मायावतींचा मतदार एकदम ‘सायलंट’. म्हणजे तो डोळ्यांना दिसत नाही, कानांपर्यंत त्याचा आवाज पोचत नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांत त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा नसते. सामाजिक माध्यमांवरील गोंगाटापासून तो शेकडो मैल दूर असतो. जनमत चाचण्यांसाठीच्या सर्वेक्षणांमध्ये तर तो क्वचितच सापडतो. पण मतदानाला तो सर्वात अगोदर असतो.. त्यामुळेच बहेनजींचं कोडं निर्माण झालं आहे. उत्तर प्रदेशात यंदा तर ते अधिकच गूढ झालं आहे..

‘तुम सब लोग बिक चुके हो..’

एम. पी. त्यागी एकदम खेकसलेच. त्यागी हे दिल्लीला खेटून असलेल्या गौतम बुद्धनगर जिल्ह्य़ातील (नोएडा) दादरीमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार सतबीर गुर्जर यांच्या प्रचारयंत्रणेचे कर्ते-करविते. भेटीमध्ये त्यांनी मला दादरीतील माहोल विचारला. त्यावर भाजपचे तेजपाल नागर ऊर्फ मास्टरजींची हवा असल्याचा अंदाज मी स्पष्टपणे सांगितला. त्यावर ते जवळपास वैतागलेच.

‘मैं लिख के देता हूँ.. दादरी में गुर्जरजी आयेंगे और उत्तर प्रदेश में बहेनजी. हमे कोई रोक नहीं सकता!’

मी म्हणालो, ‘जनमत चाचण्यांमध्ये तर मायावतींना खूपच कमी जागा दाखविल्या जात आहेत.’

‘तुम मीडिया के सब लोग हमारे खिलाफ हो. भाजपने तुम्हे खरीद लिया है. इसलिए तुम बहेनजी को पीछे दिखाते हो. लेकिन सारा व्होटर बिका नही. हमारा मतदाता बहुतही सायलंट होता है. लिख लो, २००७ रीपिट हो जायेगा..’

त्यागींचा आत्मविश्वास जबरदस्त होता. पण त्यात अतिपणाची किंचितशी झाक दिसत होती. २००७मध्ये सर्व मतदानपूर्व जनमत चाचण्यांनी आणि मतदानोत्तर चाचण्यांनी मायावतींना कमी लेखले होते. पण प्रत्यक्षात मतपेटय़ांमध्ये जबरदस्त सामाजिक अभियांत्रिकीचा (सोशल इंजिनीअरिंग) चमत्कार जन्माला आला होता. दलित व उच्चवर्णीयांच्या अभूतपूर्व एकजुटीने मायावतींना स्पष्ट बहुमत दिलं होतं. आता बरोबर दहा वर्षांनी तसंच होणार असल्याचं त्यागींना ठामपणे वाटतेय. फरक फक्त एवढाच, की तेव्हा दलित आणि उच्चवर्णीयांचे मेतकूट होतं. यंदा मायावतींनी ‘डीएम’चा (दलित + मुस्लीम) फॉम्र्युला विकसित करण्याचा विडा उचललाय. म्हणून तर त्यागी दादरीमधील सुमारे सव्वा लाख ‘डीएम’ मतांचा हवाला वारंवार देत होते.

दादरी. गोमांससेवनाच्या संशयावरून झालेल्या महंमद अखलाखच्या निर्घृण हत्येने हे गाव कुप्रसिद्ध झालं असलं तरी त्याची आणखी एक महत्त्वाची ओळख आहे. ती म्हणजे ही मायावतींची जन्मभूमी. दादरीच्या पोटामधील बादलपूर नावाचं खेडेगाव हे मायावतींचं जन्मगाव. त्यांचे वडील प्रभू दास तेथील टपाल कार्यालयामध्ये कामास होते. त्यांच्या मूळ घराचं नामोनिशान आता उरलं नाही; पण बसप आमदार गुर्जर यांच्या बंगल्याच्या पाठीमागेच मायावतींचं नवं घर आहे. घर कसलं?.. फार्म हाऊस हा शब्ददेखील तोकडा पडावा.. नजरही पोचणार नाही, एवढं ते विस्तीर्ण आहे. भव्य स्तूपवगैरे पाहून तर बाहेरकरणी आपण एखाद्या स्मारकाजवळ आल्याचं वाटतं!

