रागातील स्वरविश्व हे व्यापक झाले पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. जसा राग असेल तशी त्याची अभिव्यक्ती व्हावी आणि तीही निखळ स्वरातूनच व्हावी- अशी एक शिस्त मी स्वत:ला घालून घेतली. यातूनच मला जे काही सांगायचे आहे, ते स्वरांच्या सुपूर्द करताना इतर बऱ्याचशा तत्त्वांची जाणीव झाली. रागातील स्वरांनाही त्यांचे स्वत:चे असे काही ‘सांगायचे’ असते. ते काय सांगतात, त्यांचे शुद्ध मनाने निरीक्षण करता करता तो राग किंवा कुठलेही सांगीतिक अस्तित्व हे त्याचे स्वत:चे चैतन्य घेऊनच जन्माला आलेले असते. इथे ‘मी’ महत्त्वाची नसून ‘राग’ महत्त्वाचा आहे, तो व्यापक आहे, तो वैश्विक आहे आणि तो चिरंतनही आहे, एवढे मला समजले. स्वत:ची अस्मिता, स्वत:चा अहंकार म्हणजेच दैहिक अस्तित्व यांचा विसर पडल्याखेरीज या अमूर्त, निरहंकार विश्वाचे दर्शन घडणे शक्य नाही. म्हणून त्या दृष्टीने पुढची वाटचाल करण्याखेरीज मला दुसरा पर्याय नव्हता आणि नाही. हे अंत:प्रेरणेतून होणारे ज्ञान आहे. या देहाचे महत्त्व असे की, जोपर्यंत देह अस्तित्वात आहे, तोपर्यंतच मी हे करू शकेन. म्हणूनच एक गृहिणी असल्याने संसारातील कार्य व्यवस्थित पार पाडण्याइतका वेळ दिल्यानंतर इतर कुठेही वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी मी अत्यंत दक्ष राहिले. सारखे कार्यक्रम (रागनाटय़) करीत राहणे, जरुरीपेक्षा अधिक प्रवास करणे हे मी शक्य तितके टाळले. रागनाटय़ हे सुंदर असतेच; परंतु रागसत्य जे ‘सत्यं शिवम् सुंदरा’चे स्वरूप आहे, त्या स्वरूपावर माझे मन जडले, तर त्यात नवल नाही.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

संगीत क्षेत्रातील सर्व प्रकार मी ऐकले आणि गाण्याचा प्रयत्नही केला. या सर्व प्रकारांमध्ये म्हणजे सुगम संगीतापासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत असलेल्या सर्व प्रकारांमध्ये शास्त्रीय संगीत हे फारसे लोकप्रिय नाही, असे माझ्या लक्षात आले. स्वर हा अतिशय मंजूळ आणि कानाला गोड वाटणारा असा असूनही तो लोकांना का भावत नाही? भावणे हा मनाचा धर्म आहे. शास्त्रीय संगीतात ‘शास्त्र’ जरूर आहे, पण कलेचे आदितत्त्व असलेला ‘भाव’ मात्र जवळजवळ नसल्याइतकाच अगदी अल्प असल्याने त्यातून श्रोत्यांना आनंद मिळत नाही, श्रोते त्याच्यात समरस होऊ शकत नाहीत, असे माझ्या प्रकर्षांने लक्षात आले. शास्त्रीय संगीतातील ‘राग’ या संकल्पनेला भावनेचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे. ‘स्वर’ हा स्वयंप्रकाशित असून स्वरंजित असे त्याचे अस्तित्व असल्याने स्वराला किंवा स्वरअस्तित्वाला स्वतंत्र भावगर्भता असलीच पाहिजे हे निश्चित! शास्त्रीय संगीतातील प्रत्येक राग हा एक भाव असतो. तो भाव प्रकट करणे म्हणजे राग प्रकट करणे असा याचा अर्थ होतो. प्रकट होणाऱ्या प्रत्येक स्वरअस्तित्वातून किंवा स्वरक्रियेतून त्या भावाची अभिव्यक्ती होणे आवश्यक असते. ती सार्थ आणि सौंदर्यपूर्ण होण्यामागची ‘शिस्त’ हा भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आहे, याची जाणीव मला झाल्यामुळे ‘राग’ या अस्तित्वाकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली.

