03 December 2020

News Flash

कांदा शेती नियोजनाची गरज!

यंदा कांदा बियाण्यांचा प्रचंड तुटवडा होता.

(संग्रहित छायाचित्र)

अनिकेत साठे

सतत वाढलेल्या नाहीतर कोसळलेल्या दरामुळे कांदा हे पीक कायम चर्चेत असते. दराच्या चढउतारामुळे कांद्याची एकूण शेतीच अशाश्वत बनली आहे. पण कांदा शेती देखील किफायतशीर होऊ शकते. त्यासाठी बदलत्या परिस्थितीत नव्याने नियोजन करण्याची गरज आहे.

कांदा हे संवेदनशील पीक आहे. वातावरण थोडेफार बदलले तरी रोपे खराब होणे, रोगांचा प्रार्दुभाव असे प्रकार घडतात. हवामानातील बदलांमुळे नुकसान होते. महागडे बियाणे, खते-औषधांचा भार, मजुरी आदींमुळे कांद्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. मात्र, त्यास मिळणारा भाव अस्थिर असतो. अनेकदा उत्पादन खर्च देखील निघत नाही. सध्या ‘भाव’ खाणाऱ्या कांद्याची चर्चा होत असली, तरी या पिकाचे आर्थिक समीकरण काही केल्या जमत नाही. ही शेती किफायतशीर होऊ शकते. त्यासाठी बदलत्या परिस्थितीत नव्याने नियोजन करण्याची गरज आहे.

यंदा कांदा बियाण्यांचा प्रचंड तुटवडा होता. त्यासाठी तिप्पट, चारपट किंमत मोजावी लागली. राज्यात अनेक शेतकरी स्वत: बियाणे तयार करतात. या वेळी तसे वैयक्तिक बियाणे फारसे नव्हते. कारण, गेल्या वर्षी कांद्याचे भाव उंचावले होते. इतके महाग कांदे बियाण्यांसाठी का वापरायचे, हा विचार करून बहुतेकांनी आपल्याकडील कांदे विकून टाकले. याचा परिणाम बाजारात बियाण्यांची मागणी प्रचंड वाढली. पुरवठय़ात तफावत होऊन दर गगनाला भिडले. काळाबाजार झाला. महागडे बियाणे टाकूनही सततच्या पावसाने रोपांचे नुकसान झाले. बुरशीचा प्रादुर्भाव वाढला. रोपे वाहून गेली. बनावट बियाण्यांमुळे हात पोळले. साधारणपणे दोन किलो बियाण्यात एक एकरवर लागवड होणे अपेक्षित असते. अनेकांनी चार किलो बियाणे टाकले. याचा अर्थ बियाण्यांची उत्पादकता कमी होती. निवडीत चूक झाली किंवा बनावट बियाणे त्यांच्या हाती पडले. पाऊस परतण्याची प्रतीक्षा न करता काहींनी बियाणे टाकले. पावसाने सपाट वाफ्यांमधील रोपांचे अधिक नुकसान झाले. गादी वाफे, सऱ्यांवर रोपे टाकणाऱ्यांचे नुकसान झाले नाही. तेथून पावसाच्या पाण्याचा निचरा झाला. रोपे नैसर्गिक आपत्तीच्या कचाटय़ात सापडू नये, याचा विचार करावा लागणार आहे.

पाऊस जास्त झाला, की पिकांसाठी पोषक ठरणारा जमिनीचा वरचा थर वाहून जातो. जमिनी अशक्त होतात. या वर्षी सततच्या पावसाने ते वारंवार घडले. पिकावर आवश्यक त्या फवारणीबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे सांगतात. सध्या बाजारभाव पाहून अधिकाधिक क्षेत्रावर कांदा लागवडीची धडपड होते. ती अयोग्य आहे. शेतकऱ्यांनी जितके भांडवल हाती आहे, त्यात शक्य तेवढय़ाच क्षेत्रात लागवड करायला हवी. एक एकरमधून जास्तीतजास्त कांदा कसा काढता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. यासाठी स्वत:चा अनुभव, तांत्रिक मार्गदर्शनाची जोड देऊन पीक संरक्षण, खतांचा योग्य वापर करून नुकसानीची भरपाई करता येईल, याकडे डॉ. भोंडे लक्ष वेधतात.