घरासमोरच्या मोकळ्या जागेत काही युवक कोवळी उन्हं खात बसले होते. त्यापैकी एक होता करण. उत्तर भारतात अनोळखी व्यक्तीशी कुणी लगेचच मोकळं होत नाही. खोलवर नजरेने टेहळणारा करणही त्यास अपवाद नव्हता. योगायोगाने तो या फार्म हाऊसमध्ये काम करणारा मजूर होता. उत्तर प्रदेशातीलच गोंडा जिल्ह्य़ातला.

‘बहेनजी इथे येतात का?’ त्याला विचारलं.

‘कहाँ आयेगी ओ?.. २००२ के बाद यहा नही आयी है. लेकिन दादरी गाव में चुनाव के लिए आती हैं.’

‘मग, इथे कोण असतात?’

‘दूरचे काही नातेवाईक आहेत. आनंदभैय्या (मायावतींचा भाऊ) कधी कधी येतात. काम पाहतात आणि लगेचच जातात.’

करण हळूहळू बोलू लागला. बहेनजींच्या घरातल्या विस्मयकारक जगाची माहिती देऊ  लागला. उंची फर्निचर, आलिशान सुविधा, सुमारे शंभर-दीडशे एकरावर पिकविली जात असलेली फळं-फुलं.. थक्क करणारं असं ते सारं होतं. पण खरा धक्का बसला तो मायावतींनी तिथं स्वत:साठी खास स्मशानभूमी बांधल्याच्या माहितीने! मायावतींना असलेलं पुतळ्याचं वेड सर्वानाच माहिती आहे. आता त्याचा पश्चात्ताप होत असल्याचं त्या स्वत: जाहीररीत्या कबूल करतात. पण स्वत:च्या घरामध्ये स्वत:साठी खास स्मशानभूमी?! मायावतींचे, त्यांच्या विक्षिप्तपणाचे अनेक खरे-खोटे, अतिशयोक्त वगैरे किस्से ऐकलेत. पण स्मशानभूमीची माहिती त्या सर्वावर कडी करणारी होती. विश्वासच बसत नव्हता. मी तसे करणला म्हणालोसुद्धा.

तो म्हणाला, ‘साब, एवढा पैसा कुठं ठेवणारं त्या? काय करणार त्याचं? म्हणून पाण्यासारखा पैसा वाहतोय. घरामध्ये साठ-सत्तर मजूर आहेत. वर्षभर काही ना काही काम चालू असतं. जाऊ द्या, पैसा त्यांचा. त्या खर्च करताहेत. पण माझ्यासारख्या गरिबाच्या हाताला काम मिळतंय ना!’

निवडणुकीचा विषय काढल्यावर तो म्हणाला, ‘यहाँ सब भाजप की बात करते है. मी घरी गोंडय़ाला जात असतो, कधी कधी लखनौला जातो. तेव्हा रेल्वेमधील लोकांमध्ये चर्चा असते, की एकदा मोदींना मत देऊन पाहू. मला तर वाटतंय, यंदा भाजपच येणार.’

त्याची इतकी स्पष्ट मतं पाहून त्याला घाबरत घाबरत जात विचारली. जात विचारताना आपण ओशाळतो; पण उत्तर प्रदेशात बहुतेक वेळा जात विचारण्यापासूनच संभाषणास सुरुवात होते. तो निर्विकारपणे म्हणाला, ‘कुर्मी!’

एकदम आठवलं, ही भाजपच्या पाठीशी असलेली बिगरयादव ओबीसी जात. पूर्वाचलमधील अतिशय प्रभावी जात. म्हणून तर भाजपने कुर्मीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अपना दला’शी लोकसभेपासून युती केलीय आणि संस्थापक सोनेलाल पटेलांच्या कन्येला, अनुप्रिया पटेलला केंद्रात मंत्री केलंय. त्या राजकीय चालीचा भाजपला होणारा फायदा करणच्या रूपाने दिसत होता. अनुप्रिया पटेलचे नाव घेताच तो आणखी खूश झाला. म्हणाला, ‘वो बहोत आगे जायेगी. मोदीजी उस को सीएम भी बना सकते हैं..’

तेथून निघालो तेवढय़ात तो म्हणाला, ‘साब, तुम्ही कोण? बाहेरचे दिसता.’ म्हटलं, ‘पत्रकार आहे.’ तर लगेच त्याचा चेहराच पडला. तो म्हणाला, ‘अगोदर का सांगितलं नाही? पत्रकारांशी न बोलण्याची सक्त ताकीद आहे आम्हाला. तुम्ही अगोदर सांगितले असते तर मी एक शब्दही बोललो नसतो..’ तेथून जाईपर्यंत तो विनवणी करत होता. ‘साब, मेरा नाम मत लिखिएगा. किसी ने देख लिया, पढ लिया तो मेरा काम छिन जाएगा..’

