03 June 2020

News Flash

बालनाटय़काराची घडण!

नाटय़लेखक म्हणून रत्नाकर मतकरी यांची घडण शालेय वयातच कशी झाली आणि पुढे ‘बालनाटय़’ हा प्रकार त्यांना कसा गवसला, याविषयीच्या या नोंदी..

संग्रहित छायाचित्र

लीला विनोद हडप

नाटय़लेखक म्हणून रत्नाकर मतकरी यांची घडण शालेय वयातच कशी झाली आणि पुढे ‘बालनाटय़’ हा प्रकार त्यांना कसा गवसला, याविषयीच्या या नोंदी..

शालेय वयापासूनच अफाट वाचनाची आवड निर्माण झाल्यामुळे रत्नाकर मतकरी यांचे साहित्यिक वर्तुळात एक वेगळे व्यक्तिमत्त्व घडत गेले. या वाचनाची गोडी लागण्यामागे साहित्यिक वारसा होता, विद्वत्तासंपन्न वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी यांचा. त्यांचे संस्कृत, इंग्रजी आणि गणित यांवर प्रभुत्व होते. शिक्षक, संस्कृत मार्गदर्शक याबरोबरच ‘संस्कृत स्वयंशिक्षक’ या पुस्तकाचे संपादन आणि महाराष्ट्र भाषाभूषण ज.र.आजगावकर यांच्या संत तुकाराम-चरित्राचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केले होते. मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरी आर्थिक खजिना नसला तरी जुन्या नाटकांच्या पुस्तकांचा खजिना होता. त्यामुळे अक्षरओळख होण्याच्या त्या वयातच रत्नाकर मतकरी यांना वाचनाची गोडी लागली. अगदी झपाटल्यासारखी.. मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळात गाजलेल्या नाटकांची पुस्तके पुन:पुन्हा वाचतानाच नाटकाचे कथानक हे त्यातील संवाद, पदांच्या जागा आणि त्यानुसार प्रवेश यातून कसे सादर केले जायचे याचे तंत्र कळत गेले.. पुस्तकांतील छायाचित्रामुळे प्रवेशामागील सुसंगत अशा पडद्याची मांडणी याबद्दल उद्भवलेल्या सर्व शंकाचं निरसन वडील करायचे. वडिलांबरोबर ठाकूरद्वारच्या लायब्ररीत पायी चालत जाताना नाटकाविषयी सर्व शंकांचे निरसन होत गेले आणि माहिती मिळत गेली. तिकीट काढून नाटक पाहण्यासाठी ट्रामने परळच्या दामोदर हॉलपर्यंत जाण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती.

केवळ हट्ट धरल्यामुळेच पुण्यप्रभाव, विद्याहरण, मानापमान ही नाटके पाहता आली. नानासाहेब फाटक, कृष्णराव चोणकर आणि बालगंधर्व असे दिग्गज कलाकार जवळून पाहता आले. याच प्रेरणेने वयाच्या सातव्या वर्षांपासून नाटक लिहिण्याचा प्रारंभ झाला तो, कालिदासाच्या गोष्टींवर. त्यानंतर आठव्या वर्षी साने गुरुजींच्या तीन मुले या कादंबरीवरून आणि मग गणेशोत्सव. शालेय शिक्षकांनी दाखविलेल्या प्रोत्साहनामुळे अनुवादित दीर्घकथा – कादम्बिनी (मूळ- रवींद्रनाथ टागोर), नाटिका- पन्नादाई (ऐतिहासिक कथा) अशा नाटिका उत्स्फूर्तपणे लिहिल्या गेल्या. त्यानंतर राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये सादर करण्यासाठी ‘हसरी सुमने’ मासिकातील नाटिका शोधून त्यात शिक्षकांच्या सूचनेनुसार अधिक दोन पात्रांचे संवाद लिहून शाबासकीही मिळाली. अभ्यासात तर ते हुशार होतेच पण चित्रकलेतही आवड असल्यामुळे चित्रकलेचा अभ्यास करावा असे वाटले, पण मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन वेळ आणि पैसे वाया जातील म्हणून प्रवेश घेण्याचे टाळले गेले.

