नंदा खरे

दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा आहे, पण अन्य शहरांचीही हवा धूळमय आणि धुरकट होत राहाणे, पाऊस लांबणे अशा हळूहळू अनर्थकारक ठरणाऱ्या घडामोडी कशामुळे होतात? याचे एक उत्तर ‘आशियाई तपकिरी ढगा’त आहे. मात्र उपाय या ढगावर नव्हे, अन्य प्रकारे करायचा आहे..

भारतीय उपखंडात प्रेमी जोडप्यांना एकमेकांशी मनोमन, उराउरी भेटण्यात खूप अडचणी येतात. कधी नायक ‘तुझे चांद के बहाने देखूं’ म्हणत असतानाच नायिका मात्र ‘चांद बरी छुप जाने दे’ म्हणत असते. तो चंद्रही नको तेव्हा ‘बदरी हटा के’वर ‘छुप के से’ झाँकत असतो. सगळे त्रास सहन करून, अडचणी ओलांडून कायदेशीर लग्नबिग्न करूनही प्रश्न सुटत नाही. कधी ‘आधी रात को खनक गया मेरा कंगना’ होतं, तर कधी बेकरार होऊन ‘बाजे पायल छुन छुन’ होतं. वर ‘जाग रही है सांस-ननदिया’ असतातच, सीसीटीव्ही नजरा रोखून! पण तरी हे सगळे अडथळे घातक नसतात, नुसतेच रोमांचकारी असतात. पण आपण माणसांनी आपल्या बेबंद वागणुकीने वेगळाच धोका घडवला आहे, ‘ना बाबा ना बाबा, पिछवाडे बुढ्ढा खांसता’!

म्हातारा उगीच नाही खोकत. पाकिस्तानपासून चीनपर्यंत सगळा दक्षिण आशिया हवेत धूर सोडत असतो. त्या धुराने वातावरण धुरकट होते. भारतीय महासागराच्या उत्तर भागावर या धुराचा एक प्रचंड तपकिरी ढग घडतो. उपग्रहांवरून पृथ्वीचे फोटो काढताना तो स्पष्ट दिसतो. त्याला पूर्वी ‘एशियन हेझ’ (Asian haze) म्हणत असत. आजकाल ‘एशियन ब्राऊन क्लाऊड’ (Asian Brown Cloud) किंवा ‘एबीसी’ म्हणतात.

पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, सगळी ईस्ट इंडिज बेटे, दक्षिण चीन; हे सगळे गरीब, ‘विकसनशील’ देश. लाकूड आणि कोळशावर अन्न शिजवतात. पीक निघाल्यावर शेतात उरलेला कूडा-कचरा जाळतात. शेतावर ‘राब’ करतात. आजकाल डिझेल-पेट्रोल वाहने वापरतात, कोळसा-डिझेल रेल्वेगाडय़ा वापरतात. वीजही वापरतात, ती मुख्यत कोळसा जाळून तयार करतात. यांतल्या बऱ्याच क्रियांमध्ये इंधन पूर्ण जळत नाही. काही भाग तरी धूळकण-धूरकण या रूपांत हवेत सोडला जातो. या धुळीत न जळलेला भाग असतो, जळूच न शकणारा भाग असतो आणि त्यांच्याभोवती हवेतली वाफ जमा होत असते. एरवी दिसूही न शकणाऱ्या कणांना ही वाफ दृश्य करत असते.

पावसाळ्यात हा धूर, ही धूळ धुतली जाते आणि जमिनीवर पडते. पण नोव्हेंबर ते एप्रिल मात्र हा ढग वाढतच जातो. दाटही होत जातो. असं काही घडतं हे गेली पंचविसेक वर्ष माहीत आहे, ‘एबीसी’ हे नाव मात्र २००२ साली दिलं गेलं. होतं काय या ढगामुळे?

एक म्हणजे बुढ्ढे खांसू लागतात! आता नेमकं किती प्रदूषण श्वसनाचे किती रोगी उत्पन्न करतं हे सांगता येत नाही; पण दक्षिण आशियात श्वसनाचे रोगी इतर जगातल्यापेक्षा जास्त प्रमाणात भेटतात, हे मात्र नक्की. २००२ सालच्या एका अंदाजानुसार वर्षांला २० लक्ष माणसं या तपकिरी ढगामुळे मरतात.

