मधु कांबळे madhukar.kamble@expressindia.com 

एखादी अन्यायी व्यवस्था बदलण्यासाठी त्या व्यवस्थेने अन्याय केलेल्या समूहाबरोबरच अन्य समाजघटकांतील विवेकी लोकही पुढे आले पाहिजेत. धर्मव्यवस्थेने दिलेले जन्माधारित जातवर्चस्व, वर्णवर्चस्व झुगारून देणाऱ्यांत अशा काहींचा समावेश होता, हे आज आठवावे लागते..

बघता बघता आरक्षणाचे राष्ट्रीयीकरण झाले. नव्याने झालेल्या घटनादुरुस्तीने नवा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आला, त्याच्या कवेत सर्वच समाजाला सामावून घेण्यात आले. त्यावर राजकीय खल सुरू झाला, ते स्वाभाविक आहे. मंडल आयोगाच्या वेळीही तसा खल झाला होता आणि मूळ आरक्षण व्यवस्थेच्या जन्माआधीही मोठा संघर्ष झालेला आहे. जेव्हा जेव्हा आरक्षण विषय येतो, त्या त्या वेळी त्यावर वाद-विवाद संघर्ष होतोच, ही परंपरा जुनीच आहे.

आता आरक्षण हे सर्वव्यापी, सार्वत्रिक झाले असले तरी जातिअंताचे काय करायचे, हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि तो तसा सोडून देता येणार नाही. त्याला भिडावेच लागणार आहे. जातिअंत म्हणजे विषम समाजव्यवस्था नष्ट करून त्या जागी वर्गविहीन, वर्णविहीन, जातिविहीन समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करणे होय. हा काही भारतातील एका विशिष्ट वर्गाचा, समूहाचा विषय किंवा प्रश्न नाही, तर सर्व भारतीयांचा आहे. हेच ध्येय, हीच भूमिका घेऊन आरक्षणपूर्व आणि आरक्षण अंमलबजावणीच्या काळात सामाजिक वास्तवाचे सातत्याने विश्लेषण होत राहिले आहे.

जन्मानुसार माणसाला उच्च-नीच ठरविणारी, त्याला धर्म-परंपरेचा आधार देणारी समाजव्यवस्था नष्ट झाली पाहिजे, यासाठी या देशात कृतिशील चळवळी झाल्या. आरक्षणपूर्व काळात आणि त्यानंतरही ज्यांना जातिव्यवस्थेची झळ बसली अशा समाजातील आणि ज्यांना झळ बसली नाही, अशाही समाजातील विवेकवादी, मानवतावादी सुमाजधुरीणांनी ही व्यवस्था बदलण्यासाठी सामाजिक प्रबोधनाबरोबर कठोर धर्मचिकित्साही केली. त्यातूनही मोठे वैचारिक संघर्ष झडले. पुढे त्याचे प्रतििबब भारतीय राज्यघटनेतही उमटले. आता संविधानपूर्व काळातील सामाजिक वास्तव, प्रबोधनाच्या चळवळी, समाजिक चळवळी, त्याची व्यापकता आणि संविधानोत्तर काळातील आजचे समाजवास्तव विशेषत: जात वास्तव समजून घेणे आवश्यक वाटते. त्यातून आज आपण नेमक्या कोणत्या मानसिकतेत आहोत, याचा उलगडा होणार आहे.

आरक्षणपूर्व आणि संविधानपूर्व काळातील सामाजिक विषमतेच्या विरोधात कोण कोण उभे राहिले आणि त्यांनी नेमकेपणाने ते वास्तव बदलण्यासाठी काय भूमिका घेतली, काय विचार मांडले आणि ते वर म्हटल्याप्रमाणे जातिव्यवस्थेची झळ पोहोचलेल्या एकाच वर्गातील किंवा समूहातील ते नव्हते, ही उदारता मुद्दाम समजून घेतली पाहिजे. त्याचा अगदी थोडक्यात आढावा..

