चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी प्रकल्पातील मोहर्लीजवळ मुक्कामाला असलेल्या हत्तींच्या एका कुटुंबाचं स्थलांतरण तिथून अठराएक किलोमीटर दूरच्या बोटेझरी येथे गेल्या महिन्यात झालं. हे स्थलांतरण निर्धोकपणे घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावलेले हत्ती-संगोपनतज्ज्ञ आनंद शिंदे सांगताहेत हत्तींच्या या नव्या गृहप्रवेशाची गोष्ट..

हा गृहप्रवेश ताडोबाच्या जंगलामध्ये १९ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न झाला. गृहप्रवेश होता गजराज, लक्ष्मी, सुशीला, छोटा विश्वा आणि बाहुबली या हत्तींचा. या गृहप्रवेशाला थोडी नकारात्मकतेची झालर होती. २०१९च्या नोव्हेंबरमध्ये गजराजचं माहुताबरोबर बिनसलं. खरं तर ज्याच्यावर हल्ला केला तो माहूत वाचला आणि गजराजला शांत करण्याकरिता पुढे आलेल्या माहुताला गजराजचा फटका बसून तो जागीच गतप्राण झाला. वनखात्याने आणि वैद्यकीय विभागाने तातडीच्या हालचाली करून गजराजला बेशुद्ध केलं. पुढील काही दिवस गजराज साखळदंड बांधलेल्या अवस्थेत होता.

जानेवारीत वनखात्याने गजराजला शांत करण्यासाठी आम्हाला बोलावलं. आम्ही वनखात्याकडून दहा दिवसांची मुदत मागून घेतली होती, पण गजराजनं आमच्या संवादाला खूप छान प्रतिसाद दिला. अगदी नवव्या दिवशी गजराजला बेशुद्ध न करता त्याच्या पायातल्या बेडय़ा आम्ही काढून टाकल्या. गजराज चालत हत्ती केंद्रापर्यंत आला. दोन महिन्यांनंतर तो आपल्या परिवाराला भेटत होता. त्या उत्साहाच्या भरात त्याने मला आणि डॉक्टरांना धक्का दिला. मी सुदैवाने मातीत पडलो आणि जखमा झाल्या. पण डॉ. खोब्रागडे हे सिमेंट काँक्रीटच्या जमिनीवर पडले व त्यांच्या कॉलर बोनला इजा झाली. या घटनेमुळे गजराजबद्दल पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं व त्याला पूर्णत: साखळदंडमुक्त करून जंगलात फेरफटका मारण्याचा कार्यक्रम दहा दिवसांनी पुढे ढकलला गेला. त्या दहा दिवसांमध्ये त्याची वागणूक कशी आहे, यावर लक्ष ठेवलं गेलं. गजराज शांत होता, त्या काळात तो नीटच वागला. मग बाराव्या दिवशी त्याच्या साखळ्या काढून त्याला घेऊन जंगलात फेरफटका मारून आलो. गजराज कोणावरही हल्ला करणार नाही याची खात्री पटल्यावर त्याला वनखात्याच्या ताब्यात देऊन आम्ही निघालो. पण त्याच्याबद्दल प्रचंड भीती मोहर्लीतले गावकरी आणि माहुतांमध्ये होती. त्यामुळे गजराजच्या मुक्तभ्रमंतीवर येणारी बंधनं व गावकऱ्यांची चलबिचल पाहता, वनखात्याने मोहर्लीतला हत्ती कॅम्प बोटेझरी इथं हलवण्याचं ठरवलं.

आता हत्तींना नवीन घर मिळणार होतं. हत्तींसाठी मुबलक पाणी आणि त्यांना हवं असलेलं अन्न यांनी ती जागा पुरेपूर भरलेली होती. १६ नोव्हेंबरला चंद्रपूरला पोहोचून आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. हत्तींना त्यांची जागा बदलणार आहे हे सकारात्मक पद्धतीनं सांगायचं होतं. यात पूर्वीसारखा एकटा गजराज नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब सहभागी होणार होतं. सुशीला हत्तीण कळपाची प्रमुख आहे हे लक्षात येत होतं. मग तिला व लक्ष्मीला घेऊन ज्या दिशेनं जायचं आहे त्या रस्त्यापर्यंत नेऊन आणलं. होणाऱ्या बदलांच्या संदर्भातली जाणीव त्यांना करून देत होतो. या संवादाला सुशीला अपेक्षित असा प्रतिसाद देत होती.

