14 August 2020

News Flash

आत्महत्यांचे सामाजिक संदर्भ..

मानसिक आजार व मनाचा अभ्यास हाच मुळी आधुनिक काळात- म्हणजे १९ व्या शतकापासून विशेष शाखा म्हणून विकसित व्हायला लागलेला विषय.

संग्रहित छायाचित्र

मुक्ता मनोहर

करोनाच्या अतिशय आव्हानाच्या काळात आणि अर्थव्यवस्था ठप्प झालेली असतानाही, सुशांतसिंह राजपूत या ‘सेलिब्रेटी’च्या आत्महत्येविषयीच्या चर्चेने प्रसारमाध्यमांपासून समाजमाध्यमांपर्यंतचा अवकाश व्यापला. परंतु कुठलीही आत्महत्या स्थळकाळाच्या संदर्भातच समजून घ्यावी लागते, याचे भान या चर्चेत राखले गेले का?

सेलिब्रेटी सुशांतसिंह राजपूत हा नट आत्महत्या करतो काय आणि करोनाच्या भयावह व चिंताग्रस्त वातावरणात गुदमरून जाणाऱ्या लाखो लोकांना सनसनाटी नवी बातमी पुरवण्याची संधी माध्यमांना मिळते काय; सगळेच गंभीर, विचार करायला लावणारे. नव्या मालिका बंद, काही नवीन घडण्याच्या शक्यताही बंद अशा वातावरणात ही घटना घडते आणि बऱ्याच चित्रवाणी माध्यमांना आपली सारी कल्पकता ‘हॉट केक’सारखी प्रेक्षकांना ‘सव्‍‌र्ह’ करण्याची संधी मिळते. गेल्या तीन आठवडय़ांत, ‘सुशांतची आत्महत्या नव्हे.. पुरेसे पुरावे हाती आहेत की तो खून आहे?’, ‘सुशांतच्या आत्महत्येचे रहस्य उलगडले..’, ‘त्या रात्री सुशांतच्या फ्लॅटमध्ये नक्की काय घडले?’ अशा प्रकारचे काहीही अतार्किक आणि हास्यास्पद आपण ऐकलेले आहे. शिवाय खुद्द त्याच्याच नावाने खोटय़ा बातम्या ट्वीट करणे, त्याच्या मृत्यूबद्दल बिनदिक्कत टवाळी केल्यासारख्या प्रतिक्रिया लिहिणे.. कित्येक मानवी मेंदू गेल्या तीन आठवडय़ांत जणू तरारून उठले. हे इतके अति झाले की, भारताच्या ‘सेंटर फॉर मेंटल हेल्थ लॉ अ‍ॅण्ड पॉलिसी’च्या वतीने त्यांच्या ट्विटर खात्यावर सूचना दिल्या गेल्या. माध्यमांनी त्याचे पालन करावे ही अपेक्षा होती.

या सूचना होत्या एखाद्या सेलिब्रेटीने आत्महत्या केली तर बातमी कशी दिली जावी, याबाबत! म्हणजे बातमीला पहिल्या पानावर छापू नका, आत्महत्या कशी केली त्याचे वर्णन व तपशील प्रसृत करू नका, आत्महत्येबाबतची निश्चित माहिती पुढे आलेली नसताना कोणतेही अंदाज देत बसू नका, त्या घटनेला एखादी भयानक घटना म्हणून रंगवू नका, त्या व्यक्तीने समाजासाठी जे योगदान दिले असेल त्याची माहिती देण्याचे काम करा, आदी सूचनांचा त्यात समावेश होता. अर्थातच अशा सूचना कोणीही दिलेल्या असल्या, तरी त्या काही मनावर घ्यायच्या नसतात अशीच धारणा लोकांची आणि माध्यमांची होती. म्हणून त्या सूचनांना बहुतांश जणांकडून काडीचीही किंमत दिली गेली नाही व दीर्घकाळ सुशांतच्या आत्महत्येभोवती लोकरंजन सुरूच राहिले. माध्यमांनी आपला ‘टीआरपी’ सुरक्षित केला. अर्थात, अगदी अपवादाने काही वृत्तवाहिन्यांवर मानसिक आजारांबाबत माहितीपूर्ण चर्चा घडवण्याचा प्रयत्न झालाही. मानसिक ताणतणाव ही गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे; डिप्रेशन, अँग्झायटी, पोलर डिसऑर्डर, डिमेन्शिया, अल्झायमर असे किती तरी प्रकारचे मानसिक आजार आहेत आणि त्यावर औषधोपचार करावे लागतात, ही माहिती तज्ज्ञांमार्फत पुढे आणली गेली. पण तरी हा आत्महत्येचे रूपांतर मनोरंजनात करण्याचा प्रकार सुरूच राहिला. खरे तर या प्रश्नाचे स्वरूप आपल्या देशात जास्तच गुंतागुंतीचे आहे.

