डॉ. मनोज शहाणे

न्यू जर्सी येथील एका सार्वजनिक रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी गेल्या दोन महिन्यांच्या अनुभवावर केलेली ही नोंद.. भारतीय अनुभवापेक्षा थोडीफार निराळी, पण ‘डॉक्टर’ आणि वैद्यकीय विश्वाने जगभरच जे प्रयत्न केले, त्यांच्याशी मिळतीजुळती..

चीनच्या वुहान भागातील या भयंकर संकटाचा उगम जरी अमेरिकेपासून हजारो किलोमीटर दूर असला, तरी जेव्हा इटलीचा पराभूत लढा दिसायला लागला तेव्हाच आता हे संकट आपल्या किनाऱ्यावर लवकरच पोहोचणार ही शंका माझ्या मनात घर करून बसली. न्यू यॉर्कमध्ये १ मार्चला करोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला. न्यू जर्सी आणि न्यू यॉर्कच्या मध्ये फक्त एक नदी असल्यामुळे दोन-तीन दिवसांतच करोनाचा रुग्ण येथेही येणार हे अटळ होते.

न्यू जर्सीतील आमच्या रुग्णालयाने युद्धपातळीवर तयारी सुरू करून ‘करोना आपत्ती दल’ निर्माण केले. याचा अविभाज्य भाग असल्यामुळे मला हा पूर्ण प्रवास खूप जवळून बघायला मिळाला.

पाचशे खाटांच्या आमच्या रुग्णालयात साधारणत: ४० अतिदक्षता विभागाच्या खाटा आहेत. पाचशे रुग्णांकरिता खाटा सज्ज करणे, करोनाव्यतिरिक्त रुग्णांसाठीही काही राखीव ठेवून त्याप्रमाणे नियोजन करणे हे आव्हानात्मक होतेच, परंतु याहीपेक्षा ४०च्या खाटांच्या अतिदक्षता विभागाची क्षमता ११० पर्यंत नेताना चांगलीच दमछाक झाली. विभागाच्या प्रत्येक भागात एकाऐवजी दोन रुग्ण, त्यांची देखरेख यांसह संसर्ग प्रसार रोखण्यासाठी या खोल्यांमधील हवा बाहेर जाऊ नये यासाठी ऋण हवादाब (निगेटिव्ह प्रेशर) तयार करणे याचा आराखडा तयार केला. डॉक्टर, परिचारिका, जैववैद्यकीय अभियंते, प्रशासकीय विभाग अशी अनेक पथके रात्रंदिवस कामाला लागली.

कमतरतांवर मात

वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई), सहकृत्रिम श्वसनयंत्रणाची कमतरता होतीच. इतर राज्यांतली रुग्णालये आणि अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीने ही कमतरता भरून निघाली. हळूहळू सर्व वॉर्ड्स आणि अतिदक्षता विभागातील खाटा भरायला सुरुवात झाली तशी आमचीही आघाडीवरील लढाई सुरू झाली.

सर्वात जोखमीची जबाबदारी होती ती आमच्या भूलतज्ज्ञ विभागाची. रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणा लावताना श्वासनलिकेत नळी घालायची असते. रुग्णाच्या तोंडाच्या अगदी जवळ जाऊन ही नळी घालणे म्हणजे शत्रूच्या मुलखात प्रवेश करण्याइतके धोकादायक असल्याने सुरक्षित राहून हे कसे करता येईल, याचा विचार सुरू झाला. यासाठी मग ‘पीएपीआर’ या संपूर्ण चेहरा बंदिस्त करून पाठीवर ऑक्सिजन पुरविण्याची सोय असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला. याचे प्रात्यक्षिक केले गेले. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर तातडीने कृत्रिम श्वसनयंत्रणा लावणे अत्यावश्यक असते. अशा वेळी इतक्या रुग्णांमधून दुर्लक्ष होऊ नये यासाठी ही यंत्रणा लावणारी स्वतंत्र टीम तयार केली. यासाठी विभागातच वेगळे स्टेशन तयार केले. येथे अगदी औषध भरलेल्या इंजेक्शनपासून सर्व साधने एका ट्रेमध्ये तयार असायची. याचा एक फायदा असा झाला की, रुग्णांना ही सेवा वेळेत मिळाली. यामुळे त्यांचे प्राण वाचविण्यात मोठी मदत झाली. नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे आमच्या टीमला संसर्गापासून सुरक्षित ठेवू शकलो.

