News Flash

‘जेएनयू’वर हल्ला का झाला?

केंद्रीय सत्ता दररोजच्या आयुष्यात हस्तक्षेप करते असा अर्थ होतो. हे केवळ कुप्रशासन नव्हे, तर वैचारिक अधिसत्ताकरण असते.

(संग्रहित छायाचित्र)

प्रा. मिलिंद आवाड

उदारमतवादी लोकशाही चौकटीत टीका-टिप्पणी वा विरोधी मत मांडण्यासाठी किती अवकाश मिळतो, त्यावर ती लोकशाही किती सकस आहे हे ठरते. असा अवकाश विद्यापीठांमध्ये नाही मिळाला, तर कुठे मिळणार?

‘जेएनयू’वरील हल्ला म्हणजे फक्त निवडणुकीचे राजकारण नव्हे. केंद्रस्थानी असलेली सत्ता निरपेक्ष वा तटस्थ राहणे अपेक्षित असते; पण सद्य:स्थितीतील ही सत्ता ‘प्रचार(प्रपोगंडा)वादी’ आहे. जेव्हा देशात प्रचारवादी सत्ता स्थापन होते, तेव्हा नेहमीच उजवी विचारसरणी अधिक प्रबळ व्हायला लागते. भारतात सध्या ही प्रक्रिया पाहायला मिळत आहे. प्रत्येक संस्थेमध्ये उजव्या विचारांचे लोक असतात; पण गेल्या पाच वर्षांमध्ये अशी मंडळी फाजील आत्मविश्वासाने वावरायला लागलेली दिसतात. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली वा कुलगुरू नामानिराळे राहतात असे जेएनयूवरील हल्ल्यासंदर्भात बोलले जाते, तेव्हा केंद्रीय सत्ता दररोजच्या आयुष्यात हस्तक्षेप करते असा अर्थ होतो. हे केवळ कुप्रशासन नव्हे, तर वैचारिक अधिसत्ताकरण असते.

देशात लोकशाही मूल्यांच्या आधारावर अनेक संस्था उभ्या राहिल्या. उदा. विद्यापीठे वा नियोजन आयोग. या संस्थांना महत्त्व प्राप्त झाले, याचे कारण त्या संस्थांना लाभलेले बौद्धिक अधिष्ठान. लोकशाहीच्या मूलभूत संरचनेचे काम करण्यासाठी त्यांची स्थापना झाली. विशेषत: विद्यापीठीय संस्था निव्वळ पायाभूत सोयीसुविधा मिळाल्या म्हणून उभ्या राहत नाहीत. जेएनयू हजार एकरांत पसरलेले आहे म्हणून या विद्यापीठाला प्रतिष्ठा लाभलेली नाही. देशाच्या विविध शैक्षणिक संस्थांकडे शेकडो एकरचे कॅम्पस आहेत. पण हे विद्यापीठांच्या विद्वत्तेचे लक्षण नव्हे. तर, त्या विद्यापीठांचे बौद्धिक संचित हे त्यांच्या यश-अपयशाचे गमक असते.

गेल्या तीस वर्षांतील जेएनयूमधील बौद्धिक संचित देशाची लोकशाही दृढ करणारे ठरते. देशाला सर्वाधिक नोकरशहा जेएनयूनेच दिलेले आहेत. हा उल्लेख एवढय़ासाठी की, जेएनयू आणि महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यापीठाची तुलना करा; ही विद्यापीठे निव्वळ परीक्षा केंद्रेच असावीत इतकी त्यांची शैक्षणिक दुरवस्था झालेली पाहायला मिळते. पण म्हणून जेएनयू हे स्पर्धा परीक्षांचे केंद्र नाही, तर तिथे संशोधन होते. प्रमाणशास्त्रांची जोपासना करून बुद्धिविकासाचे काम करताना समाजातील सर्वच गोष्टींवर वैचारिक चर्चा घडवून आणणे हे विद्यापीठाचे काम असते. सामाजिक चळवळ समाजाला विचार करायला भाग पाडते, समाजाला दिशा देते; तसे विद्यापीठ बौद्धिक निकषांवर विचार करायला भाग पाडते. जेएनयू ते सातत्याने करताना दिसते. जेएनयूने नोकरशहा पुरवले असतील, पण ते निव्वळ परीक्षा केंद्र कधीच बनले नाही. जेएनयूमध्ये अनेक वैचारिक अभिजन आहेत आणि ते समाजातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांशी जोडलेले आहेत. त्यांचे अभिजन असणे बिनबुडाचे वा निव्वळ बौद्धिक चर्चा करण्यापुरते सीमित नाही. त्यामुळे हा अभिजनवर्ग जैविक आहे. खासगी विद्यापीठांमध्येही अभिजन आहेत; पण त्यांची समाजाशी खोलवर नाळ जोडलेली आहे असे म्हणता येत नाही. देशाच्या बौद्धिक परिप्रेक्ष्यात जेएनयूला महत्त्व आहे, कारण देशातील जैविक विचारवंतांचे ते संवर्धन करते. समाजातील सर्वच प्रश्नांवर बोलले पाहिजे यासाठी बौद्धिक क्षमता तयार करते. जेएनयू जसे अभिजनांचे केंद्र आहे, तसेच समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून देणारी संस्थाही आहे. जेएनयूप्रमाणे आयआयटी, दिल्लीतील सीएसडीएस, टाटा समाजविज्ञान संस्था वा बेंगळूरुमधील समाजशास्त्र संस्था अशा देशातील अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या साऱ्या संस्था जागतिक दृष्टिकोनातून वैचारिक चिंतनाला प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात. वैशिष्टय़ातून वैश्विकतेकडे जाणाऱ्या ठरतात. त्यामुळेच जेएनयू तुम्हाला तात्त्विकदृष्टय़ा वैश्विक बनवते. म्हणूनच जेएनयूचे संवर्धन देशातील लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी गरजेचे आहे!

