डॉ. शमसुद्दीन तांबोळी

जगात करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने प्राण गमवाव्या लागलेल्या लोकांची संख्या आता लाखाच्या घरात पोहोचली आहे आणि रुग्णांची संख्या वाढतच असल्याने येत्या काळात किती तरी आबालवृद्धांना आपला प्राण गमवावा लागणार आहे. करोना विषाणू जात, धर्म, लिंग किंवा देश यांची तमा न बाळगता पसरत चालला आहे. करोना प्रसार रोखण्यासाठी धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा यांवर निर्बंध घालण्यात आले. भारताचे पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व धर्मीयांना आपापली प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आवाहन केले. असे असतानाही काही मंदिरे, मशिदी, गुरुद्वारांत सामुदायिक प्रार्थना झाल्या. रस्ते, बाजार, वसाहतींत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम धाब्यावर बसवण्यात आले. या दरम्यान संसदेचे अधिवेशन आणि हजारांच्या गर्दीत पार पडलेल्या कर्नाटकातील शाही विवाहसोहळ्यात त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती चर्चेत आली. कळत-नकळत अनेकांनी मार्गदर्शक सूचनांना हरताळ फासला. जगात काय सुरू आहे, याची सतत जाणीव होत असताना आपल्याकडे मात्र बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा दाखवण्यात आला. त्याचे मूर्त परिणाम आज आपण पाहत आहोत.

भारतात पंतप्रधान मोदींनी २२ मार्च रोजी एक दिवसाची जनता संचारबंदी लावली आणि २४ मार्चला २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. धास्तावलेले मजूर मैलोन्मैल पायी चालत गावाकडे गेले. दिल्लीत आनंदविहार येथे गावी जाण्यासाठी जवळपास १५ हजार लोक जमले. परगाव, परराज्यांतील लोकांनी जेथे आहेत तेथेच थांबावे, अशा सूचना करण्यात आल्या. काहींनी सूचना पाळल्या, काहींनी आपापले मार्ग धरले. नियमभंग करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल झाले.

तबलीगी म्हणजे सर्व मुस्लीम नव्हेत

या दरम्यान दिल्लीस्थित निजामुद्दीन येथील तबलीगी जमात मरकज चर्चेत आले. आजही ही चर्चा आणि त्यानिमित्ताने आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. करोना रुग्णांची संख्या वाढत असताना नैतिक जबाबदारी पत्करून दिल्ली सरकार, केंद्राचे गृहखाते आणि तबलीगी जमात खेद किंवा दिलगिरी व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे भारतात शिगेला पोहोचलेल्या धार्मिक द्वेषाचे पडसाद प्रसार आणि समाजमाध्यमांवर जाणवू लागले. बनावट दृक्मुद्रणे, खोटी माहिती देणारे मजकूर यांतून सामान्य मुस्लीम समाजालाच लक्ष्य करण्याचे प्रयत्न झाले. तबलीगी जमातच्या मरकजला गेलेल्या लोकांना उद्देशून ‘करोना जिहाद’, ‘तबलीगी बॉम्ब’ असे संबोधित करण्यात येत होते. यामुळे सामान्य मुसलमान धास्तावला. मुस्लीम समाजाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या समाजमाध्यमांवरील नोंदी बनावट असल्याचे उघड झाले. शेवटी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा नोंदी टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, माध्यमांवर आलेल्या खोटय़ा प्रचाराचा संदर्भ देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे गरजले  – ‘या तबलीगींना कसली ट्रीटमेंट देताय? त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. लॉकडाऊन संपू द्या, नंतर गाठ आमच्याशी आहे.’ समाजमाध्यमांतील खोटय़ा प्रचाराचा रोख फळभाज्या विकणाऱ्या सामान्य मुस्लीम वा धार्मिक मुस्लिमांविरोधात होता. ज्या मुस्लीम समाजातील काहींना गोरक्षकांनी शंका आली म्हणून कायदा हातात घेऊन मारले, ‘लव्ह-जिहाद’च्या नावाने जाळले, त्या मुस्लीम समाजाची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. तबलीगी जमात हा मुस्लीम समाजातील एक प्रभावी गट आहे. परंतु तबलीगी म्हणजे सर्व मुस्लीम समाज नाही, हे वास्तव दोषारोप करताना समजून घेतले जात नाही.

