19 November 2017

News Flash

एकाच नाण्याच्या दोन बाजू

मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अमृता कुलकर्णी-गुरव | Updated: May 7, 2017 2:09 AM

पृथ्वी ही पाच वेगवेगळ्या आवरणांपासून बनली आहे- वातावरण, जलावरण, भूआवरण, मृदावरण आणि जीवावरण. या पाचही आवरणांत एक गोष्ट समान आहे ते म्हणजे पाणी.

मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील बहुसंख्य खेडेगावांकरिता आणि शहरांकरिता भूजल हेच जलपूर्तीचे महत्त्वाचे साधन आहे. भूजलाचा होणारा बेसुमार उपसा जर लक्षात घेतला तर नजीकच्या काळात भूजलसाठय़ांच्या वापरावर र्निबध आणावे लागतील म्हणूनच आपण सर्वानी जलसाक्षर होऊन, व्यक्तिगत स्तरावर तसेच स्थानिक पातळीवर लोकसहभागातून ‘भूजल नियोजन आणि व्यवस्थापन’ ही कार्यपद्धती अवलंबिण्यास सुरुवात करायला हवी. जलसाक्षर होण्यासाठी ‘भूजल म्हणजे नेमके काय’, ते कोणकोणत्या स्वरूपातून आपल्याला मिळते, त्याची पातळी कशी मोजायची, पाण्याची गुणवत्ता कशी तपासायची हे समजून घेतले पाहिजे. आपल्याला गरज आहे ती जलसाक्षरतेची बाराखडी शिकून घेण्याची. या बाराखडीची सुरुवात होते ‘जलचक्रा’पासून. आपण हे जलचक्र थोडक्यात समजून घेऊ या.

पृथ्वी ही पाच वेगवेगळ्या आवरणांपासून बनली आहे- वातावरण, जलावरण, भूआवरण, मृदावरण आणि जीवावरण. या पाचही आवरणांत एक गोष्ट समान आहे ते म्हणजे पाणी. पाचही आवरणांत वेगवेगळ्या स्वरूपांत पाण्याचे वहन होते. पाऊस कसा पडतो हे तर आपल्याला माहिती आहेच, पण तरी आपण थोडक्यात उजळणी करू या. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, पाण्याची वाफ होऊन वर जाते, त्याचे ढग तयार होतात, ढगांना थंड हवा लागली की पाऊस पडतो. याव्यतिरिक्त जलचक्रात खूप निरनिराळ्या प्रक्रिया घडून येतात. पाऊस जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा त्यातील काही पाणी वाहून जाते त्याला ‘सरफेस रनऑफ’ असंही म्हणतात. यातील काही पाण्याचे बाष्पीभवन होते, काही झाडांमार्फत उत्सर्जित होऊन वातावरणात परतते. दृश्य रूपातील पाण्याला ‘पृष्ठजल’ अर्थात ‘सरफेस वॉटर’ असे म्हणतात. अशा तऱ्हेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर व मातीचा थर पूर्ण भरण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागल्यानंतर उर्वरित पाणी खोलवर मुरून अदृश्य रूपातील भूजलामध्ये रूपांतरित होते.

आज जगातील गोडय़ा पाण्याचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे भूजल होय. जो पाऊस पडतो त्यातला काही पाऊस माती-दगड-मुरुमातून खाली झिरपतो. पाणी जमिनीत झिरपण्याच्या क्रियेला ‘ इन्फिल्ट्रेशन’ असंही म्हणतात. भूगर्भातील खडकांमधील छिद्रे, संधी, मोकळ्या जागा व चिरा-भेगांमध्ये पाणी साठते आणि त्याचे वहन होते, या भूशास्त्रीय संरचनेला ‘भूजलधारक’ म्हणजे ‘अ‍ॅक्विफर’ असे संबोधले जाते. आपल्या भागातील जमिनीखाली नक्की किती पाण्याचा साठा होईल आणि तो आपल्याला किती काळ पुरेल, हे त्या-त्या भागातील भूजलधारकाच्या साठवण्याच्या आणि वहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. खोलवर जोपर्यंत पूर्णपणे एकसंध भूस्तर आढळत नाही तिथपर्यंत पावसाचे पाणी मुरते आणि साठते. आपल्या भागातील भूजलधारकाचे स्थान ओळखण्यासाठी खडकांचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म माहिती असणे म्हणजेच भूस्तराची माहिती असणे तितकेच आवश्यक आहे. आपण थोडक्यात या भूस्तराची माहिती करून घेऊ या.

भारत हा भूविविधेतेने नटलेला देश आहे, त्यामुळे येथे आढळणाऱ्या खडकांच्या प्रकारांमध्ये विविधता आहे. खडकांच्या प्रकारांनुसार, वेगवेगळ्या प्रदेशांत आढळणारे भूजलसाठे यांमध्येही फरक असतो. खडकांचा पोत, सच्छिद्रता आणि त्यांची रचना यावरून त्यांत पाणी साठवण्याची क्षमता अधिक की पाणी वहन करण्याची क्षमता ‘पर्मिबिलिटी’ अधिक हे ओळखता येते. ज्या खडकाची सच्छिद्रता अधिक त्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अधिक. अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, खडक जर मोठय़ा मोठय़ा कणांपासून बनला असेल तर त्याची वहन क्षमता अधिक आणि जर छोटय़ा कणांपासून बनला असेल तर त्याची साठवण क्षमता अधिक. उदाहरणादाखल, आपण जर पश्चिम महाराष्ट्रात आढळणारा काळा पाषाण डोळ्यासमोर आणला तर त्यामध्ये सच्छिद्रता किंवा पाणी खेळण्याची मोकळी जागा यांचे प्रमाण कमी असल्यामुळे अशा खडकांमध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी आहे. याउलट मराठवाडा-विदर्भात आढळणारा गाळापासून बनलेला खडक ‘सेडिमेंटरी रॉक’ बघितला तर तो सच्छिद्र असल्याने त्यांत पाणी साठवण्याची क्षमता जास्त आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर येथे प्रामुख्याने आढळणाऱ्या ‘बसाल्ट’ खडकाची भूजल धारण क्षमता ही कमी आहे.

