News Flash

दंगलपूरची दंतकथा

आटपाट नगर होते, त्याचे नाव पूर्वी मंगलपूर होते म्हणतात. पण मंगलपूर वाढू लागले. आटपाट राहिले नाही. ते नगर वाढू लागले.

(संग्रहित छायाचित्र)

अभिजीत ताम्हणे

हैदराबादमधील ‘दिशा’ बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपी ६ डिसेंबरच्या पहाटे पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. या घटनेनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाविषयीचे कायदेशीर प्रश्न मांडणाऱ्या लेखाबरोबरच, कथा आणि कवितेतून व्यक्त झालेल्या भावना..

आटपाट नगर होते, त्याचे नाव पूर्वी मंगलपूर होते म्हणतात. पण मंगलपूर वाढू लागले. आटपाट राहिले नाही. ते नगर वाढू लागले. अनधिकृत बांधकामे वाढू लागली. बांधकामे करणारे, करवून घेणारे, त्यासाठी जमिनी लाटणारे, वीजपाण्याच्या जोडण्या ओरबाडणारे, टोलेजंग बांधकामे लोकांना चढय़ा दराने विकणारे.. या साऱ्या लोकांनीच अशी आवई उठवली की, परप्रांतीयांमुळे आपल्या नगराची अवदसा होत आहे. परप्रांतीय कुणीही नाही- सारे आपलेच आहेत, असे शासकांनी सांगताच मंगलपूरवासींचे रक्त खवळले. कुणाला ना कुणाला, कशा ना कशा प्रकारे परके ठरवून या परक्यांना अद्दल घडवायचीच, असे आता मंगलपूरवासींनी ठरवले. झालेही तसेच. पण मग मंगलपूरचे न्यायाधीश म्हणाले, अद्दल घडवणे म्हणजे न्याय नव्हे. लोकांनी त्यांना सुनावले, ‘‘पूर्वीप्रमाणे आपल्याकडे सरंजामदार असते, तर यालाच न्याय म्हणाले असते.’’ मंगलपूरवासींनी मनोभावे सरंजामदारांचे स्मरण केले. त्यांच्या स्मृतीसाठी मोठे अनुष्ठान केले. हवनाच्या ज्वाळेतून सरंजामशाही प्रकटली आणि म्हणाली, ‘‘हे माझ्या पुत्रांनो, जुने सारे बदलते आहे.. जे आहे ते माझे नाही राहिलेले.. पुन्हा नव्याने सुरुवात करा.. मग मी तुमच्यातच राहीन.’’ मंगलपूरवासी विचारात पडले. नव्याने सुरुवात करायची म्हणजे काय करायचे? त्यापेक्षा जुन्याचेच नाव बदलले तर? आहे की नाही नामी उपाय? झाले! मंगलपूरचे नाव बदलून दंगलपूर असे ठेवले गेले.

या दंगलपुरात सरंजामशाहीचा नित्य वास असे. आज आगगाडीत तिकीट विचारणाऱ्या तपासनीसाला मारहाण, उद्या गावकुसाबाहेरच्या वस्तीत कुणी तरी चांगले कपडे घालून मिरवले म्हणून त्याला धरून हाणणे, असे प्रकार लोकांच्या अंगवळणी पडू लागले. मंगलपुराप्रमाणे दंगलपुरातही पोलीस होतेच. या पोलिसांना काही काम उरले नाही. लोकच सारी कामे करत. कायदा-सुव्यवस्था उरलीच नाही असे काही शिकलीसवरली मंडळी म्हणत. ‘ते कोण बोलणारे?’ असा प्रतिप्रश्न दंगलपूरचे रहिवासी करीत. कुणाला तो प्रतिप्रश्न उर्मट वाटे. पण त्यात तथ्यही होते, कारण उर्मटपणे प्रतिप्रश्न करणाऱ्या याच सामान्यजनांवर तर दंगलपूरच्या कायदा-सुव्यवस्थेची भिस्त होती. पण कायदा-सुव्यवस्था म्हणजे काय हे कुणी तरी ठरवत असे. ते ठरवणारे कोण, हे कुणालाही दिसत नसे. ती अदृश्य शक्ती म्हणजे सरंजामशाहीची धाकटी कन्या बहुमतशाही, असे काही श्रद्धाळू लोक कुजबुजत. पण श्रद्धाळूंना भीती असे बावळट ठरण्याची. म्हणून मग हे श्रद्धाळू लोक, खऱ्या श्रद्धा गाडून टाकून बहुमताला ज्या मान्य आहेत, तेवढय़ाच श्रद्धांचे प्रदर्शन जाहीरपणे करीत. आपल्या अंतरात्म्याला जे दिसते, त्याबद्दल आपण अगदी गप्प राहायचे आणि झुंडीला जे दिसते तेवढेच आपले म्हणायचे, अशी या श्रद्धाळूंची गत झाली.