एखादा अपघात होतो आणि त्यात माणसं मरतात. मृत्यूचं कारण आणि मृतांची संख्या स्पष्ट असतात. हवेतली धूळ ( किंवा औपचारिक भाषेत ‘तरंगते कणरूप पदार्थ’- इंग्रजीत ‘सस्पेन्डेड पार्टिक्युलेट मॅटर’, लघुरूपात ‘एसपीएम’) किती माणसं मारते हे मात्र थेट ‘हे कारण, आणि हा परिणाम’ असं सांगता येत नाही. काही टक्केवाऱ्या बदलतात, एवढंच. त्यामुळे ‘काही होत नाही!’ म्हणणाऱ्यांचं फावतं. हे ‘नाकारणारे’, मानसशास्त्राच्या भाषेत ‘डिनायर्स’ बहुतेकवेळी कोणाच्या तरी तर्फे बोलत असतात. गेल्या उन्हाळ्यात नागपूरच्या काही डॉक्टरांनी ‘बांधकाम जास्त होत असल्याने दमा व इतर श्वसनाचे रोग वाढले आहेत’ असं म्हटलं. अर्थातच याचा सांधा मेट्रो, सिमेंटचे रस्ते वगरेंशी जोडला जात नाही. विकासविरोधी (= देशद्रोही!) कोण म्हणवून घेईल स्वतला! फार काळ सत्य नाकारता येत नाही, पण नकारघंटेच्या काळात प्रश्नांना उत्तरेही शोधली जात नाहीत. अशाच उपेक्षेमुळे आज आशियाई तपकिरी ढग हा काटय़ाचा नायटा घडला आहे.

पण माणसांच्या आरोग्यावरचे परिणाम सौम्य म्हणावे असे परिणाम भारतीय उपखंड आणि एकूण दक्षिण आशिया भोगतो आहे. कारण आहे आशियाई तपकिरी ढग. हे टप्प्याटप्प्यानं गेली साठसत्तर वर्ष समजतं आहे. जरा शाळकरी भूगोल आठवून हवामानशास्त्रातली एक भानगड समजून घेऊ या.

दोन ध्रुवांपासून सारख्या अंतरावर असलेल्या जागांना ‘शून्य अक्षांश’ म्हणतो आपण. हे झालं पृथ्वीच्या फिरण्याच्या अक्षाच्या ध्रुवांबद्दल. पण दोन्ही ध्रुव थंडही असतात, आणि त्यांच्यापासून दूर, एक गरम कंबरपट्टाही पृथ्वीला लाभलेला आहे. त्याला ‘थर्मल इक्वेटर’  किंवा ‘आयटीसीझेड’ (इंटर-ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन) म्हणतात. त्याच्यापासून उत्तरेला जा की दक्षिणेला, तापमान कमीच होत जातं. आता एखादा जमिनीचा भाग शेजारच्या भागापेक्षा गरम असला, तर गरम भागावरची हवा जमिनीपासून उंच जाते, आणि शेजारच्या थंड भागांवरची हवा गरम भागाकडे जाते. म्हणजे  ‘आयटीसीझेड’कडे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून वारे वाहू लागतात. इकडे वर गेलेली हवा थंड पडून तिच्यातली पाण्याची वाफ पावसाच्या रूपानं जमिनीवर पडते. यामुळे ‘आयटीसीझेड’वर नेहमी पाऊस पडतो. जवळपास रोज, थोडा थोडा का होईना पाऊस पडतो.

पण हा पृथ्वीचा गरम कंबरपट्टा, हा ‘आयटीसीझेड’ ना नेमका विषुववृत्तावर असतो, ना वर्षभर एका जागी राहतो. भारतीय उपखंडात तर तो पावसाळ्याच्या सुरुवातीला भारताच्या दक्षिण टोकापासून सरकत वर हिमालयापर्यंत जातो, आणि पाऊसकाळ संपताना पुन्हा हिमालयापासून खाली सरकत भारताची जमीन सोडून जातो. भारतातला पावसाळा हा अशा तऱ्हेनं भारत ‘आयटीसीझेड’खाली असण्याचा काळ असतो. आणि आशियाई तपकिरी ढग या ‘आयटीसीझेड’च्या प्रवासात अडथळे आणतो!