परंपरावादी आग्रह

‘तबलीगी’ म्हणजे अल्लाहच्या संदेशाचा प्रचार, ‘जमात’ म्हणजे समुदाय आणि ‘मरकज’ म्हणजे केंद्र. भारतात तबलीगी जमातचे मरकज म्हणजे मुख्यालय हे दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. या मरकजमध्ये मशीद आहे; एकाच वेळी पाच-दहा हजार लोक तिथे राहू शकतात. येथे तबलीगीच्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. तबलीगी जमातचे लोक भारताशिवाय जगातील सुमारे दोनशे देशांत आहेत. दरवर्षी भारतातील विविध राज्यांत त्यांचे इज्तेमा म्हणजे मेळावे होतात. तबलीगीची स्थापना भारतात १९२६ मध्ये झाली; म्हणजे नव्वदहून अधिक वर्षांची परंपरा आहे. तबलीगी जमातची स्थापना ‘सामान्य मुस्लिमांना धर्माची शिकवणूक देण्यासाठी’ झाली. मात्र, पैगंबरांना अपेक्षित असलेला शुद्ध इस्लाम यांनाच माहीत आहे, असा त्यांचा दावा असतो. त्यांच्या म्हणण्यानुसार,  मुस्लिमांनी इस्लामचे पुढील पंचस्तंभ आचरणात आणावे – (१) अल्लाह एकमेव आहे- मोहम्मद हे त्यांचे प्रेषित आहेत यावर इमान (२) दिवसातून पाच वेळा नमाज (३) रमजान महिन्यातील रोजे (४) जकात-सदका-फित्रा (दानधर्म) आणि (५) हज यात्रा. तसेच या पंचतत्त्वांशिवाय मदरशातून धार्मिक शिक्षण, ठरावीक पद्धतीचा पोशाख-टोपी, मिशी नसलेली दाढी, इस्लामचे श्रेष्ठत्व आणि मुस्लिमेतरांशी संबंध या इतर पाच बाबींकडे तबलीगी जमातचे विशेष लक्ष असते. एकूणच अलगतावाद जोपासत असताना तबलीगी जमात ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनाला महत्त्व देते. ऐहिक जीवन हे तात्कालिक आहे. मुस्लिमांना आखिरत (म्हणजे अल्लाहकडे न्यायनिवाडय़ाचा दिवस)ची भीती आणि प्रलोभन दाखवून समाजाला अधिकाधिक धर्मवादी बनवणे हा त्यांच्या कार्याचा गाभा आहे.