प्रसिद्धीमुळे वलयांकित झालेल्या व्यक्तींची कार्यक्षेत्रे असतात, ज्यात त्यांनी कर्तृत्व केलेले असतेच. मात्र कर्तृत्वाचे कार्यक्षेत्र कोणते आहे, यावरही ती व्यक्ती सेलिब्रेटी आहे की नाही हे ठरते. आपल्याकडे सिनेमा जगतातले नट-नटी, गायक, नर्तक तसेच लोकप्रिय खेळांतले खेळाडू सेलिब्रेटी ठरतात. प्रसिद्धी, पसा आणि लोकप्रियतेवर सदैव आरूढ राहणे ही गुंतागुंतीची, पण व्यक्तिकेंद्री प्रक्रिया आहे. परंतु अनेकदा हे सेलिब्रेटी समाजापासून वर तरंगत राहतात.. एखाद्या दंतकथेसारखे! ही मंडळी स्थळकाळापासून मुक्त झाल्यासारखीच भासत राहतात आणि त्यांच्यासारखे होण्याची स्वप्ने लोक बघत राहतात. भारतात २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक हे कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यातले ८० टक्के लोक इलाजापर्यंत जाऊच शकत नाहीत, अशी माहिती पुढे आली. शिवाय आजच्या करोनाकाळात तर या प्रश्नाची गुंतागुंत आणखी वाढलेली आहे. नोकऱ्या जाणे, आर्थिक उत्पन्न कमी होणे, कर्जबाजारी होणे, धंदा बंद होणे यांतून प्रचंड तणाव सर्व स्तरांतील माणसांमध्ये तयार झालेले आहेत. त्यामुळेच या प्रश्नाच्या मुळाशी असलेली सामाजिक कारणे लक्षात घेतली नाहीत, तर मानसिक आजार केवळ औषधांनी बरे होतील ही शक्यता धूसर होते.

तसेही आपल्या देशात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद यंत्रणेचे २००१ ते २०१५ या दीड दशकातले आकडे दाखवतात की, या काळात २,३४,६४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. तसेच ९९,७५६ विद्यार्थ्यांनी आणि १,४४,९७४ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. वरील तिन्ही स्तरांतील माणसांच्या आत्महत्या वाढताहेत. २०१६ साली आरोग्यावर काम करणाऱ्या ३० संस्थांनी भारतात होणाऱ्या आत्महत्यांचा अभ्यास केला. त्यातून भारतात एक लाख स्त्रियांमधल्या १५ स्त्रिया आत्महत्या करतात, तसेच १५ ते ३० या वयोगटातल्या स्त्रिया कौटुंबिक दडपणांमुळे आत्महत्या करतात, ही बाब स्पष्ट झाली. असे असूनही सेलिब्रेटींच्या आत्महत्येलाच एवढे महत्त्व का, हा प्रश्न उपस्थित होतो.

मानसिक आजार व मनाचा अभ्यास हाच मुळी आधुनिक काळात- म्हणजे १९ व्या शतकापासून विशेष शाखा म्हणून विकसित व्हायला लागलेला विषय. माणसाचा मेंदू, माणसाचे मन आणि मानवी संस्कृती असे संदर्भ घेऊन त्याचा अभ्यास करावा लागतो. शिक्षण, आरोग्य आणि संशोधन या बाबतींत फारच मागे असलेल्या भारतासारख्या देशापुढे तर ही बाब फारच मोठे आव्हान उभे करते. त्यामुळेच सेलिब्रेटीच्या आत्महत्येचा उपयोग प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी करू नका, ही सूचना एखाद्या संस्थेकडून केली जाते; पण त्याचाही फारसा परिणाम होत नाही.

सुशांतच्या आत्महत्येच्या संदर्भात- तो ज्या सिनेसृष्टीत उभे राहू इच्छित होता त्याशी याचा संबंध आहे की नाही, त्याला मानसिक असह्य़ तणाव होता की नाही, वगैरे गोष्टींबद्दल सतत होणाऱ्या चच्रेतून सामान्य प्रेक्षकांना काय संदेश जातो? त्यांना कोणती दिशा मिळू शकते? ज्यांच्या आयुष्याच्या कोणत्याही प्रश्नाचा त्याच्याशी संबंध नाही आणि तरी ते त्या आत्महत्येत रमत राहतील; स्वतचे आयुष्य आणि प्रश्न विसरत राहतील, असा क्रम आपोआप घडतो.

शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या हा विषय घेतला तर त्यांची मोठी संख्याच त्या प्रश्नाच्या सामाजिक मुळाशी जाण्याचे आवाहन करते. बेकारीबाबतही तेच. स्त्रियांबाबतही तेच. या आत्महत्यांची कारणे दूर करायची असतील, तर समाजातच काही मूलभूत बदल करावे लागतील. मात्र मग प्रेक्षकांना केवळ बघ्याची भूमिका देऊनही भागणार नाही. त्या प्रश्नाबाबत त्यांना सक्रियही व्हावे लागेल. मात्र, सक्रिय होण्यासाठी मनोभूमिकाही वेगळ्या पद्धतीने घडवावी लागते, जी माध्यमांना घडवायचीच नसते. याचे कारण कॉर्पोरेट जग मुळातच प्रचंड विषमतेवर उभारलेले आहे आणि टीव्हीसारखी घरोघर पोहोचलेली प्रभावी ‘प्रचारमाध्यमे’ ही कॉर्पोरेटच्या मालकीची आहेत. मग ही मंडळी प्रेक्षकांना सुजाण व सक्रिय करण्याच्या फंदातच कशाला पडतील? नफाकेंद्रित बाजारपेठीय तत्त्वावर आधारलेल्या या रचनेत प्रेक्षक ‘खरेदीदार’ झाले पाहिजेत म्हणून जाहिरातींचा सतत मारा केला जातो. त्यामुळे प्रसंगांची, वस्तूंची निवड करताना विवेकबुद्धी जागृत राहू शकत नाही; सत्य परिस्थिती शोधायची इच्छा राहत नाही आणि झालीच तर ती पूर्ण होऊच शकणार नाही, अशी रचना केली जाते.

जाहिरातींतून काय साधते? प्रसिद्ध अमेरिकी विचारवंत नॉम चॉम्स्की यांनी हा विषय अतिशय प्रभावीपणे जगापुढे आणला. त्यांच्या मते, प्रचंड संख्येने असणाऱ्या जनतेला नियंत्रित करायचे असेल तर त्यांच्यात सतत वस्तू घेण्याची, वापरण्याची इच्छा किंवा हावच विकसित केली पाहिजे. जाहिरातींतून नेमके हेच साध्य होते. एवढेच नाही, तर यासाठी लोकांना अगदी वरवरच्या (सुपरफिशियल) गोष्टींमध्येच रंगून जाऊ देणे आवश्यक असते. विसाव्या शतकात अमेरिकेमधल्या अनेक विद्वान मंडळींनी- लोकशाही नीटपणे चालवायची असेल तर लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनांना आणि श्रद्धांना नियंत्रित केले पाहिजे, असे मत जोरदारपणे मांडले. लोकांना केवळ बघण्याची भूमिका दिली तरच जबाबदार लोकांना देशाचा कारभार चालवता येईल, हेच सूत्र जाहिरात धंद्यानेही उचलले.

अशा पद्धतीने असंख्य माणसे जर निष्क्रिय असतील, तर त्यांना वास्तव कधीच समजणार नाही. करोनाच्या अतिशय आव्हानाच्या काळात आणि अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना लोकांना काही दिवस का होईना, सुशांत या सेलिब्रेटीच्या आत्महत्येबाबत गुंगवून टाकण्यात चित्रवाणी माध्यमांना यश मिळालेही. त्याच्या आत्महत्येच्या अनुषंगाने आत्महत्या केलेल्या इतर अनेक सेलिब्रेटींच्या आठवणीही रंगविल्या गेल्या. मात्र, सेलिब्रेटींच्या आत्महत्याही स्थळकाळाच्या संदर्भातच समजून घ्याव्या लागतील. अशा सगळ्या आत्महत्यांचे एकच एक गाठोडे बांधता येणार नाही. सामाजिक संदर्भ सोडून तर नाहीच नाही. पण तरी अशा आत्महत्यांना आजच्या समाजव्यवस्थेचा एक चिवट पदर आहे. पसा, प्रसिद्धी- सर्व काही असतानाही ही माणसे मनात भयभीत आहेत. स्वतच्या स्थानाला धक्का तर लागणार नाही ना, या शंकेने व्यापलेलीही आहेत, हे ध्यानात येते.

टोकाच्या स्वकेंद्री आणि तरीही स्वतपासून दूर गेलेल्या, स्वतच्या सार्वजनिक अस्तित्वाचे आरोग्यदायी स्वरूप जीवघेण्या स्पर्धेत रूपांतरित केलेल्या आणि सर्वप्रकारच्या विषमता असताना एकेकटय़ाच्या स्वास्थ्याचा शोध घेणाऱ्या विस्कळीत समाजाला कोणता रस्ता सापडणार, हा प्रश्नच आहे.

muktaashok@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:02 am

Web Title: article on social context of suicides abn 97
Next Stories
1 नागरी बँकिंगला नवी, ग्रामीण संधी..
2 Ashadhi Ekadashi 2020 : रामविठ्ठल एकरूप
3 इतिहास कोणी अभ्यासायचा?
Just Now!
X