किरणकुमार जोहरे

तशी उशिराच सुरू झाली असली, तरी राज्यभर सर्वत्र थंडी आहे. राज्याच्या विविध भागांत तापमानात लक्षणीय चढउतार अनुभवास येत आहे. त्याच्या तपशिलांचा हा अन्वय..

बेसुमार वृक्षतोड, औद्योगिकीकरण यामुळे महाराष्ट्राचे वातावरण बदलले आहे. शरीरातील रक्त व हाडे गोठविणाऱ्या थंडीकडे महाराष्ट्राची वाटचाल सध्या सुरू आहे. येत्या काळात तापमान आणखी घसरेल. काश्मीरमधील बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये थंडीत वाढ होत आहे. नाशिकमधील निफाडची वाटचाल शून्य अंश सेल्सिअसकडे सुरू आहे. तापमानातील घसरणीमुळे येत्या काळात उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पारा पाच अंश सेल्सियसपेक्षाही खाली जाऊ शकतो. दिवसापेक्षा सायंकाळी तसेच रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जास्त जाणवणार आहे. २०१९ च्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ पावसानंतर आता उशिरा सुरू झालेल्या हिवाळ्याने २०२० हे वर्ष ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडीकडे वाटचाल करू लागले आहे.

जगभरात, गेल्या काही वर्षांत उष्ण व शीत अशा दोन्ही लहरींची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरात घडणाऱ्या अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या घटनांबद्दलही अशीच परिस्थिती आहे. आशिया खंडातील भारतही त्यास अपवाद नाही.

भारतात ‘थंडीची लाट’ म्हणजेच शीतलहर सामान्यत: ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ म्हणजे पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावाने येते. भूमध्य समुद्रावरून वाटेत बाष्पयुक्त ओलावा घेतल्यामुळे उत्तर व वायव्य भागात पाऊस व बर्फवृष्टी होते. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जवळपासच्या भागात बर्फवृष्टी किती प्रमाणात होते, यावरही थंडीची तीव्रता अवलंबून असते. दिल्ली येथील तापमान १.७ अंश सेल्सिअस इतके घसरले होते, जे गेल्या ११८ वर्षांतील सर्वात निचांकी तापमान ठरले होते. उत्तर भारतात एकाच दिवशी ४२ जणांचा थंडीने गारठून मृत्यू झाला होता.

जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भाग, उत्तर अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उत्तर इराणच्या काही भागात आता थंडीची लाट पसरली आहे. या सर्व भागांत गेल्या काही दिवसांपासून सरासरी तापमान १ डिग्री सेल्सियस तापमानापेक्षा कमी राहिले आहे. उत्तर-मध्य चीन आणि मंगोलियामध्येही अशीच परिस्थिती आहे. हे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ने आणलेल्या थंडीत अधिकच भर घालू शकते. परिणामी महाराष्ट्रासह देशात जागोजागी नव्या वर्षांत थंडीचे आणखीही नवे विक्रम होऊ शकतात.

तापमानात जेव्हा अचानक- म्हणजे अत्यंत कमी वेळात दहा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घट होते, त्याला ‘कोल्ड स्ट्रोक’ असे म्हटले जाते. ‘कोल्ड स्ट्रोक’चा धोका असल्याने सर्दी-खोकला-ताप, सांधेवात, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, अस्थमा असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच लहान मुले, वृद्धांची विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. माणसांमध्ये थंडीने रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होऊन हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. विशेषत: सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास तापमानात वेगाने घट होताना दिसून येत आहे.

नागपूरचे तापमान ५.१ अंश सेल्सिअस इतके घसरले होते. मागील वर्षी नागपूरने किमान तापमानाचा उच्चांक गाठला होता. २९ डिसेंबर २०१४ रोजी त्या वर्षीचे सर्वात कमी तापमान ५ अंश सेल्सियस नोंदविले गेले होते. ७ जानेवारी १९३७ रोजी नागपूरचे सर्वात कमी तापमान ३.९ अंश सेल्सिअस असे विक्रमी होते. यानंतर २९ डिसेंबर २०१८ रोजी हा विक्रम ३.५ अंश सेल्सिअसने मोडला होता.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका आहे. एकाच दिवसात सात ते आठ अंशांनी तापमान घसरण होणे हे नाशिककरांनी अनेकदा अनुभवले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील दविबदू गोठलेले चित्र नाशिकमधील निफाड येथे दिसून आले आहे. यंदा १७ जानेवारी रोजी नाशिकमधील निफाडचे तापमान १.८ अंश सेल्सिअस झाले होते. याच वेळी महाबळेश्वरमध्ये ५, धुळे ६.६, पुणे ८.२, मुंबई १०, नागपूर १३.८, औरंगाबाद ८.१, पालघर १४, सांगली १६ अंश सेल्सियस असे वेगाने तापमान घसरले आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिकमधील दिक्षी, रानवड आदी ठिकाणी दविबदू गोठले होते. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १० तर कमाल २७ अंश सेल्सियस होते. म्हणजे दिवसभरात तब्बल १७ अंशांची घट होत ‘कोल्ड स्ट्रोक’ मुंबईकरदेखील अनुभवत आहेत.

कुठल्याही प्रकारचे उंच डोंगर किंवा पर्वत नसलेल्या निफाडमध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीची पिके (द्राक्ष, ऊस, कांदा, गहू, डाळिंब) यांची रेलचेल आहे, जी निफाडमध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकवून ठेवते. थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाडमध्ये दीपावलीनंतर लागवड होणारा रब्बी हंगामातील गहूदेखील चांगल्या प्रकारे पिकतो. निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. निफाडमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, जो जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो आणि परिणामी हवेचे तापमानदेखील घटते. वाऱ्यांची कमी गती तापमान कमी ठेवण्यास पूरक आणि महत्त्वाचा भाग ठरते.

मोकळे आकाश असल्याने पाऊस व गारपिटीचा धोका नाही. मात्र धुके व दव यांपासून पिकांचे संरक्षण आवश्यक. अचानक घटलेल्या या तापमानाने बागा उद्ध्वस्त होण्याचीही शक्यता आहे. जेव्हा तापमान अचानक दहाहून अधिक अंशांनी घटते, तेव्हा झाडांनादेखील एक प्रकारचा ‘अटॅक’ येऊ शकतो. केळी, द्राक्ष, भाजीपाल्याची पिके, रब्बी पिके अशा थंडीत मृतप्राय होऊ शकतात. तापमानात अचानक झालेली ही घट प्राणीमात्रांसह पिकांनाही हानीकारक ठरणारी आहे. मात्र रब्बी व बागायती पिकांना या थंडीचा फायदा होणार आहे. ‘ग्लोबल टू लोकल’ अशा या वातावरणातील बदलांचा थेट परिणाम आपल्या घरावर होत असल्याने तो समजून घेत याचा सामना करायला हवा.

(लेखक हवामानविषयक अभ्यासक आहेत.)

kkjohare@hotmail.com