सर्वसाधारण मुस्लीम समाज तबलीगीकडे आकर्षित होतो, कारण त्यांना हे धर्माचे वाहक वाटतात. तबलीगी जमात हजारो नव्हे तर लाखांच्या घरात असणारे इज्तेमा (मोठे मेळावे) घेते. तसेच दहा-वीस तबलीगी गावोगावी जाऊन लोकांना धर्माची दावत देतात. त्यांना नमाजी करतात. काही मुस्लीम या जमातीत सामील होऊन तबलीगी पेहराव करतात. घरी परतल्यानंतर आपल्या मुली, बहिणी, बायका आणि आईला नखशिखांत बुरखा घालायला भाग पाडतात. जेवायला कसे बसावे, पाणी कसे प्यावे या बारीकसारीक गोष्टी बारकाव्याने पाळतात. आपण खरे धार्मिक झालो असे या मंडळींना वाटू लागते. ज्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणासाठी पैसे नसतात, ते बायकापोरांना वाऱ्यावर सोडून ४० दिवस ते चार महिने जमातमध्ये जातात. काही कुटुंबांतील एखाद्या सदस्य जर व्यसनी असेल, तर त्याला जमातीत पाठवतात. ४० दिवस जमातीत गेल्यावर तो व्यसनापासून दूर जातो. तबलीगी होऊन परततो. काही वेळा हे व्यसनी लोक सुधारतातसुद्धा. यामुळे सामान्य मुस्लिमांत तबलीगी जमात लोकप्रिय होते. तबलीगीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा साधेपणा. लग्न समारंभ किंवा धार्मिक सणांमध्ये डामडौल नसावा, खर्च करू नये, ढोलताशे-संगीत नसावे, असा त्यांचा आग्रह असतो. शिवाय विविध पद्धतींच्या अंधश्रद्धा आणि चमत्कारांना त्यांचा विरोध असतो. मात्र, एका चमत्कारावर विश्वास असतो, तो म्हणजे इस्लाम-कुराण हे दैवी आणि अंतिम आहे. ऐहिकतेला महत्त्व नसल्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाला स्थान नाही.

वारकरी व सूफींपेक्षा निराळे..

काही मंडळी तबलीगी जमातची वारकरी संप्रदायाशी तुलना करतात. त्यांच्यातील साधेपणा, ईश्वर श्रद्धा, धार्मिकता आणि अराजकीय व्यवहार समान आहेत असे त्यांना वाटते. मात्र हे खरे नव्हे. तबलीगी जमात अलगतावाद जोपासते. वारकरी संप्रदायातील काही संत हे बंडखोर आहेत. तबलीगी बंडखोर नसतात. वारकरी मूर्तिपूजक असतात, तबलीगी मूर्तिपूजेच्या विरोधी! जर वारकरी संप्रदायाची तुलना करायचीच असेल, तर ती सुफी संप्रदाय किंवा सुफी संतांशी करता येईल. सुफी संप्रदायाचे लोक बंधुभाव, एकत्व, गंगाजमनी संस्कृती मानतात. मात्र, दर्गा संस्कृतीत भक्तिगीत गायनात दंग असणारा सुफी संप्रदाय आता कमी झाला आहे. तबलीगींचा सुफिझम, संगीत, दर्गा याला विरोध असतो. आज दर्गा संस्कृती मानणारा मोठा मुस्लीम समाज आहे. तबलीगी हे देवबंदच्या जवळ आहेत, तर सुफी हे बरेलवी पंथाच्या जवळ आहेत. हे दोन्ही गट सुन्नी मुस्लीम आहेत. फिरंगी महल हा आणखी वेगळा प्रकार आहे. लखनौला त्यांचा मोठा मदरसा आहे. त्यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला होता. ‘पॅन इस्लामिझम’वर त्यांचा विश्वास आहे. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत त्यांचा सहभाग होता.

तबलीगी जमात वैज्ञानिकता, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समता, व्यक्तिस्वातंत्र्य अशा आधुनिक मूल्यांना महत्त्व देत नाही, म्हणून समाजाच्या प्रगतीत त्यांना स्वारस्य नसते. आजच्या काळाशी सुसंगत होण्यापेक्षा परंपरावादी राहण्यात या मंडळींना धन्यता वाटते. ऐहिक जीवनासाठी आधुनिक शिक्षण, आर्थिक प्रगती, जागतिक पातळीवरचे ज्ञान-विज्ञान समजून घेऊन मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध, उच्च, प्रगल्भ करण्यापेक्षा शुद्ध धर्माचरणावर त्यांचा भर असतो. आजचे सर्व प्रश्न हे शुद्ध धर्माचरण नसल्याने निर्माण झाले आहेत, अशीच त्यांची धारणा असते. आधुनिक समाजाला ज्या दिशेने घेऊन जाणे अपेक्षित आहे, बरोब्बर त्याच्या विरुद्ध दिशेने समाजाला घेऊन जाणारी ही तबलीगी जमात आहे.