बदलत्या परिस्थितीत हवामानावर आधारित लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंतच्या पद्धतीत बदल करणे अनिवार्य ठरले आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढवावा लागेल. पिकाचा कालावधी कमी करणे हा पर्याय उपयुक्त आहे. रोपे न लावता पेरणीद्वारे कांदा लागवड करता येईल. यामुळे पिकांचा ३० ते ३५ दिवसांनी कालावधी कमी होतो. सर्वसाधारणपणे सध्या रोपे तयार करण्यास लागणारा काळ आणि नंतर ती लागवड करून कांदा हाती येईपर्यंत लागणारा कालावधी यांत एकूण १५० ते १६० दिवस जातात. बियाणे पेरणी करून लागवड केल्यास १२० ते १२५ दिवसात कांदा निघू शकतो. त्यासाठी पेरणी यंत्र, बियाण्यांवर प्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे हे बदल करावे लागतील. राजस्थान, गुजरातमध्ये उन्हाळ्यात रोपे टाकून छोटे कांदे (कांदी) तयार करण्याची पद्धत प्रचलित आहे. पावसाचा जोर कमी झाला की, त्याची लागवड केली जाते. दोन महिन्यांत कांदा मोठा होऊन विक्रीला येतो. ही पद्धत स्वीकारता येईल. या आधी प्रायोगिक तत्त्वावर राज्यात ती राबविली गेली होती. मात्र, आर्थिकदृष्टय़ा खर्चिक वाटल्याने कोणी तिचा विचार केला नाही. सध्याची स्थिती लक्षात घेतल्यास लागवड पद्धतीत तिचे अनुकरण महत्त्वाचे ठरणार आहे.

या वर्षी कांदा महाग असल्याने पुढील वर्षी बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. महागडय़ा कांद्याची बियाण्यांसाठी कोणी लागवड करणार नाही. एक एकरमध्ये बियाणे तयार करण्यसाठी १२ क्विंटल कांदे लागतात. त्यातून एकरी दोन क्विंटल बियाणे तयार होते. ते चार क्विंटलपर्यंत कसे काढता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गेल्या वर्षी एकरी एक ते दीड क्विंटलपर्यंतच बियाणे निघाले होते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. शासनाने आपल्या रोपवाटिकांमध्ये बियाणे तयार करावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देऊन बियाण्यांची उपलब्धता वाढविण्याचा पर्याय तज्ज्ञ सुचवितात. कांदा मिश्र पीक म्हणून घेता येत नसले, तरी आंतरपीक म्हणून घेता येईल. प्रारंभीच्या काळात उसामध्ये कांदा लागवड करता येईल, तसेच हळदीच्या पिकातही लागवड करता येईल. कर्नाटकमध्ये मिरचीच्या रांगामधील जागेत कांदा लागवड केली जाते. त्या पिकाची वाढ होईपर्यंत कांदा निघून जातो. नव्याने लागवड झालेल्या डाळिंब, पेरू, द्राक्ष बागांमधील मोकळ्या जागेत कांदा लागवड करता येईल, असे जाणकार सांगतात. सध्या परदेशातून आयात केलेल्या कांद्याचा भाव कमी आहे. त्याला चव नसल्याने मागणी नसते, असा आजवरचा अनुभव. तुलनेत स्वस्त असणाऱ्या परदेशी कांद्याचा बियाण्यांसाठी कोणी वापर करू नये, असा इशारा तज्ज्ञ देतात. त्या देशातील आणि आपले स्थानिक वातावरण भिन्न आहे. यापूर्वी लागवडीचे तसे प्रयत्न फसल्याची उदाहरणे आहेत.

साठवणुकीवेळी दक्षता हवी

कांद्याची चाळीत साठवणूक केली जाते. साठवणुकीत कांदे मोठय़ा प्रमाणात खराब होतात. परिणामी, विपुल उत्पादन होऊनही तुटवडा निर्माण होतो. हवामानातील बदल आणि जमिनीच्या आरोग्याचा तो परिपाक आहे. अलीकडच्या काळात कांदा पिकासाठी शेणखताचा वापर कमी होऊन रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे कांद्याची साठवणूकक्षमता कमी झाली. ज्यांना कांद्याची साठवणूक करायची आहे, त्यांना नत्रयुक्त, रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागेल. सेंद्रिय, जैविक खतांचा वापर वाढवून जमिनी सशक्त करण्याचा मुद्दा तज्ज्ञ अधोरेखीत करतात. कांदा काढणीवेळी पाऊस असल्यास बुरशी, जिवाणूंचा प्रार्दुभाव होण्याचा धोका असतो. तो रोखण्यासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशक, जिवाणूनाशकाची फवारणी करायला हवी. कांदा चाळीचे निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. चाळीत हवा खेळती राहण्यासाठी योग्य रचना, बदल करावे लागतील. सध्या पारंपरिक पद्धतीच्या चाळीत कांदा साठवणूक होते. पूर्वी या चाळीत कांदे खराब होत नव्हते. हवामान बदलामुळे आता ते खराब होतात. त्यामुळे पारंपरिक चाळीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनुसार बदल करावे लागतील. या बाबत तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.

aniket.sathe@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:11 am

Web Title: article on onion farming needs planning abn 97
Next Stories
1 उसावर तांबेराचे संकट!
2 राज्यहिताची जमीन‘मुक्ती’..
3 ‘उमेद’ वाढवा!
Just Now!
X