इंद्रनील पोळ

‘चतु:सूत्र’ या साप्ताहिक सदरातील ‘साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा’ (२५ जून) या श्रद्धा कुंभोजकर यांच्या लेखावरील हे प्रतिवादात्मक टिपण; समाजमाध्यमांवरील गदारोळाच्या पलीकडे जाऊ पाहणारे..

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

‘साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा’ हा श्रद्धा कुंभोजकर यांचा लेख (‘चतु:सूत्र’, २५ जून) वाचला. एक वाचक म्हणून हा लेख बऱ्याच जागी अतिशय ‘प्रॉब्लेमॅटिक’ वाटल्याने त्याचा प्रतिवाद करणे गरजेचे वाटते. लेखात एके ठिकाणी औरंगजेबाच्या एका ‘राजाज्ञे’चे उदाहरण दिले आहे. या उदाहरणावरून समाजमाध्यमांवर बराच गदारोळ झाला. त्यामुळे हे उदाहरण लेखाचा एक अगदी छोटासा भाग असला तरी त्यावर आधी चर्चा करू, म्हणजे हा विवादात्मक भाग बाजूला सारून लेखाच्या विस्तृत आशयावर चर्चा करता येईल.

मुळात औरंगजेबाविषयीच्या या उदाहरणावरून वाद सुरू झाल्यावर लेखिकेने त्याचा संदर्भ असलेल्या दोन पृष्ठांची छायाचित्रे ‘फेसबुक’वर डकवली. ती दोन्ही पाने वाचल्यावर लक्षात आले की, मूळ अर्थ आणि लेखिकेने लावलेला अन्वयार्थ यात नक्कीच फरक आहे. हिंदूंच्याच एका मठाला हिंदूंमधलेच ब्राह्मण, बैरागी, गोसावी, संन्याशी, जमीनदार आदी घटक त्रास देत असल्याने त्यांना त्रास देण्यात येऊ नये, अशा प्रकारचा तो आदेश आहे. वाचताक्षणीच मला लक्षात आले की, हा आदेश दोन पक्षांमधील मालमत्तेसंदर्भातल्या विवादाच्या अनुषंगाने आहे. यापुढे जाऊन सत्येन वेलणकर यांच्यासारखे इतिहास अभ्यासक हेही म्हणतात की, हा आदेश ‘राजाज्ञा’ नसून आणि ‘औरंगजेबाने दिलेला’ नसून त्याच्या वऱ्हाड प्रांताच्या सुभेदाराचा हा आदेश (?) आहे. (विशेष म्हणजे वेलणकर हे फारसी उत्तमपणे जाणतात!)

पण लेखात काय म्हटले आहे? तर – ‘औरंगजेबाची आपल्या मनात करवून दिलेली प्रतिमा कितीही वाईट असेल, तरीही भारत इतिहास संशोधक मंडळानं प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक फार्सी साहित्यात १६९१ या वर्षीची औरंगजेबाची राजाज्ञा दिलेली आहे, तिचा अर्थ असा – ‘..मठ उद्ध्वस्त करू नये, मत्ता जप्त करू नये.. जातित्वाची हीन भाषा बोलू नये.’’

यावरून गदारोळ झाल्यावर लेखिकेने फेसबुकवर नोंद लिहून खुलासा केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘मूळ मुद्दा हा कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीची दुसरी बाजू अनुल्लेखानं मारू नये असा आहे.’ परंतु लेखिका ज्यास दुसरी बाजू म्हणताहेत ती ‘दुसरी बाजू’ नाहीये, हे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरे म्हणजे, ‘औरंगजेबाची आपल्या मनात करवून दिलेली प्रतिमा कितीही वाईट असेल..’ या वाक्यातील ‘करवून दिलेली प्रतिमा’ हा भाग अर्थातच सामान्य वाचकांच्या मनात गोंधळ निर्माण करेल, हे लेखिकेसारख्या ‘अ‍ॅकॅडेमिशयन’ना उमजायला हवे. पण ते एक तर उमजत तरी नाही किंवा अशी वाक्यरचना ‘कॉग्निटिव्ह बायस’मुळे कळत-नकळत केली जाते. मला यातली दुसरी शक्यता (कॉग्निटिव्ह बायस) अधिक वाटते आणि ती का हे मी पुढे मांडतो.

