प्रतिमा पंडित वाघ

सूक्ष्मजीवशास्त्राच्या (मायक्रोबायॉलॉजी) अभ्यासकांना विषाणू नवीन नाहीत.. विषाणूंचे वागणेही या अभ्यासकांना पुरेपूर माहीत आहे.. विषाणू एका अर्थाने, ‘हुशार’ असल्याचे सातत्याने जाणवते आहे.. म्हणून तर आपण काळजी घ्यायची!

करोना विषाणूने जगभर थमान घातलेले असताना विषाणू, जिवाणू, कवक आदी सूक्ष्मजीवांनी आपल्याशी नक्की कशा प्रकारचे दुहेरी नाते ठेवले आहे हे समजून घेणे औत्सुक्याचे आहे. तसे पाहता अत्यंत क्लिष्ट असे हे नाते आहे, तितकेच अद्भुतही! जिवाणूंचे आणि विषाणूंच्या सान्निध्यात राहून मनुष्यप्राणी त्यांना ओळखू लागला आहे असे म्हणावे, तर ते विषाणूंनी अनेकदा खोटे ठरवले आहे.

माणसाने उपकारक जिवाणूंना मनसोक्त वापरले (उदा.- ब्रेड बनविणे, दारू बनविणे, दही, इडली/ ढोकळा, इ.) आणि अपकारक विषाणूंचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या तथाकथित सर्वात प्रगत मेंदूला या अदृश्य जिवांनी चांगलेच आव्हान दिले आणि वाढवत नेले.

आपण आणि ‘ते’ यांच्यामधले नाते हे ‘होस्ट-पॅरासाइट रिलेशनशिप’ किंवा यजमान आणि त्याच्यावरच अवलंबून असलेला परजीवी पाहुणा यांच्या नात्यासारखे आहे. हे नाते कधी मधुर तर कधी पार विकोपाला गेलेले. दोघांमध्ये जणू शर्यत लागली आहे. ही शर्यत दोन देशांतील शस्त्रस्पध्रेइतकीच (आम्र्स रेस) संहारक ठरणारी असली; तरी माणसाच्या दोन हातांनी (हेदेखील ‘आम्र्स’) एकमेकांशी स्पर्धा करण्याचे ठरवल्यास ती जशी बरोबरीतच सुटेल, तसे या मानव- सूक्ष्मजीव स्पध्रेत नेहमी होते. कोण पुढे जातो याच्या या शर्यतीत कधी मानव पुढे तर कधी सूक्षमजीव, असेच वारंवार दिसले आहे. कायमसाठी ना कोणी मागे ना कोणी पुढे.  ‘त्यांनी’ आपल्याला आजारी पाडले, मारले; आपण विविध प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) शोधली आणि त्यांना तोंडघशी पाडले. मग ‘त्यांनी’ या प्रतिजैविकांनाही पचविले, म्हणजे प्रतिकार- रेझिस्टन्स- वाढला तो त्यांचा!  क्षयरोगावर (टीबी ) आपण उपाय शोधले खरे; परंतु टीबीचा नवा, बहुऔषधीप्रतिकारक (मल्टि ड्रग रेझिस्टंट ) मायकोबॅक्टेरिअम आला. एड्सचा विषाणू हा तर मानवी प्रतिकारशक्तीची धूळधाण उडवू लागला. आपण विविध लसी बनविल्या तर सूक्ष्मजीवांनी या लसींवरही मात करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

इबोला, स्वाइन फ्लू अशा वेगवेगळ्या रूपांत कोणता ना कोणता विषाणू येतोच आहे. आपणही हरप्रकारे त्याला परतवून लावतो आहोत. शर्यत कायम आहे. पण खरे सांगायचे म्हणजे, या सर्व प्रकारांत माणसाला असे असुरक्षित वाटू देण्यात नवनव्या विषाणूंनी मोठी भूमिका बजावली आणि त्यामुळे मानवी उत्क्रांतीला – इव्होल्यूशनलादेखील हातभारच लागला. आपण कसे वागावे हेसुद्धा त्यानेच ठरविले. हे कसे?