अशा पद्धतीने संगीताची साधना चालू होती. त्याचबरोबर कॉलेजचे शिक्षणही चालू होते. कोणताही राग सादर करण्याइतपत ज्ञान आणि कंठ दोन्हीही तयार झाले होते. जशी ज्ञानपूर्तीसाठी अविरत साधना करावी लागते, तशीच सदैव तत्पर, योग्य रीतीने कार्यशील राहण्यासाठी आणि सांगीतिक होण्यासाठी कंठाचीही साधना तितक्याच प्रकर्षांने करावी लागते. या आणि अशा साधनामार्गावर येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचे मला अप्रूप होते.

मातृहृदय हे किती विशाल असते, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे. आपली कन्या आपल्यापेक्षा अधिक ज्ञानवंत व्हावी, या तळमळीतून सुगम संगीताचे ज्ञान देण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील नामवंत गुरूंकडे शिकण्याची तिने मला संधी दिली. त्या वेळी मी फक्त शास्त्रीय संगीतच शिकत होते. प्रकर्षांने ‘आकारयुक्त’ स्वरांचे विलंबित ते द्रुतापर्यंतचे अलंकारच शिकत असल्याने इथे हरकती, मुरक्या किंवा शब्दांचा वापर करण्याचे प्रयोजनच नव्हते. त्यामुळे आवाजही त्या दृष्टीनेच चालायचा. एके दिवशी माझे सुगम संगीताचे गुरू आईला म्हणाले, ‘माई, तुझ्या मुलीचा आवाज म्हणजे शुद्ध दगड आहे दगड! तो हलता हलत नाही.’ हे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले, तेव्हा तारुण्यावस्थेतला माझा अहंकार दुखावला गेला. परंतु ईश्वरीकृपा अशी की, त्या अहंकारातून अधिक खोलवर अशा ज्ञानाचा संपर्क मी साधू शकले. मी निश्चय केला, यापुढे संगीतातील (स्वरभाषेतील) एकही अस्तित्व असे असता नये की, जे माझ्या कंठातून येणार नाही. भावगीत, नाटय़संगीत, चित्रपटसंगीत, गझल, भजन, अभंग तसेच्या तसे मला गाता आले पाहिजेत- असा मी पणच केला! म्हणूनच आज कोणताही भावानुकूल अलंकार गाणे मला सोपे जाते. खरे म्हणजे आधी शास्त्रीय संगीत शिकून मग लघुसंगीताकडे वळणे यापेक्षा लघुसंगीतातील म्हणजे सुगम संगीतातील छोटय़ा छोटय़ा अलंकारांची साधना करून करूनच निखळ स्वरांचे व्यापक दैवी विश्व अनुभवण्याचे सामथ्र्य कलाकारामध्ये येत असते. म्हणूनच असे वाटते की, ज्याचे निखळ स्वरांच्या संगीतावर, स्वर्गीय संगीतावर प्रेम बसले; तो भौतिक संगीताच्या क्षेत्रात पाऊल टाकीलच कशाला? शुद्ध निखळ स्वरांचे सौंदर्यव्यापी विश्व अनुभवल्यानंतर शब्द किंवा मात्रा यांचा अधिक वापर असलेले संगीत हे शेवटी लौकिक, भौतिक पातळीवरचेच असते, हे मला मान्य करावेच लागेल.

