दयानंद लिपारे

पारंपरिक पद्धतीच्या बेणे पद्धत लागवडीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने लागवड केल्याने हे दृश्य गोड फळ पाहायला मिळालेले आहे. यातूनच ‘बेणे मळा’ पद्धतीने ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले असून याद्वारे काही हजार शेतकरी दर्जेदार ऊस घेण्याचे उत्पादन घेत आहे.

Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे वर्णन संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात केले आहे. शुद्ध बीजापासून उत्तम आणि रसाळ फळांची निर्मिती होते असा त्याचा अर्थ सर्वाना ज्ञात आहे. हाच निकष राज्यात आर्थिक गोडी आणणाऱ्या ऊस शेतीच्या बाबतीतही लागू होतो. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रात ऊस शेती मोठय़ा प्रमाणामध्ये विस्तारलेली आहे. अर्थात त्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या बेणे पद्धत लागवडीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने लागवड केल्याने हे दृश्य गोड फळ पाहायला मिळालेले आहे. यातूनच ‘बेणे मळा’ पद्धतीने ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले असून याद्वारे काही हजार शेतकरी दर्जेदार ऊस घेण्याचे उत्पादन घेत आहे. त्यांच्याकडून प्रमाणित, दर्जेदार ऊस बेणे घेऊन त्याआधारे उसाचा मळा फुलवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखांमध्ये आहे. यातूनच ऊस बेणे मळ्याचे महत्त्व अधोरेखित होते.

महाराष्ट्रात साखर उद्योगाने सुरुवातीपासूनच चांगले मूळ धरले आहे. राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक कणा ऊस शेतीवर अवलंबून आहे. हमखास दर मिळवून देणारा आणि उत्पादनाची खात्री असलेले पीक असल्यामुळे ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत चालला आहे. त्याचबरोबर ऊस शेतीत वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक शेती करण्याला प्राधान्य दिले जात आहे. याचा ऊस शेतीच्या अंगाने विचार करता ऊस शेती वाढण्यामध्ये ऊस जाती आणि त्यातील चांगल्या बेण्याचा सिंहाचा वाटा आहे.

ऊस मळा हिरवागार व्हायचा असेल; तो चांगल्या प्रकारे फुलायचा असेल तर उसाचे बेणे आणि त्याच्या जातींची निवड महत्त्वाचे ठरते. राज्य शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही.एस.आय) मांजरी, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणाऱ्या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत. तथापी, अलीकडच्या काळात को. ८६०३२ (निरा), को ९४०१२ (फुले सावित्री), को.एम.०२६५ (फुले २६५), को. ९२००५ आणि को.सी ६७१ या मोठय़ा प्रमाणात लागवडीखाली असणाऱ्या जातींची प्रामुख्याने निवड केली जाते.

पूर्वी पारंपरिक बेणे वापरण्याची पद्धत होती. त्यामध्ये तीन डोळा असलेली कांडी पायाने दाबून जमिनीत पेरली जात असे. त्यातील दोन डोळे वर तर एक डोळा जमिनीत असे. दुसऱ्या एका पद्धतीत एक डोळा जमिनीवर तर एक डोळा जमिनीत पेरला जात असे. मात्र यामध्ये उगवणीची खात्री नसायची. शिवाय, बेणे भरपूर म्हणजे एकरी ३-४ क्वि ंटल लागायचे. याला पर्याय म्हणून ऊस संशोधन केंद्रातून प्रमाणित केलेले ‘फौन्डेशन’ म्हणून ओळखले जाणारे मोजके बेणे मळ्यात पेरले जायचे. त्यातून उगवलेला ऊस हाच बेणे स्वरुपात अन्य शेतकऱ्यांना दिला जातो. याकरिता अनेक साखर कारखान्यांनी प्रत्येक गावात काही शेतकऱ्यांना बेणे मळा करण्यास प्रोत्साहन दिले आहे. हे बेणे शुद्ध, प्रमाणित असल्याने त्याची उगवण क्षमता खूपच चांगली असते. ‘२६५’ जातीचा ऊस आला तेव्हा त्याची मोजके ऊस या बेणे मळ्यात आणले. बेणे मळ्यात त्याची उगवण करून ते शेतकऱ्यांना पुरवले. आणि शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात फुलवून साखर कारखान्यांना गाळपासाठी पाठवला. त्यानंतरही ऊस संशोधन केंद्रात संशोधित जातीच्या बाबतीत हाच क्रम राहिला. या अशा उत्तम प्रतीच्या बेण्यामुळे उसाची उगवण चांगली झाली, वजन वाढले, उतारा अधिक मिळू लागला. असे बरेच फायदे यातून दिसून आले आहेत.

