महेश सरलष्कर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम त्या राज्यातील राजकारणावर, तसेच प्रत्येक पक्षावर होणार आहेत. यंदा भाजपची कामगिरी २०१५ पेक्षा चांगली, तर काँग्रेसची वाईट झाली; संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार यांना कमकुवत करण्याचा अजेण्डा रीतसर राबवला गेला; अवघी एक जागा मिळवलेला लोकजनशक्ती पक्ष ‘सत्ताधाऱ्यांचा विश्वासू’ ठरणार हेही उघड झाले; तसेच ‘मजदूर-युवा’ हे राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगणारा तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि डावेही पुन्हा जिंकू लागले.. हे सारे, केवळ आकडे कुणाकडे जास्त यापेक्षा नक्कीच निराळे..

बिहार विधानसभेची निवडणूक १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतकी अटीतटीची झाली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) काठावरील बहुमत मिळाले. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने एकीकडे भाजपला, तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलालाही ‘मदत’ केली. काँग्रेसने ताकद लावली असती तर बहुमताचा आकडा कदाचित महाआघाडीकडे असता. बिहारची सत्ता तेजस्वी यादव यांच्या हातून थोडक्यात निसटली. पण आता बिहारवर भाजपचे वर्चस्व निर्माण होऊ शकेल. मोदी-शहांसाठी नितीशकुमार केवळ नामधारी असतील. त्यामुळे एनडीएतील सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष असलेल्या भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देणे हा तात्पुरत्या तडजोडीचा भाग असेल.

बिहारमध्ये आतापर्यंत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सत्तेत भाजप भागीदार होता. जनता दलाच्या जागा नेहमीच जास्त राहिल्या आणि भाजपला छोटय़ा भावाची भूमिका बजावावी लागली होती. नितीश कुमार यांनी भाजपला त्यांच्या तालावर नाचवले. बिहारमध्ये गेल्या १५ वर्षांत विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे नेतृत्व कधीही भाजपकडे नव्हते. पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदींना बिहारमध्ये नितीश कुमार यांनी प्रचार करू दिला नाही. फलकांवर मोदींची छायाचित्रे लावली गेली नाहीत. यंदा मात्र, फलकांवरून नितीशकुमार गायब झाले होते. मोदींच्या प्रचारसभेत ते पाहुणे होते. आता मुख्यमंत्रिपदही पाहुण्याजोगे असेल. बिहारच्या सत्तेवर भाजपचा वरचष्मा कधीही नव्हता. भाजपची ती मनीषा आता पूर्ण झाली आहे. उत्तरेच्या पट्टय़ातील राज्यांपैकी राजस्थान भाजपच्या हातून गेलेले असले, तरी या पट्टय़ावर आता भाजपचीच सत्ता आहे : हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आता बिहार. इथे सरकार एनडीएचे असेल; पण सत्ता भाजपची असेल. छत्तीसगड आणि झारखंड ही छोटी राज्ये भाजपच्या हातून निसटली. राजस्थानवर पुन्हा ‘रिसॉर्टमार्गे’ कब्जा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न काँग्रेसचे चाणाक्ष मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हाणून पाडला. बिहारमधील भाजपचा विजय पक्षाला पश्चिम बंगालमधील लढाईसाठी राजकीय ताकद देऊन गेला आहे. तिथे भाजपला खरोखरच रस्त्यावर उतरून सत्तेसाठी लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपचे सर्वेसर्वा अमित शहा यांची ‘चाणक्यनीती’ पश्चिम बंगालमध्ये पणाला लागेल.

बिहारमध्ये भाजपची कामगिरी अन्य पक्षांच्या तुलनेत चांगली झाली. या वेळी भाजपने ११० जागा लढवल्या आणि ७४ जिंकल्या. म्हणजे जागानिहाय विजयाचा दर (स्ट्राइक रेट) ६७ टक्के राहिला. २०१५ मध्ये भाजपने १५७ जागांपैकी ५३ जागा जिंकल्या होत्या. त्यांचा तेव्हाचा विजयाचा दर फक्त ३३ टक्के होता. याउलट, गेल्या वेळी भाजपविरोधात लढून संयुक्त जनता दलाचा हा दर तब्बल ७१ टक्के होता. या वेळी तो ३७ टक्क्यांवर आलेला आहे. ११५ जागांपैकी जेमतेम ४३ जागा जनता दलाला जिंकता आल्या आहेत. तरीही जनता दलाला चौथ्यांदा सत्तेत वाटा मिळाला आहे. पण तो देताना जनता दलाची ताकद भाजपने निम्म्यावर आणून ठेवली आहे.