एखाद्या देशात लोकशाही मूल्ये किती रुजली आहेत, हे तपासायचे असेल तर ते त्या देशातील पोलिसांचे वर्तन बघून कळते, असे म्हटले जाते. अधिक गांभीर्याने विचार केला, तर उदारमतवादी लोकशाही चौकटीत टीका-टिप्पणी वा विरोधी मत मांडण्यासाठी किती अवकाश मिळतो, त्यावर तिथली लोकशाही किती सकस आहे हे ठरते. हा अवकाश विद्यापीठांमध्ये मिळाला नाही तर कुठे मिळणार? जेएनयूमध्ये हा अवकाश अजूनही मिळताना दिसतो. गेल्या आठवडय़ातील घटनांमुळे हा अवकाश काढून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला असे म्हणावे लागते. आजघडीला देशात विद्यापीठीय चिंतन काय असावे, हे जेएनयू ठरवते. त्यातील अनेक जण देशाची धोरणे ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत, राजकीय चिंतक आहेत आणि तरीही ते शासनाचे अंग बनलेले नाहीत. हे सगळे त्यांची वैचारिक स्वायत्तता टिकवून आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. अशा विचारवंतांना वैचारिक स्वायत्ततेची गरज असते आणि ती जेएनयूने आत्तापर्यंत पुरवलेली आहे. तिच्या या स्वायत्त क्षमतेमुळे जेएनयूला लक्ष्य बनवले जात आहे. गेल्या आठवडय़ातील हल्ला हा त्याचाच भाग आहे.

जे शिक्षित आहेत ते बुद्धिजीवी आहेत, असा समज खूप पूर्वीपासून निर्माण झालेला आहे. हा समज जेएनयूने मोडून काढला. सामाजिक उत्तरदायित्व घेऊन, समाजाशी नाळ जोडून सातत्याने विचार करणारी माणसे बुद्धिजीवी असतात. अशी माणसे फक्त एका क्षेत्रात असतात असे नाही. शैक्षणिक क्षेत्रात जशी असतात तशी ती पत्रकारितेत वा नोकरशाहीतही असतात. ही सगळी माणसे सामाजिक जबाबदारी घेत असतात. हीच जाणीव जेएनयूमधील कोणत्याही घटकामध्ये दिसते. जेएनयूवर हल्ला होतो, कारण विद्यापीठातील सामाजिक उत्तरदायित्व मानणारी माणसे पारंपरिक सारासार विचारांच्या विरोधात उभी राहिली आहेत. महाराष्ट्रात पारंपरिक सारासार विचार मोडून काढण्याची ‘परंपरा’ मोठी आहे. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, ‘सुधारक’कार आगरकर, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे या सगळ्यांचा संघर्ष बघा. महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली, अस्पृश्यांसाठी विहीर खुली केली. ही पारंपरिक सारासार विचारांच्या विरोधात केलेली कृती होती. शंभर वर्षांनंतर आता आपल्याला ही कृती म्हणजे सामाजिक विकासाचा मार्ग असल्याचे लक्षात येते. सद्य:घडीला या देशातील उजवा विचार (हिंदुत्व) हा पारंपरिक विचार जोपासून तिचे अधिसत्ताकरण करणारा आहे. उजव्या विचारांचे स्वरूप बहुसंख्य लोकांच्या सारासार विचारांना अग्रभागी मानणारे आहे. हा सारासार विचार बुद्धिप्रामाण्यवादी असतोच असे नाही. हा लोकशाहीवादी, समतावादी, बंधुत्ववादी आहे असेही म्हणता येत नाही. त्यामुळे जेएनयू वा वैचारिक चिकित्सा घडवणाऱ्या विद्यापीठांना, संस्थांना, चळवळींना पारंपरिक सारासार विचारांनी (प्रतिगामी) लक्ष्य बनवलेले आहे.