दूरवरच्या मराठी मुलखातील वर्तमानपत्रात त्याचं नाव छापून येण्यानं काही फरक पडला नसता. पण उगाच कशाला ‘धोका’ घ्यायचा? डायरीतील त्याचं खरं नाव खोडलं आणि टोपण नाव दिलं.. करण.

महंमद याकूब आणि शशिकुमार गौतम. मेरठजवळच्या सरदाना गावातील हातगाडीजवळ उभे असलेले दोन ‘अँग्री यंग मॅन’. भावना भडकाविणाऱ्या भाषणांबद्दल कुप्रसिद्ध असलेले आणि मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी भाजप आमदार संगीत सोम यांचा हा मतदारसंघ. याकूब पूर्वाश्रमीचा समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता. तो छोटी-मोठी कामे करतो. गौतम ट्रकचालक. ‘मुस्लीम वस्तीत राहणारा एकमेव दलित’ असल्याची खास ओळख तो आवर्जून सांगत होता. याकूबच्या तोंडातून तर अंगार बाहेर पडत होता. त्याला सर्वाधिक चीड वाटत होती ती अखिलेशसिंह यादव यांची. दातओठ खाऊन तो बोलत होता, ‘मुझफ्फरनगर में मुसलमानों को बेरहमी से काप रहे थे, तब ये सैफई (मुलायमसिंहांचे मूळ गाव) में नाच-गाना कर रहा था.. अब मुसलमानों की बात करता है. लेकिन खुद इस का बाप (मुलायमसिंह) इस को मुसलमानों के खिलाफ बताता है. उत्तर प्रदेशात सर्वाधिक दंगली अखिलेशांच्या कारकीर्दीत झाल्या. मुस्लिमांच्या जिवावर राजकारण करतो; पण त्यांचा जीव वाचवीत नाही. याउलट बहेनजी बघा. त्या मुख्यमंत्री असत्या तर २०१३मधील मुझफ्फरनगर दंगल झालीच नसती. मुस्लिमांना बेघर व्हावं लागलं नसतं.’

गौतमचा राग मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होता. ‘नोटाबंदीने रोजगार हिरावला. महिना झालाय हाताला काम नाही. हम गरीब लोग भुखे है. कुछ लोग मरे भी. जिओसाठी नोटाबंदी केली मोदींनी!’

त्याला म्हणालो, ‘नोटाबंदी आणि जिओचा काय संबंध? मुकेश अंबानींनी जिओ मोबाइलची सुरुवात नोटाबंदीच्या कितीतरी महिने अगोदर केली.’ त्याला बहुधा चूक लक्षात आली असावी. पण तो लगेचच सावरून म्हणाला, ‘पण मोदी सगळं त्या अंबानी आणि अदानींसाठी तर करताहेत. विजय मल्लय़ांना कोणी मोकळं सोडलं? गरिबांचा तळतळाट लागेल मोदीला!’

याकूब-गौतम या जोडगोळीच्या विचारांतली तीव्र स्पष्टता आश्चर्यकारक होती. आपला ‘अजेंडा’ खालपर्यंत पोहोचविण्यात मायावतींना यश आल्याची ती पावती होती. उच्चवर्णीयांबरोबर सामाजिक अभियांत्रिकी शक्य नसल्याचा अंदाज आल्याबरोबर ज्या ‘डी-एम’ समीकरणासाठी मायावतींनी जंगजंग पछाडले, त्याला किमान पश्चिम उत्तर प्रदेशात तरी चांगला आकार मिळाल्याचं जाणवत होतं. समाजवादी पक्षाला सोडून मुस्लिमांच्या बसपकडे जाण्याने भाजपला फायदा होण्याची शक्यता बोलून दाखविल्यानंतर याकूबने सणसणीत उत्तर दिले, ‘अगर अखिलेश अपने बाप को छोड सकता है, तो हम क्यूं अखिलेश को छोड नहीं सकते?’ त्याचा हा सवाल म्हणजे अखिलेश यांच्यासाठी धोक्याची घंटा होता. उगीचच नाही मायावतींनी तब्बल ९८ मुस्लिमांना उमेदवारी दिली. तेवढं तर आजतागायत मुस्लिमांचे ‘मसीहा’ असलेल्या मुलायमसिंहांनीसुद्धा कधी केलेलं नाही.