उदाहरणार्थ, कुणाही धर्मास दुखावणे हे पाप. हे श्रद्धाळूंना अगदी मनोमन पटे. पण मनोमनच. उघडपणे मात्र ही परधर्मसहिष्णुता दाखवण्याची अजिबात सोय नव्हती दंगलपुरात. त्यामुळे मग धर्माच्या नावाखाली माणसे मारली गेली, एखादा ओसाड ढांचा वादग्रस्त ठरवून तो पाडला गेला, की श्रद्धाळू लोक पहिल्यांदा टाळ्या पिटत. ‘असेच व्हायला हवे होते,’ म्हणत. या श्रद्धाळूंनी आपापल्या मनांवर वेळोवेळी ठेवलेल्या दगडांची संख्या इतकी झाली की, त्या दगडांच्या राशीतून एक डोंगर उभा राहिला दंगलपुराच्या मधोमध. त्याला बहुमतशाहीचा डोंगर असे नावही रूढ झाले. पण या नगराचे नकाशे काढून पाहिलेत तर, त्यांत या डोंगराचा उल्लेखही दिसणार नाही. ‘कुठे आहे बहुमतशाहीचा डोंगर? आहे का पाहा बरं इथं नकाशात..’ असे आव्हानच बहुमतशाहीच्या डोंगराचे अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या विवेकवाद्यांना दिले जाई. तशी सोय नकाशानेच ठेवली होती. बरे, ‘हा नकाशा बदला’ असे काही विवेकवादी म्हणतील, हे तर अशक्यच. मग, या डोंगरात आपल्याही मनावरचे दगड साचून तो मोठा होऊ नये, याची काळजी घेणेच तेवढे विवेकवाद्यांच्या हाती उरे.

पण या सर्व काळात, दंगलपूरचा विकास होत होता. प्रगती होत होती. दंगलपूर हे आता विश्वगुरू होणार, अशी आकांक्षा सच्च्या दंगलपूरवासींना होती. ‘विश्वगुरू म्हणजे काय?’ असा प्रश्न करण्याची कुणाचीही टाप नव्हती आणि कुणालाही प्रश्नच न पडणे हीच तर ‘एक दंगलपूर, श्रेष्ठ दंगलपूर’ या घोषणेची प्रत्यक्ष वाटचाल, असेही मानले जात होते. आताशा दंगलपुरात ‘वाटचाल’ वगैरे शब्द हे फक्त आलंकारिक अर्थाने किंवा स्तुती करण्यासाठीच वापरले जात. वाटेने चालणे हा प्रकार लोकांनी विसरून जावा, इतका वेग दंगलपूरच्या दैनंदिन जीवनात आला होता. चालण्यासाठी सरळ वाटा फारशा उरल्या नव्हत्याच, वाकडय़ा वाटेने चालण्याचा पर्याय मात्र खुला होता. पण वेग वाढवण्यासाठी शासकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक गल्लीत मेट्रोचे जाळे पोहोचले तरी होते किंवा पोहोचणार तरी होते, प्रत्येक उपनगर हे उड्डाणयोजनेद्वारे विमानसेवेने जोडले गेले होते.

अशा दंगलपुरात काही अवजड वाहनेही शिल्लक होती. पुरुषी अहंकाराचे, पुरुषी आक्रमकतेचे प्रतीक म्हणून दंगलपुरातले जुने मंगलपूरवासी या अवजड वाहनांकडे पाहत. पण धूळ उडवत, गुरगुराट करीत नगराभोवती फिरणाऱ्या या वाहनांपैकी काही वाहने दंगलपूरवासींच्या उपयोगी पडत. मॉलमध्ये नव्या वस्तू, किराणा दुकानांत डाळदाणा, चकचकीत इमारतींसाठी बांधकामसाहित्य.. हे सारे याच वाहनांतून येई. धूळ कमी उडावी, गुरगुराट कमी व्हावा, यासाठी दंगलपूरच्या बाहेर कुठे तरी संशोधन चालू होते. पण असल्या सामाजिक संशोधनात दंगलपूरला रस नव्हता. ही वाहने एकटय़ादुकटय़ा महिलांना तुडवतात, असेही म्हटले जाई. पण दंगलपूरच्या गल्ल्यांमध्ये तरी कधी असा अतिप्रसंग घडला नव्हता. म्हणजे, महिलांना तुडवण्याचे प्रसंग बरेच घडत.. पण कधी गल्लीतल्याच स्कूटरने, आळीतल्याच मोटारीने महिला तुडवल्या जात. परक्यांविरुद्ध पेटून उठणे हा मंगलपूरचा मूळ स्वभाव, तो दंगलपुरातही कायम होता. त्यामुळे आपल्याच लोकांना कशाला मारायचे, असा विचारही दंगलपुरात नेहमी होत असे. त्यालाच चांगुलपणा म्हणण्याची रीत होती, दंगलपुरात.

