डॉ. प्रमोद चौधरी

केपटाऊनसारख्या शहराने अनुभवलेली भीषण पाणीटंचाई असो की ऑस्ट्रेलियातील वणवा; जागतिक तापमानबदलाच्या धोक्याच्या घंटा आपण अलीकडच्या काळात वारंवार ऐकू लागलो आहोत. भारताच्याही कोणत्या ना कोणत्या भागात होणारी ढगफुटी आणि काही भागांच्या नशिबी आलेली वाढती दुष्काळाची तीव्रता हे त्याचेच निदर्शक आहे. खनिज इंधनांवरील आपले अवलंबित्व कमी करणे हे त्यातून जागे होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने टाकण्यासाठीचे एक ठोस पाऊल ठरणार आहे. १० ऑगस्टच्या जागतिक जैवइंधन दिनानिमित्ताने त्यावर प्रकाश टाकणारा लेख..

औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यापासून विसाव्या शतकाच्या अखेपर्यंतच्या साधारणत: दीडशे वर्षांमध्ये पृथ्वीच्या पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ३० टक्क्यांनी, तर मिथेन वायूचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. हरितवायू उत्सर्जनाचे स्वरूप असेच बेसुमारपणे सुरू राहिले, तर एकविसाव्या शतकाअखेरीस पृथ्वीच्या तापमानात औद्योगिकीकरणपूर्व पातळीच्या तुलनेत ३.२ अंश सेल्सिअसची वाढ झालेली असेल, असे संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या २०१९ मधील उत्सर्जनविषयक अहवालात म्हटले आहे. ही वाढ ओल्या आणि कोरडय़ा दुष्काळाच्या हिंदोळ्यांवर जगाला पराकोटीचे विध्वंसक रूप दाखवेलच, शिवाय अन्नसाखळीही पूर्णत: उद्ध्वस्त करू शकेल, असे इशारे शास्त्रज्ञांनी वारंवार दिले आहेत.

ऑस्ट्रेलिया हा जगाच्या दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा खंडप्राय देश. खनिजसंपन्न अशा या देशाची अर्थव्यवस्थाच या भूगर्भातील विविधरंगी ‘सोन्या’वर अवलंबून आहे. कोळसा हे त्यांपैकीच एक. त्या देशाच्या एकूण गरजेच्या ८० टक्के ऊर्जानिर्मिती त्यापासूनच होते. परंतु त्यातून हरितवायूंचे उत्सर्जन वाढून तापमानातही भर पडते. ऑस्ट्रेलियातील वनक्षेत्रांवर वारंवार लागणाऱ्या वणव्यांमागेही हेच प्रमुख कारण सांगितले जाते. २०१९ मध्ये या देशाने अभूतपूर्व वणवा अनुभवला. त्यात एक अब्जांहून अधिक पक्षी-प्राणी मृत्युमुखी पडले. आधीच एक दशकाहून अधिक काळ सातत्याने अनुभवावा लागणारा दुष्काळ व कोरडे हवामान यांत या वणव्याची भर पडली. वणव्यांमुळे निर्माण होणारे हरितवायू शोषून घेण्याची ऑस्ट्रेलियातील वनक्षेत्राची क्षमताही यानंतर तोकडी पडणार आहे. या देशाच्या तापमानवाढीला त्यातून आणखी एक कायमस्वरूपी निमित्त मिळाले आहे.

जगाच्या साडेसात अब्जांहून अधिक लोकसंख्येपैकी सुमारे ७० लाख लोकसंख्या दरवर्षी वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडते. त्यांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजे सुमारे ४० लाख लोकसंख्या ही फक्त आशिया-पॅसिफिक प्रदेशांतील आहे. वायुप्रदूषणाची अशी टोकाची किंमत मोजावी लागणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. आपल्या देशातील २५ लाख नागरिक २०१८ मध्ये या कारणास्तव मृत्युमुखी पडले आहेत.