मेरठमध्ये एका इंग्रजी वर्तमानपत्राची पत्रकार भेटली. तोपर्यंतच्या बहुतेक जनमत चाचण्यांनी बसपला ४०-५० पेक्षा जास्त जागा दिल्या नव्हता. ते तिला खटकत होते. ती म्हणाली, ‘आम्हाला तर जागोजागी फिरताना बसपच अधिक मजबूत वाटतोय. पण का कुणास ठाऊक राष्ट्रीय माध्यमे मायावतींना कमी लेखत आहेत?’ त्याचवेळी ट्विटरवर वृत्तवाहिनीवरील एका प्रसिद्ध अँकरने ‘मायावतींना कमी लेखणे चुकीचे ठरेल’, अशा आशयाचं केलेलं ट्वीट पडलं. ते वाचून ती एकदम उल्हसित झाली. तिरकसपणे म्हणाली, ‘चला, किमान एका तरी बडय़ा पत्रकाराला मायावतींचा जोर दिसला.’ तिच्या म्हणण्यात तथ्य दिसत होतं. पहिल्या दोन मुस्लीमबहुल टप्प्यांमध्ये (पश्चिम उत्तर प्रदेश व रोहिलखंड) मायावतींचा पक्ष समाजवाद्यांपेक्षा अधिक मजबूत वाटत होता. तिसऱ्या टप्प्यात (अवध) मायावतींना फारसे स्थान नाही. पण चौथ्या (बुंदेलखंड) आणि पाचव्या टप्प्यांत (नेपाळ सीमेला लागून असलेले भाग) त्या पुन्हा एकदा महत्त्वाच्या ‘खिलाडी’ आहेत.

या निवडणुकीत बहेनजी एक गूढ बनल्यात. कोडे झाल्यात. त्यांचा कोणालाही नीटसा अंदाजच येईनासा झालाय. याचं कारण अगदी सोपं. मायावतींचा मतदार एकदम ‘सायलंट’. म्हणजे तो डोळ्यांना दिसत नाही, कानांपर्यंत त्यांचा आवाज पोचत नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये त्याचं प्रतिबिंब बहुतेकवेळा नसतं. सामाजिक माध्यमांवरील गोंगाटापासून तो शेकडो मैल दूर असतो. जनमत चाचण्यांसाठी घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये तो क्वचित सापडतो. पण मतदानाला सर्वात अगोदर आणि निष्ठेने मतदान करणारा असतो. म्हणून तर भले मायावतींना लोकसभेची एकही जागा मिळाली नसेल; पण तब्बल वीस टक्के मते मिळाली होती. अशा गूढ मतपेढीचा अंदाज कसा बांधता येईल?

नेमका हाच प्रश्न राजकीय वर्तुळाला छळतोय. झाकल्या मुठीचं कोडं उलगडताना फसगत बिलकूल शक्य आहे. म्हणून तीन प्रश्न खूप महत्त्वाचे ठरावेत. –

दलितांमधील जाटव मायावतींशी एकनिष्ठ. पण पासी, वाल्मीकी आदी बिगरजाटव दलित लोकसभेप्रमाणे भाजपकडे ओढले जातील का?

समाजवादी पक्षाकडील नैसर्गिक ओढा बाजूला ठेवून भाजपला हरविण्यासाठी मुस्लीम समाज मोठय़ा संख्येने बसपाकडे येईल का?

कायदा व सुव्यवस्थेबद्दल मायावतींची मोठी ख्याती. या ख्यातीमुळे त्यांना उच्चवर्णीय व व्यापाऱ्यांची लक्षणीय प्रमाणात मते मिळतील का?

दादरीमधील बसपाच्या त्यागींचे एक वाक्य आठवते. ‘अगर बहेनजी नहीं जितती, तो प्रदेश में किसी की भी सरकार नही बनेगी..’ या त्यांच्या दाव्यात तथ्य वाटण्यासारखं चित्र दिसतं. म्हणजे बहेनजींच्या कामगिरीवर भाजप व समाजवादी-काँग्रेस आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यांना कमी जागा मिळाल्यास (पन्नासपेक्षा कमी) फायदा समाजवादी-काँग्रेस आघाडीचा असेल. मध्यम यश (शंभरच्या आसपास जागा) मिळाल्यास फायदा कदाचित भाजपचा असेल आणि त्यागी म्हणतात त्यानुसार २००७ची पुनरावृत्ती झाल्यास..

११ मार्चपर्यंत थांबणेच इष्ट!

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com