‘कविते तुझ्यामुळेच व्यथा तमाम झाली।  दु:ख, अश्रू, वेदना सारी खुलेआम झाली।

आसवे झाकली मी गं, कवितेच्या पदराखाली।  हा पदर असा मायावी, आसवेच कविता झाली!’

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

वरील ओळी म्हणजे कवितेची अधिकृत व्याख्या नाही. पण ती का नसावी? कारण आसवानांही शब्दसाजाचे चिरनूतनत्व प्रदान करण्याची अलौकिक शक्ती कवितेच्या ठायी ठायी भरलेली असतेच ना!

कविता जशी सत्य, शिव, सौंदर्य या त्रयींचा एकात्म, संघटित आविष्कार असते, तसेच ती आत्मशोधाच्या प्रखर वाटेवर मायेची सावली धरणारी हळवी बागही असते. पण आज समाजमाध्यमांवरील रंजनाच्या बहुभाषिक पर्यायांच्या गुदमरवून टाकणाऱ्या गर्दीत ही शब्दांनी सिंचलेली भावनांची बाग पार उद्ध्वस्त होते की काय, अशी भीती कवितेवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्या मनात सारखी घोंगावत असते. कवितेच्या सभोवताल दाटणारे भीतीचे हे मळभ दूर व्हावे.. आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या लेखणीतून प्रसवलेला हा लाखमोलाचा वारसा जितक्या प्राणपणाने केशवसुत, मर्ढेकर, कुसुमाग्रस आदींनी जपला, तो तसाच समर्पण वृत्तीने नवीन पिढीच्या आश्वासक ओंजळीत सोपवता यावा, यासाठी ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ‘एक संध्याकाळ कवितेची..’ या ‘अभिजात’ काव्यमैफिलीचे आयोजन केले होते. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, कवी अशोक नायगावकर, सौमित्र अर्थात किशोर कदम, मिलिंद जोशी आणि कवयित्री नीरजा यांच्या बावनकशी कवितांनी या कार्यक्रमाला अशा उंचीवर नेले, जिथे अभिजात मराठी काव्याच्या नादमाधुर्याने श्रोत्यांना मनमुग्ध केले. दाही दिशांनी कविता येथे अवतरली.. नाचली, बागडली.. आणि श्रोत्यांच्या परतणाऱ्या पावलांची संगती होऊन त्यांच्या उंबऱ्यावरही पोहोचली! त्या दुर्मीळ काव्ययोगाची ही काव्यात्मक सफर..

कदाचित दूर होतील युद्धाचे ढग..

कवितेने बहरलेल्या या संध्याकाळी पहिले काव्यपुष्प घेऊन मंचावर आल्या त्या कवयित्री नीरजा! ‘निर्थकाचे पक्षी’, ‘वेणा’, ‘निरन्वय’ अशा कवितासंग्रहांमधून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अखंड जागर मांडणाऱ्या नीरजा यांनी आल्याआल्याच नामदेव ढसाळांच्या शब्दविद्रोहाचे विलक्षण दर्शन घडवले. सभोवतालच्या विखारी वातावरणाचा ढसाळांनी ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितेत प्रखर आढावा घेतला होता. त्यास आता अडीच दशकांहूनही अधिक काळ लोटून गेला. पण ती कविता कालबाह्य़ झाली नाही. उलट तिची प्रस्तुतता आणखीच प्रखरपणे अधोरेखित होत आहे. ढसाळांच्या कवितेतील ‘आता हे शहर माझे राहिले नाही..’ ही खंत आजही कायम आहे. ती नीरजा यांनी नव्याने मांडली. वेदना आणि विद्रोहाच्या या क्रमात स्वत: नीरजा यांची कविताही अशीच संतप्त होऊन अवतरली..

‘कोसळत जातात भिंती

आणि उभारलेले तट,

म्हणून जाळलीस तू

विद्वेषाची उघडी पाडलेली पाने,

आणि दिलंस हातात

चवदार तळ्यासारखं

स्वच्छ, नितळ पाणी..’

अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती सांगताना ‘कदाचित दूर होतील युद्धाचे ढग..’ असा आशावाद मांडत नीरजा पुढे म्हणाल्या,

‘हा कसला आवेश

उसळलाय दऱ्याखोऱ्यांत

जो पोहोचत नाही,

कुणाच्याच मनापर्यंत

चोवीस तास, चोवीस

दिवस माणसं असतात गायब

शांततेच्या आवाजाने

बसत राहतात कानठळ्या

बहिरी माणसं अधिकाधिक

होत जातात मुकी..’

आंबेडकरांच्या स्वप्नातील लोकशाही वास्तवात उतरण्यासाठी माणसाला माणूस म्हणून स्वीकारावे लागेल, अशी आग्रही भूमिका नीरजा यांनी यावेळी मांडलीच..

‘माणसांचं मन जाणणाऱ्या

तुझ्या मनात

वसतील सगळी माणसं

तर किती सोपं होईल सगळं?’

असे म्हणत नीरजा यांनी रंजनात गुरफटवून वास्तवाची धगच जाणवू न देणाऱ्या कथित काव्यसौंदर्याला पार झुगारून लावले. धगधगत्या वर्तमानाची सद्य:स्थिती अतिशय पोटतिडकीने मांडली. क्षणिक सुखाच्या हव्यासात कोवळ्या कळ्यांनाही जाळून टाकणाऱ्या वा पुरुषी व्यवस्थेला उद्या कुणी आव्हान देऊ नये म्हणून गर्भातच या कळ्यांच्या कत्तली घडवणाऱ्या मानसिकतेवर प्रहार करताना नीरजा म्हणाल्या..

‘मेणबत्त्या घेऊन निघाल्या

आहेत मुली

न्यायाच्या शोधात

सारे स्रोत आटून जात आहेत

आतल्या आत..’

अशा आशयघन कविता सादर करून नीरजा यांनी रजा घेतली खरी; पण त्यांच्या कवितेतील ज्वालाग्राही निखारे श्रोत्यांच्या मनात नक्कीच पेटते राहतील..

शब्दाआधी, शब्दानंतर

सुरूच असते कविता!

मिलिंद जोशी.. चित्रकार, कवी, गायक, संगीतकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. या ‘अभिजात’ काव्यजागरात तेही सामील झाले होते. अस्वस्थ मनाची धग मांडताना वरच्या पट्टीत पोहोचणारा त्यांचा आवाज भावनांच्या कल्लोळाने अचानक कातर व्हायचा. त्यांच्या मनातील चिंतनशील काव्याचे द्वंद श्रोत्यांना या वेळी अनुभवता आले. कवितेवर कविता करताना मिलिंद जोशी म्हणाले,

‘ऐकू येते, दिसते त्याहून

अधिक असते कविता

शब्दाआधी, शब्दानंतर

सुरूच असते कविता..

कुणा पटो, ना पटो,

वाटू दे अगदी कुणास खोटी

प्रत्येकाच्या लेखी त्याची

खरीच असते कविता..’

प्रामाणिक कविता आपल्या मानसिक गरजेमुळे लिहिली जाते. कवीने स्वत:च्या प्रतिभेने, कल्पनाशक्तीने एक स्वतंत्र, स्वायत्त व अंतर्बाह्य़ सुसंगत असे अनुभवविश्व त्या कवितेत साकारलेले असते. कवितेतले सारे कवीचे. ती त्याची ‘अमानत’. पण ऐकताना ती श्रोत्यांना आपली वाटते. याचे कारण माणूस बदलला तरी प्रत्येकाची व्यथा, वेदना आणि आनंदाची परिमाणेही सारखीच असतात. मिलिंद जोशींच्या कवितांनीही मानवी आविष्काराच्या याच चिरंतन वास्तवाचे दर्शन घडवले.

