01 October 2020

News Flash

..पुढल्या वर्षी नक्की या!

रत्नागिरीमध्ये जणू करोना ही समस्या राहिलेलीच नाही, असा काही मुंबईकर चाकरमान्यांचा समज झालेला आहे.

संग्रहित छायाचित्र

नंदिनी देसाई

करोनाप्रसार होत असताना कोकणातील गणपती सणासाठी यंदा जाता येईल, अशी आशा अनेक मुंबईकरांना आजही असणे ठीकच; पण संसर्गाच्या आपत्तीला रत्नागिरीसारखा जिल्हा किती तोंड देणार, याला मर्यादा आहेत..

गौरीगणपती आले की, कोकणामध्ये सगळ्यांना वेध लागतात ते चाकरमान्यांचे. अनेक पिढय़ा मुंबईत घालवूनही गावाकडे यांची नाळ टिकून राहते ती याच कारणामुळे. पण यंदा मात्र या सणालाच काय, अख्ख्या निसर्गाला गालबोट लागलेले आहे. करोना महामारीने जगभरच हाहाकार उडवलेला असताना, सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेल्या भारतात कडकडीत टाळेबंदी पाळूनही, करोनाचे आकडे वाढतच आहेत. सुरुवातीला मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये फैलावत असलेला रोग हळूहळू इतर शहरांमध्ये-खेडय़ांकडे पसरत चालला आहे. सध्या प्रामुख्याने केवळ लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींच्याच चाचण्या करत असूनही, रत्नागिरीत जवळपास १,८०० पर्यंत बाधितांचा आकडा पोहोचलेला आहे. १ ऑगस्टपर्यंत ६० मृत्यू झालेले आहेत. यामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. अशा वेळी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी येण्यामुळे अनेकविध समस्या निर्माण होत आहेत.

रत्नागिरीमध्ये जणू करोना ही समस्या राहिलेलीच नाही, असा काही मुंबईकर चाकरमान्यांचा समज झालेला आहे. गणपतीच्या सणाला या सर्व चाकरमान्यांना गावी यायचे आहे. हरकत नाही. अवश्य या. पण येण्यापूर्वी काही खास गोष्टी ध्यानात घ्या. इथे काहीही वैद्यकीय सोयीसुविधा नाहीत. आज करोनाच्या काळातच काय, पण पूर्वीही अनेकदा गंभीर रुग्ण हा कोल्हापूर अथवा मुंबई-पुण्यालाच न्यावा लागत असे. करोनामुळे तर परिस्थिती आणखी बिकट आहे.

टाळेबंदी सुरू झाली ती ऐन शिमग्याच्या सणात. होळी सुरू झाल्यावर प्रत्येक गावात देवीचे पालखी सोहळे सुरू असण्याचे दिवस. तरीही, रत्नागिरीकरांनी सण साजरा केला नाही. पालखी मिरवली नाही. हे सर्व पाळूनही रुग्ण इतके का वाढले? टाळेबंदी अंशत: उठवल्यानंतर मुंबईमध्ये दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राहणारे अनेक चाकरमानी आपल्या गावी परतले. त्यांनी येणे आवश्यक होते, पण त्यांच्याचसोबत मुंबईमध्ये टाळेबंदीला कंटाळलेले अनेक ‘टुरिस्ट’देखील कोकणात फिरायला आले, हॉटेले-लॉजेस सुरू नसल्याने लांबचे, दूरचे नातेवाईक तेव्हा एकदम जवळचे झाले, आंबे-काजू-फणस यांची चैन झाली. गावातली शुद्ध हवा आणि पाणी यांमुळे त्यांना इथे विलगीकरणात जाण्याची काहीही गरज भासली नाही. परिणामी, इथे मे महिन्याच्या शेवटी रत्नागिरीकर घरामध्ये बंद आणि मुंबई/पुणेकर गावभर फिरत आहेत ही स्थिती. शहरात ही अवस्था, तर वाडय़ावस्त्यांमध्ये कुणीही आपखुशीने विलगीकरणात जायला तयार नाही. ‘होम क्वारंटाइनचा मारलेला शिक्का काय काय वापरल्याने पुसला जातो’ याचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश फिरू लागले. सुमारे दोन लाख मुंबईकर यादरम्यान जिल्ह्य़ात परतले होते. इथे गावकऱ्यांनी आपल्या घरी परत येण्याबद्दल काहीच प्रश्न नव्हता. मुद्दा होता, तो स्वयंशिस्तीचा. अत्यंत व्यवस्थितरीत्या ही मंडळी जर विलगीकरणात गेली असती, तर आज रत्नागिरीमध्ये करोनाचे भयावह रूप दिसते आहे, ते दिसलेच नसते.

