नरेन्द्र चपळगावकर

साथ येते, माणसे हलतात, इथली तिथे जातात.. साथीच्या काळात विरंगुळाही शोधतात! पण वस्तू हव्या असणे, रोजचे पीठ-मीठ काही चुकवता येत नाही. हेच १९४० च्या दशकातल्या ‘प्लेगपाहुण्या’पासून ते आजच्या करोनापर्यंत सुरू आहे. हे दोन्ही नकोसे पाहुणे, टाळता येतातही.. पण असे किती काळ, ही चिंता मात्र नकोशी असते..

ज्याला त्या वेळी औषध उपलब्ध नव्हते अशा एका रोगाची मोठी साथ माझ्या लहानपणी दर दोन-तीन वर्षांनी येत असे. गाठीच्या प्लेगला त्या वेळी प्रतिबंधक किंवा निवारक काहीच औषध नसे. गावामध्ये घरात उंदीर पडू लागले म्हणजे प्लेगची साथ आली आहे, हे लोकांच्या लक्षात येई.

मग काय करायचे?

मेलेले ते शक्य तेवढे उंदीर रॉकेल टाकून जाळून टाकायचे. अगदीच आवश्यक तेवढे सामान गोळा करून घराच्या बाहेर निघायचे आणि वाडय़ाला कुलूप लावायचे. एवढेच लोकांना करता येई. त्या वेळच्या लोकलफंड (शहर  पालिका) खात्याकडून शहरातल्या नागरिकांना कसल्याच सूचना येत नसत. ज्यांना शक्य होते ते नागरिकच आपापली व्यवस्था करून घेत.

बीड गावाच्या बाहेर एक-दोन किलोमीटर अंतरावर परिचयाच्या एखाद्या शेतकऱ्याचे शेत रिकामे असेल तर त्याच्या परवानगीने वीस-पंचवीस लोकांच्या पत्र्याच्या कोप्या उभ्या राहत आणि त्यात लोक राहायला सुरुवात करीत. अशा पाच-सात वस्त्या गावाच्या पश्चिमेकडे उभ्या राहत. प्लेगची साथ साधारण उन्हाळ्यातच येई. त्या वेळी शेतातील पिके काढली गेलेली असत. शेतकऱ्याचीही अडचण होत नसे. त्याच्या शेतावर राहायला येणाऱ्यांत वकीलही बहुधा असत. तीन आडवे पत्रे एकावर एक गुंतवून उभे केले म्हणजे भिंत तयार होई. कोप्याच्या पत्र्यावर गवत अंथरून त्यांचे तापणे थोडेसे कमी करता येई.

कॅम्पातला विरंगुळा..

अशा तात्पुरत्या वस्त्यांना कॅम्प म्हणत. गावाच्या पश्चिमेला न्यायालय आणि सरकारी कार्यालये होती. कॅम्पवरून वकील आणि कर्मचारी आपापल्या कामाला दिवसभर जात. वाहनाचा मुद्दाच नव्हता. सगळेच एक-दीड किलोमीटरच्या आत असायचे. रात्रीच्या उकाडय़ाला मात्र इलाज नसे. पुरुष मंडळींनी थोडासा विरंगुळा शोधला होता. जेवणखाण झाल्यावर वर्तुळाकार कोप्यांच्या मध्यभागी सोडलेल्या जागेवर थोडे साफसूफ करून घेऊन एखादी मोठी सतरंजी अंथरली जाई. तिच्या मध्यभागी घासलेटचा रिकामा डबा एखाद्या स्टुलासारखा पालथा ठेवून त्यावर पेट्रोमॅक्स लावून ठेवला जाई. हळूहळू वीस-पंचवीस लोक जमत. कधी पत्त्याचा डाव रंगे. एखादा दिवस आमच्याच वस्तीत राहायला आलेले गणपतराव पत्की मास्तर जादूचे प्रयोग करून दाखवत. तर कधी एखादा होतकरू गायक आपल्या कलेचा नमुना सादर करी. गाणे शास्त्रोक्त वगरे अजिबात नसे. ‘कोणता मानू चंद्रमा’ यांसारखी मराठवाडय़ात पोहोचलेली काही भावगीते म्हटली जात. त्यात लक्ष्मीकांतराव हेडक्वॉटर हेच प्रमुख असत. (हेडक्वॉटर हे त्यांचे आडनाव नव्हते. जिल्ह्य़ाच्या मुख्य ठिकाणी त्यांची पोलीस प्रॉसिक्युटरची नोकरी असल्यामुळे त्यांना हेडक्वॉटर हे विशेषण चिकटले होते.)

काय काय लागू शकते हे कितीही आठवून त्या वस्तू बरोबर आणल्या तरी अचानक काही लागे व त्यासाठी गावात जावेच लागे. दळणाच्या गिरण्या गावातच होत्या. जास्त पीठ कॅम्पवर साठवण्याची सोय नव्हती. आणलेले संपले की, दळण आणायला कुणी तरी जावे लागे. शाळेत असलेली माझ्यासारखी मुले मग दोन-तीन शेरांचे दळण गिरणीत जाऊन दळून घेत आणि कॅम्पवर घरी आणत. दळणाचा दर तेव्हा शेरामागे दोन आणे असा असावा. मी दळण आणण्यासारखे काम केले तरी आजीला कौतुक वाटे.

स्थानांतर ते पुन्हा झाडलोट..