असेच एकदा अतिशय प्रफुल्लित आणि प्रसन्न मनाने मी ‘बागेश्री’ रागाची साधना करायचे ठरविले. गाऊन झाल्यानंतर जेव्हा तंबोरा आडवा ठेवला, तेव्हा एका गोष्टीची मला जाणीव झाली. माझ्या मनाची अवस्था अतिशय उदास, खिन्न अशी झाली आहे. मी जेव्हा बागेश्री गायला बसले, तेव्हा माझे मन अतिशय उल्हसित होते, मग ते इतके उदास का बरे व्हावे? राग गाताना मला काही सुचत नव्हते, असे नाही. माझे सूर बागेश्रीचे लागत नव्हते, असेही नाही. आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न होते. तरीही माझ्या मनाची अवस्था इतकी खिन्न आणि उदास का झाली? याचा जेव्हा मी विचार केला, तेव्हा मला जाणवले की, हा त्या रागाच्या वातावरणाचा माझ्या मनावर झालेला परिणाम आहे. अर्थात हा अनुभव रागाच्या भावाशी अंतर्यामी एकरूप झाल्याखेरीज म्हणजेच स्वत:ला विसरल्याखेरीज येणे शक्य नाही. मग मी असा विचार केला की, बागेश्रीचा जर अशा तऱ्हेने मनावर परिणाम होत असेल; तर इतर रागांच्या वातावरणाचा परिणामही मनावर होत असला पाहिजे. तेव्हा वेगवेगळ्या रागांमधून मनाच्या विविध अवस्था प्रतीत होत असल्या पाहिजेत. म्हणूनच ‘मन’ म्हणजे काय? ते कसे असते? ते कसे कार्य करते याचा अभ्यास करणे मला आवश्यक वाटले. या विषयाचा मागोवा घेता घेता शेवटी उचित अशा रागप्रकटीकरणाची आनंदस्वरूप अशी अवस्था होऊ शकते, याकडे माझे लक्ष केंद्रित झाले.

या विषयाचे ज्ञान व्हावे म्हणून मी अनेक ग्रंथ व पुस्तके प्रामाणिकपणे वाचली. त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. ही सर्व पुस्तके, ग्रंथ साहित्यशास्त्र आणि नाटय़शास्त्राची असल्याने या कलात्मक अवस्थांचा मनावर होणारा परिणाम यासंबंधीचे ज्ञान मला प्राप्त झाले, पण त्याचा स्वरभाषेशी संबंध कसा जुळवावा, असा प्रश्न मला पडला. म्हणून ‘हा रससिद्धांत संगीतातील काही पुस्तकांत उपलब्ध आहे का?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र मी निराशच झाले. पूर्वीच्या ग्रंथांमध्ये तो असेलही; परंतु पूर्वीचे ग्रंथ हे संस्कृतमध्ये असल्याने आणि त्या भाषेची माझी फारशी ओळख नसल्याने मी अनभिज्ञच राहिले. शेवटी साहित्यशास्त्रातील काही ग्रंथ, पुस्तके आणि नाटय़शास्त्र यांच्या आधारे मी स्वरभाषेतील रससिद्धांताचा अभ्यास केला. भरतमुनी, भामह, दण्डी, लोल्लट, उद्भट, वामन, आनंदवर्धन, राजशेखर, भट्टनायक, भट्टतोत, कुंतक, अभिनवगुप्त, भोज, क्षेमेन्द्र, मम्मट, विश्वनाथ, जगन्नाथ इत्यादींनी केलेल्या रससिद्धांताच्या विश्लेषणाचा मी शक्य तितका अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि ‘रसो वै स:’ असे जे या विद्वानांनी म्हटले आहे; त्याचा प्रत्यय माझ्या रागातूनही येत असलाच पाहिजे असे मला निश्चितपणे वाटले. म्हणूनच रससिद्धांताची जी जी तत्त्वे साहित्यशास्त्रात आणि नाटय़शास्त्रात विद्वानांनी मांडली, त्यातील प्रत्येक तत्त्व हे स्वरभाषेतील रागसंकल्पनेशी किती एकरूपत्व साधू शकते, याचा सखोल अभ्यास करणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या अभ्यासातून मला एवढे समजले की, ‘राग’ हा मूलत: ‘चैतन्यस्वरूप’ असाच आहे. त्या मूळ चैतन्याची म्हणजेच आत्म्याची अनुभूती येणे हीच आत्मप्रचिती असते आणि शेवटी कलाकाराला अशा तऱ्हेने आलेली आत्मप्रचिती श्रोत्यांमध्ये संक्रमित करणे हे कलाकाराचे परमकर्तव्य आहे! स्वत:ला विसरणे इतके सोपे नसते, याची क्षणोक्षणी प्रचिती येत असूनही त्या आनंदमार्गाचा मोह कोणत्याही खऱ्या कलासाधकाला आवरता येणार नाही हे निश्चित!

(राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या स्वरार्थरमणीया किशोरी आमोणकर लिखित पुस्तकातील भूमिका’ : संपादित अंश.)