शेतकरी आत्महत्या का करतात? काय आहे त्यांचे दुखणे? केंद्र आणि राज्य सरकारने आजवर अब्जावधी रुपयांची पॅकेजेदिली. परंतु वाळूत पाणी टाकावे तसे त्या पैशाचे झाले. प्रश्न जागच्या जागीच राहिला. का थांबत नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या? अनेकांच्या मनाला या सवालांच्या इंगळ्या डसत आहेत. अनेक जण या ना त्या प्रकारे या प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉ. करुणाकरन हे त्यातलेच एक. त्यांनी या प्रश्नाचा आधी अभ्यास केला आणि आपल्या परीने त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून उभे राहिले स्मार्ट किसान.असे उपक्रम आणि उपक्रमशील कार्यकर्ते पाहिले की आपल्यासमोरील कलंकमुक्तीचे आव्हान या महाराष्ट्राला नक्कीच पेलता येईल असा विश्वास जागा होतो..

शेतकरी आत्महत्यांनी विदर्भ-मराठवाडा जगभर कलंकित होत असतानाच त्याच्या मुळाशी जाऊन त्या थांबविण्याचा प्रयत्न विविध मार्गानी होऊ लागला. केंद्र व राज्य शासनाप्रमाणेच अनेक स्वयंसेवी संस्था आत्महत्यांमागील कारणांचा शोध घेऊ लागल्या. ज्येष्ठ गांधीवादी डॉ. करुणाकरन यांनी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात फि रून अभ्यास केला. त्यांचा निष्कर्ष वेगळाच होता. आत्महत्या शेतकऱ्यांची नाही, तर शेतीची होत आहे. एकही शेतकरी आपल्या मुलाला शेतकरी करण्यास तयार नाही. असे असेल, तर या कृषिप्रधान देशाचे भवितव्य काय? तेव्हा डॉ. करुणाकरन यांनी मंत्र दिला तो शेतीला वाचविण्याचा. शेती फायदेशीर आणि सन्मानजनक होत नाही, तोपर्यंत ती वाचणे कठीण आहे. पण हे सांगणे सोपे. असे सांगणारे फुकटचे सल्लागार समाजमाध्यमांतून सत्राशेसाठ दिसतील. मुद्दा करून दाखविण्याचा होता. महात्मा गांधींनी हाच तर संदेश दिला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. करुणाकरन उभे ठाकले.

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेचे ते संचालक होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ठरविले, आपणच समाजासमोर उदाहरण ठेवायचे. पण शेती करायची तर त्यासाठी हवी शेतजमीन. १९३६ ला महात्मा गांधींच्या प्रेरणेने महारोगी सेवा समिती स्थापन झाली होती. पण आता कुष्ठरुग्णांअभावी तिचे कार्य ठप्प पडले होते. सरकारी अनुदान बंद झाले होते. या संस्थेची दत्तपूरला १८० एकर शेतजमीन होती. तेव्हा संस्थाध्यक्ष डॉ. विभा गुप्ता यांनी डॉ. करुणाकरन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यातूनच उभा राहिला ‘स्मार्ट किसान’ हा शेतकऱ्यांना आत्महत्याकारक स्थितीकडून आत्मनिर्भरतेकडे नेणारा उपक्रम. गुरुकुलाच्या धर्तीवर तेथे कृषिकुल उभे करण्याचा संकल्प करण्यात आला. तेथे शेतकऱ्यांच्या मुलांनी यावे, शिकावे, स्मार्ट शेती करावी आणि हे शिकून इतरांना शिकवावे, अशी ती योजना. त्यासाठी घरी थोडीबहुत शेती असणारे, पण मजूर म्हणून राबणाऱ्या, त्यामुळे शिक्षणवंचित झालेल्या, तसेच दुष्काळग्रस्त भागातील, शेतकरी-आत्महत्या-कुटुंबातील मुलांना आवाहन करण्यात आले. वर्धा जिल्ह्य़ातील तर अशा सर्वच कुटुंबातील मुलांना पत्र पाठवून येण्याची विनंती करण्यात आली. परंतु प्रतिसाद शून्य. अखेर बीड जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त गावातील १५ मुले ‘फ्लोरा फोऊंडेशन’च्या माध्यमातून दत्तपूरला आली. कळंब तालुक्यातील १५ आणि वर्धा जिल्ह्य़ातील पाच मुलेही तयार झाली. या मुलांच्या भविष्याच्या या उपक्रमास नाव देण्यात आले ‘अ‍ॅग्रींडस’. (अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्री.) आणि सुरू झाला स्मार्ट किसान तयार करण्याचा अनोखा प्रयोग.