आपण जर जमिनीची संरचना पाहिली तर आपल्या असे लक्षात येईल की, ह्य़ुमस, माती, मुरूम, सच्छिद्र खडक आणि पक्के खडक असे एकाखाली एक थर आढळून येतात. पावसाचे झिरपलेले पाणी या कुठल्या तरी थरांमध्ये साठून बसते. ते कोणत्या थरामध्ये आढळते याप्रमाणे भूजलधारकाचे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. जेव्हा भूजल, खडकांची छिद्रे, माती यांद्वारे वातावरणाच्या प्रत्यक्ष संपर्कात येते तेव्हा त्याला  ‘अन्कन्फाइण्ड’भूजलधारक म्हणतात. जेव्हा भूजल अच्छिद्र खडकांच्या दोन थरांमध्ये, उच्च दाबाखाली (‘हायड्रॉलिक प्रेशर’) आढळते तेव्हा त्याला ‘कन्फाइण्ड’भूजलधारक म्हणतात. आपण जर विचार केला तर असे लक्षात येते की,  वरच्या थरातील भूजलाचा साठा जर संपुष्टात आला तर कन्फाइण्ड भूजलधारक ही संकटकाळी उपयोगात येण्यासाठी निसर्गाने केलेली सोय आहे.

पाण्याने पूर्ण भरलेला भूजलधारक म्हणजे संपृक्त भूजलधारक (‘सॅच्युरेटेड अ‍ॅक्विफर’). संपृक्त भूस्तरावरील वरच्या पृष्ठभागास ‘वॉटरटेबल’असे म्हणतात. भूपृष्ठावर जसे उंच-सखल भाग असतात, तसेच उंच-सखल भाग वॉटरटेबलवरसुद्धा असतात. पृष्ठजलाप्रमाणेच भूजल उताराच्या दिशेने सरकत राहते. जिथे नदी-नाल्याकाठी जमिनीला खोल उतार असतो तिथे वॉटरटेबल झऱ्यांच्या रूपाने जमिनीवर येते. हेच पाणी आपल्याला नंतर विहिरी आणि बोअरवेलमध्ये उपलब्ध होते.

एखाद्या भागात जितका पाऊस पडतो त्यापकी केवळ १२ ते १५ टक्के पाणी भूजलधारकापर्यंत पोहोचते आणि त्यातूनच भूजलाचे पुनर्भरण (रिचार्ज) होते. कोणत्याही भूजलधारकाचे पुनर्भरण होण्यासाठी लागणारा कालावधी हा सांगता येणे अवघड आहे, कारण तो पर्जन्यमान, तापमान, मृदेचा प्रकार आणि खडक यांसारख्या अनेक बाबींवर अवलंबून असतो. भूजलधारकामधून पाणी बाहेर पडण्याच्या क्रियेला उपसा (डिसचार्ज) असे म्हणतात.

वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार विहिरी आणि शेकडो फूट खोल खणलेल्या बोअरवेल्सच्या बेसुमार संख्येने भूगर्भाची अक्षरश: चाळणी झाली आहे. विहिरी-बोअरवेल्सच्या माध्यमातून  भूजलाचा उपसा करत करत आपण भूगर्भातील हे सगळे भूजलसाठे संपवू पाहात आहोत. भूजलाचे महत्त्व आणि त्याची जोपासना करण्यासाठी आवश्यक असलेली शास्त्रशुद्ध माहिती यांचा अभाव असल्यामुळे आपल्याला विहिरी, झरे, नाले, नद्या कोरडय़ा पडत चाललेल्या दिसत आहेत. मानवी कृत्याने झालेल्या भूजलाच्या या अमानवी शोषणामुळे आपल्याला भीषण परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येक गावाने जर खऱ्या अर्थाने आपल्या गावाच्या पाणलोटक्षेत्र विकासाचा विचार केला, तर भूजल व्यवस्थापन आणि नियोजन ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरते. त्यामुळे भूजल, भूजलधारक या सगळ्याची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या रूपाने जमिनीत मुरलेले हे पाणी जरी आपल्या स्वत:च्या मालकीच्या जमिनीखाली असले तरी भूजल या सामुदायिक संसाधनाची जपणूक करणे ही आपल्या सर्वाची नतिक जबाबदारी आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘भूपृष्ठावरील पाणी’ आणि ‘भूपृष्ठाखालील पाणी’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकंदर जलचक्रामध्ये दोनही पाण्यांचे एकमेकांशी आदानप्रदान होत राहते, तेव्हा पाणी व्यवस्थापनात यांचा सयुक्तिक विचार होणे गरजेचे आहे.

यासाठीच आनंदवन जलसाक्षरतेच्या माध्यमातून ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.  जमिनीखाली आपल्या नजरेआड चलनवलन होणाऱ्या भूजलाचे विविध गुणधर्म आणि भूजल व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती कशी गोळा करायची, हे आपल्याला पुढील लेखातून जाणून घेता येईल.

संपर्क क्रमांक :  ७४४७४ ३९९०१, ९९२२५ ५०००६

अमृता कुलकर्णी-गुरव

amruta.gurav@gmail.com

 

First Published on May 7, 2017 2:09 am

Web Title: article on water management in india