प्रमोद मुजुमदार*
न्यूझीलंडमधील मशीद-हल्ल्यानंतर जेसिंडा आर्डर्न यांच्या नेतृत्वाचा कस लागला..
.. या नेतृत्वाचा स्वीकार लोकांनी केल्याचे ताज्या निवडणुकीत दिसले!
न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गेल्या शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले, त्या देशाच्या विद्यमान अध्यक्ष जेसिंडा आर्डर्न यांच्या पक्षाला ४९ टक्के मते मिळाल्याने आर्डर्न यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसले. या वाढत्या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे देशातील सलोखा टिकवण्याच्या कसोटीचा क्षण दीड वर्षांपूर्वी त्यांच्यापुढे उभा राहिला, ते प्रकरण त्यांनी योग्यरीत्या हाताळले. १५ मार्च २०१९ रोजी न्यूझीलंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर- ख्राइस्टचर्च – येथील अल नूर मशीद आणि लिनवूड इस्लामिक सेंटर येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या मुस्लिमांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ५१ मुस्लीम मारले गेले. ४८ जखमी झाले. हल्लेखोर २९ वर्षीय ब्रेन्टन टॅरेंट नावाचा ऑस्ट्रेलियन श्वेतवर्ण- दुरभिमानी (व्हाइट सुप्रीमॅसिस्ट) होता. त्याने आपल्या डोक्यावर कॅमेरा बसवला होता. या हल्ल्याचे थेट प्रक्षेपण फेसबुकवरून त्याने केले.
ब्रेन्टन टॅरेंट याने हल्ल्याआधी एक लेखी निवेदन ऑनलाइन प्रकाशित केले, त्यात या हल्ल्याची उद्दिष्टे आणि योजना नोंदली होती. या निवेदनाला त्याने ‘दि ग्रेट रिप्लेसमेंट’ असे नाव दिले होते. युरोपातील श्वेतवंश दुरभिमानी (व्हाइट सुप्रीमॅसिस्ट) गटाची ही ‘स्थलांतरितविरोधी’ घोषणा आहे. ‘जगात गोरी, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची श्वेतवर्णीय माणसेच नैसर्गिकरीत्या श्रेष्ठ असून आपल्यापेक्षा वेगळी कोणतीही माणसे ठार मारणे हा अतिशय योग्य मार्ग आहे; नव्हे हे आपले इतिहासदत्त काम आहे.. सरकार, न्यायालय, कायदा न जुमानता ‘वांशिक शुद्धता’ राखण्यासाठी क्रौर्य आवश्यक आहे’- असे ठासून सांगणारे हे तत्त्वज्ञान आहे. ‘दि ग्रेट रिप्लेसमेंट डॉक्युमेंट’ हे त्यांचे मूलभूत ‘पवित्र घोषणापत्र’ आहे.
या सुप्रीमॅसिस्ट तत्त्वज्ञानाने भारलेल्या ब्रेन्टन टॅरेंट या ‘हिंसेच्या श्वापदाने’ आपल्या योजनेप्रमाणे प्रथम अल नूर मशिदीत प्रार्थना करणाऱ्या मुस्लिमांवर स्वयंचलित रायफलद्वारे थेट १७ मिनिटे गोळीबार केला. तिथून तो बाहेर पडला आणि जवळच असलेल्या लिंडवूड इस्लामिक सेंटरमधील प्रार्थनास्थळात घुसून तसाच बेछूट हल्ला केला.
न्यूझीलंड हा एक शांतताप्रिय लोकशाहीवादी सहिष्णू परंपरांचा देश. या देशात लोकसंख्येच्या १.१ टक्के म्हणजे सुमारे ४२,५०,००० इतकी मुस्लीम लोकसंख्या आहे. मशिदीवरील हल्ल्याच्या घटनेनंतर न्यूझीलंडच्या अध्यक्ष जेसिंडा आर्डर्न विनाविलंब धार्मिक द्वेषाचे बळी ठरलेल्या मुस्लीम माणसांना जाऊन भेटल्या. हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. जखमी किंवा आपले नातेवाईक गमावलेल्या मुस्लिमांना त्यांनी मिठीत घेऊन त्यांचे सांत्वन केले. जेसिंडांच्या प्रामाणिक भावना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. या हल्ल्याचे बळी ठरलेल्यांचेच नव्हे तर न्यूझीलंडच्या सर्व नागरिकांचे मन जेसिंडांनी प्रांजळ वर्तनाने जिंकले होते.
जेसिंडांच्या या भेटीची प्रतिमा जगभरात ‘मानवी करुणा आणि सहिष्णुतेचे प्रतीक’ बनली. अशाच एका त्यांच्या प्रतिमेचे भव्य शिल्प (म्यूरल) आता ख्राइस्टचर्चमध्ये रंगवण्यात आले आहे!
सन २०१७ पासून न्यूझीलंडमध्ये ग्रीन पार्टीच्या पाठिंब्यावरील लेबर पार्टीचे संयुक्त सरकार होते. या सरकारचे नेतृत्व ४० वर्षीय जेसिंडा आर्डर्न यांनी केले. पण त्यांचे नेतृत्व झळाळून उठले ते या हल्ल्याच्या घटनेनंतर. जेसिंडांचे व्यक्तिमत्त्व आणि वैचारिक जडणघडण अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या वयाच्या १७व्या वर्षांपासून लेबर पार्टीसाठी काम करतात. इंग्लंड, अमेरिका आदी देशांत राजकीय अभ्यास आणि संशोधन प्रकल्पांवर त्या काम करायच्या. सन २००१ मध्ये जेसिंडा ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ युथ’ या आंतरराष्ट्रीय युवा संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. सन २००५ पर्यंत त्या न्यूझीलंडमधील ‘दि चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट’च्या सदस्य होत्या. परंतु समलिंगी नातेसंबंध किंवा स्त्री-स्वातंत्र्य यांविषयीच्या आपल्या भूमिकांचा चर्चच्या भूमिकांशी मेळ बसत नाही; उलट त्यात विसंगती आहे, म्हणून आपण चर्च सोडत असल्याचे जेसिंडा यांनी २००५ मध्ये अधिकृतपणे घोषित केले. पुढे सन २०१७ मध्ये त्यांनी आपण आस्तिक नसून ‘अज्ञेयवादी’ (अॅग्नॉस्टिक) असल्याचे घोषित केले. त्या स्वत:ला ‘सोशल डेमोक्रॅट’ म्हणवतात. त्यांचे म्हणणे आहे की, भांडवलशाही व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे.