प्रथम चार-चार मुलांचे गट करण्यात आले. त्यांना ‘शिवाजीराजे, सावित्रीबाई फु ले, बिरसा मुंडा, युवाशक्ती’ अशी नावे देण्यात आली. प्रत्येक गटाकडे दोन एकर जमीन सोपविली. कामाची प्रात्यक्षिके, वर्गानुभव आणि व्यक्तिमत्त्व विकास हा त्यांचा ‘अभ्यासक्रम’ ठरला. नांगरणी, पेरणी, कापणी, मोजणी आणि शेवटी विक्री, असे कार्यानुभवाचे टप्पे ठरले. घरची शेतीची दैन्यवस्था पाहून या मुलांमध्ये शेतीविषयीच उदासीनता आली होती. पण तीच मुले येथे काळ्या मातीत घाम गाळू लागली. परळी-भिलगावचा मंगेश कडभाने हा त्यातलाच एक. तो सांगत होता, ‘घरी एकदा पाण्याचा पंप सुरू केला की, तो बंद करण्याची तसदीही घेत नव्हतो. पण इथं लिटरचा हिशेब ठेवून पिकांना पाणी देतो. इथं पाण्याची बचत समजली.’ शेतीतील नापिकीने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सौरभ भोंगे याला येथेच, ‘सुरुवातीलाच रसायने वापरली, तर रोपटी अशक्त होतात. त्यांना सशक्त करण्यासाठी पुन्हा खते द्यावी लागतात. हा औषधोपचार व्यर्थ आहे,’ अशी समज आली. हे मुलांचे शिकणे होते. सिद्घसार खरी येथील पंकज फ रकाडे सांगतो, ‘शेतीवरचा खर्च कमी केला, तर ती परवडू शकते.’ त्याचा हा अनुभव फार महत्त्वाचा होता. त्यांच्या ‘सावित्रीबाई फु ले अ‍ॅग्रींडस’ गटाने एकरी २५ क्विंटल भेंडी घेण्याचा विक्रम केला. बारावी उत्तीर्ण तुळजा कुवेकर हिने सव्वा महिन्याचे मेथीचे पीक घेऊन मिरची लागवड सुरू केली. गोड मक्याचे एक कणीस दलालामार्फ त विकले, तर दोन रुपयांत खपते. स्वत: बाजारात नेऊन विकले, तर प्रत्येकी १० रुपये मिळतात. तेच भाजून विकले, तर त्याचे २० रुपये येतात, हे बाजाराचे अर्थशास्त्रही ही मुले येथे शिकली. या शेतात सुमारे २० प्रकारची उत्पादने मुलांनी घेतली. त्यातून त्यांना फायदाही मिळाला. डॉ. करुणाकरन अभिमानाने सांगतात, ‘प्रत्येक गटाला २५ हजार रुपये देण्यात आले होते. शेतमालाची स्वत: विक्री करणाऱ्या प्रत्येक गटाने दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची परतफे ड केली. हे माझे स्मार्ट किसान आहेत. ते गावात जातील तेव्हा दहा शेतकऱ्यांना तयार करतील. हे शेतीदूत फ सणार नाहीत.’

