आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे ७ मे रोजी पहाटे झालेल्या वायुगळतीने १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेच्या कटू स्मृती जाग्या झाल्या. त्यावेळी मेथिल आयसोसायनेट वायू युनियन कार्बाइड प्रकल्पातून सुटला होता. त्यात तीन हजारांहून अधिक बळी गेले होते.

विशाखापट्टणम म्हणजे विझागमधील या दुर्घटनेत आठपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले तर शेकडो आजारी झाले आहेत. दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीच्या गोपालपट्टणममधील आरआरव्हीपूरम येथील प्रकल्पातून ही वायुगळती झाली. ही वायुगळती साधारण पाच  किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात स्टायरिन वायू पसरला. आरआरव्हीपूरम, व्यंकटापूरम, बीसी कॉलनी, पद्मपुरम, कामपारालेम या भागात अनेक लोक रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसले. हा सगळा किनारी भाग असल्यानेही तेथे हा वायू वेगाने पसरत गेला कारण वाऱ्याचा वेग जास्त होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे विझागला पोहोचले आहेत.

स्टायरिन काय आहे?

स्टायरिन द्रव हा इथेनीलबेन्झीन, व्हिनायल बेंझीन, फेनिलीथीन नावानेही ओळखला जातो. कक्ष तापमानाला तो वायूत रूपांतरित होतो. स्टायरिन हे कार्बनी संयुग आहे, त्याचे रासायनिक सूत्र उ8ऌ8 असून तो बेन्झीनचा उपप्रकार आहे. त्याला रंग नसतो. प्रत्यक्षात तो द्रव रूपात असतो, पण बाहेर आल्यानंतर त्याचे वायूत रूपांतर होते. द्रव रूपात काही वेळा तो पिवळसर दिसू शकतो. द्रवाची वाफ झाल्यानंतर जो वायू बनतो त्याला गोडसर वास असतो. जर त्याची संहती जास्त असेल तर त्याचा उग्र वास येतो.

स्टायरिन वायूची बाधा झाल्यास काय होते?

लघुमुदतीचे परिणाम

* डोळे, त्वचा व नाकाची जळजळ

* आतडय़ांवर परिणाम

* श्वासात अडथळे

दीर्घ मुदतीचे परिणाम

* डोकेदुखी

* मध्यवर्ती चेतासंस्था व मूत्रपिंडावर परिणाम

* नैराश्य

* थकवा, कमकुवतपणा

* श्रवणदोष

* समतोल ढळणे

* लक्ष केंद्रित होत नाही

* कर्करोग

विशाखापट्टणम येथील परिस्थिती कशी आहे?

विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त राजीव कुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार जो वायू सुटला तो विषारी नाही. पण दीर्घकाळ त्या वायूच्या सान्निध्यात राहिल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. स्टायरिन वायू (कक्ष तपमानाला) हवेत सुटला तेव्हा रात्र होती. लोक झोपलेले होते. त्यामुळे वायू गळती झाल्याचे पहाटे तीन वाजता लक्षात आले. नंतर ध्वनिवर्धकावर सूचना देण्यात आल्या. तोपर्यंत अनेक लोक बेशुद्ध पडले होते. एलजी पॉलिमर्स कंपनीच्या प्रकल्पातून वायू सुटला. साठवण टाकीच्या तपमानातील बदल व इतर कारणांनी हे घडले असावे. त्यातून स्वयं बहुवारिकीकरण (सेल्फ पॉलिमरायझेशन) झाले व त्यातून द्रव रूपातील स्टायरिन वायू रूपात पसरला. चार तास निरीक्षण करून नंतर परिस्थिती सुरळीत आहे की नाही हे सांगण्यात येणार आहे.

कोविड १९ ची तयारी उपयोगी

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मास्क, व्हेंटिलेटरची सज्जता होती त्याचा उपयोग काही प्रमाणात झाला. पाच खेडय़ांना वायू गळतीचा फटका बसला असून कोविड १९ तयारीतील रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्स व व्हेंटिलेटरची व्यवस्था होती त्याचा फायदा झाला. वायूचा प्रसार हा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो. पाच कि.मी त्रिज्येपर्यंत हा वायू पसरला होता.

उपचार काय?

स्टायरिन वायूच्या संपर्कात आल्यास त्वचा व डोळे पाण्याने धुणे हा एकच उपाय आहे. काही वेळा कृत्रिम श्वसनाची व्यवस्था करावी लागते. ओले मास्क वापरावेत असा सल्ला विझागच्या स्थानिक प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वायू श्वासात येत नाही.

वापर कशासाठी?

स्टायरिन हा ज्वालाग्राही द्रव आहे. त्याचा वापर पॉलीस्टायरिन प्लास्टिक, फायबरग्लास, रबर, लॅटेक्स यात केला जातो. काही फळे, भाज्या, मांस, दाणेसदृश घटक, थंड पेये यातही तो नैसर्गिक स्वरूपात असतो. त्याचा वापर खालील गोष्टींसाठी करतात.

रोधक घटक

पाइप, वाहनांचे सुटे भाग, प्रिटिंग काट्र्रीज, व कॉपी मशीन टोनर, फूड कंटेनर, कारपेट (चटया), पॅकेजिंग, बूट, खेळणी, फ्लोअर वॅक्स व पॉलिश, सिगरेटचा धूर व वाहनांच्या धुरात स्टायरिनचा समावेश असतो.