सिद्धार्थ ताराबाई

येशू ख्रिस्त समलिंगी (गे) असावा, अशी त्याची व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या ‘द फर्स्ट टेम्पटेशन ऑफ ख्राइस्ट’ या ‘नेटफ्लिक्स’च्या लघुपटावरून ब्राझिलमध्ये वादळ उठले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा वाजू लागला आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाची निर्माती कंपनी ‘पोर्टा डॉस फंडो’च्या रिओ दी जानिरोतील कार्यालयावर चेहरे झाकलेल्या हल्लेखोरांनी पेट्रोलबॉम्ब फेकले. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी २० लाखाहून अधिक कॅथॉलिक नागरिकांनी केली होती. हा लघुपट ख्रिस्ती समाजाला कधीही भरून न येणारी हानी पोहोचवतो, असे मत व्यक्त करत ब्राझीलमधील कनिष्ठ न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. परंतु लघुपटामुळे येशू ख्रिस्तावरील श्रद्धेला कोणताही तडा जात नाही, अशी टिप्पणी करत ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली.  आता  पुन्हा कॅथॉलिक संघटनेने मोहीम सुरू केली आहे आणि तिची धार आधीपेक्षा तीव्र आहे.

जगात सर्वाधिक कॅथॉलिक ब्राझीलमध्ये आहेत. २०१८मध्ये कर्मठ आणि उजव्या विचारांचे जेर बोल्सोनारो ब्राझिलचे अध्यक्ष झाले. त्यानंतर तेथील राजकारणाचे स्वरूप बदलू लागले. अध्यक्ष बोल्सोनारो यांनी या लघुपटाच्या अनुषंगाने, गे मुलगा असण्यापेक्षा तो मेलेलाच बरा, अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर, कर्मठ आणि कट्टर विचारांचा पुरस्कार करणारे राजकारणी लोकप्रिय होत आहेत, अशी टिप्पणी न्यूयॉर्क टाइम्सने केली आहे.

येशू ख्रिस्त आपल्या तिसाव्या वाढदिवशी नाझरेथला येतो. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र ऑरलँडोही असतो. ते दोघे ४० दिवस वाळंवटात एकत्र होते. ऑरलँडोचे सगळे हावभाव, वागणे-बोलणे एखाद्या समलिंगी (गे) सारखे असते. त्याच्या वागण्यातून तो आणि येशू एकमेकांत भावनिकरीत्या गुंतलेले असल्याचे प्रतीत होत राहते.. ‘द फर्स्ट टेम्पटेशन ऑफ ख्राइस्ट’ या लघुपटाचे हे कथानक.

या वादासंदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा असतो आणि अभिव्यक्ती म्हणजे स्वैराचार नव्हे, अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. चर्चा न करता थेट बंदीसाठी पुन्हा देशव्यापी मोहीम सुरू करणाऱ्या कॅथॉलिक संघटनेचे वक्तव्य ‘द रिओ टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. ही संघटना म्हणते, ‘आत्म्याची मुक्ती हे आमचे ध्येय आहे आणि संपूर्ण ब्राझील त्यासाठी बांधील आहे. तो खऱ्या देवावर प्रेम करतो आणि त्याला भजतो. त्याचा अपमान करण्याची कृती कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही.’

या वादाच्या निमित्ताने ब्राझीलच्या अध्यक्षांच्या निर्णयावर तेथील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कसे नाराज आहेत, हे दर्शवणारे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्त संकेतस्थळाने दिले आहे. ‘हा वाद अशावेळी पेटला आहे जेव्हा अध्यक्ष बोल्सोनारो यांनी एक प्रकारच्या सांस्कृतिक युद्धास तोंड फोडले आहे. त्यांनी धार्मिक मूल्यांना आव्हान देणाऱ्या कला प्रकल्पांच्या अनुदानांमध्ये कपात केली आहे. कार्निव्हल रोखण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे,’ असे काही संघटनांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.

या वादासंदर्भात ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. त्यात या विषयाच्या सर्व बाजूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दिसतो. ब्राझिलचे अध्यक्ष याईर बोल्सोनारो यांच्या प्रतिक्रियेबरोबर त्यांचा मुलगा एदुआदरे बोल्सोनारो याची प्रतिक्रियाही या वृत्तांतात आहे. तो म्हणतो, ‘आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो, परंतु ८६ टक्के लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर हल्ला करणे अयोग्य ठरते.’ (आपल्याकडे शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्दय़ावरही असेच श्रद्धेचे बहुसंख्याकवादी राजकारण सुरू आहे.)

या लघुपटात येशूच्या मित्राची ऑरलँडोची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता फाबिओ पॉर्च म्हणतो, जर येशू वाईट असता, त्याने अमली पदार्थाचे सेवन केले असते तर लघुपटाच्या विरोधकांचे काही बिघडले नसते, पण त्यांचा आक्षेप आहे तो समलैंगिकतेला, ही वॉशिंग्टन पोस्टमधील त्याची प्रतिक्रियाही बोलकी आहे. या लघुपटाच्या निर्मात्यांना दहशत बसवण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आला असावा, असे भाष्यही या वृत्तांतात आहे.

‘पोर्टा डॉस फंडो’ या निर्मात्या कंपनीने या वादापासून स्वत:ला दूर ठेवले होते. परंतु मेट्रो या ब्रिटनस्थित वृत्तसंकेतस्थळाने या कंपनीच्या प्रतिक्रियेसह बातमी दिली. ‘आम्ही समाजातील वैविध्यपूर्ण विषयांवर व्यक्त होतो. कलात्मक स्वातंत्र्याला आमचे प्राधान्य आहे आणि कोणत्याही लोकशाही देशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही गोष्ट महत्त्वाची असते.’ असे या लघुपटाच्या निर्मात्यांनी म्हटल्याचा हवाला या वृत्तात आहे.