पर्यावरणीय साखळीतील एका घटकाने जरी आपला तोल गमावला, तरी त्याचा संपूर्ण साखळीवरच कसा विपरीत परिणाम होतो, याची डोळ्यांत अंजन घालणारी ही काही उदाहरणे. भूतकाळातून धडेही न घेता येणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेताना तोकडय़ा पडणाऱ्या फक्त वर्तमानात जगण्याच्या लघुदृष्टीचा हा परिणाम. त्यावर उपाय माहिती असूनही कोणा एकटय़ा-दुकटय़ाला तो प्रत्यक्षात आणता येणे सोपे नाही. परंतु त्या दिशेने टाकण्यासाठीच्या प्रत्येक पावलावर आपली साथ राहील, याची निश्चिती आपण नक्की करू शकतो.

प्रदूषणकारी खनिज इंधने

खनिज इंधनांवरील तंत्रप्रगत प्रक्रियांमुळे आम्ही आपल्यापर्यंत पर्यावरणस्नेही इंधन कसे पोहोचवत आहोत, अशा चकचकीत जाहिराती आपण अलीकडे वारंवार पाहतो. कधी त्याला भुलतोही. परंतु हे तेल व वायुरूपी इंधनच पर्यावरणविषयक आणीबाणीच्या स्थितीकडे आपल्याला ढकलण्यास कारणीभूत आहे. खनिज इंधनांचा स्रोतच मुळी भूगर्भात गाडल्या गेलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये आहे. त्यांमुळे त्यांना जीवाश्म इंधने असेही म्हणतात. ही इंधने ६५ कोटी वर्षांपेक्षा पूर्वीपासून असलेल्या जीवांपासून निर्माण झालेली आहेत. समुद्र आणि सागरांच्या तळांशी असलेले सूक्ष्मजीव स्वरूपातील हे वनस्पती व प्राणी यांचे समूह (ज्यांना प्लवक; इंग्रजीमध्ये प्लँक्टन असेही म्हणतात) ऑक्सिजनअभावी गाडले गेले होते. या प्लवकांच्या विनॉक्सी अपघटन (अनएरोबिक डिकम्पोझिशन) प्रक्रियेतून इंधननिर्मिती होते. त्यांमध्ये कार्बन हा मुख्य घटक असतो. कोळसा, तेल आणि वायू या रूपांमध्ये हे इंधन आपल्याला उपलब्ध होते. त्यांच्या निर्मिती साखळीतील कोणताही स्रोत किंवा अंतिम ऊर्जारूप हे फेर वापरक्षम नाही. परंतु ही खनिज इंधनेच संपूर्ण जगाच्या एकूण गरजेच्या ८० टक्के इंधनाचा स्रोत आहेत. शिवाय प्लास्टिक, पोलाद यांसारख्या आपल्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठीही खनिज इंधनांचा वापर होतो.

खनिज इंधनाच्या प्रज्वलनात त्यांमध्ये साठलेल्या कार्बनचा हवेमध्ये उत्सर्ग होतो. जागतिक तापमानबदलाविषयी स्थापन झालेल्या आंतरशासकीय समितीने अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार, २०१८ मध्ये जगभर झालेल्या एकूण कार्बन उत्सर्गापैकी ८९ टक्के एवढय़ा प्रमाणात फक्त खनिज इंधन आणि उद्योग क्षेत्र हे कारणीभूत आहेत. त्यातही खनिज तेलाच्या प्रज्वलनातून जगाच्या एकूण कार्बन उत्सर्गापैकी एकतृतीयांश उत्सर्ग होतो. कोळसा त्याहून अधिक, तर नैसर्गिक वायू त्याहून कमी प्रमाणात कार्बन उत्सर्ग करतो. जागतिक तापमानवाढ ही औद्योगिकीकरणपूर्व परिस्थितीपेक्षा १.५ अंश सेल्सिअस एवढीच जास्त स्तरापर्यंत राहायची असेल, तर पुढील ११ वर्षांत- म्हणजे २०३० पर्यंत खनिज इंधनांपासून होणारा कार्बन उत्सर्ग हा निम्म्यापर्यंत कमी करायला हवा, असेही या समितीने म्हटले आहे. परंतु त्यासाठी खनिज तेलांचा वापरही निम्म्यावर येणे गरजेचे आहे आणि ते कसे साध्य करावे, हा धोरणकर्त्यांपुढील मोठा पेच आहे.