मात्र, तबलीगी भारतीय नागरिक आहेत. भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना दिलेला धर्मस्वातंत्र्याचा हक्क त्यांनाही आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व घटनाबा नाही. मात्र, संविधानाने अपेक्षिलेले मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे सर्वाची जबाबदारी आहे. तबलीगीप्रमाणेच भारतात अनेक समुदाय आहेत, लोकप्रतिनिधीही आहेत, ज्यांना सांविधानिक कर्तव्यांचे भान नसते.

नैतिक चूक आहेच..

‘करोना आपत्तीच्या काळात आमचे काहीच चुकले नाही, आम्ही सर्व नियमांचे पालन केले. जी परिस्थिती ओढावली आहे, त्यास गृहमंत्रालय जबाबदार आहे..,’ असा तबलीगी जमातचा दावा आहे. घटनाक्रम पाहून त्यांना निर्दोषत्व द्यावे असे तबलीगी प्रतिपादन करतात. समजा तबलीगीचे तांत्रिकदृष्टय़ा चुकले नसले तरी नैतिक दृष्टिकोनातून चूक आहेच. जगभर करोनाचे थैमान सुरू असताना परदेशी नागरिकांना येण्याबाबत अटकाव करता आला असता, तो केला गेला नाही. मरकजमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले नाही. त्यापैकी अनेकजण मरकजहून परत गावी-परराज्यांत गेल्यानंतर स्वत:हून आरोग्य प्रशासन, पोलीस यांच्याकडे जाऊन तपासणी किंवा चौकशीला सामोरे गेले नाहीत. तबलीगींची शोधमोहीम आखताना पोलीस यंत्रणेला आपल्याकडून किती त्रास झाला, याबद्दल त्यांना खंत नाही.  महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्या-त्या भागातील पोलीस पुन:पुन्हा आवाहन करीत आहेत तरी प्रतिसाद नाही. आजही या मंडळींचा विज्ञानापेक्षा अल्लाहवर विश्वास आहे. पूर्ण तपास करूनही सध्या महाराष्ट्रात मरकजहून परतलेले, पण यंत्रणेकडे न आलेले जवळपास ६० तबलीगी आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तबलीगी जमातच्या मरकजमुळे रुग्णांची संख्या वाढली असा ठपका ठेवला आहे. या सर्व घडामोडींचे परिणाम तळागाळातील मुस्लिमांना भोगावे लागत आहेत. सामान्य मुस्लिमांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांच्यात अपराधीभाव वाढतोय. मोकळ्या मनाने राहता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

भारतात सर्वत्र चर्चा, आरोप होताना निजामुद्दीन तबलीगी मरकजचे प्रमुख आमीर मौलाना साद पुढे येऊन स्पष्टीकरण देण्याऐवजी लपून बसले आहेत. त्यामुळे अनेक शंका घेतल्या जात आहेत. त्याचा नकळत परिणाम सामान्य मुस्लिमांवर होतोय. मुस्लीम सत्यशोधक मंडळासह भारतीय मुस्लीम महिला आंदोलन तसेच अन्य सामाजिक संघटनांनी तबलीगीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. मरकजचे प्रमुख व आयोजकांनी  भारतीयांची माफी मागावी. १५ दिवसांनी रमजान महिना सुरू होणार आहे. रोजे, सामुदायिक नमाज, तराबीची नमाज, इफ्तार पार्टी याचे मोठे आकर्षण असते. हा रमजान

चार भिंतींच्या आतला असावा, कारण हा

करोना कोणाची श्रद्धा तपासून संसर्ग करीत नसतो. धर्मापेक्षा विज्ञानच आम्हाला वाचवू शकते, याची जाणीव सर्वानीच ठेवावी.

लेखक ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत. ईमेल : tambolimm@rediffmail.com

‘शाहीनबाग’सारखी आंदोलने ही मूलत: संविधानाचा उद्घोष करणारी होती!