इथे सापडलेला पहिला शृंगारतळीचा रुग्ण आखाती देशातून परतलेला होता. त्या वेळी पूर्ण गाव सील करण्यात आले. गावकऱ्यांनी उत्तम सहकार्य दिले. त्यानंतरचे रुग्णदेखील परदेशातून आलेले होते. मार्चमध्ये अगदीच सुरुवातीला सापडलेले हे रुग्ण; पण टाळेबंदी आणि नागरिकांची स्वयंशिस्त यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात होती. पर्यायाने, रत्नागिरी ‘ग्रीन झोन’मध्येच राहिला. १४ मार्चला दुबईहून आलेला रुग्ण १८ मार्चला आढळला. त्यानंतर एप्रिलअखेर अवघे चार रुग्ण असलेला रत्नागिरी जुलैअखेरला १,७५० पर्यंत पोहोचला. मुंबई-पुण्याच्या आकडेवारीपुढे हा आकडा कमीच भासला तरी, इथल्या एकंदर वैद्यकीय सेवासुविधांचा विचार करता ही अवस्था भीषण ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ाची एकूण लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेप्रमाणे) साधारण १७ लाख. जिल्ह्य़ाबाहेरून आलेले दोनेक लाख नागरिक पकडल्यास, आज जिल्ह्य़ाची लोकसंख्या सुमारे २० लाख आहे असे म्हणता येईल. यापैकी केवळ १२ टक्के लोक शहरी भागात, तर उरलेले ८८ टक्के ग्रामीण भागात राहतात. यातही कोकणामधल्या दुर्गम खेडय़ांची संख्या प्रचंड. जिल्ह्य़ाच्या आठ हजार चौ. किमी. परिसरात शासकीय रुग्णालयांमधल्या एकूण रुग्णशय्या अर्थात बेड्सची संख्या आहे फक्त १,४००! जिल्ह्य़ात मल्टिस्पेशालिटी खासगी रुग्णालये फार कमी आहेत; जी आहेत त्या सर्वाची मिळून क्षमता २,००० हून जास्त नाही. म्हणजे सरकारी-खासगी वैद्यकीय सुविधा मिळून, ६०० व्यक्तींमागे एक बेड. त्याहून भयावह अवस्था आहे व्हेंटिलेटर्सची. जिल्ह्य़ात खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून एकूण व्हेंटिलेटर्स सुमारे ४५ आहेत. करोनाखेरीजही काही रुग्णांना व्हेंटिलेटर्स लागू शकतात, हे लक्षात घेतल्यास रत्नागिरीकरांची अवस्था काय आणि किती बिकट आहे हे लक्षात येऊ शकेल.

सध्या जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नियमानुसार खासगी रुग्णालये करोनाबाधित निदान झालेल्या रुग्णांना दाखल करून घेऊ शकत नाहीत. रुग्णाच्या करोना चाचणीमध्ये बाधा झालेली नसल्याचे निदान झाले तर ते रुग्ण पुन्हा खासगी रुग्णालयामध्ये दाखल होऊ शकतात, अन्यथा त्यांना कोविड रुग्णालयातच दाखल व्हावे लागते. याचा अर्थ, दुखणे कितीही गंभीर असले तरी रुग्णाचा त्या रोगापुरता विचार न करता सरसकट केवळ ‘कोविड पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह’ असा विचार केला जातो; यामध्ये प्रचंड वेळ वाया तर जातोच आणि अत्यवस्थ रुग्ण दगावण्याची शक्यतादेखील वाढत आहे. तशा घटना घडतही आहेत.

