19 March 2019

News Flash

ज्ञानयोगी आणि कर्मयोगी

मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान शाखेत, म्हणजेच यूडीसीटीमध्ये त्यांनी १९५८ साली  प्रवेश घेतला.

मन मोहन शर्मा भारतातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व

प्रा. मन मोहन शर्मा हे रसायन उद्योग आणि रसायन अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. परदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना अध्यापनासाठी वारंवार बोलावले, पण आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी देशात वैज्ञानिक व संशोधक घडवण्यासाठीच केला. डॉ. माशेलकरांसारखे अनेक वैज्ञानिक त्यांचे विद्यार्थी . केंद्राने ‘पद्मविभूषण’ किताबाने त्यांचा गौरव केला आहे. आता शर्मा यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून उद्या, सोमवारी तो मुंबईत प्रदान केला जाणार आहे. या निमित्ताने त्यांच्या अफाट कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा लेख..

मन मोहन शर्मा हे भारतातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व आहे. रसायन अभियांत्रिकी, रसायन उद्योग क्षेत्रात आणि सरकारी स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संलग्न विविध आघाडय़ांवर महत्त्वाचे योगदान देणारे मन मोहन शर्मा हे स्वत एखाद्या संस्थेपेक्षा कमी नाहीत. १ मे १९३७ रोजी राजस्थानमधील एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या शर्माचे संपूर्ण आयुष्य अत्यंत मोहवून टाकणारे आहे. भारतातील रसायन अभियांत्रिकीला जागतिक स्तरावर जागा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान शाखेत, म्हणजेच यूडीसीटीमध्ये त्यांनी १९५८ साली  प्रवेश घेतला. १९६० साली त्यांनी एन. आर. कामथ यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. डिसेंबर १९५९ ते सप्टेंबर १९६१ या काळात अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. दरम्यान, १९५८ साली नव्यानेच स्थापन झालेल्या भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई येथे रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कामथ रुजू झाले. या काळात या दोघांनी ‘pyrolysis of alcoholl या विषयावरील अनेक शोधनिबंध प्रकाशित केले. परंतु पुढील संशोधनासाठी प्रा. कामथ उपलब्ध नसल्यामुळे शर्मानी विदेशातील विद्यापीठांकडे अर्ज करायला सुरुवात केली. त्यांचा अर्ज सर्वप्रथम जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या प्रा. होईल्शेर यांनी स्वीकारला. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग आखून ठेवला होता. याच वेळेस त्यांची भेट प्रा. जे. पी. काणे यांच्याशी झाली आणि त्यांनी शर्माच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. काणे हे यूडीसीटीमधील रसायन अभियांत्रिकीचे पहिले प्राध्यापक. केंब्रिज येथील प्रा. डँकवर्ट्स यांनी त्या सुमारास काणे यांच्याकडे एखाद्या चांगल्या युवा संशोधकासाठी विचारणा केली होती. यूडीसीटीचे तत्कालीन प्रमुख जी. एम. नाबर यांच्याकडून शर्माच्या कामाबद्दल प्रशंसा ऐकलेली असल्यामुळे काणे यांनी शर्माच्या नावाची शिफारस डँकवर्ट्स यांच्याकडे केली. जॉन हॉपकिन्स येथील शिष्यवृत्ती शर्मानी आधीच स्वीकारली असल्याने या समोर आलेल्या नव्या संधीने त्यांना काहीशा द्विधा मन:स्थितीत टाकले. पण जॉन हॉपकिन्सच्या प्रा. होईल्शेर यांची परवानगी मिळाल्यामुळे शर्मा केम्ब्रिजला अखेरीस रुजू झाले. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता.