‘बायोडिग्रेडेबल’ या कवितेत नवनिर्मितीच्या सूक्ष्म तपशिलातून हाती आलेले संचित श्रोत्यांपुढे मांडताना जोशी म्हणाले,

‘व्यक्त होण्याचे प्रवाह

अडवत असतात

श्वासांच्या मातीचा उपजाऊपणा

कमी करत राहतात

अपूर्ण राहिलेल्या इच्छा

त्या बायोडिग्रेडेबल नसतातच..’

मिलिंद जोशी चित्रकारही आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्याही नकळत चित्रांतील गूढ कवितेतही झिरपतेच. मूर्त-अमूर्तातील हा भेद पटकन लक्षात येत नाही. चित्रातली विसंगती कवितेत कशी संगती होऊन जाते, हेही कळत नाही. त्यामुळे ही गूढता अधिक रम्य स्वरूपात श्रोत्यांपुढे येते. या कार्यक्रमातही असेच घडले. चित्रातील गूढता शब्दात झिरपली अन् तिचे उत्कट काव्यरूप श्रोत्यांनी अनुभवले, ते असे..

‘तो म्हणाला, सावल्या म्हणजे

उन्हाला पडलेल्या घडय़ा असतात

मग तिने विचारले, ऊन म्हणजे?

तो म्हणाला, सावल्यांची

विस्कटलेली घडी..’

सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने..

मु क्ता बर्वे.. नाटक, मालिका वा चित्रपट- माध्यम कुठलेही असो, आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री. अभिनय असो वा प्रत्यक्ष जगणे, संवेदनशील मन जपलेली अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे अनेकांना ठाऊक आहे. संवेदनशील मनाला कवितेची ओढ लागणे स्वाभाविकच. पण मुक्ता बर्वे कविता नुसती लिहीत नाही, तर जगतेसुद्धा. ‘लोकसत्ता’च्या ‘अभिजात’ काव्यपीठावर मुक्ता आली आणि रोजच्या जगण्यातून गाठीशी आलेल्या अनुभवांना तिने व्यापक, उन्नत आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर सादर केले. मात्र, स्वत:च्या कविता सादर करण्याआधी मुक्ताने शांता शेळके यांची कविता सादर केली..

‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला

लोलक हरवला माझ्या हातून

आणि दिसू लागली माणसं

पुन्हा माणसासारखी!

परवा खूप खूप वर्षांनी एक चिमुरडी धावत आली माझ्याकडे आणि म्हणाली, आजी तुला माहितेय.. आकाश नसते नुसतेच निळे’

शांताबाईंची ही कविता सादर करून मुक्ता वळली ती पद्मा गोळे यांच्या कवितेकडे. ‘लक्ष्मणरेषा’ असे त्या कवितेचे शीर्षक..

‘सीतेपुढे एकच ओढली

रेषा लक्ष्मणाने

तिने ती ओलांडली

आणि झाले रामायण

आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा :

ओलांडाव्याच लागतात,

रावणांना सामोरे जावेच लागते

एवढेच कमी असते,

कुशीत घेत नाही भुई दुभंगून!’

यानंतर मुक्ताने स्वत:ची

‘सावली’ ही कविता सादर केली..

‘मी माझ्या सावलीला सांगितले

जा.. तुही सुटी घे काही दिवस

सतत माझ्या मागे धावत राहतेस..’

ही स्वत:चा आत्मनाद मांडणारी कविता असो की पडद्यावरील भूमिकेचा प्रभाव रंगभिजल्या कुंचल्यातून गळणाऱ्या शेवटच्या ओघळासारखा मनात उतरत जातो त्याची मांडणी करणारी ‘कॅनव्हास’ नावाची कविता असो; मुक्ताने श्रोत्यांची मने जिंकली.

मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी ‘लोकसत्ता’ची काव्यमैफिलीची कल्पना खूपच छान होती. अनेक जुन्या कवितांची उजळणी झाली. आपले वाङ्मय किती समृद्ध आहे, याची जाणीव करून देणारा, खूप शिकवणारा कार्यक्रम होता. सर्वच दिग्गज कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केले. आपल्या मातृभाषेबाबत आदर असलाच पाहिजे. तो अशा कार्यक्रमातून वाढीस लागेल. साहित्यातील रुची वाढवण्यासाठी ‘लोकसत्ता’ने टाकलेले हे पाऊल अभिनंदनीय आहे.

– उषा काकडे, ग्रॅव्हिटस फाउंडेशन

‘अभिजात’ या काव्यमैफलीत कवितांचा अक्षरश: पाऊस पडला! त्यामुळे उन्हाळ्यातही कवितांचा गारवा मिळाला. अतिशय वेगळ्या धाटणीच्या या कार्यक्रमातून अभिजात मराठी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात आले. ‘लोकसत्ता’चा हा स्तुत्य उपक्रम असून दरवर्षी असा कार्यक्रम करायला हवा.

– डॉ. मेधा मेहेंदळे, तन्वी हर्बल्स

‘अभिजात’ या काव्यवंतांच्या मैफिलीचे नियोजन अतिशय उत्कृष्ट होते. नाटय़गृह प्रेक्षकांनी पूर्ण भरलेले होते. काही प्रेक्षकांनी तर नाटय़गृहातील खुच्र्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बसून कोणतीही तक्रार न करता कार्यक्रमाचा आनंद घेतला. उत्तम मांडणी असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

– रंजन मूर्ती, मँगो हॉलिडेज्

‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘अभिजात’ काव्योत्सव हा अतिशय सुंदर कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे वर्णन शब्दातीत आहे. ठाणेकरांचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

– उत्तम जोशी, ठाणे भारत सहकारी बँक लि.

‘अतिशय दर्जेदार कार्यक्रम होता. तीन तास कसे गेले, हे कळलेच नाही. कार्यक्रम सादर करणारे सर्व कलाकार अष्टपैलू होते. अभिनय क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व माहीत होते, पण या कार्यक्रमातून या कलाकारांचा एक वेगळाच पैलू दिसला. वर्षांतून एक तरी असा कार्यक्रम असायलाच हवा.

– डॉ. नितीन देशपांडे, श्री रामकृष्ण नेत्रालय

लोकसत्ता’ने एक अप्रतिम कार्यक्रम रसिकांसाठी उपलब्ध करून दिला. या ‘अभिजात’ प्रयोगाचे कौतुक करावे तेवढे कमीच! मराठीचे वैभव मांडणाऱ्या, कधी हळुवार, तरल, तर कधी जहाल शब्दांत जाणिवांना साद घालणाऱ्या कवितांचा खजिनाच सर्व कलाकारांनी खुला केला आणि जाणत्या मराठीजनांनी तेवढय़ाच जल्लोषाने रसग्रहणाचा आनंद लुटला. या सोहळ्याचा भाग होता आले याचा अतिशय आनंद आहे. समाजमन घडविणाऱ्या ‘अभिजात’ उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!  – सलिल चौधरी, नेट भेट

अभिजात कवितांचा हा कार्यक्रम अतिशय आखीव आणि रेखीव होता. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम होते. उगाच भाषणांमध्ये वेळ न घालवता उपस्थितांना केवळ कविता आणि कविताच ऐकायची संधी या कार्यक्रमात मिळावी. त्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने रसिक प्रेक्षकांसाठीचा कार्यक्रम ठरला.

– सविता सुळे, ब्रह्मविद्या साधक संघ

प्रायोजक

कार्यक्रमाचे प्रायोजक ‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी, मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स, टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा,  हॉस्पिटलिटी पार्टनर हॉटेल खवय्ये आणि आय केअर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे आहेत.