शेती हे विज्ञान आहे म्हणून त्याचे गणितही आहे. नफो व तोटय़ाचे समीकरण मांडूनच ते सोडवावे, असे सांगणाऱ्या डॉ. करुणाकरन यांनी या उपक्रमासाठी लागणारा पैसा कुठून आणला? त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते हसले. डॉ. करुणाकरन हे आयआयटी (दिल्ली) आणि चेन्नईत प्राध्यापक होते. गांधीग्राम (तामिळनाडू) आणि चित्रकूट (मध्य प्रदेश) विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते. या दीर्घ अध्यापन-प्रवासात त्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले. वध्र्यात स्थिरावण्याचा निर्णय झाल्यावर ते मराठी शिकले. पोलॅरिस नामक कंपनीत त्यांचा एक शिष्य आहे. त्याला जेव्हा समजले, की शेतीचे चित्र पालटण्यासाठी आणि भविष्यातील शेती घडविण्यासाठी आपले सर काम करीत आहेत, तेव्हा तो धावून आला. ८० लाख रुपयांची गुरुदक्षिणा सरांकडे सुपूर्द करून गेला. मुंबई आयआयटीचे प्रा. डॉ. देवांग कक्कर यांनी या संपूर्ण उपक्रमास सौरऊर्जा प्रकल्प तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. आयआयटीचे असे अनेक माजी विद्यार्थी डॉ. करुणाकरन यांच्या पाठीशी उभे आहेत.

या उपक्रमातून तयार झालेले हे स्मार्ट किसान नंतर आपल्या गावी जातील. तेथे शेती करतील. येथे ट्रॅक्टर चालविण्यास शिकलेली सुवर्णा भोपळे म्हणते, ‘गावकरी तोंडात बोटे घालतील अशी शेती मी गावात करणार आहे.’ असेच प्रत्येकाचे बोल आहेत.

वर्षभराच्या या उपक्रमास शेतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण होते. तेथे पहाटे प्रार्थना, न्याहारी व ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या निवडक बातम्यांचे वाचन झाल्यानंतर कामाला लागतात. सायंकाळी परतल्यावर संगणक शिक्षण, कागदापासून लिफोफे , पिशव्या वगैरे वस्तू तयार करणे, कापसाचा पेळू करणे, गूळ निर्मिती, केंद्रीय खते, टोमॅटो ज्यूस, लोणची तयार करणे, असे कृषिपूरक उद्योग समजून घेतात. संगणकावर शेतीखर्च व विक्रीचा हिशेब ठेवतात. प्रगतिशील शेतकरी व कृषितज्ज्ञ वेगवेगळ्या दिवशी त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना मुले कृषिऋषी संबोधतात. गुरुकुल पद्धतीप्रमाणे निवास-भोजन-शिक्षणाची सोय मिळालेली ही मुले ‘शेतीच उत्तम’ असे आता म्हणू लागली आहेत. हा स्मार्ट किसान नव्हे काय, असा प्रश्न समन्वयक प्रभाकर पाटील हे विचारतात.

टोमॅटोला भाव नाही म्हणून ते फे कण्याऐवजी त्याचा ज्यूस काढून तो विकण्याचे तंत्र गवसलेली मुले अ‍ॅग्रींडस पदविकाधारक होणार आहेत. वर्षभराच्या अनुभवाअंती त्यांना प्रमाणपत्र मिळेल. त्याला शासनमान्यतेची गरज नाही. कारण, त्यांना नोकरीच करायची नाही. हेच प्रमाणपत्रधारक विद्यार्थी उद्या गाव घडवतील. तेव्हा सरकारच त्यांची मदत घेण्यासाठी धावत येईल, असा डॉ. करुणाकरन यांचा विश्वास आहे. रोज बारा तास कष्ट वेचूनही चेहऱ्यावर हास्य विलसणाऱ्या त्या स्मार्ट किसानांचे बोलके चेहरे हा विश्वास खरा ठरवतील, यात शंका नाही..

प्रत्येक गटाला २५ हजार रुपये देण्यात आले होते. शेतमालाची स्वत: विक्री करणाऱ्या प्रत्येक गटाने दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची परतफे ड केली. हे माझे स्मार्ट किसान आहेत. ते गावात जातील तेव्हा दहा शेतकऱ्यांना तयार करतील. हे शेतीदूत फ सणार नाहीत.  डॉ. करुणाकरन