पुस्तके हीच त्यांना गुरुसमान होती. नाटकाप्रमाणे आणखी एक खजिना घरातच सापडला .. कथा-पटकथा संवादाच्या पुस्तिका आणि त्याही गाजलेल्या चित्रपटांच्या. ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत तुकाराम’, ‘शेजारी’, ‘पहिली मंगळागौर’.. असे किती तरी. केवळ या वाचनातूनच नाटय़लेखनाप्रमाणे चित्रपट लेखनाचे तंत्र अभ्यासता आले. एखाद्या निस्सीम भक्ताला जसा परमेश्वर प्रत्यक्ष भेटतो तसा वाचन या एकाच ध्यासामुळे मतकरींना रंगदेवता प्रसन्न झाली असावी. कारण त्यानंतर पुढील आयुष्यात लिहिलेली बालनाटय़े, प्रौढ नाटके, कथा-कादंबऱ्या, चित्रमाला, ललित लेख त्याचप्रमाणे दूरदर्शन-आकाशवाणी या माध्यमातील कार्यक्रम यांची सर्व मिळून संख्या शेकडोहून अधिक आहे आणि हे सर्व उपजत आणि उत्स्फूर्तपणे.. कुठल्याही गुरुविना!

‘बालरंगभूमी’ ते ‘बालनाटय़’!

बालरंगभूमीच्या सुवर्णकाळाची नांदी झाली ती मतकरी यांच्याच लेखनाने.. नाटकाचे नाव मधुमंजिरी. बालरंगभूमीच्या प्रवर्तक सुधा करमरकर यांच्या मागणीवरून लिहिलेले नाटक. प्रौढ नाटकाप्रमाणे मुलांनाही बंदिस्त नाटय़गृहात नाटक पाहण्याचा आनंद मिळावा आणि तेही तीन अंकांत ..हे सर्वच त्यावेळी नावीन्यपूर्ण होते. मतकरी यांची भेट आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली होती, त्यामुळे हे बालनाटय़ रत्नाकरच लिहू शकतील असा त्यांना विश्वास होता. सुधाताईंनी अमेरिकेहून आणलेली काही पुस्तके वाचायला दिली. त्यातील एक पुस्तक (रेपन्झेल) योग्य वाटले आणि त्याप्रमाणे व्यावसायिक दर्जाच्या बालनाटय़ निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली. साहित्य संघाच्या सहकार्याने बालरंगभूमीवरील या क्रांतिकारक निर्मितीचे बालप्रेक्षकांनी स्वागत केले, तर सर्व वृत्तपत्रांनी यावर उलट सुलट मतेही मांडली. साहित्य संघाने बालनाटय़ शाखाच बंद केल्यामुळे, सर्वस्व पणाला लावून सुधाताई करमरकर यांनी ‘लिटल थिएटर’ (बालरंगभूमी) नावाने संस्था स्थापन केली. लेखक मात्र रत्नाकर मतकरी हे समीकरण तेच राहिले. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ या पुढल्या बालनाटय़ालाही तितक्याच उत्फूर्तपणे प्रेक्षकांनी दाद दिली. मोठय़ा कल्पकतेने भव्य आणि खर्चीक नेपथ्यरचना करून बालमनाच्या कल्पनाशक्तीला पुरेसा वाव मिळत नाही या विचाराने मतकरी अस्वस्थ झाले आणि त्या मूडमध्ये ‘राजकन्येची सावली हरवली’ ही नाटिका लिहिली. जी ‘शिशुरंजन’ या मासिकाच्या दिवाळी अंकात छापली होती. ‘कुमार कला केंद्र’ आयोजित नाटय़स्पर्धेत प्रायोगिक पद्धतीने जुजबी नेपथ्य वापरून सादर केलेल्या या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. आणि मग ‘भामटे बावळे’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटिकाही याच स्पर्धेत पुढील वर्षांमध्ये परीक्षकांच्या पसंतीस उतरल्या.. याच तत्त्वावर बालनाटय़ निर्मितीचे समाधान मिळण्यासाठी मतकरी यांनी ‘बालनाटय़’ नावाने वेगळी संस्था (१९६२) स्थापन केली. कमी तिकीटदरात, कोठेही प्रयोग लावून बालनाटय़े सादर करण्याची ती सुरुवात होती!

(पूर्वप्रसिद्धी : ‘रंगवाचा’ दिवाळी अंकातील मतकरी यांची मुलाखत; लेखिकेच्या परवानगीने पुर्नसपादित).

leelahadap@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 12:17 am

Web Title: article on ratnakar matkari childrens play abn 97
Next Stories
1 कोविडोस्कोप : एका वेदनेचे वर्धापन..
2 कोविडोस्कोप : पुराव्यानिशी सिद्ध होईल..
3 हा रस्ता अटळ आहे?
Just Now!
X