27 February 2021

News Flash

स्वरयोगिनी

ज्येष्ठ कलावंत डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ कलावंत डॉ. प्रभा अत्रे

गेली सुमारे सहा दशकं भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात कलावंत, अभ्यासक, संशोधक म्हणून सतत कार्यरत असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ कलावंत डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या गुरुवारी (१९ एप्रिल) तो पुण्यात समारंभपूर्वक दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने..

वयाच्या ८६व्या वर्षांत मनानं टवटवीत राहण्यासाठी काय करायला हवं, याचं उत्तर डॉ. प्रभा अत्रे यांच्याकडे आहे. थकत चालल्याची भावना त्या व्यक्त करतात खऱ्या, पण मैफलीत स्वरमंचावर विराजमान झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातील चैतन्य असं काही फुलून येतं, की ऐकणारा गारदच व्हावा. प्रभाताईंनी गेली सुमारे सहा दशकं अभिजात संगीताच्या क्षेत्रात विविध पातळ्यांवर सैर केली. प्रत्यक्ष मैफली तर गाजवल्याच, पण नवे राग बांधले, नव्या बंदिशी रचल्या. संगीतावरील चिंतनात्मक लिखाण केलं. विद्यापीठीय पातळीवर संगीताचं अध्यापन केलं. अनेक शिष्य तयार केले. शिक्षणाच्या क्षेत्रात एका नावाजलेल्या संस्थेत अध्यक्ष म्हणून कार्यरत राहून आपल्या वडिलांची सेवा पार पाडण्याचं भाग्य मिळवत राहिल्या. हे सारं करताना, संगीतातून मिळणाऱ्या ऊर्जेचा अतिशय विधायक उपयोग करून घेत अनेक शिष्यांना घडवण्याचं कार्यही सुरू ठेवलं. प्रभाताईंना हे सगळं करताना, मनापासून समाधान वाटत असेल, यात शंका तर नाहीच, पण त्याही पुढे जाऊन संगीताची ही अवघड होत चाललेली वाट पुन्हा एकदा तेजाळण्यासाठी हर प्रकारे प्रयत्नशील राहून हे समाधान द्विगुणित करण्याचा आनंदही त्या मिळवत आल्या आहेत. आयुष्य सार्थकी लागणं, ही आपल्याकडील संकल्पना ताईंच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर किती सार्थ आहे, याचा अनुभव येतो.

प्रभाताईंनी गाण्याकडे वळायचं ठरवलं, तेव्हा संगीत ही उच्च अभिरुचीची कला मानली जात असली, तरीही तेथे स्त्रियांचा वावर अभावानेच होता. भारतीय अभिजात संगीतात ज्या कलावतीने पहिल्यांदा जाहीर मैफलीत गायन केलं, त्या हिराबाई बडोदेकर याच प्रभाताईंच्या आदर्श होत्या. त्या ज्यांच्याकडे शिकल्या, ते सुरेशबाबू माने हे त्या काळातील संगीताच्या क्षेत्रातील एक चमत्कार होते. आजही त्यांचं नाव घेतल्यावर कानाच्या पाळीला हात लावून आदर व्यक्त केला जातो.

सुरेशबाबू माने हे किराणा घराण्याचे संस्थापक आणि काळाच्या अवकाशावर आपली अमीट छाप उमटवणारे खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे चिरंजीव. सुरेशबाबूंना संगीताची अप्रतिम जाण तर होतीच, पण त्यांना अनेक वाद्यं सहजपणे वाजवताही यायची. एखाद्यानं आयुष्यभर ज्या वाद्याची साधना करावी आणि काही मिळाल्याचं समाधान मिळवावं, ते सुरेशबाबूंना जन्मत:च मिळालं. प्रभाताईंना या अशा अवलिया कलावंताकडे गाणं शिकता आलं. किराणा घराण्याची ही थेट तालीम त्यांनी नंतरच्या आयुष्यात शिदोरीसारखी उपयोगात आणली आणि आपल्या संगीताचा विकास करण्यासाठी तिचाउपयोगही केला.