करुणा, सहवेदना आणि हिंमत
ख्राइस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलून ‘न्यूझीलंड गन लॉ’ – शस्त्र कायदा – आणखी कडक केला. लोकशाही समाजात हिंसेला स्थान नाही अशी त्यांची भूमिका आहे. जेसिंडा यांचे एक विधान त्या वेळी गाजले- ‘‘मला ठामपणे माहीत आहे की, करुणा, सहवेदना आणि हिंमत हे मानवी जीवनातील अस्सल सत्य आहे.’’ त्याची सार्थता पुढे, हल्ला- खटल्याच्या निकालातून न्यूझीलंडच्या व्यवस्थेने आणि लोकांनीही दाखवून दिली.
त्या धर्मविद्वेषी हल्ल्यातील आरोपी ब्रेन्टन टॅरेंट याला अटक झाली. न्यूझीलंडच्या उच्च न्यायालयात खटला दाखल झाला. घटनेनंतर ५३०व्या दिवशी म्हणजे २६ ऑगस्ट, २०२० रोजी या खटल्याचा निकाल लागला. न्यूझीलंडमध्ये सन १९६१ पासून फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. आजीवन विनापॅरोल कारावास हीच सर्वात मोठी शिक्षा आहे. ती ब्रेन्टनला मिळाली. न्यायालयाने दोषी ठरवल्यावर त्याबाबत एकही शब्द त्याने उच्चारला नाही. न्यायालयात त्याच्या वकिलांनी मात्र, ‘‘टॅरेंटला आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप होतो आहे. त्याने त्याची (वंशविद्वेषी) भूमिका बदलली आहे. त्याची कृती अगदी ‘अनावश्यक, किळसवाणी आणि अविवेकी होती’, तो चुकीच्या भ्रामक अशा राजकीय भूमिकेने प्रेरित होता, असं त्याला आता वाटतं.’’ अशी बाजू मांडली होती.
शिक्षा घोषित करताना न्यायमूर्ती कॅमेरॉन मँडर म्हणतात, ‘‘ माझी खात्री झाली आहे की तुझ्या मनात तू बळी घेतलेल्या माणसांबद्दल कसलीही वेदना किंवा पश्चात्तापाची भावना नाही.. आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांविषयी तीव्र द्वेषभावनेने भरलेला असा तू एक अत्यंत दुर्बल माणूस आहेस.. तू पूर्णपणे आत्ममग्न माणूस आहेस. तू लोकांना दिलेल्या वेदनांविषयी ना माफी मागितलीस, ना तू त्यांना पोहोचविलेल्या यातनांची कबुली दिलीस. तू केवळ स्वत:तच,आपल्या प्रतिमेत गुंग आहेस..’’
टॅरेंटला शिक्षा झाली त्या वेळेस न्यायालयात आणि बाहेर त्या धार्मिक विद्वेषाच्या हल्ल्याचे बळी ठरलेल्यांचे नातेवाईक, जखमी झालेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. लुडविन इस्लामिक सेंटरमधील हल्ल्यात टॅरेंटला क्रेडिट कार्ड मशीनच्या साह्य़ाने अडवणारे अब्दुल अझीज वहाबझादा शिक्षेनंतर म्हणाले, ‘‘टॅरेंट हा एक ‘भेकड’ आणि ‘निव्वळ मूर्ख’ इसम आहे. त्यानं आपलं आयुष्य वाया घालवलं.’’ टोनी ग्रीन हा अल नूर मशिदीत नियमित प्र्थनेला येतो. तो म्हणाला ‘‘टॅरेंट गप्प बसला कारण त्याला काही म्हणायचंच नाही. मानवतेविषयी त्याला काहीही घेणंदेणं नाही आणि त्याच्या मेंदूपर्यंत आपण पोहोचू शकत नाही.’’
या निकालावर भाष्य करताना जेसिंडा आर्डर्न म्हणाल्या, ‘‘हल्ल्याच्या जखमा सहजपणे भरून येणाऱ्या नाहीत. टॅरेंटचे बळी ठरलेल्या मुस्लीम समाजाबद्दल माझी पूर्ण सहवेदना आहे. आमची कोणतीच कृती त्यांच्या यातना कमी करू शकणार नाही. पण माझ्या मुस्लीम समाजबांधवांना या सर्व प्रक्रियेत आमच्या मायेची ऊब पोहोचली असेल असं वाटतं. यापुढेही ते असेच आमच्या ‘प्रेमाच्या बाहूत’ राहतील याची खात्री बाळगा.’’ त्या प्रेमाच्या बाहूंतील ताकद निवडणूक निकालांत दिसली, कारण न्यूझीलंडच्या नागरिकांनी ती ओळखली!
* आधार : वॉशिंग्टन पोस्ट व अन्य वृत्त-स्रोत.
लेखक ‘सलोखा संपर्क गटा’चे समन्वयक आहेत.
mujumdar.mujumdar@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 12:09 am