अल्पकाळात अधिक फायदा

एक तर ऊस बेणे मळ्यातील उत्पादन हे दहा महिन्यांमध्ये तयार होते. त्यामुळे पंधरा-सोळा महिने त्याची निगा करण्याची वेळ येत नाही. शिवाय, प्रति टन चार हजार रुपये दर मिळतो. दरवर्षी हे पीक घेता येते. अन्य शेतकरी जेव्हा तीन पिके घेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी घालतात; तेव्हा बेणे मळा करणारा शेतकरी तीन वर्षांत तीन पिके घेऊ शकतो. शिवाय, अन्य शेतकऱ्यांपेक्षा यांना मिळणारा दर अधिक असल्याने आर्थिक समीकरण लाभदायक ठरते. परिणामी अशा पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे. काही बेणे मळा करणारे शेतकरी थेट शेतकऱ्यांनाही बेणे विक्री करीत असतात. एक बेणे हे तीन वेळा वापरता येते. त्यानंतर ऊस संशोधन केंद्रातून पुन्हा नवे ‘फौन्डेशन’ बेणे आणून त्यापासून त्याची लागवड केली जाते. अर्थात या शेतकऱ्यांना जादा कष्ट घ्यावे लागतात. उसाची लागण, फुटवे, वाढीचा कालावधी, रोगराई-उपचार, खत-फवारणीसह पक्व तेचा कालावधी अशा सर्व नोंदी बारकाईने टिपून ठेवाव्या लागतात. अशा पद्धतीने बेणे मळा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणामध्ये वाढलेली असून यापासून आर्थिक सुबत्ता शेतकऱ्यांच्या दारी नांदताना दिसत आहे.

परराज्यातही बाजारपेठ 

बरेच शेतकरी ‘होय आम्ही शेतकरी समूह’ या माध्यमातून ऊस बेणे मळा फुलवत आहेत. त्यातून निरोगी उसाची निवड करण्यापासून त्याचे उत्पादन घेण्यापर्यंत मार्गदर्शन केले जाते. बीज प्रक्रिया, जिवाणूंची प्रक्रिया आदीबाबत मार्गदर्शन केले जाते. आष्टा तालुक्यातील कारंदवाडी येथील सुरेश कबाडे हे समाज माध्यमातून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी आपला अनुभवकथन केला. ‘दर तीन वर्षांनी बेणे बदल करणे महत्त्वाचे असते. बेणे बदल, अंतराचे प्रयोग हा याचा महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे ऊस उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच ऊ ती संवर्धनाच्या माध्यमातून शेती करणे ही लाभदायक आहे. अशा पद्धतीची रोपे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये पाठवली जातात. खात्रीची उगवण असल्याने शेतकऱ्यांचाही यामध्ये फायदा होत आहे.’

साखर कारखान्यांचे पाठबळ

ऊस बेणे मळा पद्धतीला साखर कारखान्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिले आहे. शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने या पद्धतीला सर्वप्रथम सुरुवात केल्याचे कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा सांगतात. ‘पारंपरिक शेतीपेक्षा ऊस बेणे मळ्यातील बेण्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे मिळाल्याने उसाचे उत्पादन चांगले येणार याचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. पारंपरिक पद्धतीत उगवण क्षमता ७० टक्केपर्यंत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. ८६०३२, २६५ या जातीचे प्रामुख्याने बेणे मळ्यामध्ये उत्पादन घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी बेणे बदल करण्याबाबत जागरूक असल्याचे दिसते. साखर कारखानेही सुद्धा याबबत सजग आहेत. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दरवर्षी सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रात बेणे मळा करण्यास प्रोत्साहन दिले हाते. त्यातून ७ ते ८ हजार एकरात लागण केली जाते. तीन वर्षांत बेणे बदल केला जात असल्याने दरवर्षी ३० टक्के बेणे बदलाचे लक्ष्य असते. एकंदरीत विचार करता ऊस बेणे शेतीचे फायदे हे बेणे उत्पादक शेतकरी, त्या बेण्यावर शेती कसणारा शेतकरी आणि ऊस उत्पादनात वाढ झाल्याने साखर कारखाने अशा सर्व घटकांना होत असल्याचे अभ्यासांती दिसून आले आहे.’

कोटय़वधीची उलाढाल

ऊस बेणे करण्याचे खूपच फायदे दिसून येतात. आमच्या तमदलगे या गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. विहिरीच्या पाण्यावर ऊस शेती केली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी पडते. ऊस वाळण्याचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी बेणे पद्धतीने शेती करणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तसेच रोपवाटिकेच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे. बेणे मळा करणारे शेतकरी विक्री पश्चात सेवेकडे लक्ष देतात. अन्य शेतकऱ्यांना ते लागवडीपासून तोडणीपर्यंत शिवारात जाऊन मार्गदर्शन करीत असतात. यातून शेतकऱ्यांना हक्काचा, विश्वासाचा सहकारी मिळत असतो. ही शेती आर्थिकदृष्टय़ा लाभदायक असल्याने त्यामध्ये शेतकरी रमलेला आहे. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यात हा बदल स्वागतार्ह ठरला आहे. या व्यवहारात ग्रामीण भागात कोटय़वधीची उलाढाल दरवर्षी होत असते.

– रावसाहेब पुजारी,  शेती अभ्यासक

dayanand.lipare@expressindia.com