शर्मानी केम्ब्रिजमध्ये घालवलेला काळ अत्यंत अविस्मरणीय होता. त्यांनी या काळात विविध शास्त्रीय, अशास्त्रीय आणि व्यावसायिक विषयावरील साहित्याचे विपुल प्रमाणात वाचन केले.  ‘केमिकल अ‍ॅब्स्ट्रॅक्ट्स’ या नियतकालिकाचे नियमित वाचन करण्याची त्यांना जी सवय जडली ती पुढे आयुष्यभर टिकली. शर्माना उत्तम स्मरणशक्तीचे वरदान लाभले असल्याने त्यांच्याकडे लोक चालता-बोलता ज्ञानकोश म्हणून पाहू लागले. कुठलाही प्रकल्प हाती घेण्याआधी त्याच्या नियोजनात ते बराच काळ व्यतीत करीत असत. खरे म्हणजे पदवी प्राप्त करण्यासाठी आवश्यक इतके संशोधन त्यांचे १९६२ मध्ये पूर्ण झाले होते; परंतु विद्यापीठाच्या नियमात बसत नसल्याने त्यांनी त्यांचे संशोधन चालूच ठेवले. पुढल्या वर्षभराच्या काळात, त्यांचा प्रबंध लिहून तयार झाला. तरीही तो सादर न करता ते थोडय़ा वेगळ्या प्रकारचे संशोधन करीत राहिले. दरम्यानच्या काळात शर्मानी प्रा. डँकवर्ट्स यांच्याबरोबर काही शोधनिबंध प्रकाशित केले. डँकवर्ट्स यांच्या उत्साहवर्धक मार्गदर्शनाखाली शर्मानी आपल्या स्वतंत्र कल्पनाशक्तीला वाव देत उत्तम दर्जाचे संशोधन केले. केम्ब्रिजमधील वास्तव्याच्या शेवटच्या काळात शर्माना एक नवीन कल्पना सुचली. त्या कल्पनेने डँकवर्ट्स अत्यंत प्रभावित झाले व त्यांनी शेलला शर्माच्या नावाने त्या कल्पनेचे स्वामित्व हक्क घेण्यास सांगितले. यामुळे शर्मा केम्ब्रिज विद्यापीठाच्या इतिहासातील असे पहिले स्नातक ठरले, ज्यांच्या नावे एखाद्या कल्पनेचे स्वामित्व हक्क घेतले गेले होते. तोपर्यंत, स्वामित्व हक्क घेण्यापेक्षा शोधनिबंध प्रकाशित करण्यावर केम्ब्रिज विद्यापीठात जास्त भर दिला जायचा. दुर्दैवाने हक्क घेण्याच्या योग्यतेच्या अनेक कल्पनांचे त्यांनी हक्क न घेता ते सगळ्यांसाठी खुले ठेवले. भारतात परत येण्यापूर्वी डँकवर्ट्स यांच्यासोबत त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. डँकवर्ट्स हे खऱ्या अर्थाने शर्माचे गुरूहोते. या गुरू-शिष्यातील स्नेहाचे वर्णन करताना डँकवर्ट्स यांनी आपल्या एका पुस्तकात असे म्हटले होते की शर्मा हे त्यांना लाभलेले सगळ्यात मेहनती विद्यार्थी होते.

केम्ब्रिजच्या वातावरणाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. तिथे त्यांना अनेक थोर शास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध उद्योगपती यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ऑक्टेव लेवेनस्पील, डॉन स्कॉट, जी. ए. राटक्लिफ यांच्यासारख्या अनेकांनी शर्माच्या कामावर प्रभावित होऊन त्यांना आपल्या संस्थेत प्राध्यापकाची जागा देऊ केली. पण शर्मा आपण दिलेल्या शब्दाला जागून यूडीसीटीमध्ये रुजू होण्यासाठी परत आले. मुंबईसाठी निघण्यापूर्वी डँकवर्ट्स यांनी शर्माना यूडीसीटीमध्ये प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास सुचवले. प्रा. काणे यांना लिहिलेल्या पत्रात डँकवर्ट्स यांनी शर्माची तोंडभरून स्तुती केली. परिणामत: भारतात येऊन १६ सप्टेंबर १९६४ रोजी अवघ्या २७ व्या वर्षी शर्मा प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ३० एप्रिल १९९७ रोजी सर्वात जास्त काळ प्राध्यापक म्हणून सेवा देऊन ते निवृत्त झाले.

१९६४ च्या आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी शैक्षणिक तसेच औद्योगिक दृष्टीने महत्त्वाच्या अनेक समस्यांची एक यादी तयार केली होती. भारतात येताच आपल्या सखोल ज्ञानाचा वापर करून यातली बरीचशी उद्दिष्टे साध्य केली. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रयोगशाळा उभारणे, अभ्यासक्रम बनवणे, व्यवस्थापन सांभाळणे यांसारखी अनेक कामे असूनही शर्मानी संशोधनातली आपली रुची कायम ठेवत दर्जेदार संशोधन केले. नव्या कल्पनांना वाव देत संशोधन करणे हा त्यांचा हातखंडा होता. आश्चर्याची बाब म्हणजे, आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी कधीही कुठल्याही संस्थेकडे अर्थसाहाय्य मागितले नाही; परंतु आपल्या सहकाऱ्यांना मात्र त्यांनी वेळोवेळी असे करण्यासाठी मदत केली. रसायन अभियांत्रिकी क्षेत्रात अत्यंत मूलभूत साधनांयोगे उच्च दर्जाचे संशोधन करण्यात त्यांनी यश मिळवले. यामध्ये त्यांना आपल्या उद्योग क्षेत्रातील मित्रांची कायम मदत मिळाली. अशा प्रकारे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचे संशोधन केल्यामुळे त्यांचा zero budget researcher from bombay असा लौकिक झाला. याच काळात शर्माना काही नवोदित तरुण संशोधक मिळाले. शर्माच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संशोधनाचा आलेख उत्तरोत्तर वाढत गेला. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या शोधनिबंधांची दखल तत्कालीन वैज्ञानिक जगताने घेतली.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल ७१ पीएचडी आणि ३५ पदव्युत्तर संशोधक पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या संशोधन समूहाने पहिल्या ५ वर्षांत तब्बल ४२ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी प्रा. रघुनाथ माशेलकर हे सर्वाधिक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. ते अलीकडेच प्रमुख, वैज्ञानिक तथा औद्योगिक परिषद आणि सचिव, केंद्रीय वैज्ञानिक तथा औद्योगिक विभाग येथून निवृत्त झाले.