भारतातही दरवर्षी २.२९ अब्ज टन एवढय़ा प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचा उत्सर्ग होतो. त्यांमध्ये वाहतूक क्षेत्राचा वाटा २० ते २२ टक्के एवढा आहे. भारतातील हरितगृह वायूंच्या उत्सर्गातीलही ५८ टक्के वाटा ऊर्जा क्षेत्राचा आणि १० टक्के वाटा वाहतूक क्षेत्राचा आहे. याखेरीज, शेती (१९ टक्के) आणि उद्योग (१० टक्के) ही क्षेत्रे हरितगृह वायूंच्या उत्सर्गाला कारणीभूत ठरतात.

अक्षय व शाश्वत जैवइंधने

या पार्श्वभूमीवर जीवभारापासून तयार होणाऱ्या जैवइंधनांचा वापर वाढवणे हा अक्षय आणि शाश्वत पर्याय म्हणून पुढे येत आहे. त्यांचे ज्वलन हे खनिज इंधनांसारखे प्रदूषणकारी नाही. जैवइंधनांपासूनही कार्बन डायऑक्साइडचा उत्सर्ग होतो, परंतु त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी असते. उदाहरणच द्यायचे, तर पेट्रोलियम डिझेलच्या तुलनेत बायोडिझेलमुळे उत्सर्ग होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ७८.५ टक्क्यांनी कमी आहे. शिवाय, जैवइंधनांसाठीच्या कच्च्या मालाच्या, म्हणजे जीवभाराच्या उत्पादनप्रक्रियेतही कार्बन शोषून घेतला जातो. खनिज इंधनाची उत्पादन प्रक्रियाही पर्यावरणदृष्टय़ा कशी धोकादायक ठरू शकते, हे २०१० मध्ये मेक्सिकोच्या आखातात भूगर्भातील तेलविहिरीचा स्फोट झाल्यानंतर अवघ्या जगाने अनुभवले होते. जीवभार किंवा जैवइंधन उत्पादन प्रक्रियेमध्ये तसा कोणताच धोका नाही, ही त्याची आणखी एक जमेची बाजू आहे. अर्थात, जीवभार उत्पादनाची प्रक्रिया हादेखील यातील महत्त्वाचा घटक आहे; कारण नत्रयुक्त खतांच्या वापरातून उत्पादित होणाऱ्या जीवभारापासून नायट्रस ऑक्साइड या कार्बन डायऑक्साइडपेक्षाही हानिकारक हरितगृह वायूची निर्मिती होते.

जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) २०२० साठी तयार केलेला जगापुढील धोक्यांविषयीचा अहवाल हा जैवइंधनांकडे वळण्यासाठी जगाला आणखी उद्युक्त करणारा असा आहे. त्यानुसार सध्या जगापुढे जे दहा प्रमुख धोके आहेत, त्यांमध्ये टोकाची हवामानस्थिती, पर्यावरणरक्षणातील अपयश, नैसर्गिक आपत्ती, जैवविविधतेची हानी, पर्यावरणविषयक मानवनिर्मित आपत्ती आणि पाणीटंचाई हे पहिले सहा धोके पर्यावरणाशी निगडित आहेत. खनिज इंधनांचा वाढता वापर हा या प्रत्येक धोक्याची तीव्रता आणखी वाढवणारा ठरणार आहे. भारत सरकारने हा धोका ओळखून २०१८ मध्येच जैवइंधनांचा वापर वाढवण्याच्या धोरणाचा पुरस्कार केला आहे. त्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने ठोस आखणी व कार्यवाही करण्याएवढी दुसरी कोणती उत्तम भेट आपण पुढच्या पिढय़ांना देऊ शकू?

(लेखक ‘प्राज इंडस्ट्रीज्’चे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)