बाबासाहेबांनी १५ मार्च १९२९ च्या ‘बहिष्कृत भारत’ च्या अंकात ‘िहदू धर्माला नोटीस’ हा अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले होते : हल्ली ख्रिस्ती- मुसलमानांच्या, विशेषत: मुसलमानांच्या चढाईच्या धोरणामुळे उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांना िहदूंचे संख्याबळ कमी होत आहे या गोष्टीची जाणीव होत आहे आणि तसे होऊ नये म्हणून त्यांनी संघटन व शुद्धी या चळवळीद्वारे धडपड चालविलेली आहे; परंतु सध्याच्या संघटन व शुद्धी या चळवळी म्हणजे संभावित लफंगेगिरी आहे. मानवी हक्कांच्या पवित्रतेची जेथे भावना नाही, जेथे अन्यायाची व अप्पलपोटेपणाची चीड नाही, जेथे समतेच्या इष्टतेविषयी जळजळीत आस्था नाही, तेथे संघटन व शुद्धी म्हणजे नुसते फार्स आहेत! या नाटकावर बहिष्कृत वर्गाचा विश्वास नाही हे वेगळे सांगावयास नको. ‘तुम्ही आम्ही एक आणि कंठाळीला मेख’ त्यातले हे संघटन आहे आणि सध्याची शुद्धी म्हणजे ‘परभारा पावणेतेरा’पकी प्रकार आहे. उघड विरोध करणारे पुराणमतवादी पत्करले; परंतु शुद्धी – संघटनवाले हे ढोंगी, म्हणून अधिक भयंकर होत. बहिष्कृतांच्या स्वाभिमानपर चळवळीचा दिनेश करणारे, खऱ्या समाजसुधारणेवर व उदारमतवादावर चोरटे हल्ले करणारे लोक हेच सध्या संघटनवाल्यांत शिरले आहेत. ब्रह्मीभूत स्वामी श्रद्धानंद यांच्या पवित्र चळवळीचा या ढोंगी लोकांनी विचका करून टाकला आहे.. िहदू-मुसलमानांत भांडणे लावून देणे हा यांचा धंदाच झाला आहे.. हे निर्लज्ज लोक बहिष्कृतांनी सध्याच्या स्थितीस कंटाळून परधर्मात जाण्याची गोष्ट काढली की, ‘जा, तुम्ही खुशाल परधर्मात जा, आम्हाला तुमची पर्वा नाही, तुमच्या धमक्या आम्ही ऐकून घेणार नाही, तुम्हाला िहदू समाजात राहायचे असेल तर आम्ही वागवू तसेच वागवून घेतले पाहिजे,’ असे म्हणण्यास कमी करीत नाहीत. बहिष्कृत लोकांची इच्छा कोणालाही धमक्या देण्याची नाही. ते परधर्मात जाणे बरे, असे म्हणतात ते िहदू समाजातील जाच असह्य़ झाल्यामुळेच म्हणतात; परंतु या म्हणण्याचा अर्थ धमकी असा करून हे स्वार्थी, लबाड लोक उलट धमकावण्या दाखवितात. तसे करायला ते धजतात याचे कारण असे की, बहिष्कृत वर्ग सामाजिक जुलमाला कितीही कंटाळलेला असला तरी त्याचे िहदू धर्मावर प्रेम आहे व त्या प्रेमाखातर असाच जाच हे यापुढेही सोसतील असे त्यांचे मन त्यांना सांगत असते.
[ मूळ ग्रंथसंदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक – पृ. २४४ (२) ]