आज जर कचऱ्याची गाडी शेजारून जात असेल तर आपण आपोआपच श्वास रोखतो, गटार जवळ येते आहे लक्षात आल्याबरोबर नाकतोंड झाकून दूर जातो. हा वास ‘घाणेरडा’ आहे, हे कोणी ठरविले? येथे जंतूंचा पसारा आहे, आपणांस अपाय होऊ शकतो या पूर्वेतिहासाच्या माहितीतून, भीतीपोटी किंवा काळजीखातर हे घडते.  स्वच्छतेच्या सर्व सवयी यातूनच निर्माण होत गेल्या आणि वाढत राहिल्या. माणसाचा मेंदू त्या प्रकारे काम करू लागला. रोग टाळण्यासाठीचा आपला हा खटाटोप ‘त्यांना’ न कळता तरच नवल! ‘ते’ मुळीच शांत बसले नाहीत. त्यांनी स्वत:मध्ये  बदल (म्यूटेशन) घडवले आणि त्याबरोबरच माणसाच्या शरीरातल्या विविध संस्थांना स्वत:च्या तालावर नाचविले. उदाहरणार्थ, पोटामध्ये शिरल्यानंतर भरघोस वाढून त्याची प्रजा उलटय़ा – जुलाबांनी आपल्याला हैराण करते. म्हणजेच त्याद्वारे बाहेर पडून इतरत्र पसरायला मोकळी होते. त्या वेळेस शिंकण्याचे काम नाही, कारण जी शरीरांतर्गत संस्था त्याच्या उपयोगाची नाही तिथे लक्षण कशाला? विषाणू पसरण्यासाठी जी संस्था निवडेल, तिथेच लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच, जर श्वसनमार्गास त्यांनी बाधित केले (रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) तर खोका, शिंका किंवा थुंका अशा चिथावण्या मानवाच्या अंतर्गत अवयवांना देऊन आणखी माणसांना आजारी पाडायला आणि स्वत: मात्र ‘दुधो नहाओ पुतो फलो’ म्हणायला हे विषाणू मोकळे!

विषाणू ‘हुशार’ असतात, असे या लिखाणातून सूचित होत असल्याचे काही वाचकांना वाटेल आणि काहींना रागही येईल.. पण आमच्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासात अशी शेकडोंनी उदाहरणे पुढे आली आहेत, त्यापैकी काही इथे बघू:

‘द अमेरिकन नॅचरलिस्ट’मध्ये आलेले हे एक प्रकरण- येथे ‘तो’ आहे एक कवक (फंगस). ‘ऑफिओकॉर्डिसेपस युनिलॅटरॅलिस’ अशा जडजंबाल नावाचा. आणि तो वापरतो मुंग्यांना. एकदा का हा ‘ऑफिओकॉर्डिसेपस युनिलॅटरॅलिस’ मुंगीत शिरला की मुंगीच्या मेंदूचा ताबा घेतो..  आता मुंगी केवढी, तिचा मेंदू तो केवढा, हा भाग अलाहिदा. ताबा घेणे महत्त्वाचे. आणि गंभीरदेखील. या बाधित मुंग्या त्यांचा अधिवास सोडून आता जमिनीवरील गवताच्या पात्यावर बरोबर खालून २५ सेंटिमीटरवर येऊन तोंडामध्ये पाते घट्ट धरून बसतात. तीही अशी जागा जिथे आद्र्रता असते ९० ते ९५ टक्के आणि तापमान २० ते ३० अंश सेल्सियस. सारे काही त्या ‘ऑफिओकॉर्डिसेपस युनिलॅटरॅलिस’ कवकासाठी अगदी हवे तस्से! येथेच त्या बाधित मुंग्यांचा मृत्यू होऊन त्यांच्या डोक्यातून कवकाचे हजारो स्पोअर्स (जीवकण) बाहेर येऊ लागतात आणि ‘लगे हाथ’ इतर मुंग्यांनाही बाधित करीत राहतात. (करोना विषाणूचे भय सर्वदूर असूनही काही माणसे बेफिकिरीने वागतात, हे पाहून मला पहिली आठवण आली ती या ‘ऑफिओकॉर्डिसेपस युनिलॅटरॅलिस’बाधित मुंग्यांची! आणि वाटले – या माणसांच्या मेंदूवर कोणाचे राज्य आहे?)

