अशोक कृ. कुलकर्णी

अलीकडेच रासायनिक कारखान्यांत स्फोट होण्याच्या घटना घडल्या. हे स्फोट होण्याची कारणे काय आहेत?

रसायने आपल्या आधुनिक जगाचा भाग बनली आहेत. विविध वस्तू, ऊर्जा उपकरणे तयार करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण कार्ये करण्यासाठी ती वापरली जातात. दुर्दैवी वास्तव हे आहे की, या रसायनांमुळे धोकादायक स्फोट होऊ शकतात आणि किंमत मोजावी लागते ती तेथे काम करणाऱ्या कामगारांना. त्याशिवाय कारखान्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना. अलीकडेच महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये एकामागून एक रासायनिक कारखान्यांत स्फोट झाले.

रसायनांच्या वापराद्वारे आणि निर्मितीद्वारे उष्णता वाढविता येते. उष्णता आणि रसायने एकत्र केल्यावर उद्भवू शकणाऱ्या प्रक्रियांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात स्फोट होऊ शकतात. यामुळे कंपनीतील मालमत्तेचे अतोनात आर्थिक नुकसान होतेच; शिवाय त्या वेळी तेथे काम करणाऱ्यांचे शरीर भयानकरीत्या भाजणे, फुप्फुसांचे प्रचंड नुकसान होणे अशा दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते.

या स्फोटांची कारणे काय असतात?

जर कंपनीतील पर्यवेक्षकांकडे किंवा मालकांकडे या कारणांची चौकशी केलीत तर ते सहजपणे उत्तर देतील, ‘‘काय करणार हो, हे कामगार ना अतिशय निष्काळजीपणे काम करतात. दिलेली वैयक्तिक सुरक्षा साधने वापरीत नाहीत, म्हणून हे अपघात होतात.’’ पण हे स्वत:चा निष्काळजीपणा लपवणारे उत्तर आहे.

प्रत्यक्षातली कारणे अशी आहेत :

(१) यंत्रसामग्रीची देखभाल न करणे, त्याकडे दुर्लक्ष करणे. (२) खराब झालेली (अकार्यक्षम), धोकादायक उपकरणे. (३) धोकादायक गंज आणि तो दिसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणारे व्यवस्थापन. (४) बॉयलरची दुर्लक्षित देखभाल. (५) अशुद्ध झालेल्या रसायनांचा वापर. (६) रसायनांवरील चुकीचे लेबिलग. (७) सुरक्षा नियमांचे पालन न करणारे कामगार आणि त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करणारे व्यवस्थापन. (८) कामावर असताना विडी, सिगरेट ओढणारे कामगार आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे व्यवस्थापन. (९) प्रचलित सुरक्षा कायद्याचे पालन न करणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकारी अधिकारी.

वर दिलेली सर्व कारणे टाळता येणारी आहेत. कशी ते पाहू या..

(अ) यंत्रसामग्रीची देखभाल : रासायनिक कारखान्यातील यंत्रसामग्री ही तशी गुंतागुंतीची असते. या यंत्रसामग्रीबरोबर आलेले ‘मॅन्युअल’ वाचले पाहिजे. त्याचे प्रशिक्षण सर्व संबंधितांना दिले पाहिजे आणि त्याचे काटेकोर पालन केले पाहिजे.

(आ) अकार्यक्षम, धोकादायक उपकरणे : खराब झालेली उपकरणे जुगाड (मेक-शिफ्ट) पद्धतीने दुरुस्त करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. शक्यतो ती नवीनच घ्यावीत. तोच नियम धोकादायक उपकरणांबाबतही लागू करावा.

(इ) धोकादायक गंज : हा अतिशय खोलवर अभ्यासाचा विषय आहे. गंज काढून त्यावर गंजरोधक रसायन लावणे हा तात्पुरता उपाय तर करावाच; पण तो का निर्माण झाला व तो होऊच नये, यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे आणि त्याची अंमलबजावणी करावी.

(ई) बॉयलरची दुर्लक्षित देखभाल : रासायनिक कारखान्यात बॉयलरचे अस्तित्व बहुतांशी असतेच. तो बॉयलर म्हणजे एक प्रकारचा शक्तिशाली बॉम्बच म्हणता येईल. त्याच्या नियमित देखभालीत जराही दुर्लक्ष चालणार नाही. त्यातील अनुभवी माणसांना काही काळानंतर त्याचे महत्त्व वाटेनासे होते, म्हणून त्यांना पुन:पुन्हा प्रशिक्षण देऊन जागे करणे आवश्यक असते.

(उ) अशुद्ध झालेल्या रसायनांचा वापर : याबाबत रसायनांची साठवण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. रसायनांच्या साठवणीबाबतच्या अटी (योग्य तापमान, योग्य दाब, ज्यात ते ठेवायचे त्यासाठी योग्य धातूची निवड इ.) न पाळल्यास रसायने खराब होणारच. शिवाय त्या रसायनांचे शेल्फवरील आयुष्यही महत्त्वाचे आहे. त्यात इतर घाण (धुलीकण वगैरे) जाऊ नये ही काळजीसुद्धा घेतली पाहिजे. त्यांची नियमित देखभाल अनिवार्य ठरते.

(ऊ) रसायनांवरील चुकीचे लेबिलग : लेबिलग ही कुठल्याही रासायनिक कारखान्यात घ्यायची प्राथमिक खबरदारी आहे. यात चूक झाली तर मोठा अपघात होऊ शकतो. सुरक्षितता या विषयात एक वाक्य नेहमी वापरले जाते, ते असे- ‘छोटय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष केले नाही तर त्या छोटय़ाच राहतात.’ लेबिलगबाबतही ते खरेच आहे.

(ए) सुरक्षा नियमांचे पालन न करणारे कर्मचारी : कुठलाही नियम कसा तोडावा, यात माणसे आपली बुद्धी खर्ची घालतात. मात्र कारखान्यांत सुरक्षा नियम पाळावेत. त्यासाठी प्रशिक्षणाचा भडिमार आणि शिस्तीचा बडगा या दोन्हींचा उपयोग केला पाहिजे.

(ए) विडी/सिगरेट ओढणारे कर्मचारी :  कंपनीच्या गेटवरच जर कर्मचाऱ्यांची झडती घेतली, तर यास आळा बसेल. शिवाय प्रशिक्षणही चालूच ठेवावे.

(ऐ) प्रचलित सुरक्षा कायद्याचे पालन न करणे : यात पहिली बाब ही की, कारखान्याच्या व्यवस्थापनाला सुरक्षा कायद्याचे ज्ञानच नसते आणि ते जाणून घेण्याची इच्छाच नसते. सुरक्षा अधिकाऱ्याला एकच सूचना व्यवस्थापन देते-  ‘सरकारी अधिकारी (सुरक्षा कायद्याची पालन होते की नाही ते पाहणारे) कंपनीत न येतील हे बघा.’ ही वृत्ती सोडायला हवी आणि कायद्याचे पालन करायला हवे.

कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी कठीण असते, पण सुरुवात केली तर कठीण असलेली गोष्टही सोपी होते. रासायनिक कारखान्यांनी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

(लेखक सुरक्षितता तज्ज्ञ आहेत.)

akkulkarni5@yahoo.com