रंगमंचावर ज्या भूमिका करण्याचे कोणी साधे धाडसही करणार नाही, अशा ‘सखाराम बाइंडर’मधील ‘चंपा’ असो, की ‘जंगली कबुतर’मधील ‘गुल’असो; लालन सारंग यांनी रंगमंचावर अनेक ‘बोल्ड’ भूमिका साकारून रंगभूमीला हादरा दिला. मात्र केवळ प्रतिमेमध्ये न अडकता अभिनयाचा कस पाहणाऱ्या ‘सूर्यास्त’, ‘रथचक्र’सारख्या भूमिकांमधून आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शनही त्यांनी रसिकांना घडविले. ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाने त्यांच्या जीवनात संघर्षांची ठिणगी पेटली. पण, ती धग त्यांनी पती कमलाकर सारंग यांच्यासमवेत लढा देऊन सोसली. आयुष्यभर रंगभूमीची सेवा करणाऱ्या लालन सारंग यांनी पन्नास वर्षे रंगभूमीची सेवा केली.

मूळच्या गोव्याच्या लालन यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले. कामगार आयुक्त कार्यालयात काम करताना त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून शिक्षण घेतले. काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशातून ‘आयएनटी’च्या (इंडियन नॅशनल थिएटर) स्पर्धेसाठी त्यांनी नाव नोंदविले. सरिता पदकी यांच्या ‘बाधा’ या नाटकाचे दिग्दर्शन अरिवद देशपांडे करणार होते. तेथेच त्यांची सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये असलेल्या कमलाकर सारंग यांच्याशी ओळख झाली. सारंग यांच्या दिग्दर्शनाखाली ‘राणीचा बाग’ नाटकात लालन यांनी भूमिका केली. टाटा कंपनीमध्ये नोकरी करताना त्यांनी रंगभूमीवर हौस म्हणून काम केले. कमलाकर सारंग बँकेची नाटके आणि एकांकिका बसवायचे. त्यामध्ये काम करतानाच कमलाकर सारंग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. राकेश याच्या जन्मानंतर दोन वर्षे त्यांनी नाटक केले नाही. नोकरीचा राजीनामा देऊन १९६७ मध्ये त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली.

त्या दरम्यान लीला चिटणीस यांच्यामुळे त्यांनी हिंदी रंगमंचावरही काम केले. संजीवकुमारबरोबर एका आणि राजेश खन्नाबरोबर दोन नाटकांतून भूमिका केल्या. सत्यदेव दुबे यांच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकात त्यांनी अमरीश पुरी, जयदेव हट्टंगडी, सुनीला प्रधान यांच्यासमवेत काम केले. आणि मग ७१ सालच्या शेवटालाच कमलाकर यांच्याकडे विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक आले. त्यात निळू फुले ‘सखाराम’, कुसुम कुलकर्णी ‘लक्ष्मी’ हे आधीच ठरले होते. मात्र, चंपाची भूमिका लालन सारंग यांच्याकडे अपघातानेच आली. हे नाटक खूप गाजले. पण १३ प्रयोगांनंतर सेन्सॉर बोर्डाने नाटक बंद केले. त्यामुळे तेराव्या प्रयोगाच्या वेळी एका दिवसाला तीन प्रयोग झाले होते. सेन्सॉर बोर्डाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने नाटक पाहण्याचे ठरविले. जयहिंदू कॉलेजमध्ये प्रयोग केला. वकील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयोग पाहिला. सगळ्यांना नाटक आवडले आणि निकाल सारंग यांच्या बाजूने लागला. नाटक सुटल्यामुळे ‘सखाराम बाइंडर’चे प्रयोग सुरू झाले आणि दोन-तीन महिन्यांत शिवसेनेचा मोर्चा आला. परवानगी असतानाही शिवसेनेने हे नाटक बंद पाडले. सारंग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांच्यासाठी प्रयोग लावला. ‘किती चांगले नाटक आहे. कोणी बंद पाडले,’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. ‘अभिषेक’ आणि ‘कलारंग’ या दोन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ‘आरोप’, ‘आक्रोश’ ही नाटके केली. बाइंडरनंतर ‘जंगली कबुतर’ नाटक जोरात चालले, गुजराती निर्मात्याला हे नाटक गुजरातीत करायचे होते, पण अभिनेत्री मिळत नव्हती म्हणून लालन सारंग यांनीच भूमिका केली.