उघड टीकेऐवजी टोमणे

औरंगजेबाचा उल्लेख हा लेखातला अगदीच छोटासा भाग आहे. त्यामुळे त्यास वगळूनदेखील लेखाचा मोठा भाग चिकित्सेसाठी उरतो आणि विषयाला अनुसरून त्या भागाची चिकित्सा करणे अधिक महत्त्वाचे वाटते. मुळात तो लेख व्यापक अर्थाने ग. भा. मेहेंदळे आणि ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा फेसबुक-समूह यांच्यावर टीका करण्यासाठी लिहिलेला आहे, असे ध्यानात यावे इतके टोमणे (हो, टोमणेच!) लेखात पेरलेले आहेत. (उदाहरणार्थ, ‘अचूक भासणारे संदर्भ निवडकपणे चघळणे आणि जुन्या जखमा चिघळवणे यालाच इतिहास संशोधन मानणाऱ्या काही मंडळींनी वर्तमान आव्हानांकडे पाठ फिरवून वेगळ्या पाऊलखुणा उमटवायला सुरुवात केली आहे’ – हा, माझ्या मते टोमणा आहे.) अशी टीका करणे कुठल्याही अर्थाने गैर नाही, पण ती उघड उघड करावी; टोमणे आणि शेऱ्यांच्या आडून किमान अध्ययन-अध्यापन करणाऱ्यांनी करू नये एवढीच माफक अपेक्षा असते. त्या अपेक्षेवर हा लेख पूर्णपणे पाणी फिरवतो. त्याशिवाय ज्याप्रकारे प्रशिक्षणाच्या मुद्दय़ाआडून ‘गेटकीपिंग’ची भलामण लेखात केली आहे, ते बऱ्याच अंगांनी  ‘प्रॉब्लेमॅटिक’ आहे. म्हणजे, इतिहासाचा अन्वयार्थ कसा लावायचा, कोणी लावायचा, किती अभ्यास करून लावायचा आणि मुळात तो अभ्यास केला आहे हे कोणी ठरवायचे, याचे सगळे अधिकार ‘काही निवडक अ‍ॅकॅडेमिशियन्सच्याच’ हातात असावेत असा काहीसा लेखाचा सूर आहे. ‘गेटकीपिंग’ हे खरे तर अकादमिक क्षेत्राला नवीन नाहीये आणि गुणवत्तेबद्दलचा मुद्दा अगदीच चुकीचाही नाहीये; पण या मुद्दय़ावर लेखाचा सूर इतका कर्कश लागतो की, अकादमिक अर्थाने प्रशिक्षित नसलेले पण विषयात रस असलेले अभ्यासक एकदमच बिचकतात.

पण लेखातील सर्वात खुपलेला मुद्दा म्हणजे, सामान्य मध्यमवर्गाबद्दल लावलेला तुच्छतेचा सूर! लेखात याविषयी एकंदर रोख असा आहे की, जगात इतक्या भीषण गोष्टी सुरू असताना भारतातला एक मोठा वर्ग ‘फेसबुक चॅलेंजेस्’ खेळण्यात, वेबिनार्सना हजेरी लावण्यात मग्न आहे. त्या वर्गाला जगात घडणाऱ्या कित्येक भीषण घटनाक्रमांशी काहीही घेणे-देणे नाहीये. (लेखातील विधाने अशी : ‘अंगावर कीटकनाशक फवारले गेलेले, देशात दोन वर्षांचा धान्यसाठा असतानाही भुकेनं जीव गेलेले लोक आपण नजरेआड करतो. आणि घरोघरी यीस्ट घालून आंबवलेल्या पदार्थाच्या फोटोंनी बीभत्स आंबटशौकीन लाइक्स मिळवतो. कारण आपल्या डोळ्यांदेखत देशोधडीला लागलेल्या, मरणाऱ्या जीवांकडे समाजाचं दुर्लक्ष व्हावं असं आपल्यातल्याच काहींना वाटतं. त्यासाठी कुणी नथ घातलेले फोटो अपलोड करण्याचं चॅलेंज देतात, तर कुणी जंगी वेबिनार सप्ताह लावून रिकामटेकडी बुबुळं आपल्याकडे खेचतात..’) हा आरोप करणारी एक विचारवंतांची फळी आहे, जी मला व्यक्तिश: अतिशय दुटप्पी आणि वैचारिकदृष्टय़ा पोकळ वाटते. (हे व्यक्तिश: लेखिकेबद्दल नसून एकूणच अशा विचारधारेबद्दल आहे.) जगात काही धार्मिक पंथ असे आहेत की, ज्यांच्यात देवाला स्वत:च समर्पण दाखवण्यासाठी ‘सेल्फ फ्लॅजिलेशन’ अर्थात स्वत:ला शारीरिक इजा करून घेण्याची प्रथा आहे. त्याचप्रकारे समाजातल्या गरीब आणि शोषित घटकाला सहानुभूती दाखवण्यासाठी आपण सतत मानसिक आणि वैचारिक ‘सेल्फ फ्लॅजिलेशन’ करावे अशी काही मंडळींची इच्छा असते.