‘ब’ची बक्षिसी

मोदींविरोधात नितीश कुमार यांनी केलेले ‘बंड’ भाजपने मोडून काढलेले आहे. त्यामुळेच जिंकूनही हरल्याचा सल नितीश कुमार यांना लागून राहील. त्यासाठी मोदी-शहांनी लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा चिराग पासवान यांना हाताशी धरले. भाजपचे प्यादे म्हणून वापरले गेल्याचा चिराग यांना आनंद आहे. भले त्यांच्या वाटय़ाला एकच जागा आली असेल, पण नितीश कुमार यांचे खच्चीकरण करून भाजपला मोठे यश मिळवून दिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. लोकजनशक्तीच्या  उमेदवारांनी फक्त जनता दलाविरोधात मते मिळवण्यावर भर दिला आणि राष्ट्रीय जनता दलाला जागा जिंकू दिल्या. भाजप नेतेगिरीला महत्त्व देणारा पक्ष नव्हे. पक्षासाठी नेत्याची उपयुक्तता किती याचा विचार करून त्याला महत्त्व दिले जाते. मोदी-शहांच्या या बदललेल्या भाजपला न ओळखू शकलेले एकतर पक्ष सोडून गेले वा मार्गदर्शक मंडळात निघून गेले. ‘उपयुक्त’ नेत्याला भाजपमध्ये ‘बक्षिसी’ दिली जाते. चिराग पासवान भाजपमध्ये नाहीत हे खरे, पण त्यांचा पक्ष भाजपच्या वेगवेगळ्या ‘ब चमूं’पैकी एक असल्याने चिराग यांना आज ना उद्या ‘बक्षिसी’ दिली जाईल. त्यासाठी वाट पाहण्याची चिराग यांची मानसिक आणि राजकीय तयारीदेखील आहे.

बिहारमध्ये पुढील दोन-तीन वर्षांत राजकीय समीकरणे बदलू शकतील. भाजपचाच मुख्यमंत्री असला पाहिजे असे उद्या नितीश कुमार यांनाही ‘जाणवू’ शकते!

बिहारच्या निकालावरून अधोरेखित झालेली बाब म्हणजे लोकांनी पक्षाला मते द्यावीत असे वाटत असेल तर फक्त नकारात्मक प्रचार करून उपयोग होत नाही. १५ वर्षांत नितीशकु मार यांच्याविरोधात वाढत गेलेली नाराजी भाजपने आपल्या खांद्यावर घेण्याचे टाळले. बिहारमध्ये जे वाईट त्याची जबाबदारी नितीश कुमार यांची, अशी भूमिका घेत भाजपने अखेपर्यंत प्रचार केला. केंद्रातील विकास योजनांभोवती मोदींचा प्रचार राहिला. आगामी वर्षांमध्ये हीच बाब भाजप लोकांच्या मनावर बिंबवू शकेल. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात झालेल्या बिहार विजयोत्सवाच्या भाषणातदेखील मोदींनी भाजपच्या यशाचे रहस्य ‘विकासा’त असल्याचे सांगितले होते. लोकांपर्यंत विकास पोहोचतो की नाही यापेक्षाही विकास होत असल्याचे वातावरण तयार करणेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरू शकते, हे लोकसभा निवडणुकीत दिसले.

