News Flash

महिलांच्या हक्कांसाठी संयमित लढा

विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्या जणी’ हे मासिक सुरू केले.

आपल्या न्याय्य हक्कांसाठी महिलांना जागृत करताना लोकशाही मार्गाने संयमित लढा देता येतो याचा आदर्श वस्तुपाठ विद्या बाळ यांनी घालून दिला. महाराष्ट्रामधील आणि भारतामधील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावेत याविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेताना त्यांनी महिलांचे विविध प्रश्न गेली पाच दशके जवळून अभ्यासले आणि त्यावर मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लेखन, संपादन याबरोबरच भाषणांतून त्यांनी महिलांमध्ये जागृती घडवून आणली.

विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी पुण्यामध्ये झाला. फग्र्युसन महाविद्यालयामधून अर्थशास्त्र विषयामध्ये बी. ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यक्रम सादरकर्त्यां म्हणून दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९६४ ते १९८३ या काळात ‘किस्त्रीम’ परिवारातील ‘स्त्री’ मासिकाच्या सहायक संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९८३ ते १९८६ या काळात त्या ‘स्त्री’च्या मुख्य संपादक होत्या. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्या जणी’ हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे डॉ. नीलिमा गुंडी यांनी संपादित केलेले ‘स्त्रीमिती’ हे पुस्तक २०१२ मध्ये  प्रकाशित झाले.

महिलांच्या समस्यांबाबत विशेष आस्था असलेल्या विद्या बाळ यांनी १९८१ मध्ये ‘नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण महिलांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्पप्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. १९८२ मध्ये दोन चांगल्या घरातील विवाहित महिलांचे खून झाले होते. त्या वेळी विद्या बाळ यांच्या नारी समता मंचने गावोगावी जाऊन ‘मी एक मंजुश्री’ नावाचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाने आख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता.

महिलांना व्यक्त होण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून विद्या बाळ यांनी ‘बोलते व्हा’ हे केंद्र सुरू केले. अशा स्वरूपाच्या व्यासपीठाची पुरुषांनाही असलेली गरज ध्यानात घेऊन २००८ मध्ये ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू करण्यात आले.

बलात्कारानंतर  पीडितेला  पती, कु टुंब आणि गावाचा मिळालेला  पाठिंबा हे एक समाजासाठी उदाहरण होते. त्यामुळे संघटनेने संबंधितांचा केलेला सत्कार, रात्रीच्या काळोखात अन्याय-अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रात्रीच हातात टॉर्च घेत जनजागृतीसाठी काढलेली ‘प्रकाशफेरी’, सुशिक्षितांमध्येही वाढत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पथनाटय़, वाढत्या स्त्री भ्रूणहत्येविरोधात निदर्शने, मोर्चा, परिसंवाद, एकटय़ा स्त्रियांसाठी परिषद, विवाह परिषद, ग्रामीण-शहरी स्त्रियांची एकत्र परिषद असे विविध कार्यक्रम नारी समता मंचने राबविले. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘फॅमिली इयर’ जाहीर केल्यानंतर कौटुंबिक समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद, अ‍ॅसिड हल्लय़ांविरोधात जागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’, असे वैविध्यपूर्ण प्रबोधनपर उपक्रम विद्या बाळ यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाले.

‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्या जणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या गोष्टींद्वारे विद्या बाळ  लोकांपर्यंत पोहोचून प्रबोधन करीत असत. महिला मंडळांना सामील करून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सखी साऱ्या जणी’च्या गावोगावी शाखा कार्यरत आहेत. अंजली मुळे आणि आशा साठे यांनी ‘विद्याताई आणि…’ या पुस्तकाद्वारे विद्या बाळ यांच्या सामाजिक कार्याचा वेध घेतला आहे.

प्रकाशित साहित्य

कादंबरी

* तेजस्विनी

* वाळवंटातील वाट

अनुवादित कादंबरी

* जीवन हे असं आहे

* रात्र अर्ध्या चंचाची

चरित्र

* कमलाकी (डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)

स्फुट लेखांचे संकलन

* अपराजितांचे नि:श्वास (संपादित)

* कथा गौरीची (सहलेखिका – गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)

* डॉटर्स ऑफ महाराष्ट्र

* तुमच्या माझ्यासाठी

* मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस)

* शोध स्वत:चा

* संवाद

* साकव

पुरस्कार

* आगरकर पत्रकारिता पुरस्कार

* कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार

* शंकरराव किलरेस्कर पुरस्कार

* सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’

* स्त्री समस्यांविषयक कार्य आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार

विद्या बाळ यांनी सुरू केलेल्या संस्था

* नारी समता मंच

* मिळून साऱ्या जणीं

* अक्षरस्पर्श ग्रंथालय

* साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ

* पुरुष उवाच अभ्यासवर्ग

* पुरुष संवाद केंद्र

श्रध्दांजली

न्याय्य हक्कांपासून वंचित स्त्री समूहाचे आत्मभान जागे करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपले. त्यांनी पेटवलेल्या वातींच्या लखलखत्या मशाली झालेल्या आज दिसतात. विद्या बाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री

*******

त्यांचे सारे आयुष्य स्त्रीवादी विचार, साहित्यिक, सामाजिक कृती कार्यक्रमांनी भरलेले होते. जीवन संघर्ष एका बाजूला चालू असतानाच त्यांनी स्वत:च्या जोरावर साहित्याचे भांडार उभे केले हे आपण सारेच जाणतो. ‘नारी समता मंच’ असो, की ‘मिळून साऱ्याजणी’, त्याही आधी किलरेस्कर समूहाच्या ‘स्त्री’ मासिकातून स्त्री विचारांचे त्यांनी भरभरून प्रबोधन केले. त्या गावागावांत पोहोचून प्रबोधन करणाऱ्या, अपार सामाजिक बांधीलकी असलेल्या, कार्यकर्त्यां साहित्यिक, स्पष्ट समाजवादी विचारांच्या, ग्रामीण शहरी आंदोलनांशी जोडलेल्या होत्या. त्यांची आठवण आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.

– मेधा पाटकर, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या

*******

समाजातील सर्व स्तरांतील महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विद्या बाळ यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ‘नारी समता मंच’च्या माध्यमातून त्यांनी महिला हक्कांचा लढा गावोगाव नेला. राज्यातील महिलांना संघटित, हक्कांविषयी जागरूक आणि सक्षम करणे हीच विद्याताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

*******

दुर्दम्य इच्छाशक्ती, संवेदनशील मन, सिद्धहस्त लेखणी आणि माणसांशी अत्यंत प्रेमाने संवाद करण्याची मानसिकता ही विद्या बाळ यांची वैशिष्टय़े होती. ४५ वर्षे त्यांच्याबरोबर काम केले. प्रवास केला. सर्व ठिकाणी, सर्व विषयांबाबत मशाल घेऊन नेतृत्व करणाऱ्या जागल्याच्या भूमिकेत त्या सदैव राहिल्या. त्यांचे निधन ही वैयक्तिक हानी आहेच, मात्र सामाजिक संघटनांमध्ये देखील त्यांची उणीव सदैव राहील.

– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

*******

महिला आणि विविध समाजघटकांना न्याय मिळवून देण्याच्या चळवळीतील महत्त्वाचा दुवा  विद्या बाळ यांच्या निधनामुळे हरपला. संवेदनशील लेखिका, कार्यकर्त्यां, पत्रकार म्हणून त्यांचे काम समाजाला दिशा देणारे आहे.

– अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री

*******

महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी विद्याताई आयुष्यभर लढल्या. पण तेवढेच नाही, सार्वजनिक जीवनात महिलांनी आत्मविश्वासाने वावरायला हवे यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या. महिलांच्या प्रश्नांसंबंधीचा कोणताही उपक्रम असो, त्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग नेहमी सक्रिय असे. सकाळी साडेसात वाजता फोन वाजला तर तो विद्या ताईंचाच असणार हे ठरलेले होते. अतिशय सौम्य आणि गोड आवाजात, मात्र ठामपणे त्या मुद्दे मांडत. मंदिर प्रवेशाचा मुद्दा असो की जेंडर स्टेटस रिपोर्टची निर्मिती, त्यांच्या मार्गदर्शनाचे मोल मोठे होते. त्यांची उणीव सतत जाणवेल.

– वंदना चव्हाण, खासदार

*******

विद्याताईंचे जाणे ही व्यक्तिगत हानी आहे. त्या साहित्यिक होत्या, कार्यकर्त्यां होत्या, विचारवंत होत्या, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या एक ज्येष्ठ मैत्रीण होत्या. स्त्रीवाद त्यांनी आम्हाला शिकवला. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांशी स्पर्धा नाही, पुरुषांचा दुस्वास नाही, स्त्रीवाद सहिष्णू आहे, त्यात विखारी काही नाही, हे त्यांनी आम्हाला शिकवले. नर्मदा खोरे, वांग मराठवाडी अशा आमच्या सर्व जनआंदोलनांमध्ये त्या बरोबर होत्या. त्यांची सोबत आश्वासक होती. त्या केवळ साहित्यातीलच नव्हे, तर माणसांच्याही संपादक होत्या. मानवीयता, सहिष्णुता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंश सदैव आमच्या सोबत असतील.