आता करोनाबाधित रुग्ण वाढल्यानंतर, रत्नागिरी शहरामधील मजगाव येथील एक बांधून तयार असलेले १०० बेड्सचे (नियोजित) महिला रुग्णालय कोविडसाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आलेली आहे. गेले चार महिने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अपघात विभाग एका शाळेच्या इमारतीत चालू होता. तो विभाग या इमारतीत हलवण्यापूर्वी मुळात, एक रुग्णालय म्हणून आवश्यक असलेल्या सर्व सोयी या इमारतीत असायला हव्या होत्या. आता तिथे कोविड रुग्णालय करणार हे जाहीर झाल्यावर प्रशासनाच्या लक्षात आले की, या रुग्णालयामध्ये प्रसाधनगृहे बांधलेलीच नाहीत! मग काही भाग मोडतोड करून पुन्हा बांधून तिथे टॉयलेट-बाथरूमची सोय केल्यावर आता बेसिनसाठी जागा नाही हे लक्षात आलेले आहे! हे सर्व झाल्यावर तिथे इतर सोयी उभारणार. कर्मचारी भरती करणार आणि मग ते रुग्णालय सुरू होणार. कधी? माहीत नाही.

जिल्ह्य़ात अगदी काहीच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वास्तविक घरी ठेवून अथवा विलगीकरण केंद्रात ठेवून उपचार करता येणे शक्य आहे. मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये तसे चालूही आहे. पण रत्नागिरी प्रशासनाला मात्र ते मान्य नाही. त्यामुळे  करोनाबाधित आला की सरसकट सिव्हिलमध्ये भरती करायचे. यामुळे जिल्हा रुग्णालयाची अवस्था वाईट झालेली आहे. वारंवार रुग्णांशी येत असलेला संपर्क आणि अपुऱ्या साधनांमुळे इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना संसर्ग झालेला आहे. यापैकी कित्येक जण विलगीकरण कालावधी संपवून परत कामावर रुजू झाले आहेत. तरीही, कामाचा वाढता ताण पाहता सध्या त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा केल्या जात आहेत. याच रुग्णालयात याहीपूर्वी अनेकदा कर्मचारी नाहीत, पुरेसे डॉक्टर्स नाहीत, सुविधा नाहीत ही वस्तुस्थिती राहिली आहे. सिव्हिलमधले एक ज्येष्ठ फिजिशियन गेले चार महिने अखंड सेवा बजावत आहेत. मागे काही दिवसांपासून त्यांना मदत म्हणून काही खासगी फिजिशियन रोटेशन पद्धतीने येत आहेत. मात्र, ही तात्पुरती व्यवस्था झाली.

सध्या रत्नागिरी शहरामधील खासगी रुग्णालयांपैकी एक रुग्णालय पूर्ण बंद आहे. दुसऱ्या दोन-तीन रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना ठेवण्यास परवानगी नसल्यामुळे एक तर सिव्हिल अथवा परवडत असेल तर कोल्हापूर वा मुंबई येथे जाणे हे दोनच पर्याय समोर आहेत. अर्थात, जर इतर जिल्ह्य़ांनी रुग्ण स्वीकारणे बंद केले तर काय होईल, याची कल्पना करवत नाही. एप्रिल आणि मे हे दोन महत्त्वाचे खरेदीचे महिने लोकांनी घरी बसून काढल्यामुळे टाळेबंदी थोडी शिथिल होताच आवश्यक वस्तूंसाठी, बेगमीच्या वस्तूंसाठी बाजारात गर्दी उसळली. त्याहीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात पुन्हा गौरीगणपतीच्या सणासाठी चाकरमान्यांचे स्वागत करण्यासाठी प्रशासन आणि राजकारणी उत्सुक आहेत. मात्र, हे करताना रुग्णसंख्या अधिक वाढल्यास त्याचे स्पष्ट नियोजन कुणाहीकडे नाही.

..तरीही चाकरमानी येणार म्हणतात. या, कोकण आपलाच आसा. पण येताना कृपया या सर्व परिस्थितीचा विचार करून या. गणपती पुढल्या वर्षी परत येतील. पण आज जवळचे मित्र व नातेवाईक गमावत असताना जिवाचा मनापासून विचार करा. तुमच्या गावाकडचे लोक यंदा खचले आहेत. पुरेशा सोयीसुविधा नाहीत. हातात ठीक पैसा नाही. हे एक वर्ष आपण हा सण आपल्या घरी केला तर? पुढच्या वर्षी चाकरमान्यांनो, वाजतगाजत या. पण या वर्षी इकडच्या व्यवस्थेवर ताण येऊ देऊ नका.

nandini2911@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:09 am

Web Title: article on while corona is spreading people are going for ganpati festival in konkan abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण क्रांतिकारी; पण अंमलबजावणीचे आव्हान!
2 नव्या धोरणातले उच्च शिक्षण..
3 आता जबाबदारी राज्यांची!
Just Now!
X