अतिदक्षता विभागात करोनाबाधित रुग्णांची काळजी घेणे, त्यांना ‘प्रोन’ करणे (पोटावर झोपविल्यामुळे ऑक्सिजनच्या पातळीत सुधारणा होते.) या आमच्याकरिता चाकोरीबाहेरच्या गोष्टी होत्या. परंतु त्या लगेच आत्मसात केल्या. अगदी थोडय़ा वेळाच्या प्रशिक्षणावर परिचारिका अतिदक्षता विभागातील रुग्णांची काळजी घ्यायला शिकल्या. रुग्णालयात काम करणारा प्रत्येक माणूस आपण एका मोठय़ा परिवाराचा हिस्सा आहोत या भावनेने झटू लागला. त्या काळात आमच्या हॉस्पिटलचे रूपांतर जणू युद्धभूमीत झाले. पण फरक एवढाच की शत्रू अदृश्य रूपात फिरत होता. सेवाभावी संस्था वेळोवेळी जेवण, खाण्याचे पदार्थ पाठवीत असल्याने शारीरिक शक्ती आणि मनोबलही वाढत होतेच.

रुग्णांची स्थिती..

चाचण्या, संच यांची कमतरता येथेही होती. त्यामुळे कोणाच्या चाचण्या करायची याची नियमावली तयार केली गेली. आपत्कालीन विभागातील मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच अलग राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. गंभीर प्रकृतीच्या रुग्णांनाच दाखल केले जात होते.

रुग्णालयातील सर्व टीम दररोज एकत्र येत आणि प्रत्येक रुग्णाबाबत चर्चा होत असत. प्रत्येक रुग्णाचा अभ्यास करून उपचार पद्धती निश्चित केली जात होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसह- अझीथ्रोमायसीन, प्लाझ्मा थेरपी अशा विविध उपचार पद्धती सुरू होत्या. रेमडेसीवीर वगळता बाकीचे उपचार फारसे प्रभावशाली आढळले नाहीत.

निरोपाची घालमेल..

गेल्या दोन महिन्यांत या एका रुग्णालयात एक हजारच्या आसपास रुग्ण दाखल झाले. यात साधारणत: अडीचशे मृत्यू नोंदले. यात ज्येष्ठांची संख्या अधिक असली तरी तरुणांचीही होतीच. तरुण वयातल्या रुग्णांमध्ये मुख्यत: पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, स्थूलपणा असे आजार असलेल्यांचा समावेश अधिक होता. मृत्यूंपैकी बहुतेकांची प्रकृती अचानक अस्थिर होऊन काही उपचार करण्याच्या आतच त्यांचे निधन व्हायचे.

सर्वात कठीण काळ असायचा तो म्हणजे रुग्ण जाणार हे समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना स्क्रीनवरून त्यांना शेवटचे पाहण्याची वेळ. रुग्णांना बोलता तर यायचे नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांची निरोप घेताना होणारी घालमेल पाहून डॉक्टर असूनही मनात काहूर माजायचे. या काळात प्रत्येकाचे दु:ख करण्यात आम्हाला वेळ नव्हता, कारण लगेचच पुढच्या रुग्णांकडे जायला लागायचे.

स्थिर असलेल्या रुग्णांना वेळ घालविण्यासाठी आयपॅड दिले होते. त्यामुळे परिचारिका, डॉक्टर आणि घरच्यांशीही संवाद साधू शकत होते. विरंगुळ्याचेही तेच एक साधन.

कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील एखादा रुग्ण बरा होऊन घरी जायच्या वेळेस आनंदी गाणी लावली जायची. तेवढा थोडा वेळ का होईना आनंदाचे वातावरण निर्माण व्हायचे.

आज मागे वळून बघताना तो दोन महिन्यांचा काळ अविस्मरणीय होता. आता कुठे इथली परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. आम्हाला मिळालेली मदत प्रत्येक ठिकाणी मिळत आहे असे नाही. मात्र तरीही वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक जण या विषाणूशी आपापल्या ताकदीने, उमेदीने लढत आहे. त्या सगळ्यांना यश मिळो, हीच अपेक्षा.