लालन सारंग यांना गदिमा प्रतिष्ठानतर्फे विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी-सखी-सचिव हा पुरस्कार आणि पिंपरी-चिंचवड येथील कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार मिळाला होता. कणकवली येथे २००६ मध्ये झालेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. व्यावसायिक रंगभूमीवरील अर्धशतकीय कारकीर्दीबद्दल लालन सारंग यांना ‘संवाद’ पुणे संस्थेतर्फे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

कारकीर्द

* सखाराम बाइंडर (चंपा)

* कालचक्र

* खोल खोल पाणी (चंद्राक्का)

* रथचक्र  (ती)

* बेबी (अचला)

* गिधाडे (माणिक)

* कमला (सरिता)

* आक्रोश (वनिता)

* आरोप (मोहिनी)

* घरटे अमुचे छान (विमल)

* जंगली कबुतर (गुल)

* जोडीदार (शरयू)

* धंदेवाईक (चंदा)

* सूर्यास्त (जनाई)

* स्टील फ्रेम (हिंदी)

* सहज जिंकी मना (मुक्ता)

* उद्याचा संसार

* उंबरठय़ावर माप ठेविले

* घरकुल

* चमकला ध्रुवाचा तारा

* तो मी नव्हेच

* बिबी करी सलाम

* मी मंत्री झालो

* राणीचा बाग

* लग्नाची बेडी

* संभूसांच्या चाळीत

‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’. लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. आजच्या लालन सारंगना घडवणाऱ्या या भूमिकांविषयी त्यांच्याच शब्दांत..

‘सखाराम बाइंडर’नं मला काय दिलं? या प्रश्नावर त्याने मला काय नाही दिलं? असंच वाटतं. माझ्यातल्या कलावंताचा मला शोध लागला. रंगभूमी हेच माझं क्षेत्र आहे हे जाणवून दिलं. मला या लढयमत माणसं ओळखण्याची ताकद दिली. झालेल्या त्रासाबरोबर प्रसिद्धीपण दिली. मी व्यासपीठावरून माझं म्हणणं  अस्खलितपणे मांडू शकते, याचं भान दिलं. सारंग गेल्यानंतरसुद्धा मी सर्व संघर्षांंना सामोरं जात आहे, जिद्दीनं जगते आहे, जगणार आहे. एका ‘सखाराम’,  ‘चंपा’,  ‘तेंडुलकर’ आणि ‘सारंग’नं मला एक जगण्याची पोतडीच दिली. मग मात्र आमच्या स्वत:च्या संस्थेतर्फे अनेक नाटके करते झालो. उत्तमोत्तम भूमिका माझ्या वाटयमला आल्या आणि मी तृप्त होतं गेले.

‘रथचक्र’ नाटकातील काही प्रसंग साकारताना खूप मानसिक त्रास होऊ लागला. एखादा प्रसंग संपल्यानंतरही त्यातून सहज बाहेर पडणे अशक्य होऊ लागले.  बडोद्यातील  एका प्रयोगाला तर डॉक्टरला पाचारण करावे लागले. हा त्रास वारंवार होऊ लागल्यामुळे अखेर काही दिवस प्रयोग बंद ठेवावे लागले. कलावंताने ‘स्विच ऑफ, स्विच ऑन’ पद्धतीने काम करायचं असतं हे मान्य असलं तरी प्रत्येक वेळी तसंच होतं असं नाही. ती भूमिका तुम्हाला कळत-नकळत घडवत असते, तुमच्यावर परिणाम करत असते. ती भूमिका तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावू लागते, तुमच्याजवळ येऊ पाहते. अनेक भूमिकांचे माझ्यावर असेच चांगले-वाईट ओरखडे आहेत. त्यातूनच तर लालन सारंग घडत आली.

आजपर्यंत मला वाटायचं की, आपण स्वतंत्र आहोत. पुरुषांच्या बरोबरीने आपण शिक्षण घेऊ  शकतो. नोकरी करू शकतो. एकाच व्यासपीठावरून भाषण करू शकतो. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बाहेर जाऊ येऊ  शकतो. आपण स्वतंत्र आहोत, परिपूर्ण आहोत. ज्या प्रश्नांकडे आजवर मी कानाडोळा केला. तो प्रश्न मी ‘कमला’मधील सरिताची भूमिका करू लागल्यानंतर अक्षरश: माझा पाठलाग करू लागले. नकळत मी माझ्या घरातलं माझं स्थान शोधू लागले आणि मला जाणवलं की, तेंडुलकरांनी ‘कमला’मध्ये मांडलेल्या सुखवस्तू मध्यमवर्गातील स्त्रीचे अनेक प्रश्न हे माझेही वैयक्तिक प्रश्न होऊन राहिले आहेत. जे आजवर माझ्या सहज अंगवळणी पडले होते; सबब मला कधी जाणवले नव्हते.