शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज पृथ्वीराज कपूर. त्यांचा जन्म कोलकाता येथे १८ मार्च १९३८ मध्ये झाला. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे नाटय़ आणि चित्रपटांमध्ये काम करायचे. मोठे बंधू आणि प्रसिद्ध अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा घेतलेला हा आढावा.

शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झाले.  शशी कपूर यांनी कमी वयातच चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास सुरुवात केली. १९४० मध्ये ‘शशीराज’, १९४१ मध्ये ‘मीना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले, तर १९४५ मध्ये ‘बचपन’मधून त्यांनी भूमिका साकारली. प्रामुख्याने त्यांनी अभिनेता राज कपूर यांच्या बालपण ते तरुण वयातील भूमिका साकारल्या. यापैकी स्मरणातील चित्रपट म्हणजे ‘आग’ (१९४८), ‘आवारा’ (१९५१). त्यांनी बाल कलाकार म्हणून १९४४ ते १९५४ या दहा वर्षांच्या काळात १९ चित्रपटांमध्ये काम केले. या काळात ते नाटकांमध्येही सक्रिय होते.

पृथ्वीभोवतीचे जग..

‘पृथ्वी थिएटर्स’चा वारसा त्यांनी वडिलांकडून घेतला, तिथेच अभिनयाचे बाळकडू मिळाले. तोच वारसा पुढे नेताना रंगभूमीवर काम करतानाच योगायोगाने त्यांची गाठ जगप्रसिध्द नाटय़कर्मी जेफ्री केंडेल यांच्याशी पडली. रंगमंचावर काम करत असतानाच केंडेल यांची मुलगी जेनिफर यांच्याशी शशी कपूर यांची कोलकत्त्यात भेट झाली. ही भेट प्रेमात आणि नंतर कायमची विवाह बंधनात अडकली. जेनिफर यांच्याबरोबर ‘पृथ्वी थिएटर्स’चा डोलारा सांभाळतानाच या दोघांनी ‘र्मचट आयव्हरी’ प्रॉडक्शनच्या इंग्रजी चित्रपटांतून एकत्र काम केले. त्यानंतर शशी कपूर यांनी स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केली. जेनिफर यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर शशी कपूर यांना तो धक्का पचवता आला नाही. त्यानंतर ‘पृथ्वी थिएटर्स’ची धुरा त्यांची मुलगी संजना कपूर यांनी सांभाळली.

१९५९ मध्ये त्यांना सुनील दत्त यांच्या ‘पोस्ट बॉक्स ९९९’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. याच वर्षी ‘गेस्ट हाऊस’ या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शन केले.

याशिवाय प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी प्रेक्षकांनी स्वीकारली. अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत ‘वक्त’ (१९६५), ‘आमने सामने’ (१९६७), तसेच अभिनेत्री राखीसोबत ‘शर्मिली’ (१९७१), ‘कभी कभी’ (१९७६) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तसेच बबिता यांच्यासोबत ‘हसिना मान जाएगी’ (१९६८), आशा पारेखसोबत ‘कन्यादान’ आणि ‘प्यार का मौसम’ (१९६९) या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. या अभिनेत्रींसोबतच शशी कपूर यांनी झीनत अमान, परवीन बाबी, मौसमी चॅटर्जी, हेमामालिनी, मुमताज, रेखा यांच्यासोबत काम केले आहे.

गाजलेल्या चित्रपटांपेक्षाही शशी कपूर यांच्या अभिनयाने ‘न्यू दिल्ली टाइम्स’ (१९८५) या चित्रपटामध्ये प्रेक्षकांची वाहवा मिळविली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

धर्मपुत्र

शशी कपूर यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून ‘धर्मपुत्र’ (१९६१) या चित्रपटामध्ये काम केले. यानंतर त्यांनी जवळपास तीन दशके सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या काळात त्यांनी ६३ चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या, तर ५३ चित्रपटांमध्ये सहकारी अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये काम केले. तसेच २२ चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले

नंदासोबत यशस्वी

शशी कपूर यांनी तत्कालीन सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले; परंतू त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी केवळ काही जणींसोबतच स्वीकारली. नंदा या अभिनेत्रीसोबत त्यांच्या चित्रपटांना तुफान यश मिळाले. यामध्ये ‘मोहब्बत इसको कहते है’, ‘जब जब फूल खिले’ (१९६५), ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’ (१९६६), ‘राजा साब’ (१९६९), ‘रूठा ना करो’ (१९७०) या चित्रपटांचा समावेश होतो.