प्लेग साधारण दोन-तीन महिने टिके. स्थानांतर हाच त्याला उपलब्ध उपाय होता. प्रतिजैविके निघाली नव्हती. प्लेगच्या काळात उन्हाळ्याची सुटी असे आणि शाळा थोडय़ा उशिरा सुरू होत. दिवसभर तापलेल्या पत्र्यात राहावयाचे ही शिक्षा घरातल्या स्त्रियांप्रमाणेच शाळेत जाणाऱ्या मुलांनासुद्धा होई. कोपीवर राहत असताना एखाद्या वस्तूची मधेच गरज लागे. मग बाबा (माझे चुलते) गावात जात. वाडय़ाचे कुलूप उघडून घरातली ती वस्तू घेत आणि परत कोपीवर येत. हातपाय धुणे वगरे तशा दुय्यमच गोष्टी होत्या. घराचे निर्जंतुकीकरण वगरे तर ऐकण्यातच नव्हते. गावाबाहेर राहायला न जाता गावातच राहिलेल्या एक-दोन माणसांचा आणि कधी कोपीवर राहायला आलेल्यांपैकीसुद्धा एखाद्या माणसाचा मृत्यू होई. फारसे लोक न जमवता त्यांचा अंत्यविधी उरकला जाई.

प्लेगची ही छायाचित्रे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरची आहेत. सन १८९७ पर्यंत ‘इनॉक्युलेशन’चा उपाय सुरू झालेला होता, असे वरच्या छायाचित्रातून दिसते. अन्य दोन छायाचित्रे तत्कालीन भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागांतील ‘प्लेग रुग्णालयां’ची.

 

काही वेळा बाजारातली एखादी वस्तू लागे. बॅटरीचे सेल्स, फाऊंटन पेन किंवा कागद अशा वस्तू पेठेतल्या नेमूसिंगाच्या दुकानात मिळत. गावातले हे स्टेशनरीचे हे मोठे दुकान माडीवर होते म्हणून त्याला नेमूसिंगाची माडी या नावाने ओळखले जाई. प्लेगची साथ संपली की बाहेर राहावयास गेलेली मंडळी हळूहळू गावात परत येत. वाडे उघडून झाडलोट करून परत राहण्याला सुरुवात करीत.

भुजंगराव कुलकर्णीच्या आठवणी..

प्लेगची अशी साथ दोन-तीन वर्षांनी एकदा येई. शेवटची साथ साधारण १९४९ च्या सुमाराला स्वातंत्र्यानंतर आली होती. त्यानंतर मात्र प्लेग अदृश्य झाला. प्लेगमध्ये गावाबाहेर राहण्याचा बराचसा उपयोग होई. प्राणहानी थोडी होई. त्याआधीची एक साथ माझ्या जन्माच्याही फार अगोदर १९१८ साली मराठवाडय़ातही येऊन गेली होती. इन्फ्ल्युएन्झाच्या या देशव्यापी साथीने फार माणसे दगावली. जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झालेले आणि शंभरी ओलांडून गेलेले भुजंगराव कुलकर्णी मला सांगत होते की, इनफ्ल्युएन्झाच्या साथीने बीड जिल्ह्य़ात इतकी माणसे मृत्यू पावली की, एखाद्या तालुक्यातल्या लोकसंख्येएवढीच संपूर्ण जिल्ह्य़ाची लोकसंख्या राहिली. काही लाख लोकांचा आमच्या जिल्ह्य़ातच मृत्यू झाला होता. सरकारी महसूल खात्यातल्या जुन्या नोंदी त्यांच्या अजून लक्षात आहेत.

लशीचे प्रयोग की ‘प्लाझ्मा’?

प्लेगला त्या वेळी प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे लस टोचण्याचा सार्वत्रिक उपक्रम होत नसे. सहज मनात आले की, लोकमान्य टिळकांच्या काळात येऊन गेलेल्या प्लेगवर पुण्यात लस टोचण्यावरून झालेल्या वादंगाची वर्णने आपण वाचतो. ही लस कोणती आणि ती मग १९४०-५० च्या काळात का उपलब्ध झाली नाही? नरसिंह चिंतामण केळकरांनी लिहिलेल्या टिळक चरित्राच्या दुसऱ्या भागात त्याचा खुलासा होतो. प्लेग आला म्हणजे गावाचा काही भाग क्वारंटाइन करून ठेवला जाई. इनॉक्युलेशन म्हणजे प्लेगची लस टोचणे ही गोष्ट सुरू झाली होती; पण ती अद्याप प्रयोगावस्थेत होती. आणखी एक लक्षणीय गोष्ट टिळकांनीच नोंदलेली आहे. प्लेगच्या लशीबरोबरच ‘शिजलेला मांसरस थोडासा शरीरात घालावा लागतो’ अशी नोंद करून त्यालाही आपला विरोध नाही, फक्त सक्तीला आहे, असे टिळकांनी म्हटले आहे. मांसरस शरीरात लसीबरोबर घालणे ही गोष्ट कदाचित आजच्या प्लाझ्मा थेरपीची पूर्वज असावी. ते अर्थात तज्ज्ञच सांगू शकतील.

आजच्या करोनासारखे प्लेगवरही तेव्हा निश्चित औषध नव्हते. दोन-तीन महिन्यांत आपले चंबूगवाळे आटोपून प्लेगपाहुणा परत जायचा. करोनाचा मुक्काम अजून किती दिवस आहे, हे मात्र कळत नाही. संकट किती काळ आहे, याची अनिश्चितता हा सर्वात जास्त चिंतेचा भाग असतो.

(लेखक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असून महाराष्ट्राच्या गतकाळाचे साक्षेपी अभ्यासक आहेत. )