समजा, समाजाचा एक भाग अशा प्रकारे नथीची छायाचित्रे किंवा बेकिंगची छायाचित्रे टाकण्याच्या ‘चॅलेंजेस्’मध्ये भाग घेतोय; पण फक्त या अशा ‘चॅलेंजेस्’मध्ये भाग घेतोय म्हणून या घटकाला समाजातील बाकीच्या घटनांविषयी कणव नसेल, हा अंदाज कुठल्या गृहीतकावर बांधला जातो? अशा प्रकारच्या ‘चॅलेंजेस्’मध्ये भाग घेणारे किती तरी जण माझ्या व्यक्तिश: ओळखीचे आहेत, ज्यांनी करोनाकाळात ‘कम्युनिटी स्क्रीनिंग’सारखे उपक्रम किंवा मजुरांच्या स्थलांतरात जमेल तशी मदत मनापासून केली आहे. त्यांना या लेखातील ‘एलिटिस्ट’ स्वर एका झटक्यात उडवून लावतो. एवढेच नाही, तर लेखातल्या भाषेतून या घटकांबद्दल तुच्छता जाणवते. समजा, याच सुरात- ‘अकादमिक क्षेत्रातले लोक गरिबांबद्दल नुसती कोरडी कणव बाळगून लेखांवर लेख खरडतात, पण कधीही त्यांना काडीची मदत करताना दिसत नाहीत’ असे म्हटले, तर ते सयुक्तिक ठरेल का? मला वाटते नाही ठरणार.

मथितार्थ निघण्याचा धोका

यात विरोधाभासाचा कडेलोट म्हणजे, लेखाच्या सुरुवातीच्या परिच्छेदात मध्यमवर्गातील ज्या घटकाला कुत्सितपणे टोमणे मारले आहेत, वेबिनार्स आणि हौशी अभ्यासकांवर ताशेरे ओढले आहेत, त्याच घटकापर्यंत अकादमिक संशोधकांनी सोप्या भाषेत आपले म्हणणे मांडून पोहोचणे गरजेचे आहे, हे लेखाच्या शेवटी म्हटले आहे! म्हणजेच तो घटक चुकीचा नाहीये. वेबिनार्स, समाजमाध्यमांवरील ‘चॅलेंजेस’देखील चुकीचे नाहीयेत. परंतु त्या माध्यमांचा वापर कोण करणार आणि त्या घटकापर्यंत कोण पोहोचणार, हे फक्त काही ठरावीक मंडळींनीच ठरवावे असा मथितार्थ लेखातून निघण्याचा धोका संभवतो.

हे सगळे वाचून कोणालाही वाटेल की, इतका सविस्तर प्रतिवाद करण्याइतपत तो लेख महत्त्वाचा आहे का? तर माझ्या मते, नक्कीच महत्त्वाचा आहे. डॉ. कुंभोजकर यांचा व्यासंग वादातीत आहे. त्यांच्या लिहिण्याला अकादमिक आणि हौशी अशा दोन्ही घटकांमध्ये वजन आहे. अशा व्यक्ती जेव्हा वस्तुनिष्ठतेची कास सोडून भावनिक हिंदोळ्यावर स्वार होत लिहित्या होतात, तेव्हा एक वाचक म्हणून माझे नुकसान होते, आणि म्हणूनच असा प्रतिवाद करणे भाग पडते!

लेखक सॉफ्टवेअर इंजिनीअर असून इतिहासाचे हौशी अभ्यासक व ब्लॉगर आहेत. pole.indraneel@gmail.com