केवळ भारताच्याच नव्हे तर जगभरातील सामाजिक विषमतेची मुळे ही धर्मव्यवस्थेत असल्याचे म्हटले गेले आहे. त्यावर महात्मा जोतिबा फुले म्हणतात, ‘या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवाने धर्मपुस्तके केली आहेत, त्यापैकी एकाही ग्रंथात आरंभापासून शेवटपर्यंत सारखे सार्वजनिक सत्य नाही. कारण प्रत्येक धर्म पुस्तकामध्ये काही एक व्यक्तींनी त्या वेळच्या प्रसंगास अनुसरून हेकटपणा केल्यामुळे ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकारक न होता, सहजच त्यांमध्ये अनेक फळ्या होऊन, त्या एकमेकांचा मनापासून हेवा व द्वेष करू लागतात.’ ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकातील फुल्यांची ही धर्मचिकित्सा सामाजिक समतेकडे जाण्याची पायवाट तयार करणारी ठरली.

आपण सारेच जण, राजकारणी, साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकत्रे उठता-बसता शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो, तर मग सामाजिक जडणघडणतील त्यांचे विचार आणि कृतीही समजून घेतली पाहिजे. जाती व्यवस्थेवरील शाहू महाराजांचे भाष्य मार्मिक आहे. ते म्हणतात, समाजातील विषमता, अन्याय, शोषण आदी समाजपुरुषांमध्ये जे दोष निर्माण झाले आहेत, याचे मूळ कारण जातिभेदात आहे. जातिभेद असू द्या, परंतु जातिद्वेष मात्र नको, असे म्हणणाऱ्यांना शाहू महाराज सुनावतात, ‘जातिभेदाचे कार्य जातिद्वेष आहे, तेव्हा कार्य नाहीसे करण्यास कारणही काढून टाकले पाहिजे.’ या जातिद्वेषाचे उच्चाटन करण्याचा एकच मार्ग म्हणजे, प्रथम सर्व जातिभेद मोडले पाहिजेत. एका राजाला जातिभेदाची एवढी का चिंता पडली होती? ते तर वर्णव्यवस्थेत वरच्या स्थानावर होते, राजे होते, मग त्यांना जातिभेदाची कसली झळ बसली होती? ते राजे होते, परंतु समाजचिंतक होते. दृष्टी स्वच्छ मानवतावादी होती, म्हणून ते चिंतित होते. शाहू महाराजांचे विचार नीट व नव्याने आजच्या संदर्भात गंभीरपणे समजून घेतले पाहिजेत.

आधी समाज सुधारणा की राजकीय सुधारणा या वादात उघडपणे आणि जहालपणे स्वराज्याची म्हणजेच राजकीय स्वातंत्र्याची बाजू घेणाऱ्या लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत टिळक तेवढय़ाच कडवेपणाने सामाजिक सुधारणेची बाजू घेतात. महात्मा फुल्यांना श्रीधरपंतांनी आदर्श मानले होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक नेतृत्व त्यांनी स्वीकारले होते. पुण्याच्या ‘केसरीवाडय़ा’त बाबासाहेबांच्या उपस्थितीत त्यांनी १० मे १९२८ रोजी ‘समाज समता संघा’ची स्थापना केली. त्यानिमित्त त्यांनी सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. वाडय़ात संघटनेचा फलक लावला, त्यावर मात्र त्यांनी ‘चातुर्वण्र्य विध्वंसक समाज-समता-संघ’ असे लिहिले होते. त्यातून त्यांचे सामाजिक विचार स्पष्ट होतात. श्रीधरपंत आपली सडेतोड सामाजिक भूमिका मांडताना म्हणतात, ‘समता, बंधुता व स्वतंत्रता या स्वातंत्र्यदेवीच्या मंदिरप्रवेशाच्या तीन पायऱ्या आहेत आणि जिन्याच्या दोन पायऱ्या सोडून एकदम तिसऱ्या पायरीवर उडी मारणारा इसम जसा गडगडत खाली येतो, तद्वत आपल्या समाजातील जातिद्वेषाची तीव्रता कमी करून प्रथम सामाजिक समता प्रस्थापित करण्याऐवजी एकदम स्वराज्य सूर्याला पकडण्यासाठी अंतराळात उड्डाण करू पाहणारे दूरदर्शी पुढारी फजित पावल्याखेरीज राहणार नाहीत.’ आता श्रीधरपंतांना तरी सामाजिक समतेचे काय पडले होते, ते तर वर्णव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर होते. ज्याच्यात माणुसकी जागी होती, तो जातिव्यवस्थेसारख्या अमानवी व्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकला. श्रीधरपंत त्या माळेतील एक होते.