प्रत्यक्ष स्थलांतराआधी आम्ही स्थलांतराचा रस्ता पाहायला गेलो. तो साधारण १८ किलोमीटरचा होता. पर्यटनासाठी हा रस्ता वापरात नसल्यामुळे काही ठिकाणी चक्क माणूस उंचीचं गवतही बघायला मिळत होतं. रस्त्यात उगवलेलं छान हिरवं गवत आणि मुबलक बांबू पाहून हत्तींसाठी माझं मन सुखावलं. जाताना वाटेत आम्हाला अंधारी नदी, आंबेउताराची नदी आणि एक छोटासा ओहोळ अशा तीन पाण्याच्या जागा लागल्या. संपूर्ण रस्त्याचा अंदाज घेत बोटेझरीला पोहोचलो. हत्तींसाठी होत असलेल्या सगळ्या व्यवस्थेची पाहणी करून आम्ही मोहर्लीला परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून हत्तींना होणाऱ्या बदलांचा अंदाज देत होतो. त्यांना नवीन घर मिळणार असल्याची आणि ते घर या घरापेक्षा खूपच सुंदर असल्याचं पुन:पुन्हा संवादातून त्यांना सांगत होतो.  माहुतांशीही बोलून कोणी कुठे असावं या संदर्भातल्या सूचना केल्या.

अखेर तो दिवस उजाडला.. १९ नोव्हेंबर! भल्या पहाटे वनखात्याचा चमू आला. त्यांनी पर्यटनासाठीचा मार्ग एक तासासाठी बंद केला होता. सकाळी सातच्या सुमारास सुशीला आणि लक्ष्मी पिल्लांबरोबर निघाल्या. मागोमाग मी गजराजबरोबर चालत होतो. निघताना गजराज चार पावलं चालून थांबला. त्यानं थांबून तो परिसर पुन्हा बघितला अन् नंतर माझ्याकडे पाहात सोंड वर करून पुढे निघाला. त्यानंतर त्यानं एकदाही मागं वळून पाहिलं नाही. गजराजच्या मनात काय चाललं असेल तेव्हा, असा प्रश्न पडला. अचानक सुशीला आणि लक्ष्मी ओढय़ाच्या दिशेनं गेल्या आणि माहूत त्यांना आणण्यासाठी निघून गेले. तेवढय़ा वेळात गजराज मुख्य रस्त्यापर्यंत येऊन थांबला. अपेक्षेपेक्षा तो खूपच शांत होता. माहूत पिल्ले व दोन माद्यांना घेऊन आले व सुशीलाने अपेक्षेप्रमाणे संपूर्ण कळपाची आघाडी घेतली. वाटेत येणाऱ्या मुबलक गवत-बांबूंचा स्वाद घेत अतिशय वेगाने सगळ्या कळपाची वाटचाल चालू होती.

ठरल्या वेळेला आम्ही अंधारी नदीवर पोहोचलो. सगळा कळप पाण्यात उतरला. काठावरचा बांबू खाऊन आणि मनसोक्त पाण्यात डुंबल्यानंतरच कळप बाहेर आला. हळूहळू आम्ही पुढे निघालो. पहिला विराम घेतल्यानंतर कळपाची चाल थोडी मंदावली; पण उत्सुकता त्यांच्या चालीमध्ये जाणवत होतीच. आमचं लक्ष नाही असं पाहून एखादा हत्ती लगेच बाजूला जाण्याचा प्रयत्न करी; पण हाक दिल्यावर लगेच मूळ रस्त्यावर येई. बघता बघता आम्ही आंबेउताराच्या पाण्याच्या जागेवर पोहोचलोसुद्धा. कळपानं मोठय़ा आनंदानं चिखलाच्या दिशेने आपली गाडी वळवली. तिथं चिखलातली आंघोळ बराच वेळ लांबली. मग शेवटची एक पाणथळ जागा. जशी ती पाणथळ जागा सोडली तसं सगळ्यांचीच धाकधूक वाढली. नवीन गृहप्रवेश कसा होतोय आणि नवं घर ते सारे कसं स्वीकारतात, याचा अंदाज आम्ही घेऊ लागलो होतो. आम्ही अगदी बोटेझरीच्या तोंडावर पोहोचलो होतो आणि कळपाचं चालणं लक्षपूर्वक निरखत होतो. कळप आजूबाजूचा परिसर न्याहाळत होता. अखेर दुपारी साडेबाराच्या दरम्यान कळपानं त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला. समोरची विस्तीर्ण जागा, माणसांची कमी वर्दळ या गोष्टी त्यांनाही जाणवत होत्या. मुबलक पाणी, गवत आणि बांबू यांची उपलब्धता पाहून त्यांना झालेला आनंद लक्षात येण्यासारखा होता. संपूर्ण स्थलांतरण कुठल्याही त्रासाशिवाय पार पडलं याचा आनंद म्हणून त्यांना भोपळे आणि केळ्याची पार्टी दिली. नवीन जागेत आल्यावर त्यांचा आनंद व उत्साह पाहून सर्वानाच आनंद झाला. आम्ही सगळेच एका सकारात्मक व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतो. भारतीय वनखात्याच्या इतिहासातला एक अविस्मरणीय क्षण आम्ही साऱ्यांनी अनुभवला.

shindeanand79@gmail.com