काँग्रेस कमीच

सकारात्मक प्रचार करण्यात काँग्रेस अलीकडच्या काळात कमी पडलेला दिसतो. या पक्षाचा बिहारमधील निवडणूक प्रचारही लोकसभा निवडणुकीप्रमाणे नकारात्मक होता. पक्षबांधणीत काँग्रेस कमकुवत असल्याचे लपून राहिलेले नाही. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची पक्षसंघटनाही फार मजबूत नाही, तरीही तेजस्वी यांच्या प्रचारात मतदारांना त्यांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब दिसले, तसे काँग्रेसच्या प्रचारात दिसले नाही. भाजपच्या केंद्रातील धोरणावर टीका करण्यावर काँग्रेसच्या प्रचाराचा भर होता. हाच मुद्दा मोदींनी भाजपच्या मुख्यालयातील भाषणात नेमकेपणाने उपस्थित केला. काँग्रेसचा उल्लेख टाळत ते म्हणाले की, राजकीय पक्ष काय देऊ शकतात, कोणत्या नव्या कल्पना ते मांडतात याकडे लोक बारकाईने पाहात आहेत. अशा पक्षांना लोक प्रतिसाद देतात. म्हणून भाजप हा देशव्यापी पक्ष ठरला असून मतदार भाजपला वारंवार संधी देतात. बिहारमध्ये २०१५ मध्ये काँग्रेसचा विजयाचा दर सुमारे ६६ टक्के (४१ पैकी २७ जागा) होता, या वेळी तो २७ टक्के आहे. यंदा काँग्रेसला ७० पैकी १९ जागा मिळवता आल्या. खरे तर काँग्रेसला ७० जागा देण्यास तेजस्वी यांची तयारी नव्हती असे सांगितले जाते, पण लालूप्रसाद यादव यांच्यापुढे त्यांचा नाइलाज झाला असावा. काँग्रेसबाबत सांगायचे तर, हाथरस प्रकरणात रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांनी मोदी-शहांच्या विरोधात उभे राहून संघर्ष केला, तसा तो सातत्याने करावा लागेल. पण त्याचबरोबर लोकांना आकर्षित करणारा नवा अजेण्डा, नव्या कल्पना, त्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याची नवी पद्धत काँग्रेसला अवलंबावी लागेल असे दिसते.

नवे ‘एम-वाय’!

यंदाच्या बिहार निवडणुकीत हरूनही जिंकलेला पक्ष म्हणजे राष्ट्रीय जनता दल. तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाला एकहाती ७५ जागा जिंकून दिल्या आणि राजद सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. गेल्या वेळी लालूप्रसाद, नितीश कुमार असे दिग्गज भाजपविरोधात एकत्र उभे ठाकले होते. या वेळी भाजप आणि जनता दलाविरोधात एकटय़ा तेजस्वी यांनी किल्ला लढवला. तेजस्वी यांचा प्रचार सकारात्मक होता. त्यांनी दहा लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. त्या कशा दिल्या जाऊ शकतात हेही सांगितले. मुस्लीम-यादव हा पारंपरिक जनाधार म्हणजे ‘एम-वाय’ समीकरण. पण तेजस्वी यांनी ‘एम-वाय’ला मजदूर व युवक असे संबोधले. राजद हा फक्त मुस्लीम-यादवांचा पक्ष राहिलेला नाही, तो सगळ्या जाती-जमातींचा असल्याचे ठसवले. कामगार आणि तरुणांना आकर्षित केले.

तेजस्वी हे जेमतेम तिशीत आहेत, राजकारणात नवे खेळाडू आहेत; पण बिहारी जनतेची नस त्यांनी बरोबर ओळखली आहे. तरुणांना केवळ सामाजिक न्याय नव्हे, तर आर्थिक न्यायाची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी ‘एम-वाय’ समीकरणाच्या पलीकडे जाऊन मते देण्याचे लोकांना आवाहन केले. बिहार विधानसभेत महाआघाडीला ११० जागा मिळाल्या असून राजदसारखा सशक्त विरोधी पक्ष भाजपला आव्हान देताना पाहायला मिळू शकेल. या निवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे, तिघा डाव्या पक्षांना मिळालेल्या १६ जागा. भाकप आणि माकपचे प्रत्येकी दोन, तर भाकप-माले या पक्षाचे १२ उमेदवार विजयी झाले. कित्येक वर्षे भूमिगत राहून संघर्ष करणाऱ्या या कडव्या संघटनांनी संसदीय लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना गेल्या निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. पण यंदा मिळालेले त्यांचे यश काँग्रेसच्या तुलनेत ‘उजवे’ ठरले. पुढील सहा महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक आहे, या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये डाव्या पक्षांच्या वाढलेल्या जागा विचारात घेता येतील. भाकप-मालेला महाआघाडीत सहभागी करून घेण्याचा तेजस्वी यांचा निर्णय योग्य ठरला असे म्हणता येईल.

mahesh.sarlashkar@expressindia.com