प्रभाताईंनी किराण्याच्या मूळ शैलीचाच विकास केला. त्यातील नादमाधुर्य, स्वरांचे लगाव, भावातील आर्तता त्यांनी आत्मसात केलीच, पण त्यावर स्वत:च्या चिंतनाने नवा साजही चढवला. आजही ताईंच्या मैफलीत रागसौंदर्याचं शीतल चांदणं पखरत असल्याचा जो अपूर्व अनुभव येतो, त्याला त्यांची सौंदर्यदृष्टीच कारणीभूत असते. कलावंत म्हणून संगीताकडे पाहण्याची ताईंची खास दृष्टी आहे. त्यामध्ये इतर घराण्यांचा केलेला काळजीपूर्वक अभ्यास तर आहेच, पण त्याशिवाय सौंदर्य या संकल्पनेच्या मुळापर्यंत जाण्याचा ध्यासही आहे. त्यामुळे अमीर खाँसाहेबांच्या गायकीचा गंध जसा तिथे जाणवतो, तसाच बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या ठुमरीतील नाजूक कलाकुसरही त्यांच्या ठुमरीत सहज डोकावून जाते. मैफलीत समोरच्या रसिकांना स्वरांच्या साह्य़ाने एका अप्रतिम अनुभवाला सामोरं नेण्याचं त्यांचं कसब म्हणूनच वादातीत राहिलं. मारुबिहाग आणि कलावती रागातील त्यांच्या पहिल्याच ध्वनिमुद्रिकेने त्यांचं हे कसब अधोरेखित केलं. रागाची शास्त्रशुद्ध मांडणी, संगीतातील विविध अलंकारांच्या साह्य़ाने एक कलात्मक दागिना घडवण्याचं कौशल्य आणि त्यापलीकडे जाऊन संगीतातून व्यक्त होणाऱ्या अव्यक्त भावनांचं तरल आणि देखणं दर्शन ही त्यांच्या गायनाची खासियत.त्यामुळेच भावदर्शनाबरोबरच संगीताबद्दलचा विचारही त्यांच्या गायनातून सतत प्रतीत होत राहतो. सर्जनाची प्रक्रिया हा त्यांच्या खास चिंतनाचा विषय. ही प्रक्रिया मोठी गुंतागुंतीची आणि शब्दांत सहज न सापडणारी. सगळेच सर्जनशील कलावंत या सर्जनाची प्रक्रिया उलगडून दाखवत नाहीत, दाखवू शकतही नाहीत. प्रभाताईंनी तो प्रयत्न केला आणि आपल्याच निर्मितीची ही वेटोळी सहजपणे स्पष्ट करून सांगितली.

संगीताच्या अतिविशाल अशा पटलावर आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या अनेक कलावंतांनी गायनातून आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे ते समजून घेण्याची एक वेगळी प्रक्रिया निर्माण झाली. प्रभाताईंनी त्याला छेद दिला आणि ते सारं शब्दातूनही शोधण्याचा प्रयत्न केला. संगीताचा जगण्याशी, भवतालाशी असलेला संबंध समजून घेणं आणि तो उलगडून पाहणं ही किमया त्यांना साध्य झाली आणि त्यातूनच त्यांचे संगीतावरील ग्रंथ निर्माण झाले. प्रत्येकच कलावंताला राग संगीतात नवं काही उमगत असतं. त्याला रागाच्या शास्त्रशुद्ध चौकटीत बसवून एक चेहरा देणं हे अतिशय कठीण काम. ताईंनी तेही साध्य केलं. नवरागनिर्मिती ही त्यांच्या सर्जनाची एक उत्तम खूणच. हे सारं करत असतानाच, संगीताचं अध्यापन ही आणखी एक कलाही त्यांनी आत्मसात केली. नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपण जे करत आलो आहोत, त्याच्या शोधाबरोबरच अन्यांचा धांडोळाही घेण्याचा यत्न त्यांनी केला. ‘सरगम’ या संगीतातील अलंकाराचा विशेष अभ्यास करून त्याच विषयावरील शोधनिबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट ही पदवीही संपादन केली. आपल्याच कलेच्या प्रेमात न पडता, सतत आणखी उत्तमाचा ध्यास घेणं हे म्हणूनच आवश्यक. डॉ. प्रभा अत्रे यांनी आयुष्यभर हे आव्हान स्वीकारलं आणि ते पेललंही.

संगीत ही प्रवाही घटना असते. तिला काळाचं भान असतं आणि त्याबरोबरच सर्जनाची आसही. परिसरात घडणाऱ्या अशा सांगीतिक घटनांचा मागोवा घेत, तेथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजेच चिंतन. ते आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवणं हे गुरूचं काम. प्रभाताई ते अतिशय मनोभावे करीत आहेत. किराणा घराण्यात आजवर बव्हंशी पुरुष कलावंतच अधिक होते. ताईंच्या शिष्यवर्गामुळे हीही कमी भरून निघाली. प्रभाताईंनी त्यासाठी ‘स्वरमयी गुरुकुल’ असं एक व्यासपीठच तयार केलं. तेथे संगीताच्या विविध प्रवाहांमध्ये सर्जनशील असलेल्या कलावंतांना मुद्दाम निमंत्रण देऊन, त्यांना एक स्वरपीठ उपलब्ध करून दिलं जातं.  कलावंत म्हणून जी संवेदनशीलता असायला हवी, तिचा सांभाळ करणं हे तसं कर्मकठीण. प्रत्येकच मैफल हे आव्हान. तिथं संवेदनशील होऊन आपली कला सादर करताना कोणताही अभिनिवेश न दाखवता, सरळ स्वरांना अर्पण होणं, ही भावना अधिक महत्त्वाची. प्रभाताईंची ही अर्पणाची भावनाच त्यांची कला अधिक उंचीवर नेऊन ठेवते. त्यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ मिळणं ही त्यांच्या या कर्तृत्वालाच सलामी आहे!

मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 1:43 am

Web Title: article on veteran singer dr prabha atre after announces punyabhushan award
Next Stories
1 जातवास्तवावर विवेकी हल्ला
2 डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतासाठी व्रतस्थ वाटचाल
3 तपास यंत्रणेचा चुकीचा पायंडा
Just Now!
X