तो ढग सूर्यापासून येणारी ऊर्जा वरच्या वर टोलवतो. त्याखालची जमीन पुरेशी तापतच नाही, आणि ‘आयटीसीझेड’ भारतावर अवतरणं बेभरवशाचं होतं! मौसमी पाऊस सहज एकदोन आठवडे अडखळतो, आणि याच काळात उत्तर ऑस्ट्रेलिया, ईस्ट इंडिज वगैरे भागांत पाऊस पडतो. आपलं कूडा-कचरा जाळणं, मर्यादेबाहेर वाहनं उडवणं, दिवसरात्र दिवे जाळणं, लाकूड-कोळशावर स्वयंपाक करणं या साऱ्यानं आपल्या हक्काचा पाऊस रुसून इतरत्र जातो!

उलट आपण आपला कचरा ‘आंबवून’, त्याचं कम्पोस्टिंग करून स्वयंपाकाचा वायू आणि खत बनवलं, कोळसाधारित वीज केंद्रं जास्त कार्यक्षम केली, वाहन-वापर कमी केला, निर्थक ‘विकास कामं’ थांबवली, एकूण हवेत ना धूळ फार उडू दिली, ना धूर फार सोडला तर.. आशियाई तपकिरी ढग रोडावेल. तो पांढराफटक पडेल. दमा-श्वसन-रोग कमी होतील. पाऊस जास्त भरवशाचा होईल.

करता येतं का असं? हो!

सन १९५२च्या ५ ते ९ डिसेंबरला लंडन शहरावर झाकणासारखा एक ढग अडून राहिला. ढगानं सगळा धूर जमिनीलगत कोंडून धरला. आधी पांढरं धुकं घडलं आणि मग ते काळवंडत गेलं. सरासरीनं घरांबाहेर फक्त ११ इंच (२८ सेंटीमीटर) दूरच्या वस्तूच दिसू शकत होत्या. या एका घटनेत लंडनमध्ये चार हजार माणसं मेली! एका लहानशा बागेतच पन्नास प्रेतं सापडली. मुख्य दोष धुरातल्या सल्फर डायऑक्साइडवर टाकला गेला, जो कोळसा व पेट्रोल-उत्पादनं जळण्यातून घडतो. पुढे लंडन शहरानं सर्व उद्योग गावाबाहेर नेले. सार्वजनिक रेल्वे व बस सेवा सबळ केल्या. मध्य लंडनमध्ये खासगी वाहनं आणण्यावर ५०-६० पाउंड (आताचे चार-पाच हजार रुपये) ताशी, असा जबर कर लावला, आणि शहर वाचवलं.

आपण करत होतो का असं? हो!

१९६०-७०च्या काळापर्यंत मध्य मुंबईत सांडपाणी (स्युएज) शुद्ध करून पिण्यायोग्य पाणी ‘केलं’ जात असे. आपल्या मलमूत्रापासून खत बनवून महानगरपालिका ते विकत असे. इंधन-वायू परळ-लालबाग भागातल्या रुग्णालयांना दिला जात असे. पण!!! पण जमिनीचे भाव वाढत गेल्यानं दादर मलनिस्सारण केंद्र बंद पाडलं गेलं. पण मी ते ‘शुद्ध’ पाणी १९६६मध्ये पिऊन आजही ठणठणीत आहे!

गेले काही दिवस दिल्लीची दुर्दशा हा चिंतेचा विषय ठरला आहे, ती आपलीच करणी आहे, आशियाई तपकिरी ढगाला जन्म देणारी. जरा शहाणपणा दाखवला, निसर्ग न ओरबाडता विकास केला तर हे सगळं टाळता येईल. सहज!

लेखक कादंबरीकारही असले; तरी विज्ञानविषयक  तीन पुस्तकांचे स्वतंत्र लेखन व ‘इंडिका- भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास’ या ग्रंथाचे मराठी रूपांतर त्यांनी केले आहे. ईमेल : nandakhare46@gmail.com