प्रा. एन. एस. उमराणी
एखाद्या शिक्षणसंस्थेत किती संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यापेक्षा, त्या विद्यार्थ्यांपैकी किती जण भावी आयुष्यात प्रामाणिक आणि देशाप्रति बांधील असणारे नागरिक बनतात, हा त्या संस्थेच्या यशाचा मापदंड असावा. कारण शिक्षणाचा मुख्य हेतू हा मनुष्याला पूर्णत्व देणे हा आहे. त्यासाठी दर्जेदार ज्ञानदान करून विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती निर्माण करणारे आणि त्यांना चांगले नागरिक बनण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण ही खरे तर समाजासाठी देणगीच. विवेकी आणि प्रागतिक दृष्टिकोन असणारी पिढी घडवण्यात शिक्षणाचे स्थान अनन्यसाधारण आहे. ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेने शिक्षणाचे हे खरे तत्त्व/हेतू नेमकेपणे आत्मसात केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनांची मशागत करून त्यांना जागरूक नागरिक म्हणून घडवणे हा शिक्षणाचा हेतू या संस्थेने आपल्या कार्याचे मुख्य सूत्र म्हणून स्वीकारले आहे.
गेल्या सत्तर वर्षांत आपण भारतातील विविध क्षेत्रांतील संक्रमण पाहिले आहे. हे संक्रमण किंवा काळाच्या ओघात होत गेलेले बदल सर्वदूर शिक्षणामुळेच गतिशील झाले. थोडक्यात, समाजाला आकार देण्यात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरुवातीपासूनच शिक्षणाकडे समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले आहे. सोसायटीची स्थापना करताना समाजघडणीबरोबरच ज्ञानकक्षा वाढवत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीकडे पाहिले तरी हे ध्यानात येईल की, संस्थेने सातत्याने आपली उपक्रमशीलता जपली, किंबहुना ती वाढवत नेली. त्यामुळेच शिक्षण संस्थांची समृद्ध परंपरा असणाऱ्या आपल्या राज्यात ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ने एक अढळ स्थान प्राप्त केले आहे. केवळ औपचारिक शिक्षणच नव्हे, तर कला, क्रीडा आदी जीवनाच्या बहुविध क्षेत्रांत उत्तमता मिळविण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिला आहे.
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर हे सोसायटीचे संस्थापक. भारतीय शिक्षण देऊन भारतीय मूल्यव्यवस्था जपण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे संस्थेने आपल्या शैक्षणिक उपक्रमांतून ‘भारतीयते’ला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ‘आत्मनिर्भर भारता’कडे जाण्याचा हा एक मार्ग असे वाटते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना होऊन १६० वर्षे झाली. या काळात अनेक राजकीय-सामाजिक उलथापालथी झाल्या, बदल घडले. पण संस्थेचे मूलभूत उद्दिष्ट मात्र बदलले नाही. त्यामुळेच स्वावलंबी समाज आणि स्वतंत्र विचारांच्या व्यक्ती व नागरिक घडवण्याच्या कामी संस्था सदैव कार्यरत आहे. या वाटचालीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने निरनिराळ्या प्रकारे आपला कार्यविस्तार केला. ज्ञानाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित उपसंस्था निर्माण केल्या. पूर्वप्राथमिकपासून विविध विद्याशाखांतील पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण देण्यात संस्था आघाडीवर आहे. १८६० साली लावलेल्या या ज्ञानरोपटय़ाचे रूपांतर आता ज्ञानाच्या वटवृक्षात झाले आहे. या वटवृक्षाच्या छायेत विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान अशा विद्याशाखांतील तब्बल ७७ उपसंस्था ज्ञानदान करत असून त्याचा लाभ जवळपास ४० हजार विद्यार्थी घेत आहेत. बदलत्या काळाला साजेसे ‘स्मार्ट’ पदवीधर त्यांच्यातून घडत आहेत. दुसरे म्हणजे, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाच्या दृष्टीनेही संस्था कार्यरत आहे. ‘दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र’ त्यासाठी स्थापले आहे. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकास केंद्रही संस्थेने सुरू केले. विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारी ‘क्रीडा वर्धिनी’ आणि समृद्ध ग्रंथालये संस्थेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. या साऱ्यात दोन हजारांहून अधिक कर्मचारी, अध्यापकवर्ग सेवारत आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शिक्षण संस्थांशीही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्वत:ला जोडून घेतले आहे.
पण उत्तमतेचा ध्यास घेतलेली कुठलीही संस्था वाढायची थांबत नाही. तिच्या वाढीची, विस्ताराची प्रक्रिया अखंड सुरूच राहते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीदेखील तशीच वाढत राहील आणि भविष्यात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास वाटतो.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू आहेत.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2020 12:05 am