प्रबोधनकार ठाकरे हे तर धर्मव्यवस्थेचे अतिजहाल टीकाकार होते. ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात ते म्हणतात, ‘सध्या लोकशाहीचे वारे वाहात आहे. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कुणाची प्राज्ञा नाही. अशा वेळी हिंदू देवळांतही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रांतल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राखरांगोळी केली पाहिजे.’ ..आणि ती कशी करायची त्याचे मार्गही त्यांनी सांगितले आहेत. प्रबोधनकारही काही धर्मव्यवस्थेने किंवा जातिव्यवस्थेने विस्थापित अथवा बाधित झालेले नव्हते; तरी त्या व्यवस्थांवर त्यांनी वैचारिक वज्रप्रहार केले. जो जो विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी तो तो अशा माणसामाणसांत भेद, द्वेष, मत्सर निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेला आव्हान देतोच, प्रबोधनकार हे त्यातील एक होते.

जातिव्यवस्थेची, धर्मव्यवस्थेची दाहकता, त्यामुळे होणारे व्यक्तीचे, समाजाचे आणि राष्ट्राचे नुकसान याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याइतकी शास्त्रशुद्ध, तार्किक आणि सद्धांतिक मांडणी कुणी केलेली नाही. जातिव्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकात त्यांनी जातीची काही लक्षणे आणि परिणाम सांगितले आहेत. जात ही समाजविघातक प्रवृत्ती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘ही समाजविघातक स्वार्थपरायण प्रवृत्ती जसे दोन एकाकी राष्ट्रांचे व्यवच्छेदक लक्षण आहे, तसेच ते विविध व एकाकी जातींचेही व्यवच्छेदक लक्षण आहे. ब्राह्मणाला ब्राह्मणेतरांच्या हिताविरोधात आपल्या हिताचे रक्षण करण्याची मुख्य काळजी असते, तर ब्राह्मणेतराला ब्राह्मणांच्या हिताविरोधात आपले हित जोपासण्याची. त्यामुळे हिंदू म्हणजे विविध जातींचा केवळ वर्गवार समूहच नाही तर तो स्वत:साठीच जगणाऱ्या स्वार्थी ध्येयाने प्रेरित युद्धखोर गटांचा समूह आहे.’  ते पुढे म्हणतात, ‘जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्र उभारू शकत नाही, तुम्ही नैतिकता उभारू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारले, तर त्याला तडेच जातील आणि ते एकजीव असणार नाही.’

एखादी अन्यायी व्यवस्था बदलण्यासाठी त्या व्यवस्थेने अन्याय केलेल्या समूहाबरोबरच अन्य समाजघटकांतील विवेकी लोकही पुढे आले पाहिजेत. वर उदाहरण दिलेल्या काही सत्पुरुषांचा फुले-आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीला हातभार लागला आहे. त्यांनी धर्मव्यवस्थेने दिलेले जन्माधारित जातवर्चस्व, वर्णवर्चस्व मानले नाही. उलट, ते झुगारूनच दिले असे म्हणावे लागेल. ज्यांचा जातीवर नव्हे, तर माणसावर आणि  माणुसकीवर विश्वास आहे, असे शाहू महाराज, श्रीधरपंत टिळक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवारी भाऊराव पाटील अशा अनेक समाजधुरीणांनी सामाजिक विषमतेच्या वैराण वाळवंटात समतेचे झरे निर्माण केले आणि फुले-आंबेडकरांनी अखंड संघर्षांतून प्रवाहित केलेला सामाजिक समतेचा प्रवाह समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आज त्याचे काय झाले, समतेचा हा प्रवाह अखंडित सुरू आहे की तो खंडित झाला आहे आणि आजचे नेमके सामाजिक वास्तव काय आहे, त्याची चर्चा करावी लागेल.