– सुनीती सु. र., जनआंदोलनातील कार्यकर्त्यां

*******

आईने आयुष्यभर इच्छामरण या विषयाचा पुरस्कार केला, पण तिच्या हयातीत त्याबद्दलचा कायदा होऊ शकला नाही, याचे दुख वाटते. आयुष्याच्या सर्व पैलूंवर मनसोक्त प्रेम करणारी, रसिक व्यक्ती होती ती. तिने स्वत: आम्हा भावंडांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद करणे शक्यच नव्हते. घरातली, बाहेरची सर्व कामे सारख्याच पद्धतीने तिने आम्हाला शिकवली. आम्ही आमच्या मुलांबाबत देखील हाच कटाक्ष ठेवला, कारण आमच्यावर झालेले संस्कारच तसे होते. विचारांची स्पष्टता हा तिचा मोठा गुण होता, मात्र तो तिने कधीही इतरांवर लादला नाही. आयुष्यभर स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना स्वतपासून सुरू झाल्या, लाखो महिलांपर्यंत ती तो विचार पोहोचवत राहिली. साधारण चार महिन्यांपूर्वी तिची तब्येत बिघडली, त्या वेळी शस्त्रक्रिया केली. मात्र, तिच्या वयामुळे ती पूर्ण बरी झाली नाही. जगत राहाण्यासाठी कोणतीही कृत्रिम मदत घेण्यास तिने नकार दर्शवला होता. आज सकाळीच ‘मी आता जाते, तुम्ही सगळे घरी जा’ असे तिने आम्हाला सांगितले होते, त्यानंतर काही वेळातच तिने अखेरचा श्वास घेतला. तिने समजून उमजून म. गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस निवडला असेच आम्हाला वाटले.

– यशोधन बाळ, विद्या बाळ यांचे पुत्र

*******

विद्याताई म्हणजे विवेकशील, बुद्धिप्रामाण्यवादी आणि सौजन्यशील नेतृत्वाचा वस्तुपाठ होता. निष्ठेने काम करताना त्यांनी महिला कार्यकर्त्यांना बळ दिले. केवळ बोलण्यापेक्षा त्यांनी सत्याग्रह करण्याचे काम केले. परिवर्तनाचा आशय समग्र असावा अशी त्यांची धारणा होती. महिलांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सावित्रीबाइर्ंची लेक म्हणून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो.

– डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते

*******

माणूस आणि कार्यकर्त्यां म्हणून विद्याताई सर्वाशी जोडल्या गेल्या होत्या. महापालिका निवडणुकीला उभ्या असताना प्रचाराचे भाषण करण्यासाठी ताठपणाने उभ्या राहून बोलणाऱ्या विद्याताई मला अजूनही आठवतात. वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये मी लिहू शकते याची जाणीव मला पहिल्यांदा विद्याताईंनी करून दिली. स्त्रीविषयीच्या कामाची त्यांची चळवळ सामाजिक आणि सार्वजनिक संदर्भानी वाढत गेली. त्यांच्या विस्तारित समाजभानाने अनेकांना खूप काही दिले आहे.

– डॉ. अरुणा ढेरे, माजी संमेलनाध्यक्षा  

*******

स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये विद्या बाळ यांचे योगदान अधोरेखित केले जाईल. स्त्री आणि पुरुष दोघांची उन्नती कशी होईल यावर त्यांनी भर दिला. स्त्री आणि पुरुष वाचक वर्ग सामाजिक जाणिवेने समृद्ध कसा होईल यावर त्यांनी भर दिला.

– दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

‘स्त्री’ मासिकाच्या संपादक असलेल्या विद्याताई प्रागतिक लेख प्रसिद्ध करत असत. मी बंडखोरी करायला शिकले यामध्ये विद्याताईंचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे मध्यमवर्गीय तरुणी घुसमटीतून बाहेर पडल्या. वयाने मोठय़ा असल्या तरी विद्याताई सदैव आपली मैत्रीण आहे असेच वाटत राहिले.

– मुक्ता मनोहर, कामगार नेत्या

*******

१९७३ ते १९८० या काळात विद्याताईंचा मी सहकारी होतो. त्या ‘स्त्री’ मासिकाच्या संपादक होत्या. मी ‘मनोहर’ मासिकामध्ये काम करत होतो. स्त्रीमुक्ती या विषयावरून मी त्यांची चेष्टा करायचो. एकदा त्यांनी स्त्रीविषयी समाजातील नेमकी भूमिका काय आहे आणि ती काय असायला हवी याविषयी सविस्तर समजावून सांगितले. मला चांगली पुस्तके वाचण्यासाठी दिली. माझ्या वाचनाला त्यांनी दिशा दिली.

– सुधीर गाडगीळ, प्रसिद्ध निवेदक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:15 am

Web Title: article on veteran social activist vidya bal life zws 70
Next Stories
1 सत्तरीची वाटचाल..
2 पायाभूत सुविधा : ‘पायाभूत’ खर्च अपुरा..
3 शेती, कृषी-उद्योग : ऊर्जितावस्था आणि प्रतिष्ठा कधी?
Just Now!
X