इतिहासातून फक्त माणूसच शिकतो असे काही नाही बरे! सूक्ष्मजीवदेखील शिकतात. मग प्राणी आणि परोपजीवी यांचा जणू तह होतो. त्या तहाच्या अटी सूक्ष्मजीवांच्याच सोयीच्या असतात, हे आणखी विशेष. ते कसे, हे समजण्यासाठी मिग्झोमाची गोष्ट उपयोगी पडेल.

ऑस्ट्रेलियात सन १८९८ पासूनच रानटी सशांचा प्रचंड उपद्रव थोपवण्याचे उपाय योजावे लागत होते. या खादाड रानसशांच्या धुमाकुळामुळे शेती, पर्यावरण धोक्यात आलेले असतानाच शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की ‘मिग्झोमा’ नावाचा एक विषाणू सशांना आजारी पाडून मारू शकतो. झाले तर..  ‘मिग्झोमॅटोसिस’ या रोगाने पछाडलेले शेकडो ससे बाहेर सोडण्यात आले (पहिला ससा सोडण्यास १९३७ आणि परिणाम दिसण्यास १९५० साल उजाडले होते)! सुरुवातीला एकदम भारीच परिणाम दिसून आले. ज्या सशाला लागण होई, तो मरे. पण नंतर नंतर रोगराई निवळू लागली. त्या जहाल मिग्झोमा विषाणूची जागा त्यांच्यातल्याच मवाळ ‘मिग्झोमा’ने घेतली आणि हे मृत्यूंचे तांडव थांबले. याला ‘नॅचरल सिलेक्शन’ या नावाने गोंजारले गेले; पण वास्तविक ते मिग्झोमा विषाणूच्याही फायद्याचेच ठरले. सर्व ससे मारून तो विषाणू तरी कुठे जिवंत राहणार होता? म्हणून ‘जगा आणि जगू द्या’ हा मार्ग त्याने निवडला. अर्थात ससे मंडळींनीही आपली प्रतिकारशक्ती वाढवली – म्हणजे पुन्हा, एकाच शरीरातील दोन हातांची स्पर्धा या अर्थाने ‘आम्र्स रेस’मध्ये बरोबरीत झाली.

जाता जाता, सूक्ष्मजीवशास्त्राची एक अभ्यासक म्हणून लक्षात आलेली एक गोष्ट सांगायलाच हरकत नसावी की – पूर्वी आपल्याला मारण्यास कारणीभूत ठरणारे आजार निर्माण करण्यासाठी सूक्ष्मजीवांनाही बरेच कष्ट पडत असत. उदाहरणार्थ प्लेग. यामध्ये आपल्याला गाठण्याआधी उंदीर, त्याच्यावरची पिसू आणि पिसूमध्ये असलेला विषाणू, अशी साखळीचोर असे. उंदीर मेल्यावर नाइलाजास्तव पिसूला ते शरीर सोडावयास लागे व गरम रक्ताच्या शोधात माणसाकडे वळावे लागे; तेव्हा कुठे आपल्याला प्लेग होई. मलेरिया, डेंग्यूसारखे रथी-महारथीदेखील डासांशिवाय आपले घोडे दामटवू शकत नाहीत. रेबीजला कुत्रे-मांजरी आवश्यक असतात. थोडक्यात, माणसांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग जरा दूरचेच असत.. तेव्हा बायपास किंवा उड्डाणपूल नसत. करोनाने मात्र असे कोणास मध्ये न घेता हल्लाबोल केला आहे. वटवाघळांकडे बोट दाखविले जाते, पण त्यांना माणसांत सोडणाऱ्या मेंदूवर कोणाचे राज्य आहे हा संशोधनाचा विषय आहे.

नेहमीप्रमाणे शास्त्रज्ञ आता पुन्हा, या विषाणूशी ‘हातांच्या शर्यती’त आहेत. त्यांच्यामार्फत शासकीय यंत्रणांकडे ज्या सूचना येताहेत त्यांचे जरूर पालन करून युद्धात – आणि तहातसुद्धा- आपणच जिंकण्याची तयारी आपण केलीच पाहिजे.

लेखिका सूक्ष्मजीवशास्त्रातील पीएच.डी. धारक असून नाशिकच्या
के.टी.एच.एम. महाविद्यालयात अध्यापन करतात. ईमेल:

pratima.p.wagh@gmail.com