‘‘करोना विषाणू प्रतिबंधासाठी टाळेबंदी ही रणनीती असू शकत नाही, तर तो एक आपत्कालीन उपाय आहे. मुखपट्टय़ांच्या वापरासारखी व्यक्तिगत दक्षता, चाचण्या करणे, रुग्ण, संशयित रुग्णांचा शोध आणि त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था ही रणनीती असू शकते.’’ – निर्बंध मागे घेतलेल्या अमेरिकेतील १६ राज्यांत पुन्हा हाहाकार माजल्याने परिस्थिती विकोपाला जाते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली. काही राज्यांना पुन्हा निर्बंध लागू करणे भाग पडले. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने अमेरिकेतील तीन तज्ज्ञांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. वरील मत हे त्यापैकी एक डॉ. अब्रार करन यांचे. डॉ. अब्रार हे हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये जागतिक आरोग्यतज्ज्ञ आहेत.

अमेरिकेत मे महिन्याच्या अखेरच्या सोमवारी ‘मेमोरियल डे’चे कार्यक्रम झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर विषाणू संक्रमण झाल्याचे निरीक्षण अ‍ॅरिझोना विद्यापीठातील साथरोतज्ज्ञ डॉ. सॅस्किया पॉपेस्कू, पेरिल्मन स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रा. डेव्हिड रूबिन आणि डॉ. अब्रार करन यांनी ‘गार्डियन’च्या मुलाखतीत नोंदवले आहे. जेव्हा आपण निर्बंध मागे घेतो तेव्हा त्याआधीच्या दोन आठवडय़ांमध्ये रुग्णसंख्येत घट नोंदवली गेली का, हे पाहणे आणि पुन्हा मोठय़ा संख्येने रुग्ण आढळत नाहीत ना, याची खात्री करणे आवश्यक असते, असे डॉ. पॉपेस्कू म्हणतात. मोकळ्या जागेपेक्षा बंदिस्त जागेत संसर्गाचा धोका अधिक असतो. बार, कार्यालये ही अतिजोखमीची ठिकाणे आहेत. कारण साथरोगांचा संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन त्यांची रचना केलेली नसते. म्हणून संसर्ग वाढण्यामागे तेही एक कारण असल्याचे प्रा. डेव्हिड रूबिन यांचे मत. लोकांना मोकळ्या वातावरणात वावरू देणे, मुखपट्टय़ांचा आग्रह धरणे याबरोबरच धोका आणि मनुष्यहानी कमी करणे हा रणनीतीचा भाग असू शकतो, असे या तिन्ही तज्ज्ञांचे मत आहे.

खचाखच भरलेले बार, तेथे अंतर-नियमाचे होणारे उल्लंघन यांच्या दृश्यफिती समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांचा संबंध विषाणू फैलावाशी जोडला गेला. या संदर्भात ‘सीएनबीसी’च्या संकेतस्थळावरील वृत्तलेखात, ‘आता पुन्हा निर्बंध लागू करण्याबद्दल बारमालकांमध्ये संभ्रम आणि संताप आहे’, असे निरीक्षण अमेलिया ल्युकस यांनी नोंदवले आहे. निर्बंध धुडकावणाऱ्या काहींमुळे सरसकट सर्व बारमालकांना शिक्षा करणे अयोग्य आहे आणि प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे होणारी आर्थिक हानी मोठी आहे, असे बारमालकांचे म्हणणेही त्यात मांडले आहे.

जगातल्या प्रत्येक चार करोनाबाधितांपैकी एक अमेरिकेचा आहे, एकटय़ा अमेरिकेत १,२६,०००  बळी गेले आहेत. या वस्तुस्थितीबाबत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील स्तंभलेखात डेव्हिड ब्रूक्स ‘४ जुलै’  या अमेरिकेच्या राष्ट्रीय दिनाचा उल्लेख करून म्हणतात, ‘‘यंदा आपल्यापुढे एक सामूहिक प्रकल्प होता, करोना विषाणूच्या सर्वनाशाचा. पण आपण हरलो. संपूर्ण देशालाच आता शरमेने मान खाली घालण्याची गरज आहे. ’’ करोना संकट चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल ब्रूक्स केवळ अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी धरत नाहीत. ते म्हणतात, ‘‘ट्रम्प पायउतार होतील तेव्हा मलाही आनंदच होईल, पण सध्याच्या परिस्थितीस केवळ ते जबाबदार नाहीत. कारण टेम्प, ऑस्टिन, लॉस एंजलिसमधील बारमध्ये ट्रम्प जात नव्हते. मुळात अमेरिकी लोक टाळेबंदी पाळतच नव्हते. म्हणून हे अपयश सामूहिक आहे. आपण ट्रम्प यांच्या चमत्कारिक वागण्यावर लक्ष केंद्रित केले आणि मूळ समस्यांपासून दूर गेलो.’’

अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर जात असताना, विशेषत: फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये रुग्णसंख्या भयावह वेगाने वाढत असताना, ‘आपण करोनावर मोठा विजय मिळवण्याकडे वाटचाल करीत आहोत’, असे विधान ट्रम्प यांनी केले आहे! त्यांची निवडणूक मोहीमही जोरात सुरू आहे. त्यांचे खंदे समर्थक अंतर नियमाचे पालन तर सोडाच साध्या मुखपट्टय़ाही वापरत नाहीत. ‘सीएनएन’ वाहिनीच्या वृत्तसंकेतस्थळावरील विश्लेषणात यावर भाष्य आहे. ट्रम्प अमेरिकेला वेगळ्या अर्थाने मागे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका पत्रकार मेव्ह रेस्टन यांनी केली आहे. अमेरिकी नागरिक वर्णद्वेष व करोना साथीविरोधात लढत असताना त्यांचा सेनापती मात्र करोना विषाणू फैलाव रोखणारे प्राथमिक शास्त्रीय उपायही धाब्यावर बसवतात, अशी मर्मभेदी टिप्पणी या विश्लेषणात आहे.

गेल्याच आठवडय़ात, अमेरिकेत जूनमध्ये (निर्बंध शिथिल झाल्याने) ४८ लाख रोजगारसंधी उपलब्ध होऊन बेरोजगारी ११ टक्क्यांवर आल्याचे वृत्त होते.  मात्र ‘पोलिटिको’ या अमेरिकेतील नियतकालिकाच्या संकेतस्थळावर त्याविषयी, ‘४० टक्के अमेरिकी राज्यांत निर्बंध पुन्हा लादण्याचा विचार करावा लागतो आहे, अशा वेळी या आकडय़ांनी खूश होण्यात काय अर्थ?’ अशी टिप्पणी आढळते.अमेरिकेच्या मध्य व दक्षिण भागांत रुग्णसंख्या वाढत असून या १६ राज्यांतील रहिवाशांना न्यू यॉर्क राज्याने प्रवेशबंदी केली आहे.

संकलन: सिद्धार्थ ताराबाई