शर्मा यांनी कायमच पीएचडी करणाऱ्या संशोधकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नवोदित प्राध्यापकांनासुद्धा पीएचडीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहन दिले. संशोधनाबरोबरच औद्योगिक संस्थांना सल्लागार म्हणून साहाय्य देण्यास प्रवृत्त केले. याद्वारे विद्यार्थी संशोधक, प्राध्यापक, उद्योगपती यांचे जाळे निर्माण करून सर्व पातळ्यांवर संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण केले. यूडीसीटी संस्थेला भेट देणारी प्रत्येक तज्ज्ञ व्यक्ती ही विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शनासाठी वेळ काढत असे. याचे श्रेय सर्वस्वी शर्माना जाते. रसायन अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी त्यांनी कायमच महिला संशोधकांना प्रोत्साहन दिले.

यूडीसीटी येथे त्यांनी फक्त संशोधनाचाच पाया घातला नाही तर रसायन अभियांत्रिकी विभागाचाही पाया घातला. यायोगे अनेक गुणवान संशोधकांना संस्थेत राहणे शक्य झाले. चांगले संशोधन करण्यासाठी लागणारे अर्थसाहाय्य विविध औद्योगिक आस्थापनांकडून घेऊन त्यांनी संस्थेचा विकास साधला. फेब्रुवारी १९९७ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला तेव्हा औद्योगिक, शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रांतील व्यक्तींनी संशोधनासाठी मुबलक प्रमाणात अर्थसाहाय्य दिले. खचितच हे शर्मानी संस्थेला व समाजाला दिलेल्या नि:स्वार्थ सेवेचे फळ होते. १९६४ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात करूनही शर्मानी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर परिस्थितीवर मात केली. एवढेच नव्हे तर इतर संस्थांमध्ये नंतर यशोशिखरावर पोहोचलेल्या अनेक व्यक्तींना त्यांनी पहिल्यांदा संधी दिली. मूलभूत संशोधन करीत असतानाच त्याचा उपयोग उद्योग क्षेत्राला कसा करता येईल याचे अवघड तंत्र शर्माना चांगलेच साधले होते.

पीएचडी करणाऱ्या संशोधकांना उद्योग क्षेत्रात काम मिळणे अवघड जाते हे लक्षात आल्यावर शर्मानी उद्योगपतींशी चर्चा केली. भारतातील रसायन क्षेत्रातील उद्योगपतींना या नवोदित संशोधकांचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी पीएचडी केलेल्या व्यक्तींसाठी औद्योगिक क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले. संशोधनासाठी खासगी क्षेत्राकडून निधी जमा करण्याची परंपरा शर्मानी सुरू केली. प्रयोगशाळा, ग्रंथालय यांना सुसज्ज आणि अद्ययावत करणे यामुळेच शक्य झाले. शैक्षणिक क्षेत्रात यापूर्वी कधी न झालेले क्रांतिकारी प्रयोग त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि संशोधकांच्या कल्याणासाठी केले. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, साहाय्यक कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पाल्यांना साहाय्य, वैद्यकीय सुविधा आणि संस्थेच्या परिसराचा विकास यांसारख्या अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात गरुडझेप घेतली.

मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये आणि समित्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रसायन अभियांत्रिकी क्षेत्रातील असामान्य आणि अद्भुत कामगिरीसाठी १९८७ साली पद्मभूषण तर २००१ साली पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले. आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली यांसारख्या अनेक संस्थांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठाने त्यांची नियुक्ती ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’ या पदावर केली. आयुष्यातील क्षुल्लक सुखे नाकारून शर्मा यांनी आपले आयुष्य रसायन अभियांत्रिकीच्या सेवेसाठी वेचले. यामध्ये त्यांचा पत्नीचा मोठा वाटा होता. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या कार्यात त्यांना नेहमीच आधार दिला. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा मुळीच गर्व न बाळगता सर्वामध्ये मिसळणारी व्यक्ती म्हणून शर्मा यांचा लौकिक आहे. आपल्या व्यस्त संशोधनकार्यातून वेळ काढून त्यांनी शास्त्रीय संगीत, हिंदी सिनेमा यांची आवड आवर्जून जोपासली आहे. आपल्या ध्येयावर असलेली निष्ठा, ज्ञानाची उपासना, कर्तव्यभावना, वेळेचे महत्त्व आणि साधी राहणी यामुळे प्रा. मन मोहन शर्मा यांचे व्यक्तिमत्त्व आधुनिक युगातील ऋषींप्रमाणे भासते.

प्रा. ग. दा. यादव

अनुवाद : रिद्धेश दाणी, निकिता आवारे, हृषीकेश जोशी

First Published on March 11, 2018 1:57 am

Web Title: article on professor man mohan sharma