हे लक्ष्य कसे केले आहे? ‘टुकडे टुकडे गँग’ असा शब्दप्रयोग अलीकडच्या काळात सातत्याने वापरला गेला/ जात आहे. पण हा शब्द कसा आणि कुठून आला? दलित-आदिवासींना आणि त्यांच्या चळवळींना कायद्याच्या कचाटय़ात टाकले, की चर्चेला वावच राहत नाही. ते सगळे शत्रूच ठरवले जातात. बुद्धिवाद्यांच्या अवकाशक्षेत्रात त्यांच्यावर ‘कम्युनिस्ट’ असा शिक्का मारला, की ‘ते आणि आपण’ या विभागणीसाठी बाकी काहीही करावे लागत नाही. राजकीय परिक्षेत्रात हिंदू-मुस्लीम अशी विभागणी केली, की कोण ‘आपले’ हे ठरून जाते. इथल्या उजव्या विचाराने सर्वच परिक्षेत्रांत विरोधाचे लक्ष्य ठरवून टाकले आहे. ‘टुकडे टुकडे गँग’ हे त्याचेच एक उदाहरण ठरते. ही विभागणी इथल्या पारंपरिक विचाराला बौद्धिक आणि शारीरिक हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करते आणि बळ पुरवते. मग हा मुख्य प्रवाही विचार तुम्हाला वाळीत टाकतो. ते शक्य नसेल तर हिंसेच्या बळावर- त्यात वैचारिक हिंसेचाही समावेश होतो- तुम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्ता होत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या विरोधातील संघर्ष केवळ कुठल्या एका राजकीय पक्षाच्या विरोधात केला जात आहे असे नव्हे. हा संघर्ष मानवी मूल्यांचा संघर्ष आहे. पुरोगामी विचार नेहमीच नवी मानवी मूल्ये स्वीकारत असतो. पारंपरिक सारासार विचार नेमका त्याविरोधात असतो. हा विचार त्या त्या काळातील सत्तेबरोबर असूही शकतो. आत्ता पारंपरिक विचार हा सत्ताधाऱ्यांचा विचार बनलेला आहे. हे इतिहासातही घडलेले आहे. या विचारांना विरोध करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह यांना हिंसेच्या माध्यमातून लक्ष्य बनवून पराभूतही केलेले आहे. जेएनयूमध्ये सुरू असलेली वैचारिक स्तरावरील हिंसा वा शारीरिक पातळीवरील हिंसा ही ‘पेरलेला हिंसाचार’ म्हणता येईल. ही पेरलेली हिंसा उजव्या विचारांच्या इतिहासाचे पुनर्चक्र मानता येईल.

जेएनयूवरील हल्ला हा आधुनिक काळातील लोकशाही संस्थेवरील हल्ला आहे. वैचारिक संवर्धन आणि बौद्धिक स्वायत्तता असणाऱ्या समूहावरील हा हल्ला आहे. तो नवी वैचारिक मूल्ये आणू पाहणाऱ्या व्यवस्थेवरील हल्ला ठरतो. म्हणूनच जेएनयूवरील हल्ला हा कोणा राजकीय पक्षावर केलेला हल्ला नाही, केवळ एका गटावर केलेला हल्ला नाही. तो विचारांवरील हल्ला आहे. पण विचारांशी विचाराने लढावे असे मानले तर इथल्या उजव्या विचारसरणीने किती स्तरांवर वैचारिक लढाई लढली? या विचारसरणीने वैचारिक लढाई कधी लढलेलीच नाही असे दिसते. म्हणूनच जेएनयूवरील हल्ला वैचारिक लढाई नव्हे, तर हिंसा आहे.

(लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये अध्यापन करतात.)

शब्दांकन : महेश सरलष्कर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 12:54 am

Web Title: article on why was jnu attacked abn 97
Next Stories
1 असुरक्षित विद्यापीठे हा सरकारचा नैतिक पराभवच!
2 चाँदनी चौकातून : जोर आमचाच!
3 कर्जमाफीच्या चक्रव्यूहात शेतकरी
Just Now!
X