अशा दंगलपुरात एकदा खरोखरच एक अवजड वाहन एका महिलेला तुडवताना पकडले गेले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळून टाकत होते ते. एरवी अशी वाहने दिसली की एक हात पुढे करणाऱ्या आणि मग तोच हात खिशात टाकणाऱ्या विभागाला मोठेच काम लागले : गुन्हेगारांना पकडण्याचे. एरवी दंगलपुरात गुन्हे होतच नसत. एखाद्याने चूक केली की त्याला लोकच तिथल्या तिथे शिक्षा देत. काही वेळा झुंडीने मारूनही टाकत एखाद्याला. असा एखादा झुंडबळी गेला की मंगलपूरला दंगलपूर करण्यास कारणीभूत असणाऱ्या सरंजामशक्ती प्रसन्न होत. बहुमतशाहीचा डोंगर झुंडफुलांच्या रंगाने न्हाऊन निघे. असे म्हणतात की, दंगलपुरात असा एखादा झुंडबळी गेला की आसपासच्या गावांमधले आत्महत्या केलेले शेतकरी पुन्हा जिवंत होत. यात जादूटोणा काही नसून, त्यामागे प्राचीन असे विज्ञानच आहे, असे बहुमतशाहीच्या डोंगराच्या सावलीत राहणारे लोक सांगत.

त्या अवजड वाहनाचे पोलिसांनी काय केले, ही दंतकथा सर्वाना माहीतच असेल. ती पुन्हा सांगण्याचे कारण नाही. पुरुषी अहंकार आणि आक्रमकतेचे ते प्रतीक पोलिसांनी मारून टाकले. लोक हषरेत्फुल्ल झाले. पोलिसांचा जयजयकार करू लागले. चला, आपणही त्या जल्लोषात सामील होऊ किंवा कोणताही प्रश्न न विचारण्यासाठी मनावर एक दगड ठेवू.. आपापल्या गावातही बहुमतशाहीचा डोंगर असेल, तिथे सापडेलच दगड.

abhijit.tamhane@expressindia.com

मी काय म्हणतो, आहे ना बहुमत

तर का सहन करायची हेल्मेटसक्ती?

मरू आम्ही; पैसे खाण्याचे धंदे यांचे.

 

घोळका म्हणतोय ना, गाय मारली गेलेय

तर हो, मारली गेलेय.. विचारा जाब

अरे वा, रस्त्यावर गाई प्लास्टिक खातात,

हा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे;

यात आम्ही काय करावं?

 

बहुमतानं ठरलंय ना, हा आमचा धार्मिक प्रश्न आहे

तर मग आहेच!

सहिष्णुता वगैरे भंपकपणा आहे सगळा

 

मंदी.. महागाई.. काय बोलताय तुम्ही?

माझ्यासमोर बोललात, गर्दीसमोर बोलू नका

आता गरिबाला डाळभात नाही परवडत,

पण त्याला नुसता भात तरी परवडतोय ना?

काही देशांत तोही मिळत नाही.

 

बहुमत म्हणतंय ना, अखंड भारत झालाच पाहिजे

तर झालाच पाहिजे!

काय करायच्यात चर्चा विधेयकावर?

 

बहुमत म्हणतंय ना, अमुक शिक्षा बरोबर तमुक शिक्षा बरोबर

झालं तर मग, कशाला पाहिजेत ती न्यायालयात भिजत घोंगडी?

 

सुनियोजितपणे जर बहुमताला

कशावर तरी विश्वास ठेवायला लावत असतील

तर चुकीचं काय आहे त्यात?

लोकशाहीवरही आहेच की विश्वास काही काहींचा!

 

..आणि बहुमतानं जेव्हा काहीएक घडतं

तेव्हा ती ‘लोकशाही’ असते लक्षात ठेवा!

 

वैभव मांगले, अभिनेता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:11 am

Web Title: article on rape and murder case in hyderabad in police encounter abn 97
Next Stories
1 पोलीस तपासातील अपयशावर चकमक हा उतारा नव्हे!  
2 डोनाल्ड ट्रम्प गिल्टी / नॉट गिल्टी?
3 हिंदुत्व : भाजपचे आणि शिवसेनेचे
Just Now!
X